Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... फाल्गुन व. १२ पालखेडला निजामाचा कोंडमारा मराठ्यांची विजयप्राप्ती !

A
Ashutosh badave
Sat, 04/10/2021 - 07:28
बाजीराव शके १६५० च्या फाल्गुन व. १२ रोजी पहिल्या बाजीरावाने पालखेड येथे निजामाचा संपूर्ण मोड केला. या वेळी निजामुल्मुल्काने दक्षिणेत आपले बस्तान नीटपणे बसविले होते. दिल्लीच्या बादशहापासून दक्षिणच्या सहाहि सुभ्यांतून खंडणी घेण्याचा हक्क बाळाजीने मिळविला होता. त्याप्रमाणे मराठे वसूल करीतहि असत, परंतु आतां त्याना धुडकावून लावावे व आपण पूर्ण स्वतंत्र व्हावे असा प्रयत्न निजामाने सुरू केला. कोल्हापूरकर संभाजी महाराज निजामास जाऊन मिळाले. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर हेहि आपल्या बाजूस आहेत असे पाहून वसूल करणाऱ्या लोकांना निजामाने दरडावून विचारले, “खरा वारसरदार कोण? कोल्हापूरकर की सातारकर, ते अगोदर ठरवा. मग खंडणीची बात बोला.” या प्रकारे निजामाचा उद्धटपणा पाहून शाहू राजांस संताप आला. त्यांनी निजामाचे पारिपत्य करण्यासाठी बाजीरावास आज्ञा केली. बाजीरावाने स्वारीची तयारी.करून निजामाचे साह्यकर्ते संभाजीराजे व चंद्रसेन एकत्र होण्यापूर्वीच जालना प्रांत हस्तगत केला व तेथील खंडणी वसूल केली. बाजीरावाचा पाठलाग निजामने मोठ्या कष्टानें केला, पण त्यात त्याला यश मिळाले नाही. मोंगल व मराठे यांच्यात वारंवार चकमकी होऊ लागल्या. शेवटीं पैठणशेजारी पालखेड येथे निजामाचा कोंडमारा केला, फाल्गुन व. १२ रोजी बाजीरावांने पालखेडनजिक आकस्मिकपणे निजामास गांठून त्याला कोंडून धरले. निजामाचा तोफखाना दूर राहिल्यामुळे त्याचे काही चालेनासे झाले. बाहेरचे दळणवळण तुटल्यामुळे कठीण अवस्था निर्माण झाली. दाणावैरण व अन्नपाणी बंद होऊन सैन्याचे हाल होऊ लागले. निजाम अगदी त्रस्त होऊन गेला. त्याचे साह्यकर्ते त्याला मदत करीनात. तेव्हां बाजीरावाशी समेट करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ऐवजखानाच्या मध्यस्थीने कराराची बोलणी सुरू झाली. संभाजी राजांसही आपल्या स्वाधीन करण्याविषयी बाजीरावाने आग्रह धरला. चौथाई व सरदेशमुखीचे हक्क निजामाने मान्य केले. काही किल्ल्यांचीहि प्राप्ति मराठ्यांना झाली. याप्रमाणे मराठ्यांना अनुकूल असा तह झाला. -२५ फेब्रुवारी १७२८

प्रतिक्रिया द्या
849 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा