भारतीय टायटॅनिक - एस. एस. रामदास
१७ जुलै १९४७ या दिवशी एस. एस. रामदास ही बोट रेवसजवळच्या काशाच्या खडकाजवळ उलटली. या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हढी माहिती नाही. त्याबद्दल थोडंसं -
एस. एस. रामदास ही बोट सिंदीया स्टीमशिप कंपनीच्या मालकीची होती. ही कंपनी मुंबई पासून गोव्यापर्यंत कोकणाच्या वेगवेगळ्या बंदरांपर्यंत प्रवासी वाहतूक करत असे. दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश - भारतीय नौदलाकडून घेतलेल्या ८ - १० अजस्त्र बोटी या सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या मालकीच्या होत्या. यापैकीच एक म्हणजे एस. एस. रामदास. १९३६ साली बांधलेली ४०६ टन वजनाची ही बोट तीन मजली - तीन डेक असलेली - होती. एकावेळी सुमारे १२०० प्रवासी वाहून नेण्याची या बोटीची क्षमता होती. अनेकदा वादळवार्यात सापडून आणि मोठमोठ्या लाटांशी सामना करुनही या बोटीला कधीही कोणताही अपघात झालेला नव्हता. सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या सगळ्या बोटींपैकी रामदास ही सर्वात भक्कम आणि सुरक्षीत बोट आहे अशी कोकणात जाणार्या नेहमीच्या प्रवाशांचा ठाम विश्वास होता, त्यामुळे या बोटीवर कायमच प्रवाशांची गर्दी असे.
१७ जुलै १९४७ - गटारी अमावस्येची सकाळ....
सुमारे दोन - तीन दिवसांपासून मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर तुफान पाऊस सुरु होता. १७ जुलैच्या सकाळीही मुंबईत पावसाची संततधार सुरुच होती. अशा पावसातच रामदास बोट भाऊच्या धक्क्यावर उभी होती. सुमारे हजारेक प्रवासी बोटीवर होते. आजचा प्रवास हा जेमतेम दीड तासाचा - कुलाबा जिल्ह्यातल्या रेवस बंदरापर्यंत होता. बोटीला असलेल्या दोन इंजिनपैकी एका इंजिनात काहीतरी बिघाड झाला होता, त्यामुळे बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान हा मात्रं इतक्यातच मुंबईहून निघण्यास तयार नव्हता. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच नौदलाच्या अधिकार्यांकडून बोटीची वार्षिक तपासणी करण्यात आली होती आणि बोट कोकणप्रवासासाठी सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं होतं पण अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने शेख सुलेमान काहीसा काळजीत होता.
रेवसला जाण्यासाठी बोटीचं तिकीट घेतलेल्या प्रवाशांपैकी काहीजणांनी वादळाचा एकंदर रंग पाहून आपला प्रवासाचा बेत रद्द केला होता. पण रामदास बोटीवरुन नियमित कोकणप्रवास करणार्यांना मात्रं वादळा-पावसाची फारशी चिंता वाटत नव्हती. रामदास बोट वादळवार्यातून तावूनसुलाखून निघालेली म्हणून ओळखली जात होती. बोटीवरुन नियमित प्रवास करणार्यांपैकी अनेकांची शेख सुलेमानशी चांगली ओळख होती. तो एक उत्कृष्ट आणि अनुभवी दर्यावर्दी आहे याबद्दल कोणालाच काही शंका नव्हती. जेमतेम दीड तासाचा रेवसपर्यंतचा प्रवास एका इंजिनावर आणि शेख सुलेमानसारख्या अनुभवी माणूस असताना करणं सहज शक्य होतं याची नेहमीच्या प्रवाशांना पक्की खात्री होती. त्यामुळे त्यांनी कॅप्टन शेख सुलेमानला लवकर निघण्याचा आणि रेवसला पोहोचल्यावर इंजिनाची दुरुस्ती करण्याचा आग्रह धरला. हो-ना करताकरता अखेर प्रवाशांच्या आग्रहाखातर शेख सुलेमानने होकार दिला आणि साडेआठच्या सुमाराला बोटीने नांगर उचलला आणि भाऊचा धक्का सोडून रेवसची वाट धरली.
भाऊचा धक्का सोडल्यापासून पाऊस सोबतीला होता. नेहमीपेक्षा लाटांचा जोरही जास्तच जाणवत होता आणि बोट काहीशी जास्तच हेलकावत होती. पण हा थोडासा त्रास सोडला तर सुरवातीचा पाऊण तास बोटीचा प्रवास व्यवस्थित सुरु होता. त्यानंतर मात्रं पावसाचा जोर जबरदस्त वाढला आणि हे कमी होतं म्हणूनच की काय तर वादळाने रुद्रावतार धारण केला! शेख सुलेमान आपलं सगळं कौशल्य आणि अनुभव पणाला लावून तशा वादळातून बोट हाकारत होता, पण त्यानेही समुद्राचं असं रौद्ररुप कधी अनुभवलेलं नव्हतं! या वादळाशी झगडत असतानाच रेवस बंदर जवळ आल्याची ओळखीची खूण शेख सुलेमानच्या दृष्टीला पडली आणि त्या परिस्थितीतही त्याला हायसं वाटलं!
काशाचा खडक!
गेट वे, काशाचा खडक आणि रेवस
रेवसच्या वायव्येला भर समुद्रात धूमकेतूसारखं समुद्रातून उगवलेलं लहानसं बेट म्हणजे आज 'गल आयलंड' या नावाने ओळखला जाणारा हा काशाचा खडक! हा काशाचा खडक उजव्या हाताला ठेवत ओलांडला की वीस - पंचवीस मिनिटांत रेवस बंदराचा सुरक्षीत धक्का गाठणं सहज शक्य होतं, पण....
आधीच सुरु असलेल्या पावसाने आणि उंचउंच उसळणार्या लाटांनी रामदास बोट कधी नाही इतकी हेलकावे खात होती. त्यातच आता भर पडली ती अमावस्येच्या उधाणाच्या भरतीची! या उधाणाच्या भरतीमुळे उसळणार्या उंचच उंच लाटांच्या थपडा बोटीला बसत होत्या! रामदास बोटीवरुन नियमित प्रवास करणारे अनुभवी प्रवासी आणि खुद्द कॅप्टन शेख सुलेमान हे सुद्धा या भयानक वादळाने हादरुन गेलेले होते तर इतरांची काय कथा! खालच्या डेकवरचे प्रवासी धावतपळत वरच्या डेकवर आले होते कारण लाटांच्या तडाख्याने त्यांना सचैल समुद्रस्नान घडलं होतं! त्यातच एक अजस्त्र लाट काशाच्या खडकाच्या दिशेने उजव्या बाजूने बोटीवर येऊन आदळली आणि बोट एका अंगावर कलली....
बोटीवरच्या प्रवाशांत हलकल्लोळ माजला होता!
लाटेच्या तडाख्यात आपण सापडून समुद्रात फेकले जावू नये म्हणून सगळे प्रवासी डाव्या बाजूला धावले....
खवळलेला समुद्र आणि त्यात बोटीवरचं माणसांचं सगळं वजन एकदम एका बाजूला आलं होतं....
कॅप्टन शेख सुलेमान बोट वळवून काशाच्या खडकावर चढवण्याचा आकांती प्रयत्न करत होता, पण...
पाठोपाठ आलेल्या दुसर्या लाटेच्या तडाख्यात रामदास बोट उलटली!
बोटीवरच्या सुमारे साडेसातशे प्रवाशांपैकी एकूण एक प्रवासी आणि शेख सुलेमानसह बोटीवरचे कर्मचारी खवळलेल्या समुद्रात फेकले गेले!
याच दिवशी सकाळी रेवस इथले कोळी शिडाची पाच लहान गलबतं भरुन मासळी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले होते. रेवसवरुन निघून काशाच्या खड्कापर्यंत पोहोचेस्तोवर त्यांना वातावरणातला फरक जाणवला होता. आकाशात एकाएकी काळेकुट्ट ढग येऊन अंधार पसरला होता. वादळाची चिन्हे दिसू लागली होती, त्यामुळे त्यांनी आपली गलबते पुन्हा रेवस बंदरात आणली. समुद्राला उधाण आलं होतं. आपली शिडाची गलबतं असल्या वादळात टिकणार नाहीत याची कल्पना असल्याने त्या कोळ्यांनी मागे फिरुन पुन्हा रेवस बंदर गाठलं. तास - दीड तासाने वादळाचा जोर काहीसा ओसरल्यावर त्यांनी पुन्हा रेवस बंदर सोडलं आणि मुंबईची वाट धरली. ही जहाजं काशाच्या खडकापाशी पोहोचली तेव्हा भयावह दृष्यं त्यांच्या नजरेस पडलं...
अनेक माणसं काहीतरी आधाराने समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत होती!
कित्येक प्रेतंही आजूबाजूला विखरलेली दृष्टीस पडत होती!
काहीतरी भयंकर आक्रीत घडल्याची कल्यना येताच कोळ्यांनी आपल्या गलबतांवरची सुमारे दोन हजार रुपये किमतीची मासळी समुद्रार्पण केली आणि समुद्रात तग धरुन असलेल्या माणसांना वाचवण्याचं काम हाती घेतलं. सुमारे ८० च्या आसपास लोकांना खुल्या समुद्रातून ओढून त्यांनी आपल्या गलबतांवर घेतलं आणि मागे फिरुन रेवस गाठलं, तेव्हा कुठे रामदास बोटीला झालेल्या अपघाताची बातमी रेवस बंदरावर पोहोचली!
रेवस बंदरावर तारेची सोय नसल्याने तिथल्या अधिकार्यांनी अलिबागला धाव घेतली आणि मग दुपारी तीनच्या सुमाराला ही बातमी तारेने मुंबईला कळवण्यात आली. ही बातमी मुंबईत पोहोचण्यापूर्वी अवघी काही मिनिटं रामदास बोटीच्या अपघातातून वाचलेले काही लोक भाऊच्या धक्क्यावर येऊन पोहोचले होते. बोट बुडाल्यावर खवळलेल्या तशा समुद्रातूनही पोहून या लोकांनी ससून डॉक्सचा किनारा गाठला होता आणि ही बातमी देण्यासाठी ते धावत तिथे आले होते! या वाचलेल्या लोकांमध्येच बोटीचा कॅप्टन शेख सुलेमानही होता!
रामदास बोटीवरच्या साडेसातशे प्रवाशांपैकी सुमारे साडेसहाशे प्रवाशांचा बळी गेला होता. यापैकी कित्येक प्रवाशांचे मृतदेह नंतर रेवस पासून ते अलिबाग पर्यंतच्या किनार्याला लागले होते तर अनेकांचे मृतदेह सागराच्या उदरात गडप झाले! याच बोटीतून मांडवा इथल्या इंग्रज अधिकार्याची मुलगीही प्रवास करत होती. ही मुलगी पट्टीची पोहणारी होती आणि ती भर समुद्रातून मांडवा ते गेट वे पर्यंत पोहत जात असे! आपली मुलगी या अपघातातून सुखरुप वाचणार याबद्दल त्या अधिकार्याला पक्की खात्री होती, पण दुर्दैवाने नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. बोट उलटल्यावर ही मुलगी खवळलेल्या समुद्रातून मार्ग काढत काशाच्या खडकापर्यंत पोहोचली देखिल होती पण अगदी शेवटच्या क्षणी खडकावर चढण्याच्या बेतात असतानाच एका मोठ्या लाटेचा तडाखा बसल्याने डोकं खडकावर आदळून तिला मृत्यू आला!
माझे पणजोबा - आईच्या वडिलांचे वडील - या रामदास बोटीतून रेवसला येण्यासाठी निघाले होते आणि नाहीसे झाले! त्यांचा मृतदेह कधीच हाती लागला नाही.
मदनबाण.....