Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अ
अनुस्वार
Wed, 06/30/2021 - 16:59
💬 26 प्रतिसाद
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा. 'येस, आय ॲम् गिल्टी!' ही या मुनव्वर शाहची आत्मकथा किंवा आत्मविवंचना! आजकालच्या मम्मी-पप्पांच्या आवडत्या चौकटीत तंतोतंत बसावा असा बालवयातला हरहुन्नरी मुनव्वर ते फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा प्रवास एवढ्यापुरतेच हे पुस्तक मर्यादित नाही. खरेतर अगदी गुन्हा घडायच्या काही महिने आधीपर्यंत मुनव्वर सर्वांना आवडणारा, मनमिळाऊ, जो शाळा-कॉलेजात भरपूर क्षेत्रांत रमतो असा शिक्षकप्रिय विद्यार्थी होता. परंतु पुढे 'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' हे अनुभवण्यासाठीच मुनव्वर जन्माला आला होता की काय असे वाटण्याइतपत तो स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण गमावून बसतो. आयुष्यात एकदा आडमार्गाची चव चाखली की मनुष्यातला सैतान काय थैमान घालू शकतो हे मुनव्वर स्वतःच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना उलगडत जातो. ही कहाणी वाचताना वाचकाला आपल्याविषयी सहानुभूति उत्पन्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुनव्वर पुनः पुन्हा गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्याची तयारी आणि आवश्यकता व्यक्त करतो. फक्त ती फाशी(च) असावी की इतर काही हा प्रश्न तो समाजाच्या पदरात टाकतो‌. मुनव्वरने प्रकाशक शरद गोगटेंशी केलेला पत्रव्यवहार पाहिला की विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' मधील हॅर्टाने चक्रधरला पाठवलेल्या पत्रांची आठवण व्हावी, एवढा आशयगर्भ त्यांत भरलेला आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उडालेल्या गदारोळाचा मागोवाही या पुस्तकाच्या शेवटी घेण्यात आला आहे. तेव्हा मुनव्वरने सहानुभूती मिळविण्यासाठी असत्याचा आधार घेत ही कहाणी रचली असाही आरोप झाला. वाद नको म्हणून ही कहाणी शंभर टक्के असत्य मानली तरी मुनव्वर ने मांडलेले विचार कोणाही सद्सद्विवेक शाबूत असणाऱ्या मनुष्याला कधीही नाकारता येणार नाहीत. पुस्तकानंतरची शिल्लक- एक माफीचा साक्षीदार वगळता जोशी-अभ्यंकर हत्याकांडात इतर चार आरोपींना १९८३ मध्ये फाशी चढवण्यात आले. फाशीची वाट पाहताना झालेली आयुष्याची उपरती किंवा सहानुभूती मिळवण्याचा एक फोल प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करावेत असे उथळ मुनव्वरचे विचार नाहीत. काही ठिकाणी अक्षरशः हा कुणी फाशी मिळालेला गुन्हेगार नसून अध्यात्माच्या वाटेवर स्वार झालेला एक प्रेषित आहे असे वाटावे असा विचार मुनव्वर मांडतो. या पुस्तकाचे साहित्यिक मूल्य काय यावर टिप्पणी करण्याचा माझा अधिकार नाही. परंतु मूल्याधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी 'येस, आय ॲम् गिल्टी!' पथदर्शक आहे हे नक्की.

प्रतिक्रिया द्या
18016 वाचन

💬 प्रतिसाद (26)
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 18:07 नवीन
विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी... मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 06/30/2021 - 19:51 नवीन
स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Wed, 06/30/2021 - 20:04 नवीन
भान जागेवर असणाऱ्यांनी मरणाचा दरवाजा नजरेआड होऊ न देणे हेच इष्ट.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Wed, 06/30/2021 - 21:55 नवीन
चांगली ओळख . मिळाल्यास नक्की वाचणार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 06/30/2021 - 23:49 नवीन
श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल. https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 07/01/2021 - 07:09 नवीन
धन्यवाद. आणखी माहिती मिळाली ‌.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
त
तुषार काळभोर Fri, 07/02/2021 - 05:25 नवीन
इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या. अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ग
गुल्लू दादा Fri, 07/02/2021 - 07:36 नवीन
मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ग
गॉडजिला Fri, 07/02/2021 - 12:24 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/15/2021 - 15:14 नवीन
मनो, ते पुस्तक तिथं दिसत नाहीय ! This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय ! (मी हे वाचलेलं आहे ! ) इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल ! हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता ! चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे ! लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे ! https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992?fbclid=IwAR1EPC9K_L9q_ZwyoiSxu6GGCEE2Jgg87N-anOB_MgY09ZWAQscDmkgOZ5E
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/01/2021 - 05:08 नवीन
बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते. पुन्हा एकदा वाचावे लागेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 07/01/2021 - 07:10 नवीन
आता(२०२१) वेगळे जाणवेल अशी खात्री वाटते‌.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/01/2021 - 05:14 नवीन
हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम गुरुवार, 07/01/2021 - 09:50 नवीन
नाना पाटेकर आणि मोहन गोखले यांचा माफीचा साक्षीदार हा चित्रपट यावरच आहे. मुन्नावर ची भूमिका मोहन गोखले यांनी केली होती.
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक गुरुवार, 07/01/2021 - 10:20 नवीन
आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात. अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ? असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 07/01/2021 - 12:50 नवीन
दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
त
तुषार काळभोर गुरुवार, 07/01/2021 - 11:18 नवीन
यांच्या प्रतिसादांशी सहमत. करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही. अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली. मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस गुरुवार, 07/01/2021 - 15:39 नवीन
मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे. या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 07/02/2021 - 09:16 नवीन
हे पुस्तक कुठे मिळेल? Online तरी काही मिळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
य
योगेश कोलेश्वर Wed, 07/14/2021 - 13:23 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
ब
बबन ताम्बे Fri, 07/02/2021 - 03:39 नवीन
मला वाटते 1983 की 84 साली हे पुस्तक आले. त्यावेळी वाचलेय मी. त्यातली खुनाची वर्णने अंगावर काटा आणतात.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 07/02/2021 - 03:39 नवीन
मला वाटते 1983 की 84 साली हे पुस्तक आले. त्यावेळी वाचलेय मी. त्यातली खुनाची वर्णने अंगावर काटा आणतात.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 07/02/2021 - 06:32 नवीन
Image removed. Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/02/2021 - 12:27 नवीन
म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे. कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
अ
अनुस्वार Tue, 07/06/2021 - 19:32 नवीन
नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/15/2021 - 15:51 नवीन
अनुस्वार, पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा