Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रोपगंडा (Propaganda)

ट
टर्मीनेटर
Sat, 10/09/2021 - 18:40
💬 74 प्रतिसाद

प्रोपगंडा (Propaganda)



१.

आपल्यावर लहानपणापासून विविध संकल्पना आदळत असतात. आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजातील मोठय़ा लोकांकडून, पुस्तकांतून, चित्रपटांतून, चित्रांतून, संगीतातून, मित्रांच्या गप्पांतून.. आणि आपण घडत असतो. दोन व्यक्तींसमोर सारख्याच प्रतिमा वा सारखेच शब्द ठेवले तरी त्याच्या मनात उमटणारे अर्थ वेगळे असू शकतात. याचे कारण ही घडण्याची प्रक्रिया. ती दोघांबाबत वेगळी असेल, तर एकास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील टिप्पणी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरीलच वाटेल, दुसऱ्यास त्यात वेगळाच वास येईल. एकास आकाशीचा चंद्र पाहून प्रेयसीच्या मुखकमलाची याद येईल आणि दुसऱ्यास भाकरीचा चंद्र आठवेल. यास काही लोक शिक्षणसंस्कार म्हणतात. तसेही शिक्षण हा चांगल्या व जुन्या अर्थाने प्रोपगंडाचाच भाग आहे. परंतु प्रश्न असा आहे की प्रोपगंडा चांगला वा वाईट असू शकतो? यास नेहमीच्या साच्यातील एक उत्तर आहे. ते म्हणजे हेतू हे कृतीच्या योग्यायोग्यतेचे परिमाण असते. परंतु प्रोपगंडा या शब्दाबाबत तसे म्हणता येणार नाही. याचे कारण त्याचा अर्थच बदललेला आहे. अनेक शब्द अशा प्रकारे आपल्यासमोर अर्थ-विपर्यास होऊन येत असतात. उदाहरणार्थ अचपळ. म्हणजे चपळ नसलेला. पण ‘अचपळ मन माझे..’ या पंक्तीत तो चपळ या अर्थाने आला आहे. ‘प्रपोगंडा’ या शब्दाचेही तसेच. इंग्रजी स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार ‘प्रो-प-गं-डा’ असाच हवा. पण बोलीभाषेत तो म्हटला जातो प्रपोगंडा असा. तो उच्चार सुपरिचित. म्हणून नेणिवेच्या पातळीवरील संकल्पनाबोधात अडथळा न आणणारा.




२.

आपण प्रचाराच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, हे वास्तव अनेकांसाठी सहन करण्यापलीकडचे असते. त्यामुळे ते नाकारण्याकडेच अनेकांचा कल असतो. किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते आणि त्याहून भयंकर म्हणजे प्रचार नामक काही नसतेच, असे वाटणारीही माणसे असतात. त्यांचे म्हणणे असे असते, की फालतू बुद्धिजीवी, विचारवंत, माध्यमवीर अशा मंडळींनी तयार केलेली ही हवा असून, प्रचार म्हणजे काय हे न समजण्याएवढे लोक काही दूधखुळे नसतात. लोकांना सारे काही नीट माहीत असते. त्यांना तुम्ही मूर्ख समजू नका, हे विधान त्यातलेच. परंतु प्रचाराचा इतिहास पाहिला तर एक बाब नीटच लक्षात येते ती म्हणजे असे म्हणणारे लोक प्रत्येक काळात होते आणि ते व्यवस्थित मूर्ख बनले होते. त्यातही मौज अशी की अडाण्यांपेक्षा उच्चशिक्षितच प्रचारास अधिक प्रमाणात बळी पडताना दिसले. जनसंज्ञापन आणि प्रचार या विषयातील तज्ज्ञ डॉ. ब्रायन अ‍ॅन्सी पॅट्रिक यांच्या मते, याचे कारण शिक्षण. ‘शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ असे त्यांनी म्हटले आहे.




३.

प्रचाराच्या इतिहासानेही हेच अधोरेखित केले आहे. हा इतिहास साधारणत: तीन टप्प्यांत मांडता येतो. यातील पहिला टप्पा ख्रिश्चन प्रचाराचा. सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोप ग्रेगरी पंधरावे यांनी ‘प्रोपगंडाकरिताचे काँग्रेगेशन अर्थात धर्मसभा’ स्थापन केली. डॉ. पॅट्रिक यांनी या धर्मसभेचे वर्णन ‘प्रचाराचे पहिले जागतिक अभियान’ असे केले आहे. ही धर्मसभा एवढी प्रबळ होती की तिच्या प्रमुखपदी असलेल्या काíडनलला रेड पोप असे म्हटले जात असे. रेड – लाल हा रक्ताचा, हिंसेचा, युद्धाचा रंग आहे. ख्रिस्ती धर्माचा हा प्रचार विरोधात होता तो प्रामुख्याने ‘काफिरां’च्या, अधार्मिकांच्या आणि सुधारकांच्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार पाहता हा प्रचार किती प्रभावी होता हे लक्षात येते. या प्रचाराचे वैशिष्टय़ म्हणजे यातून सर्वानी एकाच तऱ्हेने विचार करावा, विचारांची एकरूपता साधली जावी असा ख्रिस्ती धर्माचा प्रयत्न होता. चर्च सांगेल तेच सत्य हाच ‘सत्याच्या शोधाचा मार्ग’ या प्रचाराने लोकांपुढे ठेवला होता. त्यात रोमन कॅथॉलिक चर्चला यश आले हे दिसतेच आहे. हे प्रचाराचे यश होते. प्रचार इतिहासाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो पहिल्या महायुद्धापासून.




४.

आजवर प्रचार – प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा. त्याला प्रचारयुद्धातील महारथी मानले जाते. पण त्यानेही त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातून पहिल्या महायुद्धातील ब्रिटिश प्रचाराची स्तुती केली आहे. ‘यासंदर्भातील (म्हणजे प्रचाराच्या) व्यावहारिक धडे घेण्याची भरपूर संधी मला मिळाली, पण दुर्दैव असे की, ते धडे आपणांस चांगल्या पद्धतीने शिकविले ते आपल्या शत्रूंनी,’ हे हिटलरचे उद्गार ब्रिटिशांचा प्रचार किती प्रभावी होता हे सांगतात. तो प्रचार जितका थेट जर्मनीविरुद्ध होता, तितकाच तो अमेरिकेविरोधातही होता. ब्रिटिशांनी प्रचाराच्या जोरावर अमेरिकेला युद्धतटस्थता सोडण्यास भाग पाडले. त्याचबरोबर त्या प्रचाराने ‘पब्लिक है, यह सब जानती है’ हे मिथकही मोडूनतोडून टाकले. अमेरिकी लोकांनी काय जाणावे आणि जाणू नये, हे त्या वेळी ब्रिटिशांची प्रचारयंत्रणा ठरवीत होती. प्रचाराचा छद्मव्यूह कसा रचला जातो हे पाहण्यासाठी ते समजून घेतले पाहिजे..



२०१७ साली लोकसत्ता दैनिकातील प्रचारभान सदरात श्री. रवि आमले ह्यांची 'प्रोपगंडा' वर एक अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी लेख मालिका प्रकाशित झाली होती. वरील चार परिच्छेद त्या मालिकेतील पहिला भाग "पब्लिक है, यह सब जानती है..?" मधून घेतले आहेत.

पुढे त्या मालिकेतील लेख व अधिकच्या माहितीसह त्यांचे 'प्रोपगंडा' नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दैनिकातली लेख मालिका आणि पुस्तक अशा दोन्हींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतोय. अर्थात ह्या लेखाचा उद्देश परीक्षण वा समीक्षण नसून स्वैर मांडणीद्वारे पुस्तकाचा परिचय व शिफारस आणि लेख मालिकेतील सर्व भागांच्या लोकसत्ता.कॉम वरील लिंक्स वाचायला सोयीस्कर पडतील अशा प्रकारे सूचिबद्ध करणे एवढाच मर्यादित आहे.


  • आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून?
  • कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती?
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो?
  • आपली मते खरोखरच आपली असतात का?
  • आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का?
  • सत्य मानत असतो ते सत्यच असते का?
  • की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला
  • एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे?

  • तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात?
  • या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते?
  • साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात?
  • बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात?
  • एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते?
  • कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात?

  • हे सारे करणारे असते तरी कोण?
  • अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार!

  • ही कहाणी आहे या सगळ्याची.
  • अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची.
  • आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची.
  • त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट,परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.

▲ 'प्रोपगंडा' पुस्तकाचे मलपृष्ठ.


'प्रोपगंडा' ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केलेल्या प्रश्नांची लेखकाने संदर्भ आणि रोचक उदाहरणांसहित दिलेली उत्तरे वाचताना आपल्याला गुंगून जायला होते. 'प्रोपगंडा' चे प्रकार आणि व्याप्ती समजून घेत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचे नव्याने अर्थ लागतात.



लेखक रवि आमले
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN 978-81-943491-5-0
पुस्तकाची पाने 380
बाईंडिंग पेपरबॅक
किंमत ४००/-

श्री. रवि आमले लिखित 'प्रोपगंडा' हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रहणीयही आहे.
खाली लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या ४६ लेखांची सूची देत आहे. सगळे लेख माहितीपूर्ण आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हे लेख आधी वाचले असतील, परंतु ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांना हे सर्व लेख वाचण्याची आग्रही शिफारस करत आहे.

विषेश टिप्पणी : गमतीची गोष्ट अशी आहे कि ही लेखमाला प्रसिद्ध करताना लोकसत्ताने निष्पक्षपणाचा आव आणत काँग्रेसवर थोडीफार टीका करत त्यांच्या संघ, भाजप, मोदीविरोधी अजेंड्याचा प्रचार मोठ्या चलाखीने केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही! अर्थात हा छुपा प्रचार लक्षात येण्यासाठी 'प्रोपगंडा' हि काय चीज आहे हे आपल्याला व्यवस्थित समजावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

  • १. पब्लिक है, यह सब जानती है..?

    मध्ययुगाच्या काळोख्या रात्रीतून जाग्या झालेल्या जगातील हा प्रचार होता. जनसंपर्काची, माहिती प्रसारणाची नवी माध्यमे आता लोकांहाती होती. ज्ञानाच्या नवनव्या शाखा खुल्या झाल्या होत्या. साम्राज्यस्पर्धा टिपेला जाऊन पोहोचली होती. अशा काळात प्रचाराचा हा नवा अध्याय सुरू झाला. त्याचे श्रेय जाते ब्रिटिशांकडे आणि त्यानंतर अमेरिकी तज्ज्ञांकडे.

  • २. हें धूर्तपणाची कामें..

    पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या प्रचारतंत्रातील सर्वात महत्त्वाचे तंत्र होते ते म्हणजे शत्रू वा विरोधक हा पूर्णत: काळ्याच रंगात रंगविणे. त्याचप्रमाणे लहान मुले, आपले कुटुंब यांबाबत सर्वाच्या मनात हळवा कोपरा असतो. भित्तिचित्रांतून, पत्रकांतून याचाही तेव्हा चलाखीने वापर करण्यात आला होता..

  • ३.मतपालटाची लढाई

    युद्धकाळात जर्मनीने प्रचारलक्ष्य केले ते सर्वसामान्य नागरिकांना. ब्रिटिशांनी मात्र जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या प्रतिष्ठितांवर लक्ष केंद्रित केले. हजारो लोकांपर्यंत जाण्यापेक्षा, त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा मोजक्या लोकांपर्यंत जाणे अधिक फलदायी हे ते साधे तंत्र ब्रिटिशांनी विकसित केले. आजही ते उपयोगात आहे.

  • ४. गांधीनिंदेची ‘उत्तर’पूजा!

    हळूहळू विष पेरीत जावे.. सातत्याने, कणाकणाने, कुणाच्याही नकळत आणि एके दिवशी उठून पाहावे तर सगळीकडे विषाची जंगले उठली आहेत. गांधीविरोधी प्रचाराचे हे असे झाले आहे. महात्मा म्हणून ओळखला जाणारा हा म्हातारा कधीच अजातशत्रू नव्हता. अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगायचे ते. पण त्यांना शत्रू भरपूर होते. म्हणजे त्यांच्या काँग्रेस नामक पक्षाचे सदस्य बहुसंख्य हिंदू. त्यामुळे ती हिंदूंची सर्वात मोठी संघटना म्हणून मुस्लीम लीगचे नेते त्यांना हिंदूंचे नेते म्हणायचे.

  • ५. एकसाची प्रतिमांचा खेळ

    युद्धकाळात ‘ल्युसितानिया’ हे प्रवासी जहाज नव्हे, तर युद्धनौका असल्याचे मानून जर्मनीने ते बुडविले. या बोटीतून १२३ अमेरिकी नागरिक प्रवास करीत होते. प्रचारतज्ज्ञांनी यातील निवडक वस्तुस्थितीच सादर करून जर्मनीचे क्रौर्य पुढे आणले आणि ब्रिटिशांनी प्रचाराच्या एका सर्वात महत्त्वाच्या तंत्राचा अवलंब केला..


  • ६. कॅव्हेलची कहाणी

    प्रोपगंडाचा पहिला नियम हा आहे की तो प्रोपगंडा वाटता कामा नये. एडिथ कॅव्हेल ही ब्रिटिश परिचारिका होती व जाज्वल्य राष्ट्रभक्तीने सैनिकांना मदत करीत होती. मग जर्मन न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. हे संपूर्ण प्रकरण अगदी सरळसोट, वस्तुस्थितीला धरून वाटते. पण ते तसे नव्हते..

  • ७. सेव्हिंग जेसिका लिंच!

    जेसिका लिंच ही अमेरिकेतील जिगरबाज तरुणी सैन्यात दाखल झाली. इराक युद्धाच्या काळात तिच्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यात नऊ सैनिक मारले गेले, ती जखमी झाली, तिला युद्धकैदी बनविण्यात आले हे सगळे खरे.. पुढचा भाग होता तो अमेरिकेचा प्रोपगंडा.. तो कशासाठी केला हे मग जगासमोर आलेच..

  • ८. तथ्यांची वाकडी तार..

    प्रोपगंडा केवळ छद्म नसतो, तो त्याहून अधिक असतो. महत्त्वाची माहिती दाबून ठेवणे, अनुमानित गोष्टींचा वापर करणे ही त्याची तंत्रे असतात. ब्रिटिशांची या तंत्रावर जणू हुकमत होती..अमेरिकेला युद्धात ढकलण्यासाठी एक धक्का देणे आवश्यक आहे, हे लक्षात आले तेव्हा सांकेतिक भाषेतील तार बाहेर काढण्यात आली..

  • ९. महायुद्धाची महाविक्री!

    अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली ती ६ एप्रिल १९१७ रोजी. त्यानंतर सातच दिवसांत विल्सन यांनी लोकमाहिती समितीची स्थापना केली. तिचे अध्यक्ष होते जॉर्ज क्रील. विल्सन यांचे सहकारी. मार्च १९१७ मध्ये त्यांनी विल्सन यांना युद्धप्रचाराबाबत एक योजना सादर केली होती. काय होती ती योजना?

  • १०. चार मिनिटांत युद्धखोरी..

    शंभर वर्षांपूर्वी अमेरिकी सरकारला हवी ती लोकभावना निर्माण करण्यासाठी ‘फोर मिनट मेन’ या संघटनेचा चांगलाच उपयोग झाला. वरवर पाहता अतिशय साधी-सरळ कल्पना होती ती. वक्त्यांनी लोकांसमोर जायचे आणि बोलायचे. पण या साधेपणातच तिच्या यशाचे रहस्य होते..


  • ११. पडद्यावरचा प्रोपगंडा

    चित्रपटाच्या स्वरूपातच हे अंगभूत सामथ्र्य आहे. एक तर तो पाहण्यासाठी अक्षरओळखीची आवश्यकता नसते. ती चलत्चित्रे कोणासही समजू शकतात. शिवाय त्या चित्रचौकटीत एकदा अडकले की प्रेक्षकाला बुद्धीने विचार करताच येत नाही. त्या वेगात त्याला तेवढा अवधीच मिळत नसतो. ती चित्रे, त्यांबरोबरचे संगीत, शब्द, प्रकाशयोजना, त्यांसाठी वापरलेले खास परिणाम हे सारे थेट छेडत असते त्याच्या भावनांच्या तारा. त्यातून प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांमधून त्या भावना हव्या तशा घडवता येतात. एवढेच नव्हे, तर व्यक्तीचे सामाजिक वर्तनही बदलता येऊ शकते आणि ते केवळ चित्रपटांतील तारेतारकांच्या वेश-केशभूषेचे अनुकरण एवढय़ापुरतेच मर्यादित नसते..

  • १२. ‘फेक न्यूज’मागचे हात..

    ट्रम्पादी मंडळींचा सरसकट साऱ्याच माध्यमांना विरोध नसतो. जी त्यांच्या बाजूची ती माध्यमे त्यांना हवीच आहेत. अर्थ साधा आणि स्पष्ट आहे. सध्याचा ‘फेक न्यूज’वाद हा एकंदरच हितसंबंधांच्या संघर्षांचा वाद आहे. एकदा हे ध्यानी घेतले की प्रश्न येतो, तो म्हणजे कोणाचे हितसंबंध? त्याचे उत्तर आहे – अदृश्य सरकारचे..

  • १३. पिवळा प्रचार..

    ‘न्यू यॉर्क जर्नल’ आणि ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ ही अमेरिकेतील दोन मातब्बर वृत्तपत्रे. एकमेकांची स्पर्धक. नंतर या दोन वृत्तपत्रांतील वादातून पीत पत्रकारिता हा शब्द पुढे आला. ही पत्रकारिता म्हणजे प्रच्छन्न प्रोपगंडाच. पुढे त्याचाच वापर या दोन्ही वृत्तपत्रांनी केला तो १८९८च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात..

  • १४. सैतानाचा दगड!

    ‘गरजेच्या वेळी उपयोगी ठरतो तोच खरा मित्र’ अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला गेला, ते जर्मनीचे सम्राट कैसर विल्हम द्वितीय यांना वर्षभरानंतर क्रौर्याचे प्रतीक बनवण्यात आले. वेडा, माथेफिरू, रानटी, राक्षस अशा शब्दांत त्यांचे वर्णन करण्यात आले होते. प्रोपगंडातील सर्वात प्रभावी तंत्र मानले जाते ते राक्षसीकरणाचे..

  • १५. अहवाल : एक प्रचारी खेळणे

    भय, घृणा, संताप, द्वेष या नकारात्मक भावना म्हणजे जसे प्रचारतज्ज्ञांचे खेळणे, तसेच अहवाल हे त्यांचे आवडते साधन. एखाद्या घटनेबद्दल अहवाल तयार करायचा. त्यातून या भावनांचा खेळ करायचा आणि आपणांस हवे ते लोकांच्या गळी उतरवायचे असा हा उद्योग. तो सर्व क्षेत्रांत चालू असतो. सगळेच अहवाल अप्रामाणिक असतात असे नाही; परंतु नागरिकांचे मत तयार करण्यासाठी, मतपरिवर्तन करण्यासाठी एखाद्या अहवालाचा उपयोग केला जातो, तेव्हा तो नक्कीच प्रोपगंडा असतो.


  • १६. छायाचित्रांचे छद्म

    छायाचित्रांमध्ये एक ‘वैशिष्टय़’ असते. त्यातील प्रतिमा कॅमेऱ्याने टिपलेल्या असल्याने त्या खऱ्याच असतात हे मानण्याकडे लोकांचा कल असतो. प्रोपगंडामध्ये म्हणूनच त्याचा अधिक वापर केला जातो. फिक्रेट अ‍ॅलिक हे नाव सहसा कोणाला माहीत असण्याची शक्यता नाही. त्याची आवश्यकताही नाही. जगातील अब्जावधींमधला तो एक. धर्माने मुस्लीम. जन्मला बोस्नियात. बाकी सांगण्यासारखे फार काही नाही; पण तरीही तो बोस्नियातील यादवी युद्धाचा चेहरा होता. त्याच्या एका छायाचित्राने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.

  • १७. अफवा – एक अग्निशस्त्र

    युद्धकाळात अफवांना ऊत येतच असतो. आपल्याकडे भारत-पाक युद्धाच्या वेळी एक बडा अभिनेता पाकिस्तानचा हेर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याच्या घरात गुप्त संदेश पाठविण्याचे यंत्र आहे, हे जणू आपण आताच पाहून आलो अशा आविर्भावात सांगितले जात होते. ब्रिटनमध्येही तेच घडत होते..

  • १८. बहिरा हेर आणि इतर कथा

    मॅकडोनाल्ड यांना सातत्याने देशद्रोही म्हणण्यात येऊ लागल्यानंतर त्यांनी नेमका काय देशद्रोह केलाय हे जाणून घेण्याची गरजच कोणास भासत नव्हती. मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते. सभा उधळून लावीत होते. १९१५ मधील त्या सभेत असेच झाले..

  • १९. पोस्टर संमोहन

    चे गव्हेराचे ते पोस्टर आठवतेय? हा क्युबन क्रांतिवीर. मार्क्‍सवादी बंडखोर नेता. त्याचे हे चित्र. काळ्या-पांढऱ्या रंगांतले. विस्कटलेले केस. चेहऱ्यावर बंडखोर संताप. डोक्यावर बरे कॅप. त्यात पिवळ्या रंगाचा तारा आणि मागच्या बाजूला क्रांतीचा भडक लाल रंग. आज जागतिकीकरणाची फळे चाखणाऱ्या तरुणाईच्या टी-शर्टावरही हे चित्र दिसते. ते..

  • २०. ते रोखलेले बोट

    ते बहुधा जगातील सर्वात प्रसिद्ध रोखलेले बोट असेल. ते होते लॉर्ड हर्बर्ट किचनर यांचे. ते सन्याधिकारी. कट्टर साम्राज्यवादी. पहिल्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनचे युद्धमंत्री. आज त्यांचे नाव इतिहासाच्या पुस्तकांतच उरले आहे. पण त्यांचा चेहरा आणि ते रोखलेले बोट मात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांची छबी असलेले ते भित्तिपत्रक युद्धकालीन प्रोपगंडा कहाण्यांचा भाग बनले आहे. आज १०० वर्षांनतरही अनेक प्रचारतज्ज्ञांना मोहवीत आहे.


  • २१. माहितीचे पाटबंधारे!

    सोमच्या लढाईत पहिल्याच दिवशी ५७ हजार ब्रिटिश सैनिक जखमी झाले होते. त्यातील १९ हजार जणांचा मृत्यू झाला होता.मात्र युद्ध वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांत म्हटले हा दिवस इंग्लंड आणि फ्रान्ससाठी चांगला गेला. युद्धातील आश्वासक असा हा दिवस होता..

  • २२. ‘किस’ – एक तंत्र!

    ‘किस’ हे बोल्शेविक प्रोपगंडाचे जणू ध्येयवाक्य होते..सर्वच देशांतील प्रोपगंडापंडितांनी पोस्टरचा वापर केलेला आहे. बोल्शेविकांची भित्तिचित्रे जरा वेगळी होती. त्यांनी पोस्टरना कथाचित्रांचे रूप दिले. आपल्याकडील काही आदिवासी जमातींमध्ये एकाच लांबलचक कापडावर कथा चित्रित करून ती दाखविली जाते. तसेच काहीसे ..

  • २३. मनांची मशागत

    सोव्हिएत रशियातील पायोनियर चळवळीत बिल्ल्यांप्रमाणेच खास प्रकारच्या टायचाही वापर करण्यात येत असे. ती त्यांची ओळख असे. तो लाल टाय मिळविणे हे मुलांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण असे. आपण एका खास अशा संघटनेचा भाग आहोत, ती संघटना मोठी म्हणून आपणही मोठे, अशी भावना त्यातून जागृत होत असे. हे प्रोपगंडातील ट्रान्सफर – आरोपण तंत्र. अण्णा टोपी घातली की व्यक्ती लगेच भ्रष्टाचारविरोधी बनते.

  • २४. ‘पीआर’चे पर्व..

    महायुद्ध संपले तरी प्रोपगंडा सुरूच होता. फरक एवढाच होता, की हा शांततेचा काळ होता. आता युद्ध विकायचे नव्हते. विक्रीसाठी बाजारात अनेक गोष्टी होत्या.. युद्धकालीन प्रोपगंडाच्या प्रत्यक्ष कार्यानुभवातून तयार झालेले प्रचारतज्ज्ञ आता या बाजारात उतरले होते. त्या सर्वाचे पितामह होते एडवर्ड एल. बर्नेज..

  • २५. अशीही होते ‘क्रांती’

    मोठमोठे झगमगाटी ‘इव्हेंट’ करणे, लोकांवर भित्तिपत्रकांतून, प्रसारमाध्यमांतून, भाषणांतून सतत प्रचार आदळवत ठेवणे हा बर्नेज यांच्या प्रचारतंत्राचा आत्मा. या सर्व गोष्टींचा प्रभावशाली वापर राजकीय क्षेत्रातही केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले ग्वाटेमालाच्या उदाहरणातून..


  • २६. धूर आणि धुके!

    पहिले महायुद्ध संपल्यानंतर एक गोष्ट चांगली घडली. ती म्हणजे महिलांच्या पायांतील शृंखला सैल केल्या. स्त्रिया बंद दारांआड धूम्रपान करू लागल्या होत्या. पण हे काही पुरसे नव्हते. मग सिगारेटचा खप वाढवण्यासाठी अमेरिकन टोबॅको कंपनीचे प्रमुख जॉर्ज वॉशिंग्टन हिल यांनी एक अनोखी शक्कल लढवली..

  • २७. त्यांची मशाल, आपले स्वातंत्र्य..

    प्रतिमांविषयी, प्रतीकांविषयी लोकांच्या मनात रुळलेल्या कल्पना ओळखून प्रचारमोहिमा राबवल्या, तर जणू लोकचळवळच असावी अशा थाटात- म्हणजे त्यातल्या मार्केटिंगचा ताकास तूर न लागता- या मोहिमा यशस्वी होतात. जाहिरात मोहिमांचे हेतू कधी लोकहिताचे असतात, तर कधी उत्पादकहिताचे; पण मुद्दा हा की, ते सारे वाटते तितके सहज नसते..

  • २८. फुकटची गाय आणि हजाराची कोंबी

    ‘यामागचे कारण नेमके काय? ते खरोखरच किती योग्य कारण आहे? काही अर्थ आहे का समोरचा सांगतोय त्यात?’ असे प्रश्न लोकांना पडूच नयेत अशी परिस्थिती निर्माण करणे आणि तिचा फायदा घेणे, हे प्रचारतंत्रातील एक महत्त्वाचे भान! हे भान ठेवले की तंत्र सुधारते..

  • २९. प्रतिमांचे भ्रमजाल!

    अमेरिकी विचारवंत नॉम चॉम्स्की यांचे एक वाक्य आहे. ते म्हणतात – ‘हुकूमशाहीत सोटय़ाचे जे काम असते, तेच लोकशाहीत प्रोपगंडाचे असते.’ पण हा सोटा दिसत नाही. त्याचा फटकाही जाणवत नाही. रक्त पिणारी जळू शरीराला जेथे चिकटते, तो भाग आधी बधिर करून टाकते. प्रोपगंडाचे तसे असते. तो मनुष्यातील तर्कबुद्धी बधिर करून टाकतो.

  • ३०. ‘प्रोपगंडा-पंडित’ हिटलर!

    प्रोपगंडाचे हे एक तत्त्व आहे की, विरोधकांवर टीका करायची तर तुटूनच पडायचे त्यांच्यावर. त्यांच्यात काही चांगले गुण असतील, त्यांनी काही चांगली कामे केली असतील असे चुकूनही म्हणायचे नाही. ते मूर्ख, स्वार्थी, भ्रष्टाचारी, देशाची वाट लावणारे असेच सतत सांगत राहायचे. हिटलर तेच करीत होता..


  • ३१. माध्यमांचे ‘बद-नामकरण’

    आपल्या विरोधकांचे राक्षसीकरण करण्याचा प्रभावी प्रोपगंडा तंत्राचा पद्धतशीर वापर हिटलरने वृत्तपत्रांविरोधात सुरू केला; पण हे करताना त्याला त्या माध्यमाचे महत्त्व कमी करायचे नव्हते. ते साधन बदनाम करून कसे चालेल? तेव्हा त्याने प्रोपगंडाचा रोख वळविला तो वृत्तपत्रांचे प्रकाशक आणि पत्रकार यांच्याकडे..

  • ३२. गोबेल्सचे ‘आक्रमण’

    हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे हे समजून घेणे आवश्यक होते. त्यासाठी अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सव्र्हिसेस’ने वॉल्टर सी. लँगर या तेव्हाच्या आघाडीच्या मनोविश्लेषणतज्ज्ञाचे साह्य़ घेतले. त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने हिटलरचा मनोविश्लेषणात्मक गोपनीय अहवाल तयार केला.

  • ३३. नेणिवेशी खेळ

    लोकांच्या मनातील विविध प्रतिमांना काही संस्कृतीजन्य अर्थ असतात. त्यांचा अगदी नकळत असा काही वापर करायचा, की आपल्याला जे सांगायचे आहे किंवा सांगण्याची इच्छा आहे त्या बाबीला तो सांस्कृतिक अर्थ चिकटला जावा. हे नेणीवलक्ष्यी संदेशाचे तंत्र. ते ध्वनिचित्रफितींमधून उत्तमरीत्या साधले जाऊ शकते, हे खरे. पण त्याआधीही त्याचा चित्रांमधून वापर केला जात होता; तो ‘हॅलो बायस’चा वापर करून.

  • ३४. नभोवाणीची बात

    ‘माइन काम्फ’मध्ये हिटलरने संघटक आणि प्रचारक यांची नेमकी कामे काय असतात, हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात प्रचारकाविषयी तो म्हणतो- ‘बहुसंख्य माणसे मानसिकदृष्टय़ा आळशी आणि भिरू असतात. ती निष्क्रिय असल्यामुळे एखाद्या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवण्याचा साधासा प्रयत्न करणे एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे असते. प्रचारकाचे- प्रोपगंडिस्टाचे- काम हेच, की आपल्या चळवळीला असे नवनवे अनुयायी मिळतील हे त्याने न थकता पाहायचे.’

  • ३५. लाइट, कॅमेरा.. प्रोपगंडा!

    नाझी काळात जर्मनीमध्ये एक हजार ९४ चित्रपट निर्माण झाले. त्या सगळ्यांतून नाझी विचारसरणीचाच प्रचार केला गेला; पण त्यांत पहिले स्थान द्यावे लागेल ते – ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ला. हा १९३५ मधला माहितीपट. त्याचा विषय होता नाझी पक्षाचा १९३४ सालचा न्यूरेम्बर्ग मेळावा. दिग्दर्शिका होती लेनी रेफेन्स्थाल. या चित्रपटाचे एक वैशिष्टय़ म्हणजे यातील एकही प्रसंग बनावट नाही. प्रोपगंडा हा सत्याधारित असावा, असे एडवर्ड बर्नेज म्हणत. हे तत्त्व यात पाळलेले आहेच.


  • ३६. डोळ्यांवरचा पडदा

    चित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे प्रोपगंडाचे. त्यातही माहितीपटापेक्षा कथात्मक आणि थेट राजकीय चित्रपटांपेक्षा अ-राजकीय चित्रपट हे अधिक परिणामकारक असतात. याचे कारण त्यातून कशाचा तरी प्रचार केला जातो हेच आपल्याला समजत नसते. डोळ्यांपुढे पडदाच येतो.

  • ३७. नाझींचे इव्हेन्ट-प्रेम

    लोकांची गर्दी जमविणे हे गोबेल्सला का आवश्यक वाटत असे? लोकांनी एकत्र यावे हे प्रोपगंडाकारांसाठी एवढे गरजेचे का असते? याचे उत्तर आपल्याला सापडते फ्रेंच समाज-मानसशास्त्रज्ञ गुस्ताव ले बॉन यांच्या ‘द क्राऊड – ए स्टडी ऑफ पॉप्युलर माइंड’ या पुस्तकात. गर्दीचे मानसशास्त्र सांगणारे हे पुस्तक आले होते १८९५ मध्ये. समाजमनाच्या, गर्दीच्या अभ्यासात आजही हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. मोठा प्रभाव होता त्याचा प्रोपगंडाच्या अभ्यासकांवर.

  • ३८. नियंत्रित सत्याचे प्रयोग

    राज्यव्यवस्थेकडून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाची शिकार केवळ जर्मन नागरिकच बनले होते असे नाही. ब्रिटन, सोव्हिएत रशिया, अमेरिका आदी सगळे देश तेच करीत होते. अमेरिकेत तेव्हा अध्यक्षपदी होते फ्रँकलिन डी. रूझवेल्ट. १९३३ ते ४५ अशी १२ वर्षे ते अध्यक्षपदी होते. ते थोर मुत्सद्दी नेते होतेच आणि अशा नेत्याला असलेले प्रोपगंडाचे भान आणि ज्ञान हेसुद्धा त्यांच्याकडे होते.

  • ३९. विदेशी बाटली, देशी ‘बायनरी’

    भारतीयांनी ब्रिटिश सैन्यात सामील व्हावे याकरिता ब्रिटिश सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच्या काळातला हा चित्रपट. गांधींच्या काँग्रेसचा याला विरोध होता. त्याचे प्रतिबिंब या चित्रपटातही दिसते. साधारणत: एक गंगादीन सोडला तर या चित्रपटातले सगळे नेटिव्ह म्हणजे आपमतलबी, क्रूर, पाठीत खंजीर खुपसणारे असेच दिसतात. ठगांचा गुरू तर त्या सगळ्यांचा बाप. अत्यंत क्रूर षड्यंत्रकारी. त्याला या चित्रपटात वेशभूषा दिली होती महात्मा गांधींसारखी. हेतू हा, की त्यास पाहून प्रेक्षकांना गांधी आठवावेत. दोघेही सारखेच, तेव्हा त्यांचे दुर्गुणही सारखेच असे वाटावे.

  • ४०. प्रोपगंडाचा पेटारा

    प्रतिमानिर्मिती आणि दिसते तसेच असते यावर असलेली आपली श्रद्धा टीव्ही प्रोपगंडाला परिणामकारक बनवीत असते. पण मग हे लोकांना समजत नसते का?. तर, नसते. याचे एक कारण म्हणजे टीव्ही सतत आपल्या घरात असतो. त्यावरील येणारे संदेश आपण परिघावरच्या मार्गाने ग्रहण करीत असतो. उदाहरणार्थ, घरात दुसरीच काही कामे करताना आपण टीव्ही पाहात असतो. अशा वेळी साध्या साध्या, निवेदकाच्या दिसण्यासारख्या गोष्टीही परिणाम करून जात असतात. पुन्हा त्यात विचार करण्यास वेळच दिलेला नसतो. म्हणून त्याला इडियट बॉक्स म्हणतात. पण तो मूर्ख नव्हे, तर हुशार पेटारा आहे.. प्रोपगंडाचा.


  • ४१. वर्तन-वशीकरणाचे भारतीय प्रयोग

    आणीबाणी लादणे ही काही चांगली गोष्ट नव्हे. ती जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी कृती. परंतु तेव्हाच्या प्रोपगंडातून ती ‘देशहितासाठीची आवश्यक कृती’, ‘गरिबांसाठी चांगली संधी’ असे सांगण्यात येत होते. कोणी ‘चांगल्या उद्यासाठी आज त्रास सहन करा’ असे सांगितले तर ते चांगलेच. फक्त तो ‘उद्या’ मात्र धूसर होता..

  • ४२. धूसर काही ‘शायनिंग’ वगैरे..

    १९८९. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेला तडे गेले होते. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काँग्रेसविरोधात राष्ट्रीय आघाडी स्थापन केली होती. काँग्रेसविरोधात इतर सारे अशी ती लढाई होती. त्या तापलेल्या वातावरणात एके दिवशी सकाळी देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांत एक भलीमोठी जाहिरात प्रसिद्ध झाली.

  • ४३. अण्णा आंदोलनातील ‘अ‍ॅजिटप्रॉप’

    भारत स्वतंत्र झाला त्याच वर्षी सोव्हिएत रशियामध्ये एका खास विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे नाव – कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे आंदोलन आणि प्रोपगंडा संचालन – अ‍ॅजिटेशन प्रोपगंडा. अ‍ॅजिटप्रॉप हे त्याचेच लघुरूप. या प्रोपगंडाचा हेतू होता लोकांना एका साम्यवादी स्वर्गाचे स्वप्न दाखविणे. असा स्वर्ग जेथे सामान्यांचे शोषण नसेल, सगळेच स्वतंत्र असतील, समान असतील. त्या प्रोपगंडासाठी पुस्तकांपासून चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारची माध्यमे वापरण्यात आली.

  • ४४. प्रशांती-प्रचाराची पहाट..

    कॅग हा बुद्धिमान, यशस्वी अशा तरुणांचा एक गट होता. तिचा संस्थापक होता प्रशांत किशोर. गुजरात दंगलीने डागाळलेली मोदींची प्रतिमा स्वच्छ करून त्यांचे प्रतिमासंवर्धन करण्याच्या कामात त्याच्या समाजमाध्यम प्रकल्पाचा मोठा वाटा होता. नंतर काय घडले ते सर्वज्ञात आहेच..

  • ४५. मोदी-मोहिनी

    वर्तमानकाळाकडे तटस्थपणे पाहणे कठीणच. कारण एक तर त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वर्तमानाबद्दल आपण जो विचार करत असतो, तो ‘आपला’च आहे असे आपल्याला वाटत असते. प्रोपगंडाचे खरे यश कशात असेल तर ते हेच, की प्रत्येक व्यक्तीचे विचार, मत, कल्पना आणि कृती हे सारे ‘त्याचे’ असते, ते त्याने त्याच्या मनाने, बुद्धीने काळजीपूर्वक पारखून घेऊन निवडलेले असते, असे त्या व्यक्तीला पटवणे.

  • ४६. प्रोपगंडाशी लढा!

    प्रोपगंडा केवळ राजकीय क्षेत्रातच असतो असे नव्हे. तो जेवढा बाजारपेठेत सुरू असतो जाहिरातींद्वारे, तेवढाच तो प्राथमिक शिक्षणापासून अध्यात्मापर्यंतच्या विविध क्षेत्रांत असतो. प्रश्न आहे तो त्यापासून स्वत:ला कसे वाचवायचे याचा. एकच साधा उपाय आहे त्यावर. तो कोणता?



--X--


प्रतिक्रिया द्या
27522 वाचन

💬 प्रतिसाद (74)
ट
टर्मीनेटर गुरुवार, 10/14/2021 - 07:06 नवीन
@ सुरिया & मित्रहो प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ सुरिया आपल्यासारख्या 'व्यासंगी' सदस्याचे मार्गदर्शन, टीका, कौतुक, सल्ले आणि शुभेच्छा ह्या माझ्यासारख्या नवोदित होतकरू लेखकासाठी फार मोलाच्या असतात. त्यासाठी आपले विशेष आभार 😋 @ मित्रहो
परंतु साऱ्या गोष्टी फक्त प्रोपगंडा करुनच साधल्या जातात प्रत्यक्षात काही नसते हे जरा न पटण्यासारखे आहे. मुळात सार काही प्रोपगंडा आहे असे म्हणणे सुद्धा एक प्रोपगंडा आहे.
बरोबर आहे! त्याबद्दलची माहिती ४६ व्या भाग 'प्रोपगंडाशी लढा!' मध्ये लेखकाने दिली आहे.
पुढचे युद्ध हे प्रोपगंडा वॉर असेल असे म्हणतात.
+१ अमोल उदगीरकर यांचा मिपावरील लेख वाचायला नक्की आवडेल. (सापडला नाही लिंक दिलीत तर फार बरे होईल) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 10/14/2021 - 08:15 नवीन
व्यासंगी? ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
R
Rajesh188 गुरुवार, 10/14/2021 - 07:44 नवीन
कारण एक माणसाच वर्तन आणि समाज म्हणून एकत्र आल्यावर किंवा कोणत्या ही कारणाने एकत्र आल्यावर जो समूह निर्माण होतो त्या समहुहाचे वर्तन हे खूप विरोधी असते. म्हणजे थोडक्यात जीवनात कधी झुरळ पण न मारणारा निष्पाप व्यक्ती जेव्हा दंगलखोर जमावाचा भाग असतो तेव्हा तो माणसं पण क्रूर पने मारतो. हा फरक का घडतो ,ही मानसिकता का बनते हा मोठा अवघड प्रश्न आहे. समाज ची मानसिकता,समूहाची मानसिकता ही वैयक्तिक व्यक्ती ची मानसिकता पेक्षा वेगळी असते. समजून घ्या अर्थ नीट व्यक्त करता आले नसेल. गाभा लक्षात घ्या. आणि propaganda ha ठराविक स्टेप नी तयार करावा लागतो. पाहिले Target असलेल्या विशिष्ट लोकांचे रूपांतर समूहात करणे आणि त्या समूहाचे नियंत्रण करूंन त्यांना हवी ती दिशा देणे ही स्टेप महत्वाची असावी. एकदा व्यक्ती समूहाची हिस्सा झाली की त्याचा संबंध समाजाची मानसिकता ह्या गूढ मानसिकता मध्ये होते.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 10/19/2021 - 15:08 नवीन
समूहाच्या मानसिकतेबद्दल नुकताच एक वीडेओ पाहिला . https://www.wionews.com/videos/gravitas-passengers-looked-on-as-a-woman-was-raped-421904 बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
र
रंगीला रतन गुरुवार, 10/14/2021 - 20:12 नवीन
झुंडीचे मानसशास्त्र हे विश्वास पाटील यांचे पुस्तक वाचले की पण बऱ्याच गोष्टी समजतात.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Fri, 10/15/2021 - 17:15 नवीन
छान माहितीपूर्ण लेख. तुमचं प्रेझेंटेशन मला नेहमीच आवडतं. रवी आमलेंच पुस्तक किंडल वर उपलब्ध नाही. वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 10/15/2021 - 18:50 नवीन
एका चांगल्या विषयाची माहिती करून दिलीत. तुम्ही दिलेल्या दुव्यांमधले काही लेख वाचले. प्रत्येक लेखातूनही हळूच प्रोपगंडा केलेला स्पष्ट दिसतोय :) अवांतरः सध्या Scandal नावाची मालिका बघतेय, ती अमेरिकेतल्या राजनितीवर आधारित आहे आणि त्यातही प्रोपगंडा करून अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या जाताना दाखवलंय.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 10/18/2021 - 07:41 नवीन
@ किल्लेदार & स्मिता प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Mon, 10/18/2021 - 09:48 नवीन
सात भाग वाचुन झाले. कॅव्हेल आणि जेसिकाची कहाणी रोचक आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 10/18/2021 - 11:13 नवीन
Propganda आहे असतो पण मूर्ख शाहणी लोक त्यांचा बळी का होतात. Propganda वर लेख लिहणे म्हणजे मूर्ख शाहण्या लोकांना त्यांचे गुन्हे माफ करण्याची संधी देणे असा त्याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Mon, 10/18/2021 - 11:25 नवीन
तुम्हाला काय म्हणायचंच समजलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
र
रंगीला रतन Mon, 10/18/2021 - 11:28 नवीन
ते कोणाला च समजत नाही. त्यांना पण :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
R
Rajesh188 Mon, 10/18/2021 - 11:49 नवीन
मी फक्त माझ्याच मेंदू वर विश्वास ठेवतो .बाकी प्रतक्ष ब्रह्मदेव आला तरी आणि त्यांनी काही सांगितले तरी मी त्या वर विश्वास ठेवणार नाही. माझा मेंदू मला जे सांगेल तेच त्रिकाळ सत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन
र
रंगीला रतन Mon, 10/18/2021 - 11:55 नवीन
जबरी. म्हणुनतर आम्ही सगळे तुम्हाला च प्रभु मानतो :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Mon, 10/18/2021 - 11:46 नवीन
देशात सत्तेवर येणाऱ्या देशहित विरोधी सरकार ल लोक च निवडून देणार. त्या पक्षाची वकिली देशातील विचारवंत करणार . पण त्या निवडून आलेल्या सरकार नी देशाची वाट लावली,लोकांना देशोधडीला लावले तर त्यांच्या पापात हे मदत करणारे सहभागी असणार नाहीत. अशा ह्या लोकांना त्या पापा मधून मुक्त करण्यासाठी propganda ही संज्ञा विचार पूर्वक मांडली गेली आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
र
रंगीला रतन Mon, 10/18/2021 - 11:51 नवीन
तुम्ही म्हणता म्हंजे तसेच असेल :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
N
Nitin Palkar Tue, 10/19/2021 - 15:10 नवीन
अतिशय अभ्यासपूर्ण आणि महितीप्रद लेख.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 10/24/2021 - 07:37 नवीन
नो बिंदी नो बिझनेस हे प्रसिद्ध ब्लॅागर शेफाली वैद्य यांचे कॅंपेन जाहीरातींतुन हिंदु परंपरा विरोधी अजेंडा राबवणाऱ्यांच्या विरोधात उचललेले चांगले पाउल आहे. भारतीय आता प्रपोगंडा ओळखायला लागलेत तर.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Mon, 10/25/2021 - 05:41 नवीन
मागे तनिष्कने अगोचरपणा केला होता, आता फॅब इंडिया आणि पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी केलाय! या लोकांना हिंदू ग्राहकांनी दणका द्यायलाच हवा. #NoBindiNoBusiness या हॅशटॅगला माझे समर्थन आहे!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
क
कॉमी Mon, 10/25/2021 - 06:23 नवीन
बालिश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
अ
अथांग आकाश Mon, 10/25/2021 - 06:31 नवीन
अपेक्शित प्रतिक्रिया! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Mon, 10/25/2021 - 06:43 नवीन
+१ #NoBindiNoBusiness
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
R
Rajesh188 Mon, 10/25/2021 - 06:07 नवीन
समाज मध्यम असू किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया चर्चेचा विषय हिंदू धर्म कसा खराब आहे हाच असतो. देव आहे तर दाखवा? हिंदू परंपरा कशा चुकीच्या आहेत. असले च विषय असणार कधीच बाकी धर्मा विषयी चर्चा करणार नाहीत कारण हिंदू कानाडोळा करतो म्हणून. जाहिराती असतील तिथे पण हाच प्रकार ह्याला पण कारण हिंदू ची नको तेव्हढी सहनशीलता. आक्रमक पने आपली बाजू मंडणे खरोखर गरजेचे बनले आहे. तो स्वरा भास्कर फक्त हिंदू विषयी च बर्गळत असते बाकी कोणत्याच धर्मात तिला त्रुटी दिसत नाहीत. हा पण अजेंडा च आहे.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Mon, 10/25/2021 - 06:23 नवीन
तुमच्याशी सहमत आहे! Image removed. काउंटर इंटेलीजन्स असतो तसा हिंदुविरोधी प्रचाराला उघडा पाडणारा काउंटर प्रपोगंडा असायलाच पाहीजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा