Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चेहरे मुखवट्याआडचे

च
चंद्रकांत
Tue, 08/03/2021 - 16:52
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. आर्थिक समृद्धीची परिमाणे काही असोत. ती सर्वमान्य असोत की सामान्य अथवा नसोत, पण जगणं श्रीमंत होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले, तरी पर्याप्त असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? प्रतिमेवर पडलेल्या धुळीला कुठल्यातरी क्लीनरने काढता येईलही, पण मनावर पडलेल्या धुळीला कुठली केमिकल्स वापरून मिटवायचे? आरसा असतो तसाच आणि तोच असतो, पण त्यात दिसणारी प्रतिमा परिस्थितीचा परिपाक असतो. ती पालटता आली की, प्रतिबिंब डागविरहित दिसतं नाही का? कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत? केवळ जगाला दाखवता यावे म्हणून? कुंपणाला मालकी असली, तरी अपेक्षित विस्तार असतोच असं नाही. आणि तसंही काट्यांशी सख्य करायला कोणाला आवडेल? पण काहीना कुंपणांचंच अधिक अप्रूप असतं. कदाचित सुखांच्या व्याख्या त्यांना तेथे गवसत असतील, पण खरं हेही आहे की, कुंपणांच्या आत सुखांचा राबता दिसत असला, तरी समाधान नांदते असेलच असं नाही. नाहीतरी आपण कोणते तरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवतही असतो. मिरवणं माणसांची मूळ प्रवृत्तीच असावी बहुतेक. माझ्याकडे हे आहे, हे सांगण्यात त्याला सुख सापडत असेलही. पण समाधान... त्याचं काय? ते कुठून आणणार आहोत? ते ना विकत मिळत, ना उसने आणता येत. तो मुळचाच झरा असतो. पण आतला ओलावाच आटला असेल, तर त्याने वाहते राहावे तरी कसे? सोस आणि समाधान यात असलेल्या अंतराचे आकलन करता आलं की, मुखवट्यांच्या मागे असणाऱ्या चेहऱ्याचे विस्मरण नाही घडत. मुखवट्यांना टाळून माणसांना जीवनयापन करणे काही अवघड नाही. सीमित अर्थाने मान्य करूया की, कधी कधी अनिच्छेने मुखवटेही परिधान करायला लागतात. समजा केला परिस्थितीवश धारण किंवा करावा लागलाच, तर त्यामागचा हेतू स्व-पलीकडे असायला काय संदेह असावा? प्रश्न फक्त एवढाच असतो की, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे. मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना मुखवटे धारण करून जगायला बाध्य करते, तेव्हा गुंते अधिक जटिल होत जातात. जग एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन वगैरे करावे लागते, असे काहीसे आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारीही आसपास बरीच असतात. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो. अशा चेहऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपलं लक्ष मुखवट्यांकडेच का वळत असेल? - चंद्रकांत चव्हाण ••

प्रतिक्रिया द्या
1122 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा