विपरीत
Primary tabs
चित्रसौजन्य- शलाका देगवेकर
विपरीत
दरवळे धुंद केवडा, न हो उलगडा, सुगंधी सडा कोण हा घाली?
केसांत खोवुनी पात, नार झोकात, चालते वाट जणू मखमाली।
भर दुपारचा तो प्रहर, उन्हाचा कहर, सावरी पदर, चिंब भिजलेला,
डौलात पडे पाऊल, नसे चाहूल, उडे का धूळ अशी बाजूला।
वाटेत डोलतो नाग, काढुनी माग, म्हणे तो, 'सांग कुठे तू जाशी?'
ती म्हणे होवुनी धीट, 'सोड तू वाट, तुझा हा थाट असो तुजपाशी !'
पाहून तिचा हा रंग, होतसे दंग, लागला अंग, त्वरेने घुसळू,
जायचे मला रे पैल, असा तू सैल, नको हा खेळ, जीव अळुमाळू।
घरट्यात बिचारी पोर, लागला घोर, मुखी चतकोर तरी तिज चारी।
ना कळे अकल्पित क्षणी, काय ये मनी, वळे तो बनी, निघे माघारी।
सर्पाची असुनी जात, मोडली रीत, दिली रे मात मानवी वंशा।
विसरून मानवी धर्म, विटाळी कर्म, तुला ना शरम, करीतो दंशा॥
वृत्त - मदनतलवार
मात्रा - २,८,८,८,८,४ (३८)
- दिपाली
१.७.२०२१
सर्पासारखे नागमोडी, हे मदनतलवार वृत्त म्हणजे तलवारीच्या धारेवर तोल सांभाळत कसरत करणे आहे.
लय सुटल्याची एखादी चूक सापडेल अशा छिद्रान्वेषी नजरेतून वाचले. पण सराईतपणे अवघड वळणे पार केलेली दिसतात. शब्दांवर हुकुमत दिसते. चित्रदेखील चपखल.
शुभेच्छा.
मदनतलवार वृत्त ! अप्रतिम काव्य
अत्यंत सुरेख.
वृत्त म्हणजे काय ?
कोणी विस्तारून स्पष्ट करेल का
वृत्ताची तांत्रीकता जरी समजत नसली तरी जे काही डोक्याला जाणवले ते कवितेच्या विषयाप्रमाणेच भन्नाट आहे. गवी म्हणतात त्याप्रमाणे कवितेला एकप्रकारचा घाट आहे.
चित्रदेखील छान आहे. चित्रातल्या ललनेच्या डोळ्याचा आकार, अन इतर अंगे दोन भिन्न शैलीत असावीत असा अंदाज आहे. जाणककारांनी विवेचन करावे.
काव्य आणि चित्र दोन्ही अप्रतिम. मानव व प्राण्यांतला फरक छान मांडलात.
हे काव्य लावणी किंवा पोवाड्याच्या चालीवर म्हणू शकू का ?
वाह! क्या बात!
क्या बात है रचना आवडली. खरं तर अशा वृत्तात (नियमात) लिहिणे नेहमी कठीण काम असतं. आपण सहजपणे असे वेगवेगळे वृत्त प्रकार हाताळता. मस्तच.
सर्वच ओळी खास आहेत, शेवटच्या चार ओळी अधिक आवडल्या. आपण लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
मस्तच !
खूपच छान . वृत्त हाताळणे , तेही इतके अवघड वृत्त म्हणजे साधी बाब नव्हे . आपले ह्या बद्दल कौतुक करावे तितके थोडे .
बाकी शेवटच्या कडव्याचा अर्थ लागला नाही !
आणि अवांतर म्हणजे : हा मदन तलवार शब्द ऐकुन नटरंग मधील अप्सरा आली ही लावणी आठवली : शेलटी खुणावे कटी , जशी हनुवटी मदनतलवार ! त्या लावणीतही हेच वृत्त आहे बहुतेक . खुप अन छोट्याछोट्या यमकांमुळे गेयता येते आहे रचनेला !
पुढील लिखाणास शुभेच्छा !
बातमी बातमी
"राजसा जवळी जरा बस जीव हा पिसा" ची चाल व्यवस्थित बसत आहे.( ते गाणं पण या वृत्तावर आधारीत तर नाही???)
खुप छान!
सर्पाची असुनी जात, मोडली रीत, दिली रे मात मानवी वंशा।
विसरून मानवी धर्म, विटाळी कर्म, तुला ना शरम, करीतो दंशा॥
अप्रतिम ,...___/\___
फर्मास इन चातुर्मास