रूटीन..
विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो.
मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते!
रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै. पूर्वी मी नोकरीच्या निमित्तानं खूप हिंडायची. मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायचे. त्यातून लिखाणाचे जर्मस् मिळायचे. आता नोकरी थांबली तसं हेही थांबलं. मोठमोठ्या लेखक कविंची सुद्धा "मधुघटचि रिकामे पडती घरी"अशी अवस्था होते मग मी किस झाडकी पत्ती!
लिहिणं थांबलं. वेळ कसा घालवायचा हा मोठाच प्रश्न समोर उभा ठाकला. घरात चोवीस तास बाई मिळाली होती कामाला. ती मनाने चांगली असली तरी तिसरी पास. तिच्याशी कसल्या काव्यशास्त्रविनोदाच्या गप्पा मारणार? तिचं माझं जग वेगळं. गप्पांना मर्यादा पडत. सूनबाई, मुलगा नोकरीवर. घरात मी एकटीच. आसपासच्या घरातल्या स्त्रिया एक तर नोकरी करणाऱ्या किंवा माझ्यापेक्षा वयानं खूप लहान. माझ्या वयाच्या बायका कुठल्यातरी महाराजांचं किंवा स्वामींचं चरित्र वाचणाऱ्या. किंवा फारतर भिशीसाठी जमणाऱ्या. अर्थात कोणीच चुकीचं नव्हतं, पण एकूण मला माझ्या मनाजोगती मैत्रीण मिळेना. वेळ खायला उठायला लागला.
मग मी एक युक्ती केली. ठरवलं की आपला पूर्ण दिवस कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीनं बांधून ठेवायचा. रोजच्या दिवसाला एक रुटीन द्यायचं. ते रुटीन कसोशीने पाळायचं. म्हणजे आपण काहीच करत नाही, निष्क्रिय बसलो आहोत असं वाटणार नाही. रिकामा, पोकळ असलेला दिवस भरुन जाईल. ठरलं, मग मी एक रुटीन केलं. ते रुटीन निरर्थक गोष्टींनी भरलेले आहे, असं एरवी मला वाटलं असतं पण ते तसं वाटून घ्यायचं नाही असं मी ठरवलं.
सकाळी जाग येईल तेव्हा उठायचं. उगीच पहाटे पाच वाजता वगैरे उठून शरीराला अनावश्यक ताण द्यायचा नाही. मला झोप पुरी होऊन नैसर्गिकरीत्या जाग सकाळी सहा वाजता येते. उठल्यावर पहिलं आवरुन,एक तास योगासने,पंधरा मिनिटे, प्राणायाम आणि पंधरा मिनिटे सायकलिंग करायचं. गेले दोन तास."हाय काय नाय काय!"
मग मस्तपैकी आलं,गवती चहा घालून कामाच्या बाईकडून चहा बनवून घ्यायचा. तो प्यायचा. चहा मला मनापासून आवडतो. चहानंतर ब्रेकफास्ट. अल्पसा. उगीच वजन वाढायला नको! दिवसाला काही एक ध्येय असलं की तो वाया गेल्यासारखा , निरर्थक नाही वाटत. वजन वाढू द्यायचं नाही हेच ध्येय.
चहा पिताना बातम्या बघायच्या,वाचायच्या. चहा, ब्रेकफास्ट, बातम्या. गेले दोन तास! मग आंघोळ, वेणी,गेला पाऊण तास!"आता वाजले की बारा!" मग चक्क काय करायचं? यू वोंट बिलीव्ह. मग चक्क रामरक्षा, मारुती स्तोत्र, संकटनाशनस्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणायचं. आंघोळ करतानाच रामरक्षा सुरू करायची. ही स्तोत्रं आईनं आणि आजीनं लहानपणी शिकवली आहेत. मी फार श्रद्धाळू किंवा देवभक्त कधीच नव्हते. त्यामुळे या स्तोत्र म्हणण्यामागे ना श्रद्धा,ना विश्वास असं मला वाटे. फक्त त्यामुळे अजूनही आई, आजी जवळ आहेत असं मनाला वाटतं एवढंच! हीदेखील एक श्रद्धाच म्हणा.
तर, श्रद्धा नसताना का म्हणतो आपण ही स्तोत्रं? Just for time killing? आणि याचं "हो" असं उत्तर मी काहीसं शरमून आई, आजीला देते.
स्तोत्रं म्हणून झाल्यावर थोडा वेळ एक सवय पडलीय म्हणून टीव्ही सिरीयल बघते. मग जेवण. नंतर थोडंसं आडवं व्हायचं. आरामात अडीच वाजतात. नंतर साडेतीनपर्यंत वाचन. लायब्ररी लावलीय. त्याची पुस्तकं घरपोच येतात. झाली की संध्याकाळ! मग दूरस्थ जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन. तेही वयस्क. मग फोनवर सगळं मिळून तासभर गप्पा. नंतर सायंप्रार्थना. वेगळी स्तोत्रं. मग टीव्ही , जेवण, झोप. गेला की नाही दिवस!
मी एक करते. मरगळल्यागत वाटू नये. फ्रेश वाटावं म्हणून मी घरात असतानाही जुने गबाळे कपडे घालण्याऐवजी चांगला नवीन फ्रेश रंगाचा सलवार, कमीज घालते. केस नीट विंचरते. गळ्यात , कानांत, हातात का दागिना घालते. नीट कुंकू लावते. ताजंतवानं वाटतं.
मी रिकामटेकडी नाही. असा एक पाॅझिटिव्ह फील आला मला!
अशी काही वर्षं गेली. आणि ह्या रुटीनचाही कंटाळा आला. तेव्हा ठरवलं की हेही रुटीन सोडायचं. व्यायाम करायचा नाही. देवाचं म्हणायचं नाही. डाएट करायचं नाही. आवडेल ते खायचं. मी तसं करायला लागले. आंघोळ करताना रामरक्षेऐवजी सरळ सिनेमातली गाणी म्हणायला लागले. आईस्क्रीम, केक खायला लागले. वजन वाढायला लागलं. सगळं रुटीन कसं सुखावह झालं. आणि अहो आश्चर्यम्! मी पुन्हा नव्यानं लिहायला लागले. मला थोडं फार का होईना सुचायला लागलं. मला लिखाणाला स्फूर्ती येण्यासाठी हिल स्टेशन, शांतता, गुलाब मोगरा वगैरे फुलं, ऐसपैस टेबल, रिव्हाॅलविंग चेयर, थर्मास मध्ये चहा, डावीकडून प्रकाश फेकणारा टेबल लॅम्प असलं काहीही लागत नाही. कुकरच्या शिट्ट्या, फोनच्या रिंगा, घरच्या मंडळींची बडबड, टीव्हीचा आवाज आणि डायनिंग टेबलवर साॅस, चटण्या, लोणच्यांच्या बाटल्यांच्या गचडीत कागद ठेवण्यापुरेशी जागा करुन मी लिखाण करु शकते. हा घ्या पुरावा! आत्ताच हे लिहिलंय ना! वाचणेबल झालंय का तेवढं सांगा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"