जे न देखे रवी...

अवचित गवसावे काही जे...

Primary tabs

प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला चिडवीत नव्या
उत्तरास
शोधत यावा

वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून जाव्या पुसून जाव्या
सार्‍या
हळव्या खुणा

सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास

अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या

चित्रगुप्त

कवन आवडले. नुस्त्या 'खुणा' च्या ऐवजी विशेषत्वाने 'हळव्या खुणा' का म्हटले असावे ते उमगले नाही.

धन्यवाद.

भावविवश करणार्‍या आठवणी (हळव्या खुणा) अद्भुताची अपरिचित वाट चोखाळण्यापासून परावृत्त करू शकतात ...