लेना होगा जनम हमें कई कई बार
वय वाढत जाते तसे काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यातून लग्नाची चाळिशी उलटून गेली असेल आणि पन्नाशी दोन तीन वर्षावर आली असेल तर तुमच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून घेणे त्यांना हक्क वाटू लागतो. पण आज सकाळी __ _ते महान रहस्य सांगता येईल असा प्रश्न बायकोने विचारला. मी ८० त प्रवेश केला आणि दोन एक वर्षात लग्नही पन्नाशीचे होईल. गेली पाच सहा वर्षे रहस्य विचारले की मी हसून उत्तर टाळत होतो. माझ्या मनात बायकोबद्दल फार आदर आहे. तो सांगण्यासाठी मला शब्दांचा आधार घ्यावा लागत नाही. माझ्या मित्रांचा आदर तिने कमावला आहे. तो जरा जास्त आहे असे मला वाटते कारण मी बायकोबद्दल काही तक्रार करू लागलो तर मित्र हसतात ,दुर्लक्ष करतात आणि तुला आम्ही ओळखून आहोत असे म्हणून विषयांतर करतात. मित्रांनी जाहीरपणे तिच्याप्रतीचा आदर व्यक्त केलेला मला अजून स्पष्ट आठवतो.
एके दिवशी सायंकाळी चार पाच मित्र माझ्याकडे मदिरा सेवन करण्यास आले. माझ्या घरी मदिरा सेवनास बायको हरकत घेत नाही. त्यामुळे अत्यंत मोकळेपणाने मित्र माझ्याकडे हा कार्यक्रम पार पाडू शकतात. आमचे दोन दोन पेग संपले असावेत कारण संभाषण इंग्रजीत होण्यास सुरवात झाली होती. मी बर्फ आणायला उभा राहिलो आणि मला खिडकीतून जे दर्शन झाले त्याने मी नॉर्मल झालो. बायकोकडे पळतच गेलो आणि म्हटले '' आता काय करावयाचे ? ''बायको म्हणाली " मी करतीय ना भजी , आणखी काय हवय ? ''अग माझ्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंना घेऊन येत आहेत असं म्हणून मी तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले . बर्फ न घेताच मी मित्रांच्याकडे आलो आणि परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यांनी ते जास्तच गांभीर्यानी घेतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आमच्या आवाजाने बायको स्वयंपाक घरातून आली आणि म्हणाली " तुमचे चालू दे , मी बघते काय करावयाचे ते "
अशावेळी तो आदर व्यक्त झाला होता. मग वाहिनीचा अजून एक किस्सा एकाने ऐकवला .हातातला ग्लास उंचावून तो म्हणाला ''वहिनी फार भारी आहेत. दोन एक वर्षांपूर्वी आम्ही असेच काहीजण बसलो होतो. आणि सुरवात करणार इतक्यात हे महाशय [ म्हणजे मी ] म्हणाले तुम्ही चालू करा मी आलोच. आम्ही विचारले कुठे जातोस या वेळी तर म्हणाला एक पण बाटली आता शिल्लक नाही. [ मित्रांच्यापुढे एक मोठी भरलेली बाटली ठेऊन मी निघालो होतो. ]आम्ही सांगितले अरे येवढी सहज पुरेल. तर हा म्हणाला घरात बाटली नसणे बर नाही,कधी वेळ येईल सांगता येत नाही. याच हे बोलणं संपलं नाही तर लगेच वाहिनी म्हणाल्या " अहो,मोठीच बाटली आणा ''
वहिनी त्या काळात मार्केट यार्ड मधून ट्यामोटो घेऊन केचप बनवून आणत आणि ते केचप भरून ठेवण्यासाठी मोठी बाटली सोयीची असते. त्यांचा मैत्रणीचा ग्रुप हे काम वर्षातून एकदा करत असे. .
तर आज सकाळी काय झाले ते सांगावयाचे राहिले बायको सकाळी सकाळी कपाट आवरत होती. ग्लासेसच्या मागे तिला ओपनर मिळाला. तो दाखवत ती म्हणाली " हल्ली हे लागत नाही का तुम्हाला ?' ''मग मी हल्ली बियरचे डबे असतात ज्याला ओपनेरची गरज नसते वगैरे समजावून सांगितले. हे सांगताना जो समंजसपणा मी दाखवला तो असला तर सगळं आयुष्य सुखाचे जाते.
🥂
चीयर्स ! पुभाप्र.😂
हा .... हा .... हा .... !