आंबा
आंबा
जन्माने आणि कर्माने कोकणातच वाढल्याने आंबा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. चिपळूण जवळच्या गावात स्वतःची हापूस आंब्याची बाग असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्याने फक्त आणि फक्त हापूस आंबाच आवडणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य मी आजतागायत पार पाडत आले आहे. घरी तसे इतरही आंबे असतातच. पण एकदा जी हापूस ची गोडी लागली ती काही अजून सुटायला मागत नाही. मुंबई ला कामाला असताना देखील भर मे महिन्याच्या कोकण रेल्वे च्या चेप गर्दीत देखील आंब्याचे बॉक्स घेऊन ठाणे स्टेशन ला उतरलेली आहे. दुर्दैवाने लेडीज डबा अगदीच प्लॅटफॉर्म च्या एका टोकाला नि मला जायचं दुसऱ्या टोकाला, हमाल पण दिसत नव्हता, अशा वेळी जराही लाज न बाळगता दोन्ही बॉक्स खांद्यावर नि पाठीला सॅक अशा अवतारात सगळा प्लॅटफॉर्म पालथा घालून वर सगळा रस्ता तुडवून घरी गेलेली आहे. तेव्हा आंब्यासाठी काहीही या सदरात मी मोडते. जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे या प्रश्नाला आंब्याच्या सिझन मध्ये तरी खाण्यासाठी जगणे हेच माझं उत्तर असत. अगदी डायट चालू करायची वेळ आली तरी, जरा पोटभर आंबे खाते नि मग उपाशी राहते अस माझं उत्तर असत.
आमच्याकडे आंबे हे मे महिन्याशिवाय होत नाहीत. मे महिना आला की आंबे काढणी आणि मग ते आढित घालून पिकयाला ठेवायचे. हे 7 ते 8 दिवस खूप संयमाचे असतात. मग मात्र जो उत्सव सुरू होतो तो जून पावेतो चालू राहतो. सुरवातीचे आंबे हे " ग्राहक ही देवता है" या न्यायाने जेव्हा भाव चांगला असतो तेव्हा बाहेर पाठवून होतात.त्यामुळे लोकांचे आंब्याचे फोटो बघूनही आम्हाला धीर धरावा लागतो. एकदा 10 मे तारीख उलटली की आंब्याचा भाव घसरतो आणि मग उरलेला सगळा आंबा आपला हे जाणवून मानसिक समाधान होत. आता उरलेला असला तरी गाळीव मात्र नक्कीच नसतो. एकेक अस्सल फळ असत. 300 ग्राम नि त्या वर वजनाला भरणारी फळ तशीही बाहेर विकायला जात नाहीत, कारण त्यांना तेव्हढा भाव मिळत नाही. त्यामुळे इथून पुढे ऐश चालू होते. या दिवसात पोळी नि रस एवढंच जेवण पुरत, पोळी बरोबर भाजी, कोशिंबीर, चटणी ,लोणचं यातलं काहीही लागत नाही. रस मात्र अगदी पोटभर हवा. एक बाउल, दोन बाउल अस मोजून खाणं माहीतच नाही. सरळ बऱ्यापैकी आकाराची तासराळी घ्यायची. म्हणजे परत परत भरायचा त्रास नको. दुपारी पोटभर रस खाऊन मस्त ताणून द्यायची. संध्याकाळी साधं जेवण आणि स्वीट डिश म्हणून परत आंबा. शिवाय अधे मध्ये भूक लागेल तेव्हा सुद्धा आंबा हाच पर्याय जो सर्वमान्य असतो.या आंब्याचा चुकूनही कंटाळा येत नाही. इतकं आंबा प्रेम उतू जात असत आमचं. एक वेळी कमीत कमीत 3/4 आंब्याचा रस मीच सहज खाते, तर बाकी भावांची बातच विचारू नका. त्यातही रस हा नुसता रसासारखा खायचा. त्यात दूध, तूप, मिरपूड असलं काहीही न मिसळता , गाठी असलेला रस खायचं समाधान खूपच. मे महिना असल्याने पंगतीला पाहुणे असतातच. कोकण बाहेरचे असतील तर घरातल्या सगळ्यांच आंबा प्रेम पाहून चकितच होतात. बाधणार नाही एवढा आंबा खाऊन? या त्यांच्या प्रश्नावर नाही म्हटलं तरी हसू येतं. पण अशा वेळी दिवेकर बाईचं पटत, जिथे जे पिकत ते खावं.(सोयीस्करपणे प्रमाणात हे विसरते मी.) पण लहानपणापासून सवय असल्याने आजपर्यंत आंबा मला कधीही बाधला नाही.
जून ची 10 तारीख झाली की मात्र हापूस आंबा संपायला लागतो. आता पुढच्या वर्षीशिवाय दर्शन नाही.अर्थात कॅनिंग करून रसाच्या बाटल्या असतातच भरलेल्या ज्या 12 महिने उपलब्ध असतात. पण ताजा रस तो शेवटी ताजाच.
आणि मग आता वेळ येते ती इतर आंब्यांची. आमच्या कडे इतरही आंब्यांच्या जाती आहेत. पण हापूस संपला की मग त्यांच्याकडे नजर वळते. तोवर त्यांचाकडे ढुंकून देखील बघणं होत नाही. रत्ना नावाचा मस्त आंबा असतो. मोठ्ठं फळ असत एकदम. त्याचा रसही एकदम भरपूर निघतो. आंबा खराब निघण्याच प्रमाणही खूपच कमी आहे. त्याचबरोबर गोलांबा म्हणून पण एक आहे. तोही चवीला छान असतो. याच फळ छोटं असल तरी गोडीला सुंदर असतो. हापूस संपल्यावर मग आमची गाडी यांच्याकडे वळते. खर तर वेगळी जात म्हणून हे दोन्ही शिवाय रायवळ, पायरी वेगळं स्थान राखून आहेत. पण हापूस पुढे या जाती नाही म्हटलं तरी दुर्लक्षित होतात. जेव्हा पर्याय नाही तेव्हा माझ्यासारखी माणसं यांचा विचार करतात. काही जवळची माणसं देखील आहेत ज्यांच्या घरी ढिगाने हापूस असून देखील ती हापूस ला स्पर्श देखील करत नाहीत. मला खरंच आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटतं. लोक हजारो रुपये मोजून त्यांच्याकडून आंबा घेतात आणि हे घरात समोर रसाच पातेलं असून निर्विकार मनाने भाजी पोळी खातात.मानलं बाबा यांना.
असो तर आंबा हे माझं अत्यंत आवडत फळ आता या सिझन साठी संपत आलेलं आहे. त्याची भेट आता पुढच्या वर्षी. तोवर रत्ना, गोलांबा यावर ताव मारणे. आणि नंतर बाटलीतील रस खाऊन समाधान मानून घेणे.
🍑
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh