दातही होते, दाणेही होते...
मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं.
मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता. पण वडा अजून तळलेला नव्हता. पुन्हा फक्त एक कप चहा प्यायले. ट्रान्समिशन संपलं. लगेचच प्रोग्रॅम मीटिंग होती. त्यात एक तास वेळ गेला. तेवढ्यात माझी एक कलिग आली आणि म्हणाली,"मला तुझी कायनेटिक दे. मला अर्जंट हाॅस्पिटलला जायचंय. तू आज बसनं जा. तुझी गाडी घरी आणून पोहोचवते." मी तिला किल्ली दिली. नंतर रेकॉर्डिंग्ज होती. असं करता करता साडेबारा वाजून गेले. माझा रिलिव्हिंग ऑफिसर आला होता. माझी ड्यूटी संपली होती. आता घरी जायचं, जाणवलं, खूप भूक लागली आहे. कोपऱ्यावरच्या टपरीवर गेले. वडापाव पुन्हा संपला होता. त्यांच्याकडं मस्तपैकी खमंग भाजलेले शेंगदाणे मात्र होते. प्लास्टिकच्या छोट्या पुड्यांतले. तिथून एक पुडी दाणे घेतले. म्हटलं बसस्टॉपवर बसची वाट बघत बघत शेंगदाणे खाऊ. खाऱ्या शेंगदाण्याची चव आठवून तोंडाला चळ्ळकन् पाणी सुटलं. मी प्लॅस्टिकची पुडी दातांनी तोडून दाणे खाणार, इतक्यात बस येताना दिसली. मी पुडी पर्समध्ये टाकून बस पकडली.
बसमध्ये गर्दी होती. बसायला जागा नव्हती. मग उभ्याने हलत्या बसमधे दाणे कसे खाणार? सीट मिळाली की खाऊ म्हटलं. थोड्या वेळानं बसायला जागा मिळाली. तीही खिडकीजवळ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. म्हटलं, आता मस्तपैकी खमंग भाजलेले शेंगदाणे खात खात घर गाठू.
मी असा विचार करतेय तोपर्यंत शेजारच्या सीटवर कुणीतरी धपकन बसल्याचं जाणवलं.
वळून पाहिलं तर,"अय्या तू?..", ती म्हणाली, "मी तुला मागून पाहात होते. म्हटलं हिच्या जवळ जागा मिळाली तर बरं होईल." ही बाई मला गावात असूनही खूप वर्षांनी भेटली होती. नावही पूर्ण आठवत नव्हतं. अर्धवट ओळख.
माझ्या मनात विचार आला की आता दाणे खायचे म्हणजे हिला एवढ्याश्या पुडीतले निम्मे दाणे देणं आलं. त्याला माझी मुळीच तयारी नव्हती. उतरेल ही बहुतेक मधेच कुठेतरी. बघूया थोडी वाट.
"कशी आहेस?""तू कशी आहेस?" झालं. शेवटी तिला थोडे दाणे देऊन आपणही उरलेले खावेत अशी माझ्या पोटातल्या भुकेनं मला आज्ञा दिली. मी पुडी बाहेर काढणार,तेवढ्यात ती म्हणाली,"तुझे मिस्टर गेल्याचं कळलं ग! फारच वाईट झालं."
(माझे मिस्टर जाऊन त्यावेळी चांगली दोन वर्षं झाली होती. मी दैनंदिन जीवनात रुळले होते.)
"कशानं,कसे गेले ग?" त्यावर मी माझे 'हे' कसे गेले ते सांगायला सुरुवात केली. आता आपला नवरा कसा गेला ते सांगत असताना शेंगदाणे खाणं शक्यच नव्हतं.
मग इतर गप्पा मारल्या. मला मारुतीमंदिरपाशी उतरायचं होतं. ती आधी कुठेतरी उतरेल, मग ती गेल्यावर मी दाणे खाईन, या आशेनं मी तिला विचारले,"तू कुठं उतरणार?"
"मारुती मंदिर ."ती म्हणाली.
झालं!नो चान्स. पुढं आमच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पांमध्ये माझं लक्ष नव्हतं. इतक्यात आमचा स्टाॅप आला. नवीन पत्त्यांची देवघेव आधीच झाली होती. नशीब ती गळेपडू "मी आत्ताच तुझ्याकडे येते" असं म्हणाली नाही. आम्ही उतरलो. एकमेकींना बाय केलं. ती गेल्याची खात्री करून मी शेंगदाणे बाहेर काढले. म्हटलं, घरी पोहोचायला थोडं चालावं लागतं. मोकळ्या रस्त्यावर चालता चालता दाणे खाऊ. मी पुडीत हात घालणार, तेवढ्यात माझ्या शेजारी एक कार येऊन थांबली. मी बघितलं तर ते आमच्याच काॅलनीत राहणारे आमचे शेजारी देशपांडे होते. मिसेस देशपांडे म्हणाल्या,"वैनी, चला गाडीत बसा. तुमच्या घरी सोडतो. ऊन तापलंय. चालत कुठं जाता?"
मी मुकाट्याने पुडी पर्समध्ये ठेवली आणि गाडीत बसले.
घर आलं. देशपांडेना थॅंक्स देऊन आत गेले. घरात कोचावर बसून आरामात दाणे खायचं ठरवलं. पुडी बाहेर काढून खाणार तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या,"भूक लागली असेल तुला. जेवणाची वेळ आहे. उगीच आवडकचवडक काहीतरी खाऊ नकोस. पिटत होईल मग. मी थांबलीय तुझ्यासाठी. जेवण गरम करते, तोपर्यंत फ्रेश हो. जेवायला बसूया. मी पुडी पुन्हा पर्समध्ये ठेवली. फ्रेश झाले. जेवायला बसले.
पुढं ती शेंगदाण्याची पुडी पर्समध्येच राहिली. मऊ पडली. त्यातली सगळी मजाच गेली.
दातही होते,दाणेही होते....पण संधीच नव्हती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover