Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय वाचताय ?-२

क
कॉमी
Tue, 09/14/2021 - 05:29
💬 105 प्रतिसाद
खालील गोष्टी वाचल्या- १. ककोल्ड-

"little saint" अर्थात संत मिराबाईंच्या नवऱ्याचे आत्मकथन किरण नगरकरांच्या कादंबरीत आहे. कादंबरीची सुरुवात चांगलीच गुंतवणारी आहे. मध्यंतरी मात्र कादंबरी जेरीस आणते. पण शेवटी मात्र इतके मोठे पुस्तक वाचले, ते वर्थ झाले असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे मुख्य पात्र अतिशय उत्तमपणे बांधले आहे. मेवाडच्या राणा संग्राम उर्फ राणा संग यांचा मुलगा, मेवाडच्या गादीचा वारस (महाराज कुमार) - राजा भोज- हा कथेचा नायक, आणि, 'ककोल्ड' आहे. ककोल्ड म्हणजे व्यभिचारी स्त्रीचा पती. हा शब्द वापरला जातो तो पतीसाठी दौऱबल्यवाचक म्हणून. महाराज कुमारचा मेर्ता (मीरत)च्या राजकन्येसोबत विवाह होतो- मीरेशी. तिचा काका राव विरामदेव हा एक ताकदवान आणि प्रभावशाली सेनापती असतो, आणि हिरव्या डोळ्यांची मीरा अतिशय सुंदर असते. म्हणजे, राजवारसासाठी अतिशय उत्तम स्थळ असते. त्यामुळे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कुमारला लग्नाच्या पहिल्या दिवशी कळणाऱ्या गोष्टी अतिशय धक्कादायक असतात. त्याची पत्नी त्याला सांगते की ती आधीच कुणाशीतरी विवाहित आहे. (अर्थातच, ती कृष्णाबद्दल बोलत असते.) यानंतर कुमारच्या आयुष्यातील होणाऱ्या घडामोडींवर हि कादंबरी आहे. इतिहासात अत्यन्त कमी दखल घेतलेलं असं कुमारचं पात्र आहे. त्याबद्दल ठोस माहिती सुद्धा अतिशय कमी आहे. असं असताना त्यावर कादंबरी लिहिताना नगरकरांकडे त्यांचा स्वतःचा कुमार उभारण्याचे भरपूर स्वातंत्र्य होते. आणि त्यातून उभारलेला कुमार वाचकांच्या मनात खूप दिवस घर करून राहणार हे नक्की. कुमारचं पात्र अत्यंत खुबीने उभारलं आहे. त्याचे अंतःकरण वाचकांसमोर पूर्ण उघडे केले आहे. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, नैतिक मूल्य, त्याला लाज वाटणाऱ्या गोष्टी, त्याच्या लैंगिक इच्छा- सगळं आपल्यासमोर आहे. त्यामुळे कुमार हे पात्र हे प्रेडिक्टेबल आहे- पण ते चांगल्या अर्थाने. तो आता काय करेल, ह्याचा आपल्याला अंदाज येतो, पण काहीतरी क्लिशे गोष्टी घडतात म्हणून नव्हे, तर कुमारला आपण नीट ओळखतो म्हणून. Maharaj Kumar the character is as close a character can get to being perfect. कादंबरीत बराच फॅन्टसी वाटण्याजोगा भाग आहे. आणि, तो भाग आणि चित्तोडच्या दरबारातील कुटील राजकारण याची किंचितही सरमिसळ होऊ दिली नाहीये. त्यातला फॅन्टसी टाईप भाग- हा बहुतेक मुद्दामून तृतीयपुरुषी वर्णनात लिहिला आहे, आणि इतर भाग मात्र कुमारच्या प्रथमपुरुषी निवेदनात आहे. ककोल्ड अगदी न मिस करण्यासारखं पुस्तक आहे. पुढे मागे पुन्हा एकदा वाचीन असे म्हणतो. 2. स्वाम्प थिंग-

अॅलन मूर या सुप्रसिद्ध (कॉमि)ककार* लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेलं हे कॉमिक बुक आहे. व्ही फॉर व्हेंडेट्टा, वॉचमेन, द किलिंग जोक हे सुप्रसिद्ध कॉमिक्स त्याच्या नावावर आहेत. मूरने स्वाम्प थिंगला आपल्या लेखणीखाली खाली घेतलं तोपर्यंत असे काही झाले असते- अलेक हॉलंड आणि त्याची पत्नी लिंडा हॉलंड वनस्पतींच्या वाढीवर संशोधन करत असतात, जगातला अन्नाचा तुटवडा सोडवण्यासाठी. पण काही कारणाने तिथे स्फोट होतो का करवला जातो, आणि त्यात लिंडा ठार होते. तर मशाली सारखा जळणारा अलेक त्यांच्या घराजवळच्या स्वाम्प, म्हणजे दलदलीत आग विजवण्यासाठी पळत जातो. त्या दलदलीतल्या पाणवनस्पतींवर त्यांच्या प्रयोगशाळेत बनवलेले रसायन शिंपडले गेले असते. त्याचा परिणाम हा होतो, कि वनस्पतींनी वेढलेला/बनलेला, आणि अलेक हॉलंडच्या आठवणी असणारा प्राणी- स्वाम्प थिंग स्वाम्प बाहेर पडतो. संबंध 'ग्रीन' म्हणजे वनस्पतींशी त्याचा संपर्क असतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा वापर करून अमरत्वासाठी प्रयत्न करणार व्हिलन, स्वाम्प थिंगचा लिंडाच्या मारेकऱ्यांना शोषून संपवण्याचे सूडपर्व, त्याचा पाठलाग करणाऱ्या फौजा इत्यादी होऊन स्वाम्प थिंगचे हे पर्व त्याला 'स्कल पिअरसिंग' गोळी लागून आणि त्याचे अपेरेंटली देहावसान होऊन संपते. इथे मूर स्वाम्प थिंगची गोष्ट परत सुरु करतो. स्वाम्प थिंगचा तुटला फाटला (मृत?)देह सदरलँड नावाच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या प्रायव्हेट लॅबोरेटरीत फ्रीझर मध्ये पडून आहे. इथे डीसी कॉमिक्सच्या एका जुन्या खलनायकाला पाचारण केले आहे- जेसन वूड्रयू. हे डीसी लोअर मधले बरेच जुने, पण कमी महत्वाचे पात्र असावे. डीसी मध्ये लिहिताना अॅलनला असली पात्रे जाम आवडतात. त्यांच्यासोबत हवे ते करायला स्वातंत्र्य मिळते ना! मूरच्या वॉचमेन या गोष्टीचेपण बहुदा तसेच आहे. त्यातले रोरशॅक हे पात्र बॅटमॅनच्या संकल्पनेला त्याच्या अंतिम सीमेला नेले तर काय होईल , अश्या अर्थाने लिहिले आहे. तर हा वूड्रयू खरेतर झाडांच्या संबंधित असलेला ड्रॅयाड नावाचा प्रकार असतो. हे ड्रॅयाड्स 'ग्रीन'शी, म्हणजे झाडांच्या एकसंध नेटवर्कचा भाग असतात, पण काही कारणाने वूड्रयू यातून बाहेर पडला असतो, आणि पुन्हा त्या जाळ्यात जाणे त्याला जमत नसते. त्यामुळे तो माणसांच्या जगात राहत असतो, आणि बॉटनिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला असतो. पुन्हा ग्रीनमध्ये परत जाण्याची ओढ आणि झाडं कापणाऱ्या माणसांबद्दल तिटकारा असं त्याचं पात्र आहे. या वूड्रयूला स्वाम्प थिंगचे शवविच्छेदन करायला सदर्लंडनी बोलावले असते. तिथे शवविच्छेदनात दिसणारी गोष्ट वूड्रयूला आश्चर्यचकित करते. स्वाम्प थिंगच्या शरीरात फुप्फुस, मेंदू, यकृत इत्यादी सर्व गोष्टी असतात, पण त्या पण लाकूड, पानांनी बनलेल्याच! त्या अर्थातच काम करत नसतात. वूड्रयूला मग प्लॅनेरीयन वर्म म्हणून एका अळीच्या जातीची आठवण येते. अडथळे पार करायचे शिकलेल्या वर्मचे तुकडे जर नवख्या वर्मला चारले, तर दुसऱ्या वर्मला सुद्धा अडथळे पार करणे शक्य होत असते. थोडक्यात या वर्म्समधून त्यांच्या आठवणी सुद्धा पास होत असतात. वूड्रयूला समजते कि स्वाम्प थिंग हा अलेक हॉलंड नाहीचे मुळी ! हॉलंड तर त्या आगीतच बुडून मेला. हा स्वाम्प थिंग म्हणजे स्वतःला अलेक हॉलंड समजणारं झाड आहे फक्त ! त्या हॉलंडचे अवशेष त्या झाडांसाठी खाद्य बनतात, आणि हॉलंडच्या प्रयोगशाळेतील केमिकल्स मुळे हॉलंडच्या आठवणी आणि ओळख त्या झाडांमध्ये येते, आणि आपल्याला सुपरिचित असणारा आकार ते झाड धारण करते, ज्यातून स्वाम्प थिंग तयार होतो. आणि अर्थात निव्वळ सवय म्हणून असलेल्या मेंदूत गोळी लागून स्वाम्प थिंग ठार होणार नाही, कारण मुळात त्याचा मेंदू दिखावाच आहे! स्वाम्प थिंग निव्वळ मेंदूत गोळी लागल्याच्या शॉकने आणि भितीने जायबंदी झाला ! आणि एव्हाना वूड्रयू आणि सदरलँडचे वाजले असते त्यामुळे वूड्रयू स्वाम्प थिंगच्या फ्रिजमधले तापमान वाढवतो आणि पळून जातो. तापमान वाढल्याने स्वाम्प थिंग पुन्हा उठतो, आणि वूड्रयूचा अहवाल वाचतो. आपण अलेक हॉलंड नाही, आपण अलेक हॉलंड कधीच नव्हतो या सत्यामुळे स्वाम्प थिंग दुःखाने वेडापिसा होतो, आणि त्याला त्रास देणाऱ्या सदर्लंडला यमसदनी पाठवतो. पण काहीतरी करून आपण पुन्हा आधीसारखं होऊ, हे त्याचे स्वप्न भंग झाले असते. ही मूरच्या मालिकेची फक्त सुरुवात आहे. आणि ती कल्पनाच भन्नाट आहे- एक झाड जे स्वतःला माणूस समजतं- आणि त्याचा भ्रमनिरास होतो... *- मूर चांगलाच सोशालिस्ट-अनार्किस्ट आहे.

३. चॉकी- जॉन विंडहॅम

गुडरीड्स जेव्हा चालू केलेलं तेव्हा अगदी सुरुवातीला मला चॉकी रेकमंड झालं होतं. आणि कथा रोचक वाटलेली. आणि कालपरवा दोन दिवसात हि लहानशी कादंबरी हातावेगळी केली. हि गोष्ट आहे मॅथ्यू नावाच्या ११-१२ वर्षांच्या मुलाची. मॅथ्यूला त्याच्या डोक्यात एक आवाज ऐकू येतो हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येते. (निवेदन वडिलांचेच आहे.) आणि हल्ली मॅथ्यूचे प्रश्न सुद्धा काहीशे विचित्र झाले असतात. जेव्हा मॅथ्यूचे वडील मॅथ्यूचा स्वतःशी संवाद ऐकतात तिथेपण मॅथ्यू कोणाला तरी थोड्याश्या त्राग्यानेच 'महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?' अश्या प्रश्नांचे उत्तर त्याला जमेल तसे देण्यात व्यस्त असतो. मॅथ्यूचा शाळेतून सुद्धा असेच रिपोर्ट्स आले असतात- मॅथ्यू भूगोलाच्या शिक्षकांना विचारत असतो-पृथ्वी कुठे आहे ? पण सौर्यमाला कुठे आहे ? पण सूर्य तरी नक्की कुठे आहे ? तर, मॅथ्यूचा वडिलांना समजते कि ह्या सगळ्या गोष्टी मॅथ्यू 'चॉकी' चे समाधान करण्यासाठी विचारत असतो. चॉकी म्हणजे त्याला जो आवाज येत असतो त्याला दिलेले नाव. चॉकी स्वतःबद्दल फार माहिती देत नसते, पण मिळालेली माहिती पण कोणालाही बुचकळ्यात टाकेल अशी असते. यापुढे काही न सांगणे इष्ट- कथा कल्पना आवडल्यास कादंबरी वाचावी लागेल. कादंबरी अत्यंत सहजसोप्या भाषेत आहे. (ककोल्ड नंतर मोठा आराम !) इतकेच नव्हे तर कथाशैली सुद्धा अत्यंत संयत आहे. अश्या प्रकारच्या गोष्टी बहुदा हिंस्त्र, किंवा अतीव दुःखी/भीतीदायक अश्या होत असतात. चॉकी मात्र कुठेही विशेष हिंदकाळे न देता संथ गतीने गोष्ट सांगते. हा संयतपणा वाचायला सुखद आहे. आणि कथा सुद्धा छानच आहे.

प्रतिक्रिया द्या
37135 वाचन

💬 प्रतिसाद (105)
ज
जेम्स वांड गुरुवार, 12/09/2021 - 17:44 नवीन
Image removed. लेखक अरुण शौरी, फतवा ह्या एकंदरीतच चमत्कारिक धार्मिक प्रकरणावर उत्तम भाष्य केले आहे, फतवे, ते जारी करणाऱ्या धार्मिक संस्था, त्यांचा इतिहास, फतव्यांचे समाजात असलेलं स्थान, धार्मिक जीवनात लोकांवर असलेला/ नसलेला फतव्यांचा पगडा इत्यादीवर उत्तम भाष्य केले आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 12/09/2021 - 17:54 नवीन
उशीरा हाती पडलेलं पुस्तक 'एक होता कार्व्हर' महाविद्यालयात असताना वाचलं असते तर Botony आणखिन आवडलं असत.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 12/09/2021 - 18:04 नवीन
Image removed. शशी थरूर ह्यांच्या ऑक्सफोर्ड युनियन डिबेट सोसायटीमधील सुप्रसिद्ध भाषणावर आधारित पुस्तक, त्या भाषणाचे आपण एकेकाळी बेकार फॅन होतो, जमैकन, भारतीय, स्कॉट्स अश्या कैक प्रतिनिधींसमोर खाशा ऑक्सफोर्डमध्ये जाऊन "गुड ओल्ड ब्रिटिश डेज" मध्ये रुळलेल्या इंग्रज लोकांचे अक्षरशः कपडे काढणारं भाषण तिच्यायला.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/22/2021 - 07:11 नवीन
हाती घेतलेले नवीन टायटल Image removed. वाचन सुरू करतोय, वाचून झाल्यावरच रिव्यु, रेकमेंडेशन टाकण्यात येईल.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Wed, 12/22/2021 - 07:55 नवीन
सर नक्की review टाका. मी वाट बघतोय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Wed, 12/22/2021 - 08:24 नवीन
बाकी काही म्हणा, सर म्हणू नका, नोकरी धंद्यातून वेळ काढून वाचतोय, थोडं लेट होईल पण नक्की रिव्यु करेनच मी, धन्यवाद गुल्लू दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
प
प्रचेतस Wed, 12/22/2021 - 08:56 नवीन
भारीच, बॅटल ऑफ कॅमल, बॅटल ऑफ सिफिन, बॅटल ऑफ नहरवान सगळं असेल त्यात. मजा येते हे वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हेमंतकुमार Sun, 01/16/2022 - 13:25 नवीन
अक्षरनिष्ठांची मांदियाळी लेखक अरुण टिकेकर नुकतेच वाचले त्यावर स्वतंत्र लेख इथे : https://www.misalpav.com/node/49778
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 01/16/2022 - 14:24 नवीन
Rukmini S यांचं Whole Numbers and Half Truths हे पुस्तक सध्या वाचतोय. Image removed. सांख्यिकीविषयी जे म्हटलं जातं, की “statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.” याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. बऱ्याच सर्वेक्षण आणि पाहण्यांमधून भारताचं, भारतीयांचं, भारतीय समाजाचं जे चित्रण समोर येतं, ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. पुस्तकाची सुरुवात पोलीस केसेस च्या statistics ने होते. उदाहरण म्हणजे दरवर्षी किती प्रकारचे किती गुन्हे घडले, याचे आकडे National Crimes Records Bureau तर्फे प्रकाशित केले जातात. पण गोम अशी आहे की ते आकडे FIR मध्ये लिहिलेल्या गुन्ह्यांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीचं अपहरण करून हत्या केली, तर त्याची NCRB मध्ये नोंद खून अशी होते. अपहरणाची नोंद होत नाही. किंवा घरच्यांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न होणाऱ्या घटनांत मुलीकडचे लोक मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवतात. नंतर उघडकीस येतं की ती स्वखुशीने गेलेली असते, पण याची नोंद अपहरण म्हणून झालेली असते. आणि या अपवादात्मक घटना नसतात. बहुसंख्य असतात. अशा अनेक धक्कादायक गोष्टी लेखिकेने स्वतः विविध सर्वे आणि सांख्यिकीचा आणि खऱ्या परिस्थितीचा अभ्यास करून लिहिल्या आहेत. त्यामुळे असे सर्वे आणि सांख्यिकी वरून मीडिया स्वराच मत बनवतात आणि ते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे आकडे सांभाळून वाचणेच योग्य.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/21/2022 - 05:51 नवीन
रोचक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रचेतस Tue, 01/18/2022 - 08:31 नवीन
पहिल्या लॉकडाऊनपासून सुरू केलेले महाभारत हरिवंशासहीत (११ खंड) संपूर्ण वाचून झाले. आता भारताचार्य चिं. वि. वैद्य यांनी लिहिलेला महाभारताचा उपसंहार हा खंड वाचतोय. नुसती अनुक्रमणिका बघूनच दडपून जायला होतेय.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/21/2022 - 05:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
B
Bhakti Fri, 01/21/2022 - 05:49 नवीन
वॉल्डनकाठी विचार-विहार’ अनुवाद दुर्गा भागवत (१९६५)काही बदलांसह या ग्रंथाची दुसरी आवृत्ती २०२१ ला मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. मस्तच आहे..वाचतेयं!😃
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/22/2022 - 06:11 नवीन
सुंदर धागा आहे. नवे काही तरी वाचायचा विचार करतोय. उद्या पहातो बाजारात कोणते पुस्तक मिळतय त्यावर ठरेल.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 01/22/2022 - 16:30 नवीन
अच्युत गोडबोले यांचं झपूर्झा वाचतोय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 02/05/2022 - 03:47 नवीन
एक दोन "सिरीयस" पुस्तक वाचत होतो, ती अगदी वाचवेनात म्हणून दिली सोडून. मग बालपणी वाचलेल्या सिरीज कडे हात वळला- पर्सी जॅक्सन. रिक रिऑर्डन नावाच्या लेखकाची धमाल सिरीज आहे ही. पहिल्या पुस्तकाचे नाव आहे- द लाईटनिंग थिफ. Image removed. पर्सी जॅकसन आणि इतर 'demigods' च्या गोष्टी या पुस्तकांत आहेत. Demigod म्हणजे अमर्त्य ऑलिम्पियन देवता आणि मर्त्य मानवांची मुले. ग्रीक कथांमध्ये असे डेमीगॉड्स जागोजागी आढळतात. ग्रीक कथांमधले काही सुप्रसिद्ध डेमीगॉड्स म्हणजे हर्क्युलस, पर्सिअस, मायनॉस, जेसन, अकिलीस, ओडिसिअस. यातली काही नावे ग्रीक महाकाव्ये इलियड (अकिलीस) आणि ओडिसी (ओडिसिअस) मधली प्रमुख पात्रे आहेत. ग्रीक मायथॉलॉजी अतिशय रंजक आहेच, पण त्याचा एकंदरीत बाज खूपच वेगळा आहे. मुळात ऑलिम्पियन देवांची कल्पना ही अगदीच वेगळी आहे- हिब्रू 'देवा'च्या कल्पनेपेक्षा मैलोन मैल दूर. ग्रीकांचे दैवत्व केवळ काही अमूर्त कल्पनांचे किंवा निसर्गाच्या तत्वांचे नियंत्रक इतकेच असते. देव माणसांपेक्षा खूप ताकदवान असतात इतकेच. बाकी ते सुद्धा लोभ, मोह, मत्सर यांपासून सुटलेले नाहीत. उलट ग्रीक देव बऱ्याचदा ताकदीच्या धुंदीतच असतात. पर्सी जॅकसन मध्ये ग्रीक कथांचा आत्मा बरोबर पकडून आधुनिक युगात ग्रीक देवतांना, राक्षसांना, टायटन्सना मिसळले आहे. पुस्तके लहान मुलांसाठी असली तरी अगदीच रंजक आहेत. लाईटनिंग थिफ वाचले आणि ग्रीक कथांमधून बाहेर यावं वाटेना. लगेच मॅडेलिन मिलर यांची सर्सी (Circe) कादंबरी सुरु केली. आतापर्यंत तर छानच आहे. सर्सी ही सूर्यदेव हेलीऑसची मुलगी. तिच्या नजरेतून ओडीसीचा काही भाग- असे पुस्तकाचे रूप आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 02/23/2022 - 15:12 नवीन
सर्सी वाचून झालं. छान वाटलं पुस्तक. ग्रीक पुराणकथा नेहमी आवडायच्याच, पण काही माहीत असलेल्या कथांमधले डोके भांजाळून टाकणारे डिटेल्स या पुस्तकात आहेत. पुस्तकाला एक सलग अशी कथा नाहीये. सर्सी सूर्यदेवाची आणि एका 'निम्फ'ची (निम्फ म्हणजे ओशानॉस या जलदेवतेच्या मुली) मुलगी असते. तिच्या लहानपणी तिच्याकडे कोणत्या विशेष शक्ती आढळल्या नसतात. पण, ती रक्ताने देवीच असते. आणि देव देवी असणे म्हणजे अमर असणे. तिचे बालपण काही शतकाचे असते- प्रोमॅथ्यूसने आग द्यायच्या आधी थंडीत मरणारे ते बलाढ्य साम्राज्य उभारून, लांबलांबच्या समुद्रसफरी करणारे- असा मानवजातीचा प्रवास तिच्या बालपणात झाला असतो. सर्सी दिसायला फारशी सुंदर नसते, तिचा आवाज कर्णकर्कश्श असतो. तिला दोन भाऊ आणि एक बहीण असतात, जे एकतर तिला खिजगणतीत घेत नसतात किंवा तिचा द्वेषच करत असतात. सर्सीला मर्त्य मानवांबद्दल खूप उत्सुकता वाटत असते. तारुण्यातल्या सर्सीची तिच्या शक्तीशी आणि माणसाशी एकत्रच ओळख होते. ग्लाउकस नावाचा तरुण मासेमार सर्सीच्या आवडीच्या बेटावर येतो, आणि सर्सी त्याला मासे मिळवून मदत करते. सर्सी ही ग्लाउकससाठी सगळ्यात सुंदर व्यक्ती असते, तो तिचा निस्सीम चाहता झाला असतो. सर्सीला आजपर्यंत इतके आवडून घेणे माहीतच नसते, आणि ती सुद्धा त्याच्याशी लग्न करायची स्वप्नं पाहू लागते. पण हेलिओस मर्त्य आणि देवीमध्ये लग्न शक्य नसल्याचे सांगतो. ह्रदयभंग झालेली सर्सी वेगळाच विचार करते- सर्व देवांचे वडील-क्रोनोसचं रक्त ज्या जमिनीवर सांडलं असतं, तिथं फार्माका नावाची फुलं उगवत असतात. कदाचित त्या फुलांनी ग्लाउकस देव होईल ? तिचा अंदाज बरोबर ठरतो, आणि ग्लाउकस एक जलदेवता बनतो. हेलिओस आणि इतर देवता मंडळी सर्सी वर चिडत नाहीत, कारण झालेली गोष्ट फुलांमुळे झालीये असं त्यांना वाटतंच नसतं, देव होणे हे ग्लाउकसच्या प्राक्तनात आहे म्हणूनच ते होऊ शकलं, सर्सी किंवा फार्माकामुळे नाही, असं त्यांना वाटत असतं. मात्र सर्सीला मनोमन वाटत असतं कि फार्माकामध्येच कोणत्याही व्यक्तीचं खरं रूप बाहेर आणण्याची शक्ती आहे. दुर्दैवाने देवत्व मिळववल्यावर सर्सी ग्लाउकसची देवी राहत नाही. तो तिच्याकडे दुर्लक्ष करून सिला (Scylla) नावाच्या अतिशय सुंदर निम्फच्या मागे लागतो. मत्सराने आंधळी होऊन सर्सी सिलाच्या तलावात फार्माकाचा रस टाकते- तिचं खरं रुप (जे सर्सीच्या मते स्वार्थी आणि अप्पलपोटी असं असत) जगासमोर यावं म्हणून. पण होतं वेगळंच, सिला एका सहा डोकी असलेल्या भल्याथोरल्या राक्षसामध्ये परिवर्तित होते, आणि शरमेने पळून जाते. हेलिओस आणि इतर देव पुन्हा आधीचाच तर्क बांधून सर्सीला दोष देत नाहीत. ग्लाउकस सुद्धा खांदे उचकवून विषय सोडून देतो आणि दुसरी सुंदर निम्फ पाहून तिच्या मागे लागतो. पण पश्चाताप सर्सीला पोखरू लागतो- सिला इतकी वाईट नक्कीच नव्हती. पुढे हेलिओस आणि इतर देवतांच्या लक्षात येतं की सर्सी आणि तिच्या भावंडांमध्ये काही शक्ती आहेत- ज्याला ते चेटूक म्हणतात. म्हणजे सर्सी आणि तिचे भावंडं पहिले चेटके चेटकीणी आहेत. सिला ही सर्सीची नातेवाईकच असते, त्यामुळे आपल्या रक्ताविरुद्ध चेटूक केल्याबद्दल सर्सीला एका बेटावर एकांतवासाची शिक्षा मिळते. आणि दैवयोगाने, सर्सीच्या बेटावर जाण्याचा जो समुद्री मार्ग असतो, त्यातल्या एका गुंफेत सिलाने बस्तान बसवले असते. तिची गुहा अश्या जागेवर असते, कि एकतर सिलाच्या कक्षेतून जहाज हाकायला हवं, किंवा चार्बिडीस नावाच्या भोवऱ्यात अडकायचं. सिला गुहेतून जहाजातल्या खलाश्यांना उचलून खात असते. ह्या सगळ्या माणसांच्या मृत्यूचे जबाबदार आपण आहोत हे सर्सीला खलत असत. एकांतवासात सर्सी आपल्या चेटूक शक्तीचा पुरेपूर अभ्यास करते. इथून पुढे अनेक ग्रीक कथा काही शतकांच्या कालावधीत समोर येतात, ज्यात सर्सीचा संबंध येतो. क्रेट देशाचा राक्षस मायनाटॉर, त्याला मारणारा 'नायक' थिसिअस, डीडॅलस आणि त्याचा मुलगा इकारस (सूर्याच्या जास्त जवळ जाणारा हाच तो.), गोल्डन फ्लिस चोरणारा जेसन आणि त्याची सर्सीपेक्षा कित्येक पटीने मत्सरी प्रेमिका मेडिया, अथेना आणि सर्सी मधले द्वंद्व अशा 'ओडिसी' महाकाव्यातल्या अनेक गोष्टी समजतात. ग्रीक कथा आवडत असतील तर पुस्तक नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
स
स्मिताके Tue, 02/08/2022 - 14:20 नवीन
A Long Way Home - Saroo Brierley written together with Larry Buttrose स्वतःचं नावही न सांगता येणारा पाच वर्षांचा मुलगा रेल्वेत हरवतो. सुदैवाने त्याचं आयुष्य योग्य रूळ पकडून मार्गी लागतं. अतिशय उत्कंठावर्धक शैलीत लिहिलेली, मनाची पकड घेणारी ही थरारक आत्मकथा. या पुस्तकाचा मराठी अनुवाद (घरपरतीच्या वाटेवरती) तसेच यावर चित्रपटही निघाला आहे (Lion).
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 02/08/2022 - 15:33 नवीन
रोचक कथानक आहे. Lion बद्दल ऐकलंय, देव पटेल आवडतोच मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिताके
क
कंजूस Wed, 02/23/2022 - 15:49 नवीन
कॉमी, ग्रीक कथानकवाली सर्सीची गोष्ट थोडक्यात सांगितल्याबद्दल धन्यवाद. कारण हल्ली वाचन वेगात होत नाही आणि पुस्तकं भगराभर क्यूमध्ये आहेत. ओडिसी रस्त्यावर मिळालं आहे. प्रचेतस मोठाली पुस्तकं वाचतात आणि त्यांना मजकूर लक्षातही राहतो. आता युक्रेन रशिया सीमेवरचे सैन्य तसेच राहील आणि पुस्तकसुद्धा येईल .
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Wed, 02/23/2022 - 20:19 नवीन
हिंदीतलं फारसं काही वाचलं नाही पण अलिकडेच मोहन राकेश यांचे 'आखिरी चट्टान तक' हे छोटेखानी प्रवासवर्णन वाचलं. मोहन राकेश हे तेंडुलकर, बादल सरकार इ. च्या जोडीने प्रसिद्ध असलेले नव्या पठडीतले नाटककार. साधारण तिशीच्याही आतल्या वयात अंदाजे १९५३ मध्ये उत्तरेतून कन्याकुमारीपर्यंत अगदी निवांतपणे केलेल्या मुशाफिरीचं हे लेखन आहे. गंगाधर गाडगीळांच्या साधारण याच काळात आणि वयात मुंबई ते कन्याकुमारीच्या प्रवासावरच्या, आजही प्रसन्न, टवटवीत वाटणाऱ्या 'गोपुरांच्या प्रदेशात'मध्ये आणि यात काही साम्य आढळते का, अशा कुतूहलाने पुस्तक वाचायला सुरुवात केली. सुरुवातीलाच भोपाळला मित्र जबरदस्तीने रेल्वेतून उतरवून मुक्काम करायचा लावतो आणि त्या रात्री ते दोघे जेऊनखाऊन भोपाळच्या सरोवरात निवांत नौकाविहाराला जातात, ते वर्णन वाचल्यावर तर खरोखरच एका निवांत भटकंतीचा आस्वाद आपण घेत आहोत असं वाटलं. पुढे प्रवासात भेटलेल्या व्यक्तींच्या कहाण्या, प्रसंग, वर्णन आणि अनुभव वाचल्यावर प्रवास सगळेच करतात पण असं वर्णन करायला लेखकाचीच नजर पाहिजे असं वाटलं. केरळसारख्या सुदूर प्रदेशातल्या एका गावात रस्त्यानं जाताना बाजूच्या एका घराच्या पडवीतलं घरगुती वातावरण बघून लेखकाला आलेली आपल्या घराची आठवण, दक्षिणी घरातल्या त्या कधीही आपलं गाव न सोडलेल्या मुलाची आणि वृद्ध आईची गोष्ट, खास 'उत्तर भारतीय गुणांचा' अर्क असलेला पंजाबी, गोव्यात भेटलेला मराठी तरुण, केरळमधले वास्तव्य, असं अनेक... सर्वच. एक गंमत सांगायची तर याच्याच जोडीला याच्या इंग्रजी अनुवादाचे 'हिंदू'मध्ये आलेले परीक्षणही वाचनीय आहे आणि त्या लेखातच इंग्रजी आवृत्तीत प्रसिद्ध झालेले भोपाळच्या तलावातल्या रात्रीच्या निवांत नौकाविहाराचे किमान तपशीलात काढलेले रेखाचित्रही सुरेख आहे. हे पुस्तक ई-बुक स्वरूपात इंटरनेटवर नि:शुल्क उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2022 - 07:04 नवीन
सलग वाचन काही होईना. वेळ मिळेल तसे वाचत. एक शशी थरुर यांचे 'द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर' संपवले. आणि दुसरं नादिया मुराद यांचं 'द लास्ट गर्ल' सविस्तर निवांतपणे लिहितो. तोवर पोच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 02/27/2022 - 05:05 नवीन
टाळेबंदीनंतर वाचनालयात जाणे बंदच झाले. त्यामुळे नवीन वाचन जवळपास शुन्यावर आले. आंतरजालावर वाचण्याची मजा येत नाही. असो. काल आमचा वर्तमानपत्रवाला बोलला की मटाचे वर्षभराचे पैसे भरले तर अगदी स्वस्तात मिळेल. मी नको म्हणालो. पैसे देऊन घरात घाण कोण आणील. हल्ली ऑनलाईन मटा पण वाचवत नाही. सगळ्या क्लिकबेटी बातम्या. तशा नसलेल्या बातम्या शोधून वाचायच्या म्हटलं तर १०% पण नसतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/27/2022 - 18:36 नवीन
डॉ.कुमार सप्तर्शी यांच्या जीवनात आलेल्या अतिमहत्वाच्या एकवीस व्यक्तींच्या व्यक्तिमत्वांचे चित्रण व्यक्तिरंग मधे आलेले आहे. काही त्यांच्या आयुष्यात आलेले तर, काहींचा प्रभाव पडलेल्या अशा व्यक्तींच्या संबंधाने आलेले चित्रण आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण, एस.एम.जोशी, कर्पुरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य दादा धर्माधिकारी, शरद पवार, शंकरराव चव्हाण, प्रधान सर आणि इतर महत्वाचे असे सर्व यांच्याबद्दलचा व्यक्तीत्वाचा विचार यात आहे. प्रा.नागनाथ कोतापल्ले यांची पर्दीर्घ प्रस्तावना आहे.समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, भारतीय राज्यघटनेतील पायाभूत तत्त्वे इ. मूल्यांची चर्चा या निमित्ताने आहे. भारतात असलेल्या जात आणि धर्मासंबंधीच्या खुळचट कल्पना. त्यामुळे होणारी देशाची वाटचाल सुरु याचीही चर्चा आहेच. पुस्तकाबद्दल अजून इथेही सविस्तर वाचता येईल. काल आमच्याकडे मराठवाडा साहित्य परिषद ( औरंगाबाद) इथे त्यांच्या या ग्रंथाला प्रा.भगवंत देशमुख विशेष वाड;मय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. तेव्हा त्यांची भेट झाली. गप्पा झाल्या. जेवणही सोबत घेतले. या निमित्ताने पुस्तकाची आठवण झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/18/2022 - 09:02 नवीन
लॉकडाऊन पासून सुरू केलेले महाभारताचे सर्व खंड हरिवंशासहित वाचून संपले. भारताचार्य वैद्य यांनीं लिहिलेला महाभारत उपसंहार हा बृहतखंड देखील वाचून झाला. आता डॅन ब्राऊनचे 'ओरिजिन' सुरू केलेय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 04/18/2022 - 15:17 नवीन
लँग्डन मालिकेतील इन्फर्नो आणि ओरिजिन सोडून बाकीची वाचलीयेत. आत्ता लेफ्टनंट जनरल जमिरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र वाचतोय- "सरकारी मुसलमान". हे नासिरुद्दीन शहांचे थोरले भाऊ आहेत. अगदी रोचक पुस्तक आहे. त्यांची लिहिण्याची साधी सोपी नर्मविनोदी शैली खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तुषार काळभोर Mon, 04/18/2022 - 18:28 नवीन
डॅन ब्राऊनची मला आवडलेली पुस्तके पसंती क्रमाने दा विंची कोड डिजिटल फॉर्ट्रेस एंजल्स अँड डेमन्स डिसेप्शन पॉइंट ओरिजिन लास्ट सिम्बॉल आणि इन्फर्नो विशेष आवडली नाहीत. तशी बरी आहेत, पण डॅन ब्राऊनच्या कीर्तीला साजेशी वाटली नाहीत. कदाचित प्रकाशकासोबत असलेला करार वेळेत पूर्ण करण्यासाठी लिहिली असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धर्मराजमुटके Mon, 04/18/2022 - 18:30 नवीन
ही सगळी पुस्तके माझ्या संग्रही आहेत पण 'ओरिजिन' काही केल्या आठवत नाहिये. नक्की काय प्लॉट आहे याचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रचेतस Mon, 04/18/2022 - 18:33 नवीन
ओरिजिन अगदी अलीकडचं आहे. स्पेनचे गुगेनहाईम म्युझियम मध्यवर्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Mon, 04/18/2022 - 18:39 नवीन
धन्यवाद ! बहुतेक वाचले असावे. संग्रही असण्याबद्द्ल साश़ंक आहे. अधाशासारखे खूप वाचत सुटल्यामुळे काय काय वाचले ते लक्षात रहात नाही. बहुतेक वेळा पुस्तकाची ५-२५ पाने वाचल्यावर ट्युबलाईट पेटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तुषार काळभोर Mon, 04/18/2022 - 18:58 नवीन
स्पेनमधील काही गोष्टी पुस्तक वाचताना पहिल्यांदाच कळल्या. उदा. ते संग्रहालय. ती विचित्र आकाराची इमारत. काहीशे वर्षांपासून बांधकाम सुरू असलेलं एक चर्च. तिथली राजेशाही. जनरल फ्रँको दुसऱ्या महायद्धाचा समकालीन असल्याचा (आणि मुसोलिनी आणि हिटलर सोबत संपल्याचा) माझा समज होता :) पण तो तर अगदी आपली आणीबाणी पाहून गेला :D बाकी मध्य युरोपियन देशांच्या मानाने स्पेन आणि पोर्तुगाल हे एकेकाळचे जागतिक राज्यकर्ते जागतिक राजकारणात बरेच शांत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तुषार काळभोर Mon, 04/18/2022 - 18:52 नवीन
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नेहमीप्रमाणे symbology , कला, इतिहास, आख्यायिका, ख्रिश्चन धर्म यांचा मेळ. बाय द वे, अशी मला रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे दोनच पंथ ख्रिश्चन धर्मात आहेत, असा गैरसमज होता. पण ओरिजीन वाचताना कळलं, की अगदी शंभर सदस्य असणारं एखादं चर्चसुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत, अशी भूमिका घेतं :) रॉबर्ट Langdon मालिकेतील पुस्तके वाचताना निम्मा वेळ इंटरनेट वर संदर्भ आणि माहिती शोधण्यात जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रचेतस Sat, 05/28/2022 - 04:17 नवीन
डॅन ब्राउनच्या ओरिजिन नंतर महारोग्यांच्या आयुष्यावरील गोनीदांचं आनंदवनभुवन झपाट्याने वाचून काढलं. अप्रतिम. आता महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी लिहिलेले कालिदासाचं अभ्यासपूर्ण चरित्र वाचायला सुरू केलंय. कालिदास प्रस्तुत 'कालिदास' ग्रंथात कालिदासविषयक विविध प्रश्नांची विस्तृत आणि साधार चर्चा केली आहे. प्रथम त्याच्या कालाविषयी विद्वानांनी पुरस्कृत केलेल्या विविध मतांची चिकित्सक छाननी करून तो गुप्तकालात ख्रिस्तोत्तर चौथ्या, पाचव्या शतकात होऊन गेला हे विविध प्रमाणांनी सिद्ध केले आहे. नंतर त्याच्या कालातील राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिति वर्णिली आहे. तिस-या प्रकरणात त्याच्या जन्मस्थानाचा जटिल प्रश्न सोडवला आहे. चौथ्या प्रकरणात त्याच्या ग्रंथांवरून व इतर साधनांवरून त्याचे चरित्र, विद्वत्ता, स्वभाव इत्यादिकांविषयी माहिती गोळा करून दिली आहे. पुढील दोन प्रकरणात त्याच्या काव्यांची आणि नाटकांची विपुल उदाहरणे उद्धृत करून दिली आहेत. पुढे त्याच्या ग्रंथांच्या गुणदोषांची सविस्तर चर्चा केली आहे. नंतर त्याचे धर्म, समाज, राजकारण, शिक्षण इत्यादी विविध विषयांवरील विचार गोळा केले आहेत. शेवटच्या प्रकरणात त्याच्या ग्रंथांचा उत्तरकालीन ग्रंथकारांच्या ग्रंथांवर झालेला परिणाम दाखविला आहे. प्रस्तुत ग्रंथात इतर संशोधकांच्या मतांचा केवळ अनुवाद नसून बहुश्रुत वाचकांस त्यातील प्रत्येक प्रकरणात नवीन संशोधन, माहिती व विचार आढळतील. त्यातील विवेचनात 'नामूलं लिख्यते किश्चिन्नानपोक्षितमुच्यते' हा नियम तंतोतंत पाळला आहे. शेवटी, गेल्या दीड हजार वर्षांत अनेक मान्यवर कवींनी कालिदासाला वाहिलेल्या आदरांजलींचे श्लोक देऊन अभ्यासकांना उपयुक्त होईल अशी संदर्भ ग्रंथांची यादी जोडली आहे. हा 'कालिदास' ग्रंथ केवळ 'अपूर्व' आहे असे प्रशंसोद्गार अनेक तज्ञांनी काढले आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 05/28/2022 - 06:08 नवीन
पुस्तकाचे कव्हर पेज टाकता आले इथं धाग्यात तर बघा ना. मजेशीर वाटत आहे पुस्तक, एकदम इंटरेस्टिंग विषय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/28/2022 - 08:15 नवीन
कालिदास जबरदस्तच आहे. मुखपृष्ठ टाकण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
प
प्रचेतस Sat, 05/28/2022 - 08:33 नवीन
मुखपृष्ठासहित पुस्तकच येथे उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कॉमी Sat, 05/28/2022 - 06:47 नवीन
कालिदास अतिशय रोचक वाटत आहे. आरकाईव्ह वर हिंदीतून मिळाले. सध्या मी सुद्धा महाभारत वाचायला चालू केले आहे. मला खरेतर संस्कृत श्लोक, आणि त्याचा आधुनिक भाषेतून मराठी/इंग्रजी अनुवाद असे हवे होते. पण तसे कुठे सापडले नाही. काही साईट्स वर आहे, पण साईट नको. किंडलवरच वाचायचे आहे. त्यामुळे सध्या तरी निव्वळ इंग्लिश मध्ये वाचणे चालू आहे. पुढे हे मिशन संपल्यावर संस्कृत-मराठी महाभारताची फिजिकल कॉपी घेईन म्हणतो. विवेक देब्रॉय ह्यांनी केलेले दहा खंडांमधले अनुवादित महाभारत वाचत आहे. भाषा सरळसोपी आधुनिक इंग्रजी आहे. फार तळटिपा देऊन वाचकाचे डोके भांजाळणे मुद्दामून टाळले आहे. जिथे गरज असेल तिथेच तळटिप दिली आहे. (म्हणजे शक्र म्हणजे इंद्र होय, पार्थ म्हणजे अर्जुन होय, सुबालाचा मुलगा म्हणजे शकुनी होय इत्यादी.) महाभारतातल्या किती गोष्टी माहित नाहीत असे आत्तापर्यंत वाचले त्यावरून वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/28/2022 - 08:32 नवीन
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केले आहे. तसेच त्याची PDF मंडळाच्या संस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे. मला मात्र छापील पुस्तकच वाचणे आवडत असल्याने पुण्यातील शासकीय ग्रंथागारात जाऊन विकत घेतले. बाकी महाभारताचा किसारी मोहन गांगुली यांनी केलेला अनुवाद हा इंग्रजी अनुवादांत प्रमाण मानला जातो. तो या संस्थळावर उपलब्ध आहे. बाकी संस्कृत श्लोक आणि मराठी इंग्रजी अनुवाद असे एकत्र मिळणे जवळपास अशक्य आहे. मी मूळचे संस्कृत श्लोक बघण्यासाठी संस्कृत डॉक्युमेन्ट्स साईटवर जाऊन भांडारकर आणि कुंभकोणम प्रतीतून संदर्भ घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कंजूस Sat, 05/28/2022 - 13:42 नवीन
वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कंजूस Sun, 06/05/2022 - 18:10 नवीन
काळ,जन्मस्थान,आणि त्या काळची राजकीय परिस्थिती प्रकरणं वाचताना इतिहासाची उजळणी होते. योगायोगाने वाचनालयातून आणलेलं ' संपूर्ण कालीदास कथा' - वि.वा.हडप हे पुस्तक हाताशी आहे. संस्कृत भाषेतील गोडवे ती समजल्याशिवाय काही कामाचे नाहीत. तेव्हा मराठीत जे काही दिलंय त्यावर समाधान मानणे आलं. छत्री नसली की डोरलं वापरतो तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कंजूस Sat, 05/28/2022 - 13:39 नवीन
मोबाईलचचे किंडल app आणि किंडल अकाउंटचा संबंध आहे का माहीत नाही. पण पुस्तकाची pdf move केली तर तिथे उघडते. 1)Kindle app ( android ) download, 2) login with Amazon account, नंतर मोबाईल रूट स्टोरेज >> Android folder>> data >> com dot Kindle>> files>>इथे आणायची. ती app मधे new file म्हणून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
श
श्रीगुरुजी Sat, 05/28/2022 - 10:37 नवीन
नुकतेच Joker in the pack हे IIM Bangalore मधील एका विद्यार्थ्याने आपल्या ३ वर्षांच्या campus मधील अनुभवांवर लिहिलेले पुस्तक वाचले. खूपच मजेशीर व रोचक अनुभव आहेत. वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 05/29/2022 - 03:19 नवीन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखन खंड (सगळे) हार्डकॉपी कुठं विकत मिळतील मुंबईत किंवा पुण्यात ? तसेच, घटनासमितीच्या संसदेतील (घटना निर्मितीकालीन) चर्चांचे खंड कुठे विकत मिळू शकतील ? (संसदेच्या वेबसाईटवर सॉफ्ट कॉपी असतील पण मला हार्ड हवी आहे)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/29/2022 - 03:47 नवीन
Publications Division Ministry of Information and Broadcasting Government of India. DIVAKAR RAO Sales Assistant Ph. 9821415003 Sales Road, No. Office: Tele/ Fax: (022) 22610081, Mob: Emporia, Commerce House, 2nd Floor, Karimbhoy Ballard Pier, Mumbai-400 001. E-mail: sempd@rediffmail.com Hqrs: Patiala House, New Delhi - 110 001.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
स्वधर्म Sun, 05/29/2022 - 15:48 नवीन
कॉनरॉड रिक्टर यांच्या त्रयीचे जी ए कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद वाचत आहे. पहिली दोन पुस्तके 'द ट्रीज' आणि 'द फिल्ड्स' अशी आहेत. त्याचे जी एंनी 'रान' आणि 'शिवार' या नावाने अनुवाद केलेले आहेत. ते वाचून झाले. एकाच स्त्रीचे जीवन शिकारी - अन्न गोळा करणार्या जीवनशैलीमध्ये 'रान' या पुस्तकात आहेत. तिचेच जीवन पुढे शेती व्यवस्थेत कसे बदलत जाते हे 'शिवार'मध्ये येते. तिसरे पुस्तक 'गांव' हे आहे, ते आता वाचेन. दोन्ही पुस्तके स्लो बर्निंग प्रकारची असून हळूहळू पकड घेत जातात. जी ए म्हटलं की भाषेचा जी एक खास शैली असते, तिचा प्रत्यय इथे येतोच. १७-१८व्या शतकातील अमेरिकेत गोर्या लोकांच्या वसाहती होत असतानाचे जीवन, त्यातील संघर्ष, रितीभाती यांचे अगदी चित्रदर्शी वर्णन वाचून सध्याच्या अमेरिकेत लोक असे का वागत असावेत, याचा काही प्रमाणात उलगडा होतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/29/2022 - 16:57 नवीन
धन्यवाद. मस्तच पुस्तकं दिसतायत. अमेरिकेची सुरुवातीची वर्षे सेंटेनियल (जेम्स मिशनर) आणि पाडस दोन्ही मध्ये वाचली होती. हि त्रयी सुद्धा वाचावी वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
कंजूस Tue, 06/07/2022 - 09:23 नवीन
पुस्तकं म्हटली की प्रकाशक आलेच. वरदा प्रकाशनाचे ह.अ.भावे यांचे आत्मकथन असेले पुस्तक. प्रकाशनातील भावेप्रयोग आणि पतंगाची दोरी. ह.अ. भावे,मंदाकिनी भावे. रु ३५० पाने ३३० ते १९७५ साली शिक्षकी पेशा, घरदार सोडून ते धुळ्यातून पुण्याला प्रकाशन व्यवसायात कसे उतरले याबद्दल सांगताहेत. कोण कोण लेखक भेटले, कोणत्या पुस्तक प्रकाशनाने हात दिला, काय बरे वाईट अनुभव आले हे चटपटीत शैलीत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/26/2022 - 04:12 नवीन
वा. वि. मिराशी यांनी लिहिलेले 'कालिदास' वाचून झाले आता मिपाकर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेले 'एका धर्मच्छळाची कहाणी अर्थात इन्क्विझिशन' हे पुस्तक वाचायला सुरू केलेय. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 09/02/2022 - 06:46 नवीन
दोन पुस्तकं वाचतोय- १. माधव गाडगीळ आणि नंदा खरेंचे - वारूळ पुराण. ह्यात माधव गाडगीळांचा उत्क्रांती, निसर्गशास्त्र, कीटक विश्वातले परस्पर सहकार्य, ह्या विषयांवर असलेला "सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी" हा लेख आहे. आणि सोबत, एडवर्ड विल्सन ह्या किटकशास्त्रज्ञाची आत्मचरित्रात्मक कादंबरी- अँटहील- चा नंदा खरेंनी केलेला अनुवाद आहे. हे विल्सन गृहस्थ सामाजिक उत्क्रांतिवादाचे पुरस्कर्ते आहेत, म्हणजे कि समाजातील दुबळे घटक मागे पडणार हे स्वाभाविक आहे, आणि आपण त्यात ढवळाढवळ करू नये अश्या मताचे. अनेक राईट विंग विचारवंतांशी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे एकूण रोचक वाचन असेल असे वाटते. २. अमेरिकन प्रोमॅथ्यूस- रॉबर्ट जे. ओपन्हायमर चे चरित्र. अतिशय विस्ताराने ओपन्हायमरची भावनिक, बौद्धिक जडणघडण उकलली आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 09/05/2022 - 05:55 नवीन
Image removed. बघू तरी म्हणलं काय लिहिलं आहे, खूप नाव ऐकत होतो साधक बाधक याच्याबद्दल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा