आवाज बंद सोसायटी
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'.
ध्वनी प्रदूषण
तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.
माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता. शेजारी एखादा जण गायन करत असेल त्यात अन दररोज आठ, नऊ तास अनेक विद्यार्थ्यांनी गायन, वादन करणे यात फार फरक आहे. एकतर रहिवासी भागात गायन क्लास, तो सुद्धा ध्वनीरोधक - साऊंडप्रूफ नसलेल्या घरात चालू असल्याने माझ्या उद्वेगात भर पडत गेली. तेथील वाद्य, गायन आदींचा केवळ मलाच त्रास होत होता असे नाही, तर आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील तो त्रास होत होता पण कुणीही त्याबद्दल संकोचाने आक्षेप घेतला नाही. त्यांचा हा एकप्रकारे निष्काळजीपणाच होता. क्लासच्या संचालक आणि घरमालक यांना या आवाजाच्या प्रदूषणाचे, त्याच्या परिणामांचे काहीच सोयर सुतक नव्हते. त्यांच्या मते त्यांनी चालविलेला हा क्लास त्यांच्या उच्च अभिरूचीचे लक्षण होते.
मला ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि कायदे माहित होते, त्यात आपले मिपाकर सदस्य श्री. वकील साहेब यांनी भर घातली. सरतेशेवटी, श्री. वकील साहेब यांच्या सल्याने मी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची कल्पना गायन क्लासच्या संचालक, त्यांच्या घरमालकाला दिली. अर्थातच पोलीसस्टेशनमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि गायन क्लासच्या संचालकाशी, त्याच्या घरमालकाशी बोलल्यानंतर त्यांनी ती जागा रिकामी केली आणि कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली.
आजकाल आपल्याकडे जल आणि वायू प्रदूषणाबद्दल बरीचशी जागरूकता झालेली आहे. कमीतकमी त्याची चर्चा तरी होते. पण आपल्या समाजात ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता कमी आहे. मोबाईलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.
सततच्या आवाजाच्या गोंधळाने आपली चिडचिड होते. आजूबाजूचे आवाज नकोसे होतात. शांततेची आवश्यकता भासते. अवाजवी, गरजेचा नसलेला आवाज हा देखील प्रदूषणात मोडतो आणि मानवी स्वास्थ्यावर त्याचे परिणाम होतात.
ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे सादरीकरण बनवले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
(क्रमश:)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya