जे न देखे रवी...

डेस्टिनेशन ∞

Primary tabs

अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे

चांदणचुर्‍याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे

दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे

मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे

आता फक्त यान कुठचे
इंधन साठवायला कॅन कुठचे
उकडले तर फॅन कुठचे
ह्या प्रश्नांशी लढतो आहे

अनंताच्या यात्रेसाठी
फक्त निघायचं बाकी आहे

सरीवर सरी

हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण).. छानच!

चौथा कोनाडा

भारी !

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
कृृृष्णविवरछाप काजळडब्बी

उल्लेखनीय हे !

आता फक्त यान कुठचे
इंधन साठवायला कॅन कुठचे
उकडले तर फॅन कुठचे
ह्या प्रश्नांशी लढतो आहे

सोप्या प्रश्र्णाचे उत्तर अवघड करुन का शोधत आहात?

पैजारबुवा,