मेरा कुछ सामान... भावानुवाद.

तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..

ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..

छत्री एकुलती एक,
दोघे अधमुरे ओले
कोरडे वा चिंब थोडे.
सुके तर माझ्यासवे;
उशापाशी भिजलेले
राहिले का माझे मन?
आवरून सावरून
दे ना सारे पाठवून..

अगणित चंद्रवेळा..
एक तीळ खांद्यावरी..
मेंदीओला दरवळ..
रुसवे ते कितीतरी,
आणि अनेक वचनं
खरीखोटी भासणारी..
बघ तूही आठवून
दे ना सारे पाठवून..

पाठवशी जे तू सारे
मृण्मयी ते करण्याची,
दे ना मला अनुमती
डोळे तिथे मिटण्याची..

सुंदर
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
खुप दिवसांनी ह्या गाण्याला साद मिळाली,कानात ऐकू येतंय!

उत्तम अनुवाद....

एक शंका म्हणून वीचारतो

मूळ गाण्यात एकसो सोला चांद की राते ...असा उल्लेख आहे तर 116 ला काही महत्त्व आहे का असं विचारायचं होतं

खास अर्थ नसावा. आपण " शंभर वेळा सांगितलं.." असं म्हणतो तसंच अनेक वेळा या अर्थासाठी तो आकडा वापरलाय. एका मुलाखतीत ते म्हणाल्याचं आठवतंय.

एकतर ही कविता मी आधी मिसली. आणि आत्ता "एकसौ "सोलह चांद की राते" ऐवजी "अगणित चंद्रवेळा" हा बिनआत्म्याचा देह पाहून मिसलेलीच बरी होती असं वाटून गेलं.

अजून एक, गुलजार साहेबांचं मूळ काव्य मुक्तछंदात असूनही त्यात प्रचंड गेयता, लय आहे. इथे यमकं जुळवूनही तो परिणाम साधता आलेला नाही. अनुवाद किंवा भावानुवाद करताना एकाचवेळी सहजता आणि कल्पकता अशा दोन्ही गोष्टी अनुवाद करणाऱ्यापाशी असाव्या लागतात. असो, ह्यामुळेच मी अनुवाद करण्याच्या फंदात फारसा पडत नाही. जे उत्तमरित्या करतात त्यांचं मला खूप कौतुक आणि हेवा वाटतो. इथे मिपावरच काही लेखक/लेखिका आहेत.

सं - दी - प

भावानुवाद प्रचंड आवडलेला आहे. शिवाय मीटरमध्येही आणि अर्थामध्येही बसतोय. कसं काय सुचतं बुवा लोकांना?

एकशे सोळा चांदण्या रात्री एकीकडे आणि तुझ्या खांद्यावरचा एक तीळ एकीकडे असा मूळ काव्यात / गाण्यात भाव अपेक्षित आहे असे वाटते. सौ सुनार की, एक लोहार की टाईप किंवा तत्सम. (क्रूड उदाहरण)

नसो हो. शोधा . आहे असे काहीसे. तुम्हीही एक arbitrary नंबर असे म्हटले आहे त्याच्याशीच समांतर आहे हे.

बाकी इतरत्र कुठेतरी तुषार काळभोर यांनी अन्य अर्थही सांगितला आहेच.

गवि, असो हा प्रतिसाद संदीप चांदणे यांच्यासाठी होते.
तुम्ही जे लिहिलंय तेच मीही समजत होते. पण मला गुलजारची ती मुलाखत सापडत नाहीये.

असा विचार केला नव्हता, आणि काय उत्तर आहे माहित नाही. पण अशी एक कल्पना सुचली, की एका महिन्याचे ३० दिवस, किंवा ३० रात्री धरल्या, तर त्यातल्या २९ चाँद की रातें असतात, कारण ३०व्या अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्यानुसार ११६ चाँद की रातें म्हणजे बरोबर ४ महिने होतात. हे अगदीच रुक्ष गणिती भाषांतर झालं. कुणाला खरा अर्थ माहीत असेल तर सांगा.

हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा. ते दोघं चार महिने बरोबर असतात म्हणून..
आणि एक तुम्हारे कांधे का तील .. कारण त्याला स्वतः ला माहीत नसतं आणि तिने तो पहिल्यांदा पाहिलेला असतो.
भौतिक गोष्टी तर देता येतील, पण हे बाकी सगळं कसं देणार..

कुठे तरी ऐकलं होतं की नंतर गुलजारांना वाटलं की ११६ नाही तर ११७ असायला हवं होतं.. का ते मला नक्की माहीत नाही.

मी सिनेमा पाहिला तेव्हा खूप कमी लक्ष दिलं होतं.. गुलजारांची गाणी नंतर नीट ऐकायला लागले

जर गुलजार यांनी १८६ चांदकी राते असे लिहिले असते तर त्या वरुन मोठा गदारोळ माजला असता.

गुगल बाबा सांगतो आहे की ११६ चंद्राच्या कलांबद्दल गुलजार साहेब बोलत आहेत. त्या ११६ कलांच्या चंद्रा पेक्षाही तो तीळ जास्त मोहक आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे.

जय हो गुगलबाबा, जय हो गुलजार साहेब आणि जय हो प्राचीताई, सगळेच ग्रेट आहेत.

भावानुवाद लै म्हणजे लैच आवडला हे वेगळे सांगायला हवे का?

पैजारबुवा,

सुंदर भावानुवाद
मी मूळ गीत आणि अनुवाद दोन टॅबमधे उघडून वाचले. छान न्याय दिला. परत एकदा गुलजारचे अप्रतिम शब्द आणि संकल्पना डोळ्याखालून गेली.

वाहा क्या बात है !
मुळात मूळ गाणं प्रचंड आवडीचं आहे . आणि तुम्ही ते गाणं अतिशय उत्तम त्याच्या अर्थासहित अन गेयतेने उतरवलं आहे .
छानच !

इतक्या सुंदर आणि तरल गाण्याचा भावानुवाद करायचा म्हणजे खूपच अवघड काम आहे. तुम्हाला ते अप्रतिम जमले आहे. ओवी वृत्ताची निवडही अगदी चपखल आहे. त्यातील भावास साजेशी.

विशेषतः एकसो सोला चांदचं उगीच एकशे सोळा चंद्र असं नीरस 'भाषांतर' न करता अगणित चंद्रवेळा असं सुंदर काव्यात्मक रुपांतर केलं, ते खूप छान!!