अलक (अति लघु कथा)
अलक 1
त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या. अंध शाळेतल्या त्या मुलींनी नुसत्या स्पर्शाच्या अनुभवाने उभा केलेला समुद्र बाईंच्या डोळ्यात पाण्याच्या रूपाने उभा राहिला.
अलक 2
ऑफिसतर्फे सगळे 2 दिवसांच्या कोकण ट्रिप वर आले होते. तो नि ती ही त्यात होतेच. समद्रावर आल्यावर इतर सगळे डुंबायला गेले. ती मात्र किनाऱ्यावर चालत होती. मऊ वाळूचा स्पर्श सुखद होता. मावळतीचा वारा आणि लाटांचा आवाज एकमेकांना साथ देत होता. इतरांपासून जरा लांब एका दगडावर जाऊन बसली ती. समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे एकटक बघण्यात इतकी गुंतली की तो शेजारी येऊन बसला कधी ते जाणवलं देखील नाही. त्याने हलकेच तिचा हात हातात घेऊन तिला भानावर आणलं. आधी ती ओशाळली आणि त्याच्या हातात हात बघून तर चक्क लाजली. त्यालाही ते जाणवलं. इतके दिवस मनात असलेलं आज समुद्राच्या साक्षीने ओठावर आलं आणि नवीन नात्याची सुरवात झाली.
अलक 3
वयाची साठी पार केलेला त्यांचा शाळेचा ग्रुप आज 30 वर्षांनंतर परत त्याच किनाऱ्यावर आला होता. शाळेच्या सुखद आठवणी काढून सगळे गप्पा मारत होते. बहुतेक सर्व गृहस्थाश्रमीच्या जबाबदाऱ्यातून मोकळे झाले होते. ती दोघ पण अर्थात तिथे होती. पण एकमेकांकडे चोरून बघणं, एकमेकांची काळजी करण, मदत करणं इतरांच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच किनाऱ्यावर मावळत्या सूर्याच्या आणि मित्र मैत्रिणींच्या साक्षीने त्याने परत तिला प्रपोज केलं. यावेळी मात्र तिला अडवायला कोणीही नव्हतं. आई वडिलांच्या इच्छेखातर 30 वर्षपूर्वी दूर केलेला तो आज तिला परत आपला साथीदार म्हणून मिळाला होता. आयुष्यच्या या टप्प्यावर खरंच साथीची गरज होती. आता हा समुद्र उर्वरित आयुष्यभर तिची साथ देणार होता. कारण त्याच नाव सागर होतं आणि त्याच घर समुद्र किनारी होत.
-धनश्रीनिवास
💖