कवीचा मृत्यू आणि इतर..
एक ऑनलाईन शोकसभा..
फार चांगला होता
मनमिळावू
कष्टाळू
एकांतप्रिय होता
कोऑपरेटीव्ह नेचरचा होता
हसतमुख होता
कविता पण लिहायचा
मला त्यातलं एवढं कळत नाही
पण चांगल्याच असतील..
पाठवत असायचा इकडे तिकडे
पण छापायचेच नाहीत हो कुणी
लोकांना किंमत कळली नाही त्याची
आता कोण पाठवणार मला कविता..!
एका ग्रुपवर कळलं सकाळी
वाचून धक्का बसला
मग लगेच बाकीच्या ग्रुपवर सगळ्यांना कळवलं
सगळ्यांना धक्का बसला
शाळेतल्या मित्रांना धक्का बसला
कॉलेजच्या मित्रांना धक्का बसला
जुन्या कलीग्जना पण धक्का बसला
धक्का सगळ्यांना घरच्या घरीच बसला
कुणाला बेडवर लोळताना बसला
कुणाला दाढी करताना करताना बसला
कुणाला पेपर चाळताना बसला
ह्याला दोन मिनिटांचा बसला
त्याला दीडच मिनिटांचा बसला
पण हा ही म्हणतो, 'अजून सावरलो नाही'
आणि तो ही म्हणतो, 'अजून सावरलो नाही'
वेळ लागेल..ह्या धक्क्यातून सावरायला..
तरी अंदाजे किती वेळ लागेल??
ते आत्ता लगेच कसं काय सांगता येईल..!
असं कसं काय झालं पण?
घरी कोण कोण असतं त्याच्या ?
माहिती घ्यायला पाहिजे
बरीच वर्षे कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आम्ही
होता होईल तेवढं करूया
कुणीतरी इनिशिएटीव्ह घ्या
येस सर.. येस सर.. जरूर
वाईट झालं
विश्वासच बसत नव्हता
ह्याचाही विश्वास बसत नव्हता
त्याचाही विश्वास बसत नव्हता
त्या तिकडे रस्त्यावरून एक मनुष्य चाललेला आहे,
त्याचा बसत असेल का विश्वास??
विचारायला पाहिजे एकदा..!
गेल्याच महिन्यात बोलणं झालं होतं
गोव्याचा प्लॅन करूया म्हणत होता
गोवा म्हटलं की एक्साईट व्हायचा
पण आता कुठलं गोवा अन् कुठलं काय..!
सगळंच राहून गेलं
ह्याला ही दु:ख झालं
त्याला ही दु:ख झालं
दोघं एकमेकांशी बोलले
मग दोघांनाही अजून दु:ख झालं
किंवा तसा भास झाला
ठसा उमटवून गेला
चटका लावून गेला
डोंगर कोसळला
पहाड कोसळला
कडा कोसळला
आभाळ कोसळलं
फक्त आठवणी राहिल्या
पोकळी निर्माण झाली
व्हॅक्यूम क्रिएट झाला
भरून निघणार नाही
सगळ्यांनी मिळून कविता छापूया त्याच्या
हीच खरी श्रद्धांजली होईल
सगळ्यांनी आठवणीत जपून ठेवूया त्याला
तीच खरी श्रद्धांजली होईल
सोसण्याचं धैर्य मिळो, ही प्रार्थना
आत्म्यास शांती मिळो, ही प्रार्थना
हे मिळो ते मिळो, ही पण प्रार्थना
अजून कुणाला काही बोलायचं आहे का?
आय थिंक.. झालं सगळ्यांचं सर
ओके.. ओके.. कनक्ल्यूड करूया का मग आता?
येस सर.. येस सर..
आता आपण दोन मिनिटं मौन पाळूया
कुणाचा तरी माईक चालूय बहुतेक
सगळा नॉईज येतोय पाठीमागचा
बरं दिसतं का हे ?
म्यूट करा सर्वांनी प्लीज
दोन मिनिटं मौन.
आभारी आहे
कार्यक्रम संपला असं जाहीर करतो
चॅट-बॉक्समध्ये RIP आणि पुष्पगुच्छांच्या दोन इमोजी..
खतम.
💬 प्रतिसाद
(3)
स
संजय पाटिल
Tue, 06/22/2021 - 06:21
नवीन
आज काल कोरोना मुळे जाणार्यांना अशीच श्रद्धांजली द्यावी लागतेय!
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 06/22/2021 - 08:42
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 10/04/2021 - 09:36
नवीन
रचना आवडली.
सं - दी - प
- Log in or register to post comments