क्रेडीट कार्ड
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.
मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे. बदलत्या काळाच्या गरजेनुसार एकेकाळी काही दुकानदार, विशेषतः सराफ २% आकार लावायचे ते आता खळखळ न करता कसलीही अट न घालता कितीही रकमेसाठी कार्ड स्विकारु लागले आहेत.
जोखीम म्हटली तर ती सर्व ई व्यवहारात असतेच, अगदी कागदी व्यवहार होते तेव्हाही चेक फोर्जर्या होत होत्याच. जर आपण भान बाळगून कार्ड वापरलं तर सुरक्षित व लाभदायक ठरतं. क्रेडिट कार्ड्चे अनेक फायदे आहेत. अधिकतम फायदे मिळवण्यासाठी किमान दोन कार्ड घ्यावीत, एक व्हिसा एक मास्टर, शक्यतो वरच्या श्रेणीतली घ्यावीत. बर्या ठिकाणी बरी नोकरी असली तर अनेक बँका तुमच्या मागे लागुन कार्ड फुकट देतात वर कुटुंबियांसाठी अॅड ऑन कार्डही देतात. एक मास्टर एक व्हिसा अशासाठी की काही लाउंजमध्ये व्हिसा चा पाहुणचार असतो तर काही ठिकाणी मास्टर चा. विमानतळावर आरामात वेळ घालवता येतो, खाणंपीणं मस्त आणि मोफत (पीणं म्हणजे चहा कॉफी मिनरल वॉटर....बिअरचे पैसे द्यावे लागतात).
दोन कार्डं घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तितजास्त क्रेडिट पिरियड उपभोगता येतो. प्रत्येक कार्ड्चं बिलिंग सायकल वेगळं असतं. म्हणजे एक तारीख ते तीस तारीख किंवा चौदा तारीख ते पुढच्या महिन्याची तेरा तारीख किंवा दहा तारीख ते पुढच्या महिन्याची नऊ तारीख असं. जर बिल १३ तारखेला तयार केलं जात असेल तर साधारण पैसे चुकवायची वेळ तीन आठवड्यांनंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेच्या आसपास असते. याचाच अर्थ जर या कार्डवर आपण १४ ते ३०/३१ पर्यंत खरेदी केली तर त्या खरेदीचे पैसे आपण पुढच्याच्या पुढच्या महिन्याच्या ३ तारखेला चुकते करणार. सरासरी ३५ -३८ दिवस मिळतात. जर ३० तारखेला बिल तयार केलं जाणारं दुसरं कार्ड आपल्याकडे असेल तर १ ते १५ तारखे दरम्यान जी खरेदी करु तिचे पैसे आपण पुढच्याच्या पुढच्या महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास चुकते करणार. म्हणजेच १५ दिवस एक कार्ड आणि १५ दिवस दुसरं कार्ड वापरलं तर आपल्याला किमान एक महिन्याची उधारी मिळते. याचा अर्थ समजा एखादं उपकरण ज्याची किंमत २५००० रुपये आहे ते जर रोख देण्याची ऐपत असतानाही कार्डावर घेतलं तर ते २५००० महिनाभर वापरायला मिळतात. इथे अनेक अर्थ तज्ज्ञ शेअर गुंतवणुकीचे धडे देत असतात. त्याचा अभ्यास करुन जर हे पैसे महिनाभर खेळवले तर काही नाही तरी ५००-१००० सुटू शकतात.
पैसे कधी चुकते करायचे ही नियोजन करणे सोपे जाते. जर रोखीत खर्च केला तर एखादा खर्चं लिहायचा राहून जाऊ शकतो मात्र कार्डवरील प्रत्येक खर्चाचा तात्काळ एस एम एस येत असल्याने हिशेब ठेवणे सोपे व अचूक होते. या व्यतिरिक्त अनेक किमती वस्तू करेदी करताना बिनव्याजी हप्त्याची सुविधा मिळते आणि एकरकमी खर्च न होता तो ३-६ महिने थोडा थोडा केला जातो आणि महिन्याच्या बजेटवर ताण पडत नाही किंवा एखादी वस्तू घेण्यासाठे खर्चाची आगाऊ तरतूद न करता झटक्यात खरेदी करता येते. आजकाल बरीच खरेदी अॅमेझॉन सारख्या स्थळी ऑन लाईन केली जाते. जर यांचं बँक संलग्न कार्ड (फुकट मिळतं) घेतलं तर डोक्याला ताप नाही, तिथल्या खरेदीचा खर्च आपोआप मोजता येतो, बिन्व्याजी हप्ते मिळतात शिवाय केलेल्या खर्चाच्या ५% रक्कम जमा केली जाते आणि पुढच्या खरेदीत ती वजा करुन उरलेली रक्कम आकारली जाते.
अडी अडचणीला किंवा अनपेक्षित गरज लागली तर कुणाकडेही पैसे मागायची वेळ जर कार्ड असेल तर येत नाही. आणखी एक फायदा म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स. दर खरेदी गणिक पॉइंट जमा होत राहतात. मी स्वतः हे पॉइंट्स रिडीम करुन कॉफी मेकर, टोस्टर, क्रॉस पेन्स, बॅग्ज, टपरवेअर ड्बे अशा अनेक भेटवस्तू मिळवल्या आहेत. झालच तर अनेकदा कसल्या ना कसल्या सेल मध्ये वा प्रमोशन मध्ये काही विशिष्ट कार्डाद्वारे खरेदी केल्यास आणखी सूट मिळते . हॉटेलमध्ये चेक इन करताना जर कार्ड असेल तर ते स्वाईप करतात व अंदाजे होऊ घातलेल्या खर्चाईतकी मर्यादा कार्डावर असल्याची खात्री करुन घेतात व विना अनामत दाखल करुन घेतात. जर कर्ड नसेल तर रोख रक्कम अनामत म्हणून जमा करावी लागते
कार्डाची सुरक्षा बर्यापैकी असते. जर प्रत्यक्ष खरेदी करत असाल तर पिन टाकावा लागतो आणि ऑन लाईन करत असाल तर सिव्हीव्ही टाकुन वर ओटीपी ही टाकावा लागतो. कार्ड घेताक्षणी मागच्या बाजुला लिहिलेला सिव्हीव्ही लक्षात ठेवून वा अन्यत्र नोंद करुन मग पक्क्या शाइने दिसेनासा करावा. यामुळे कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते दुसर्या व्यक्तीला वापरता येणार नाही. कार्ड फक्त नामांकित व विश्वासार्ह ठिकाणीचा वापरावं, असुरक्षित ठिकाणी ते क्लोन करायचा प्रयत्न होऊ शकतो. अनेक बँका जर कार्डाचा वापर त्यांच्या दृष्टीने असुरक्षित जागी केलेला आढळला तर ते कार्ड रद्द करतात, आपल्याला सूचित करतात आणि ४-५ दिवसात त्याच क्रमांकाचं नवं कार्ड विनामुल्य देतात, मी हा अनुभव घेतलेला आहे. आणखी एक सांगण्यासारखा अनुभव आहे. एकदा दिवाळीच्या सुमारास सलग काही दिवस घरी परतायला उशीर होत असल्याकारणे (कधी कधी कामही करायला लागतं, किमान केल्यासारकहं दाखवावं लागतं) घाईघाईने दिवाळिच्या अगदी दोन दिवस आधी एकाच संध्याकाळी खरेदी आटोपली. अल्पावधीत सलग पाचवं स्वाईप होताच मला बँकेच्या कॉल सेंटरहून फोन आला आणि विचारण्यात आलं की माझ्या कार्डावर पाठोपाठ खरेदी केली जात आहे तेव्हा माझे कार्ड गहाळ झाले आहे किंवा चोरीला गेले आहे की मी स्वतःच वापरत आहे.
अर्थात आपणही योग्य काळजी घेतली पाहिजे.
- कार्डाच्या मागचा सिव्हीव्ही नंबर उडवणे
- कार्ड आपल्या डोळ्यादेखतच स्वाईप करण्याचा आग्रह धरणे, ते कुणाच्या हाती न देणे. हॉटेलमध्ये वेटरकडे कार्ड न देणे. आजकाल कॉर्डलेस स्वाईप मशिन आली आहेत तेव्हा अशी गरज पडत नाही
- आपले एस एम एस किमान तासातून एकदा पाहावेत, आपल्या प्रत्येक कार्ड वापरा बरोबर एस एम एस पाठवला जातो
- कार्ड गहाळ झाल्यास/ चोरीला गेल्यास ताबड्तो ब्लॉक करणे.
- फोनवर कुणालाही कार्ड विषयक कसलीही माहिती न देणॅ
- प्रत्येक स्वाइप नंतर स्लिप चेक करणे, एस एम एस चेक करणे. एकदा १५०० चं पेट्रोल भरल्यावर पंपवरच्या मुलानं १५००० साठी कार्ड स्वाईप केलं होतं.
- टॅप ऑप्शन रद्द करुन घेणे, हा पर्याय खुला ठेवलास आपले कार्ड नकळत स्वाईप केले जाऊ शकते.
- अॅपवर सुविधा असेल तर ऑन लाईन सुविधा बाद करावी, जेव्हा ऑन लाईन खरेदी करायची असेल तेवड्या पुरती चालु करुन व्यवहार होताच पुन्हा बाद करावी
- पैसे वेळेवर चुकते करणे, विलंब केल्यास बराच भुर्दंड पदतो. अॅपवर सुविधा असेल तर पैसे चुकते करण्याच्या मुदतीआधी एखाद दिवसची तारिख टाकुन बिल मिळताक्षणीच पेमेंट शेड्युल करणे
- कार्ड खिशात वा पकिटात ठेवताना मागच्या चुंबकिय पट्टीवर चरे, ओरखडे येऊ न देणे
जर सावधतेने व हुशारीने वापरले तर क्रेडित कार्ड अत्यंत सोयीचे व फायद्याचेआहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan