Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ॐभवति! डोसां देहि!

आ
आजी
Tue, 03/16/2021 - 07:14
💬 63 प्रतिसाद
भुकेवरुन आणखी एक गंमत आठवली. एम.ए.नंतर मला जर्नालिझम करायचं होतं. त्याकाळी प्रत्येक घरात फोन नसायचा. आमच्याही घरी नव्हता. माझं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे मैत्रीणींचाही संपर्क राहिला नव्हता. मला जर्नालिझमची माहिती काढायची होती. प्रवेशाची प्रोसिजर समजावून घ्यायची होती. पण कशी घेणार? त्यावेळी मोबाईल, गुगल वगैरे काही नव्हतं. व्होकेशनल गायडन्सचे कोर्सेस कधी सुरू व्हायचे, कधी संपायचे कळायचं नाही. मी एका निमशहरातून पुण्यासारख्या शहरात एखाद वर्षापूर्वी आले होते. अजूनही घराबाहेर पडलं की बावचळल्यासारखं व्हायचं. जर्नालिझमची इन्स्टिट्यूट कुठं आहे हे माहीत होतं. एप्रिल महिना. मी एकेदिवशी नवऱ्याला म्हटलं,"मी आज जाते, चौकशी करते. "तो म्हणाला,"जा.तिथं जवळच वैशालीत स्पेशल डोसा मिळतो. तो खाऊन ये. मी पण कामावर जातो. आज डबा नको. मी वाटेतच खाईन. तू पळ आता. आल्यावर भेटूच." माझ्या हातच्या जेवणापासून सुटका झाल्याचा आनंद त्याच्या स्वरात जाणवत होता. तेव्हा नऊ वाजले होते. मी बसनं डेक्कनला गेले. इन्स्टिट्यूटजवळ पोचले. भूक लागली होती. म्हटलं, डोसा खाऊन मग इन्स्टिट्यूटमधे आत जाऊ. पण मनात आलं, नको,आधी चौकशी करु आणि मग आरामात डोसा खाऊ. मग इन्स्टिट्यूटला गेले. तिथं कळलं की आजच प्रवेश देणार आहेत. आजच रिटन आहे. इंटरव्ह्यूज आहेत. तिथला क्लार्क मला म्हणाला,"हा अर्ज पटकन भरा. मी सबमिट करुन घेतो. तुमची सर्टिफिकेटस् दाखवा." मी बरोबर नेलेली सर्टिफिकेटस् दाखवली. अर्ज सबमिट केला. अर्ध्या तासात रिटन होती. मी तिथले काही न्यूजपेपर्स वाचले. रोजचा पेपर मी वाचायचीच. रेडिओ वरच्या बातम्या ऐकायचीच. त्यामुळे चालू घटनांचं ज्ञान मला होतं. अर्थात तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हता. एकूण टीव्ही फारसा प्रचलितही नव्हता. मी रिटनला बसले. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. मी सहज चौकशी करायला आले होते. मला काय माहीत की आजच प्रवेश देणार आहेत. मी रिटन दिली. रिटन चांगली झाली. रिटन संपल्यावर काही खावं म्हटलं तर तिथल्या सुपरवायझरनं सांगितले की, लगेचच पेपर तपासून ,पास झालेल्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत. मी वाट पाहत बसले. मनावर ताण आला होता. तिथं आलेल्यांपैकी एक-दोन जणींशी ओळख झाली. काय विचारतील यावर गप्पा मारत बसलो. भुकेनं चक्कर येणार असं वाटलं. "आरामात" डोसा खाण्याची शक्यता आणखी डळमळीत झाली होती. बरोबर नेलेलं पाणी प्यायले. पर्समध्ये एक वितळून मऊ पडलेलं चाॅकलेट होतं. ते तोंडात ठेवलं. तेवढ्यात गलका झाला,"लिस्ट लागली. लिस्ट लागली." मी नोटीस बोर्डसमोरच्या गर्दीत सामील झाले. मी रिटनमध्ये पास झाले होते. इंटरव्ह्यूजच्या यादीत माझं नाव होतं. मला आनंद झाला. भुकेची उफाळून येणारी जाणीव दाबून ठेवत मी लायनीत बसून राहिले. कल्पनेतला वैशाली डोसा पुन्हा पुन्हा आठवत होता. आता गर्दी कमी झाली होती. रिटनमध्ये नापास झालेले घरी निघून गेले होते. लायनीतल्या प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिटे लागत होती. दुपारचे तीन वाजले होते. भुकेनं मी व्याकुळ झाले होते. बरोबर नेलेल्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं. मनातला कुरकुरीत डोसा मऊ पडला होता. सांबार थंड झालं होतं. किमान कुठंतरी पटकन पाणी शोधायला जावं म्हटलं तरी वाटत होतं, तेवढ्यात आपलं नाव पुकारले तर! कोणत्याही उमेदवाराची सनातन भीती असते ती. मी तशीच सुकलेल्या ओठांवरुन जीभ फिरवत बसून राहिले. माझा नंबर आला. मी आत गेले. चेहरा घामेजलेला, सुकलेला, घाबरलेला. मी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर्ड होते की नव्हते? कळेना. मला आत्मविश्वास नव्हता. इंटरव्ह्यू एकदाचा झाला. चक्क समाधानकारक झाला. मी माझ्यामते नीट उत्तरं दिली. तत्कालीन राजकीय घडामोडींचं मला माझ्यामते अचूक ज्ञान होतं. सगळं काम फास्ट चालू होतं. मी इंटरव्ह्यूतही पास झाले. वीस मिनिटात सिलेक्टेड कॅंडीडेटसची लिस्ट लागली. तीत माझं नाव होतं. मला परमानंद झाला. आठ दिवसांत ॲडमिशनचे पैसे भरायचे होते. मी बाहेर आले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. वैशाली समोरच होतं. ..... ..पण मी डोसा खायला गेले नाही. घरातून सकाळी बाहेर पडलेली मी अजूनही घरी आले नाही म्हणून नवरा काळजी करत असेल या विचाराने रिक्षानं तडक घरी गेले. ..हात्तेच्या.. घराला कुलूप होतं. नवरा अजून आलाच नव्हता. मी कुलूप काढलं . आणि गेले. आतडं पिळवटून टाकणारी भूक पोटात घेऊन काॅटवर पडले. पोटात एकाच वेळी भूक आणि एसिड झालं होतं. पण मला खूप आनंदही झाला होता. मला ॲडमिशन मिळाली होती. माझं स्वप्न पुरं होणार होतं. मी पत्रकार होणार होते. पुढे चहा आणि वडापाववर दिवसरात्र बाह्यध्वनिमुद्रण, रेकॉर्डिंग, डबिंग, रिपोर्टिंग करावं लागणार असल्याची ती चुणूक होती. त्या संध्याकाळी घरात दूध, गूळ, पोहे कालवून खाताना मी माझ्या करियरचीच स्वप्नं रंगवत होते...

प्रतिक्रिया द्या
22773 वाचन

💬 प्रतिसाद (63)
B
Bhakti Tue, 03/16/2021 - 11:39 नवीन
डोसा.. मस्तच लिहिलंय..मागेपण तुमच्या लेखात शेंगदाणेही कसे असून खाता आले नाही,हे वाचताना आवडलं..यात डोसाही नाही मिळाला... मस्त अलवार लिहिता.. मार्मिक भाव!! अजून लिहा.वाचत आहे.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 03/16/2021 - 17:29 नवीन
आपल्या मागच्या ' दातही होते, दाणेही होते...' या लेखातही असेच भुकेने व्याकुळ होण्याच्या अनुभवाचे वर्णन आहे. हा ही लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 03/17/2021 - 09:11 नवीन
छान अनुभवकथन . एका चांगल्या करीअरची कायम लक्षात राहील अशी उपासपुर्ण सुरुवात .
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 03/19/2021 - 08:40 नवीन
आजी, लेख आवडला 👍
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 03/21/2021 - 05:02 नवीन
आजी, लेख आवडला... पण मागच्या हि लेखात भुकेने दाणे खाता नाही आलेला अनुभव, या हि लेखात तसेच..पोटाचे खुप हाल केलेत तुम्ही.. हे लेख लिहिताना पोटभर खावून मग लिहिले आहेत असे मानतो..:-) लिहीत रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 03/21/2021 - 08:25 नवीन
एखाद्या ठिकाणी एक पदार्थ चांगला मिळतो, म्हणून रांगेत थांबून तो पदार्थ खाल्ल्यावर, त्या पदार्थाच्या चवीमुळे रांगेत थांबणे, गर्दी इत्यादी गोष्टी अगदी क्वचित जस्टीफाय होतात असे मत बनले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 03/21/2021 - 11:22 नवीन
एखाद्या ठिकाणी एक पदार्थ चांगला मिळतो, म्हणून रांगेत थांबून तो पदार्थ खाल्ल्यावर, त्या पदार्थाच्या चवीमुळे रांगेत थांबणे, गर्दी इत्यादी गोष्टी अगदी क्वचित जस्टीफाय होतात असे मत बनले आहे.
शाविकु जी, तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे, तंतोतंत पण काल्पनिक काही पहायचे का ??? साइनफिल्ड , यांचा सिजन ७ एपिसोड 6 "द सुप नाझी" हा नक्की पहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शाम भागवत Sun, 03/21/2021 - 10:13 नवीन
अरे कुठे नेऊन ठेवलाय आजींचा धागा? त्यांचे घागे भरकाटायला लागले आणि त्यामुळे आजींनी लिहीणेच बंद केले तर? संपादक मंडळ हो, असे झाले तर तुम्हीच जबाबदार!!!!!! 🙏
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 03/21/2021 - 12:42 नवीन
हो धागा भरकटला गेला त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश तसा नव्हता... मी वल्ली मित्राला माझ्या चेष्टेत तसे बोललो, यात काही कोणाला इतर दुखवण्याचा किंवा धागा भरकटावण्याचा उद्देश मुळीच नव्हता.. जे पुढे झाले ते.. झाले गेले.. पुढील वेळेस त्याबद्दल दक्षता घेतली जाईल.. कळावे.. मिपा प्रशासनाने माझे सर्व रिप्लाय येथून डिलीट करावे हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गवि Sun, 03/21/2021 - 12:59 नवीन
हे राम. गणेशा आणि मुवि, चला हातभर लांबीची सुरमई आणि वर फ्रुट पंच पिऊन शांत होऊया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
न
नगरी Mon, 03/14/2022 - 12:10 नवीन
++1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
आ
आजी Mon, 03/22/2021 - 03:05 नवीन
प्रचेतस-"मस्त, खुसखुशीत."अभिप्रायाबद्दल आभारी. सौंदाळा-धन्यवाद. गणेशा,मुक्तविहारी, अधुनमधून प्रचेतस आणि सौंदाळा यांनी एकमेकांना उद्देशून भरपूर लिहलंय. मी त्यात गुंतत नाही. चौथा कोनाडा-तुम्हांलाही माझ्यासारखाच अनुभव आला वाटतं. द्या टाळी. मुक्तविहारी-मलाही आत्ताच्या वैशाली तला डोसा आवडत नाही. रंगीला रतन-"भारी लिहिलंय."धन्यवाद. सौंदाळा-रिपोर्टिंग, रेकॉर्डिंग बद्दल लिहू म्हणता? नक्की लिहेन. गवि-मलाही आत्ताचं वैशाली आवडत नाही. "गेले ते दिवस"असं म्हणायची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच. तुषार काळभोर-तुमच्याशी सहमत. वैशालीत नकोच.'मिपा कट्टा. आंद्रे वडापाव-तुलना आवडली. ॲबसेंट माइंडेड- हलकेच घेतलाय तुमचा अभिप्राय. धन्यवाद. शाविकु-अभिप्रायाबद्दल धन्यवाद. शाम भागवत, Bhakti, टर्मिनेटर -आभारी आहे. थॅंक्यू. रमेश आठवले, सिरुसेरी -बरं वाटलं. समाधान वाटलं. गणेशा- लिहिते आहे. वाचत राहा. शेंगदाणे आणि डोसा, इच्छा असूनही खाणे टळणे हे दोन्ही प्रसंग आधी एकाच लेखात लिहिले गेले होते. पण खूप मोठा लेख होईल म्हणून दोन भागात प्रकाशित केले. त्यामुळे विषयाची पुनरावृत्ती वाटू शकली असेल. पुष्कळ प्रतिसाद आल्याने चुकून एखाद्या प्रतिसादाची नोंद घेणे राहून गेले असल्यास दिलगिरी. सर्व वाचकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/22/2021 - 04:15 नवीन
चला, निदान आमच्या सारखे विचार करणारे, कुणीतरी आहेत तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा