Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विपश्यना आणि रॅन्डम मी

प
पाटिल
Sun, 11/21/2021 - 08:21
💬 57 प्रतिसाद
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.) १. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो. रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला. म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय. रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे. ते विपश्यनेसाठीच आले असणार, हे मला लगेच समजले. कारण पुढचे दहा दिवस सिगरेट किंवा तत्सम पदार्थांची तीव्र निकड भासणार, म्हणून आधीच मनसोक्त तलफ भागवून घ्यावी, हा विचार मला नाही कळणार तर कुणाला कळणार! २. बाहेरचा सगळा नजारा एकदा बघून घेतला आणि गेटमधून आत गेलो तर संपूर्ण परिसर एकदम शांत. रजिस्ट्रेशन काउंटरवर डॉक्युमेंटस जमा. प्रत्येकास सेपेरेट रूम. रूममधून आकाश दिसतंय. झाडं आणि पक्षी दिसतायत. आणि दूरवर डोंगरही दिसतायत. एवढं पुरेसं आहे. नंतर मोबाईल, वॉलेट वगैरे त्यांच्याकडे जमा. एक दोघांची तिथे हाय हॅलो पुरती ओळख. तुम्ही कुठले. मी इथला. वगैरे टाईपची. अशा औपचारिक अनोळखी ठिकाणी तरूण जे करतात ते म्हणजे, सहज इकडं तिकडं पाहिल्यासारखं करत क्राउडमध्ये जरा ॲस्थेटिकली चांगलं कुठे काही दिसतंय का वगैरे... परंतु हे एकमेकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीची कसरत फार करावी लागते ह्यात. बाकी माझे ॲस्थेटिक्सचे निकष हे तसे दारिद्र्यरेषेच्या साधारण वीस फूट खालचे असल्यामुळे मला त्याबाबतीत समाधानी होण्यात कधीच अडचण येत नाही. तिथेही आली नाही. पण ते एक असो. मग संध्याकाळी सगळ्यांना एकत्रितपणे नियम वगैरे सांगण्यासाठी एक छोटासा सेशन. तो सेशन संपल्या क्षणापासून नऊ दिवसांचं 'आर्यमौन' सुरू. आता सगळ्यांची आयडेंटिटी एकच -'सा ध क' ३. झोप. पहाटे चारला घंटेचे टोल पडतायत. धम्मसेवक छोटीशी घंटी वाजवत रूमच्या पुढून निघून गेलेले ऐकू येतायत. पापण्यांना बहुतेक लोहचुंबक बांधून ठेवलेयत. डोळे चुरचुरतायत. उघडायला ठाम नकार देतायत.. रोजच्या गणितात काहीतरी त्रासदायक बिघाड झाल्याचं संपूर्ण शरीराला कळतंय. ''साला हे पहाटे चार म्हणजे जरा जास्तच लवकर होतंय..! एवढ्या रात्री उठून कुठे कुणी ध्यानबिन करत असतं काय..! ही झोपायची वेळ आहे..! झोप नीट पूर्ण नाय झाली तर ध्यान कसं करणार..! शिवाय गारठाही किती आहे बाहेर..! झोप..! काय नाय होत..! कुणी बोलवायला आलं तर बघू..'' अशी माझी ड्रामेबाजी किंवा तत्सम पिरपिर वगैरे चाललेली असतानाच डॉट साडेचारला धम्मसेवकाकडून दारावर टकटक..! मग उर्वरित काळात कधी वेळ चुकवली नाही. ४. ओह् नो..! काही साधकांना पचनसंस्थेसंबंधी वगैरे विकार आहेत, असं दिसतंय. आणि ह्या विकारांनी बऱ्यापैकी जुनाट आणि दुर्धर किंवा तत्सम उग्र स्वरूप धारण केलेलं आहे, असंही दिसतंय. कारण स्वतःच्या गॅसेसवर नियंत्रण ठेवणं, त्या बिचाऱ्यांना जमत नाहीये. ॲलोपॅथी,आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा तत्सम बंगाली बाबा वगैरे सर्व शाखांनी ह्यांच्यापुढे हात टेकले असतील काय? की ह्या विकारापुढे ह्या साधकांनी स्वतःहूनच सपशेल हार मानलेली असेल?? कारण काळवेळेचे, स्थळाचे वगैरे बंधनही आता त्यांस क्षुद्र वाटते आहे..! की हे सगळे पहिल्याच दिवशी स्थलकालाच्या सीमा उल्लंघून जाण्यात यशस्वी झाले आहेत ? बाकी काहीही असलं तरी तो विशिष्ट आवाज असा असतो की तो ऐकताक्षणी जगातला कोणताही मनुष्य गंभीर/तटस्थ राहू शकत नाही. हसू येणं अगदी स्वाभाविक. आणि ध्यानासाठी हॉलमध्ये सगळे डोळे मिटून बसलेले असताना समजा असे वेगवेगळे सूक्ष्म,अतिसूक्ष्म पिपाणीसारखे किंवा समजा आपटीबारांसारखे दीर्घ पल्लेदार मोकळेढाकळे आवाज कानावर आले, तर मग हसू दाबणं हीच एक मोठी खडतर साधना होऊन बसतेय..! त्यामुळे ह्या पिपाणीवादक किंवा तत्सम ढोल किंवा पियानोवादक साधकांना आत्ताच कुणीतरी आवरलं पाहिजे. नाहीतर पुढचे नऊ दिवस हे स्वतःच्या घरातच असल्याप्रमाणे निर्ढावत जातील आणि मग याहून मोठ्ठे स्फोट ऐकत बसावे लागेल नंतर नंतर...! हे सगळं चालतच राहणार पाटला. तू इथं कशासाठी आलायस.! तू तुझा तुझा श्वास बघ. ५. मग सकाळी सहा ते साडेसहा गोयंका गुरूजींच्या आवाजातले पाली भाषेतील तालबद्ध लयबद्ध जप. त्यातला एक शब्दही समजत नाही..! पण मन गुंगावतं..! झंकारत राहतं..! नंतर आंघोळ करतोय. दुरून गुरूजींचे हिंदी दोहे कानावर पडतायत.. सुंदर आहेत अर्थातच. सांस देखते देखते मन अविचल हो जाय, सांस देखते देखते सत्य प्रकट हो जाय, सत्य देखते देखते परम सत्य दिख जाय। पहिले तीन दिवस आनापान. श्वास मेहसूस करत राहणं. बाकी दिवसातले साताठ तास मांडी घालून बसणं काही सोपं नाही..! खाली ऐसपैस कुशन असतंच.‌ पण मी त्यावर दोन एक्स्ट्रा उशा घेतल्या. मग उजव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग डाव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग गुडघ्याखाली छोटासा सपोर्ट..! असा ऐसपैस राजेशाही ध्यानास बैसलो. दुसऱ्या दिवशी कंबरदुखी, पाठदुखी, मांड्यादुखी, पायदुखी, डांगदुखी, हेदुखी, तेदुखी, सर्वदुखी. आगायायायाssss करत करत गुरूजींना भेटण्याच्या वेळेत भेटलो. म्हटलं, 'मला बॅकरेस्ट किंवा चेअर मिळेल काय?' ते म्हणाले, ''स्पॉन्डिलायटिस, अर्थ्रायटीस, काही मेजर ऑपरेशन वगैरे झालेल्या लोकांसाठी मी ती सवलत दिलेली आहे. तुम्हाला मिळणार नाही. मणका, मान, डोकं सरळ एका रेषेत आणि जमिनीला काटकोनात ठेवा. अन्यथा इतर जागांवर तणाव येतो. आणि मग श्वासाचं आलंबन सोडून वेदनेकडेच सगळं लक्ष जातं तुमचं. आता अधूनमधून थोडा वेळ हार्ड श्वासांवर काम करा म्हणजे श्वासावर लक्ष टिकून राहिल.. या आता.'' ६. साधनेच्या ह्या मार्गावर घोडदौड करण्यामध्ये एका विशिष्ट साधिकेचा मला अडथळा होतोय, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. सदर साधिकेला समजा ह्या वस्तुस्थितीची बिलकुल खबरबात नसली तरीही काही हरकत नाही. सुरुवातीला अशी सुस्पष्ट खबरबात कुणालाच नसते. ती हळूहळू होते. त्याची एक भाषा असते. त्याचा एक रस्ता असतो. ह्यामध्ये संयम आवश्यक. समतोल आवश्यक. ते सगळं इथं शिकवतील बहुतेक. तेवढं आत्मसात केलं की मग काही अडचण नाही. कोर्स संपल्यानंतर ताबडतोब एखादं वादळी प्रेमप्रकरण करून बघायलाही हरकत नाही. म्हणजे मग आपल्यात कितपत साक्षीभाव आलाय ते समजेल. आणि शिवाय हवापण गुलाबी गुलाबी पडायला लागली आहे. ह्या हवेचाही मान राखला पाहिजे. बहुदा ह्या शतकातल्या एका महान आणि अद्भुत अशा प्रेमकथेची बीजं, ह्या तपोभूमीत माझ्याकडून रोवली जाणार आहेत..! कालिदासानं मेघदूत लिहिलं. टॉलस्टॉयनं ॲना कॅरेनिना लिहिलं.आपल्या हातूनही त्याच दर्जाचं काहीतरी कांड होणाराय, असं दिसतंय..! स्पष्ट लक्षणंच दिसतायत तशी..! आता काही अडचण नाही. काही सवालच नाही. सगळीकडे आपलाच डंका.‌‌.! हार तुरे सत्कार पुरस्कार वगैरे नको म्हणून सांगायला पाहिजे सर्वांना...आपल्याला नै आवडत तसलं काही.. पै पाहुणे सहकारी वरिष्ठ परिचित वगैरे सगळे समजा आता आपल्याशी इज्जतीत बोलतील.. पण आपण काही जुने हिशेब विसरायचे नाय भौ.. कारण आपण काय अगदीच महात्मा गांधी नाय भौ..! बापका, दादाका, भाईका, सबका बदला लेगा रेsss तेरा फैजलवा..! डोळे बंद करून, आत हे असलं चाललंय. पुढून गुरूजी खूणेनं जवळ बोलावतायत. "आप आंख क्यूँ खोलते हो बीच बीच में.. और मनभी बहुत चंचल लगता है... पांच मिनट भी टिक नही पाते है आप एक पोझिशनमें.. मैं ऑब्झर्वेशन करताय सबका... संकल्प किजीए और वापिस जगहपर जाकर सांस को जानने का अभ्यास जारी रखिए." ७. सामुहिक ध्यानासाठी धम्मसेवक प्रत्येक दारापुढे घंटी वाजवून सूचना देतात. परंतु लंच आणि ब्रेकफास्ट वगैरेसाठी असं कुणाला कळकळीचं आमंत्रण देऊन बोलवावं लागत नाही..! भूकेच्या बाबतीत सगळे एकाच पद्धतीने विचार करतात. प्रोफेशन, वय, धर्म, लिंग, देश, आर्थिक क्षमता वगैरे काही मॅटर करत नाही. ठरलेल्या वेळेस सगळे अचूकपणे भोजनालयापुढे आपोआप हजर..! (आपोआप निरंजन सोई..!) बाकी मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि लंच उत्तम. रोज वेगळा मेन्यू. साधं. सात्विक. कमी मसाले, कमी तेल. तरीही चव विसरता विसरत नाही. अत्यंत रूचकर आणि स्वादिष्ट. दोष काढायला काहीच वाव नाही..! शिवाय मोबाईल/टीव्ही /पेपर/ गप्पा वगैरे नसल्यामुळे समग्र लक्ष फक्त जेवणात.‌‌.! त्यामुळे चवीचवीने एकेक घास खाल्ला जातो. अन्यथा नेहमी आपण सवयीने, घाईघाईने ढकलत असतो. संध्याकाळी चहा/लिंबूपाणी आणि प्रत्येकी एक फळ. शिवाय चुरमुऱ्यांचा चिवडा असतो.. तो खाऊन खाऊन किती खाल? कितीही खा..! पोट रिकामंच..! रात्री जेवण नाही. पहिल्या दोन रात्री भूकेची जाणीव असते. पण तिसऱ्या दिवसापासून त्याचंही काही वाटत नाही. उलट एक वेळचं जेवण स्कीप केल्यामुळे शरीर एकदम तल्लख आणि हलकं राहतं. लखलखीत धारदार पात्यासारखं शरीर...! सकाळी उठल्यावर जडपणा नाही. बधिरता नाही. गुंगी नाही. ॲसिडिटी नाही. गॅसेस नाही. चीडचीड नाही. काही नाही. चारी ठाव दाबून खाल्ल्यावर कसली विपश्यना होणार आणि कसलं आनापान..! आणि शिवाय तिथे काही कामच नसल्याने शरीरातली ऊर्जाही खर्च होत नाही. त्यामुळे इव्हिनिंग ब्रेकफास्टही नको वाटतो नंतर नंतर. संध्याकाळी फक्त लिंबू पाणीच पुरेसं. ८. उदाहरणार्थ समजा आपण शून्यागारामध्ये ध्यानाला बसलोय. शेजारच्या किंवा वरच्या कुठल्यातरी शून्यागारातून खोकण्याचा, खाकरण्याचा आवाज येतोय. मग हळूहळू सगळ्यांनाच घसा खाकरून, आपापल्या घशांमध्ये सगळं व्यवस्थित आहे का ते चेक करून बघण्याचा मोह होतोय..! मग आलटून पालटून खोकण्याच्या लाटा 'पॅगोडा'भर घुमतायत. ह्या मनुष्यांच्या घशांतून टोचणी, खवखव, खरखर वगैरे दु:खद संवेदना 'संखारांच्या' रूपात बाहेर पडू इच्छितायत. त्यांना वाट खुली करून दिल्याशिवाय ह्यांना चैन पडत नाही नाही. संखारांची एक संसर्गजन्य लाटच आलेली दिसतेय. (रात्रीच्या वेळी समजा पुणे वगैरे शहरातल्या एखाद्या गल्लीतलं एक कुत्रं उगाचच सहज टाईमपास म्हणून भुंकतं..‌ मग त्याला एकटं वाटू नये म्हणून लगेच आख्ख्या पुण्यातल्या कानाकोपऱ्यातली सगळी कुत्री एकसाथ कल्ला करायला लागतात, हे आपण ऐकलं असेलच कधीतरी. माणसांमध्येही तसंच असतं काय?) ९. चौथ्या दिवशी गोयंका गुरुजी विपश्यना शिकवतात. शरीराच्या या जागेवर या क्षणी काय होतं आहे याचं अवधान. असा टाळूपासून पायाच्या बोटांपर्यंतचा सजग प्रवास. With respect to time. With respect to space. संवेदना जाणवली, तिला रिॲक्शन नाही दिली, संवेदना बदलतेय हे चेक केलं आणि या सर्ववेळी चित्त समतोल आहे की नाही ते चेक केलं. अशी प्रोसेस. यामागची फिलॉसॉफी अशी की शरीरावर सुखद संवेदना जाणवल्या तर आपल्या आसक्तीच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात. शरीरावर दु:खद संवेदना जाणवल्या तर आपल्या व्याकुळतेच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात. दोन्ही प्रकारातल्या संवेदनांचा पॅटर्न सेमच आहे. उत्पन्न होणे, वाढत जाणे, एका बिंदूनंतर कमी कमी होत जाणे, आणि शेवटी नष्ट होणे...! ह्या सगळ्याचा फर्स्ट हॅंड अनुभव घेऊन पाहणं म्हणजे 'विपश्यना'..! शारीर वेदनेला किंवा बोअरडमला फेस करताना चीडचीड संताप दु:ख चिंता व्याकुळता बाहेर येते.. नकोसं होतं. मन संवेदनांवर टिकत नाही. भरकटायला लागतं... विपश्यनेपेक्षा आनापान तसं सोपं आहे. पण गोयंका गुरूजी म्हणतात की, 'आनापान ही फक्त पूर्वतयारी आहे. प्रज्ञेच्या क्षेत्रात पाऊल टाकायचं असेल तर विपश्यनेकडं जावंच लागेल.' १०. डिअर गोयंका गुरुजी, तुम्ही साक्षीभावाने संवेदनांकडे बघा म्हणता. पण तीच तर मुख्य गोम आहे. साक्षीभाव एका रात्रीत तर पैदा होणार नाही. तो डेव्हलप व्हायला वेळ लागणार. सराव लागणार. विपश्यनेची प्रॅक्टिस असल्याशिवाय साक्षीभाव येणार नाही आणि संवेदनांकडे साक्षीभावाने पाहिल्याशिवाय विपश्यना करू शकणार नाही, असा चक्राकार प्रॉब्लेम आहे..! आणि वेदनांची कळ मेंदूपर्यंत जायला लागते तेव्हा बोंबलायचं कळत नाही..! कधी झटकन पोझ बदलून रिकामे होतो, कळतही नाही. कुठला साक्षीभाव आणि काय घेऊन बसलाय..! अशा वेळी आपला नेहमीचा 'भोक्ताभावच' बरा..! ११. पण पुढे अशाच एका सिटींगला जरा 'अधिष्ठान' मनावर घेतलं.. ठरवूनच बसलो की आता एकतास हालचाल करायची नाही. नाही म्हणजे नाही. बिलकुल नाही. अजिबात नाही. किंचितही नाही.. काय व्हायचं ते होऊदे *** मग एका अशाच क्षणी अवघडलेल्या मांडीतल्या घनीभूत ठणकत्या वेदनेला हळूहळू डीझॉल्व होत जाताना पाहिलं तेव्हा मलाच आश्चर्याचा धक्का बसला की साला हे असं पण होऊ शकतं..! आपल्याला हे जमू शकतं ! म्हणजे हे सांगतायत ते काही थापा मारत नाहीयेत तर..! आणि एवढं आनंददायी असतं हे? हे असं शारीर वेदनेपासून स्वतःचं विलग होणं.‌.! आणि कुठून हा असा थुईथुई आनंदकल्लोळ उसळायला लागलाय..! तोही असा अचानकच.! कुठे लपला होता एवढे दिवस..! किती दशकं झाली आपल्याला असा विनाकारण आनंद होऊन..!! तर एखाद्या मिनिटाभरासाठीही अशा स्वरूपाचा आल्हाद-क्षण तुम्हाला मिळाला तरी तुमचा पूर्ण दिवस त्याच धुंद आनंदात जातो. तो एक मिनिटसुद्धा एवढा ताकदवान असतो की संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकतो !! पण हे काही नेहमी नेहमी होत नाही.. आणि शिवाय हे ही टेंपररी असतं‌, 'अनिच्च' असतं. हे एक आहेच. १२. बाकी इथे कुणी दिव्य अनुभूतीच्या शोधात वगैरे येऊ नये. ही टेक्निक शिकावी. पटली,आवडली तर पुढे आपापला सराव जमेल तसा चालू ठेवावा..बाकी आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही फूटपट्ट्या सांगतात गुरुजी. त्याप्रमाणे पहावे स्वतःस आजमावून. अचानक 'सडन एनलाईटमेंट'चा हा मार्ग नाही. किंवा ते युजी कृष्णमूर्ती सांगतात तशी 'कलॅमिटी' वगैरे काही होणार नाही यात.. किंवा रजनीशांसारखा हसत खेळत करायचाही प्रकार नाही. ह्या दहा दिवसांत आपल्या आत काही रॅडिकल चेंजेस होऊन आपण डायरेक्ट बुद्ध होऊनच गेटच्या बाहेर पडणार, असलंही काही होणार नाहीये... जे काही आहे ते फ्लॅशेसमध्येच..! अर्थात, आपल्याला ते मुक्ती मोक्ष सतोरी किंवा निर्वाण वगैरे काही नकोच आहे. शांत वाटत राहिलं तरी पुरे. गोष्टींकडे नीटपणे बघता आलं तर पुरे...! शिवाय थोडंसं सर्व्हिसिंग. थोडंसं धार लावणं स्वतःला. थोडंसं आयसोलेशन. मन ज्यांना लटकतं ते बाहेरचे सगळे आधार, सगळ्या खुंट्या काढून टाकणं आणि मनाला आत वळण्याशिवाय इतर काही मार्गच शिल्लक न ठेवणं. किमान थोडा काळ तरी..! १३. प्रतिक्षण सजग. शरीराबद्दल अवेअरनेस वाढत चाललाय. विचारांचा गोंगाट कमी होत चालल्याने शारीर हालचालींतली घाई कमी होत जातेय.. सगळ्या कृती शांत संथपणे होतायत.. त्यात एक ठेहराव आहे... उठणं, बसणं, खाणं, आंघोळ, कॅंपसमध्ये फिरणं ह्या साध्या साध्या कृतीही फिलॉसॉफीकल वाटतायत.. १४. ह्या कोर्सच्या गुरूजींचं हिंदी मुंब्बैय्या आहे. काही साधकांना जवळ बसवून सांगण्याची त्यांची पद्धत आहे. "आप चुळबुळ बहोत करते हो. वैसा नय करने का. संवेदना, संखारा, धाराप्रवाह, अनिच्चबोध कुछ समझा की नय आपको?.. गोयंका गुरूजीने क्या बोला कल के प्रवचन में? अपनेको भीतरकी गांठें खोलने का हय.. नई गांठें नही बांधने का हय अपनेको... गांठें धीरे धीरे कमती होना मंगता हैं.. साक्षीभाव धीरे धीरे बढना मंगता हय..." १५. एक साधक बहुदा महाबोअर होऊन एका ठराविक झाडाखाली बसलेला मला दिसायचा. त्याला मी मनातल्या मनात सल्ला दिला. "अरे, तुम ऐसे खुले में पेड के नीचे मत बैठा करो. तुमारा फोटू निकालके बादमें यहांपे टीव्हीपे दिखाते की ये आदमी येडा हो गया करके.. जाव.. जाके रूममें बैठो" १६. नॉर्मल रूटीनमध्ये मनाला वेगाची चटक लागलेली असते. मनावर पुटं/गंज चढलेला असल्यामुळे इथं कॅंपसमधला सर्व काळ साचून राहिल्यासारखा वाटतो. सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी गुरूजींचे प्रवचन ह्या चार पिलर्सवर पूर्ण दिवस तोललेला आहे. सकाळचा वेळ पटकन जातो. संध्याकाळीही ब्रेकफास्ट, प्रवचन वगैरे मध्ये वेळ जातो.. पण दुपार सरता सरत नाही. बहुदा या कॅंपसमध्ये दुपारी बारा ते पाच या वेळेत पृथ्वी फार हळूहळू फिरते. सूर्याच्याही बहुदा ते लक्षात येत नाही. कारण तो स्वतःच पेंगत असतो. १७. कधीतरी सगळी निगेटिव्हीटी अंगावर चाल करून येतेय. मनातला खाली बसलेला सगळा गाळ ढवळून वर आलाय. जुने अपमान. चुका. जुन्या काही प्रसंगातलं आपलं शरमनाक वागणं. निष्कारण लोकांना शब्दांनी बोचकारलेलं. आपल्या आत्मसन्मानाच्या चिंध्या झालेल्या वेळा. गैरसमज. मुजोरी. बालिशपणा. ह्या सगळ्याच्या थपडा बसतायत. नव्हे, ठोसे बसतायत. ह्यातलं नव्वद टक्के भूतकाळातलं आहे. वरचा उथळ स्तर खरवडून काढला की खाली सगळी बोंबाबोंबच आहे ***. अमुक गोष्टी करायला नको होत्या, तमुक गोष्टी आता कधीच जमणार नाहीत. गेला तुझा चान्स. आता बस बोंबलत. सातव्या-आठव्या दिवशी हे असे प्रचंड स्विंग होणारे मूड्स. चांगले आणि खराब मूड्स. उत्साही आणि मलूल मूड्स. हतबल मूड्स. दिवसातून तीन वेगवेगळ्या वेळी सहा-सात वेगवेगळे मूड्स. कोणता चांगला कोणता वाईट ठरवणं मुश्किल. झाकोळ..! खस्ता हालत..! पण हे 'वादळ' कायम टिकत नाही. ते ओसरतंच कधी ना कधी. मग हलकं वाटतं. १८.मागच्या आठ दिवसांत डोक्यात नवीन काहीच कचरा शिरलेला नसल्याने ह्या खूप प्राचीन आठवणी येतायत. अगदी लहानपणापासूनच्या ज्या गोष्टी, घटना आपण बिलकुल विसरून गेलेलो होतो, त्याही वरती येतायत. आश्चर्य आहे. चित्त पूर्ण बहिर्मुख. दोन मिनिटंसुद्धा एका जागी टिकत नाही. साधनेच्या प्रक्रियेतले दोष काढणारं मन.. साला ह्या 'संखारांना' माझी पाठ आणि मांड्याच फार आवडतायत की काय? तिथेच नेमक्या 'संखारा' कशा काय प्रकट होतायत.‌.! आठवा दिवस रद्द करून नऊच दिवसांचाच हवा होता हा कोर्स, असंही म्हणतंय मन..! मोठं फिलॉसॉफर वगैरे झालेलं मन..! किंवा मग प्लॅनिंग करणारं मन..! इथून अकराव्या दिवशी कसं कसं जायचं.. नंतर काय काय अडचणी येतील... त्या अडचणी कशा कशा सोडवायच्या... अमुकचं काय करायचं... तमुकला काय सांगायचं..! प्लॅनिंग करायला किती आवडतं मनाला..! भले ते प्लॅनिंग उद्याचं असू द्या, तासाभरानंतरचं असू द्या किंवा लॉंग टर्मचं असू द्या. साला प्लॅनिंग कमिशनचा उपाध्यक्ष करायला पाहिजे मला ताबडतोब..! किंवा ते नाही शक्य झालं तर ॲटलीस्ट भारतातील सगळ्या महानगरांच्या पुढच्या वीस वर्षांच्या नियोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवायला पाहिजे. काही अडचणच येणार नाही. काही प्रश्नच नाही..! १९. गुरुजींची प्रवचनं एकदम सही आहेत. त्यांची सांगण्याची, एक्सप्लेन करण्याची शैली खरोखरच सुंदर आहे.. अतिशय बुद्धिवादी तरीही करूणेनं ओतप्रोत. तर्ककठोर, कट्टर नास्तिक माणसालासुद्धा हे सहज कन्विन्स करतील. दिवसभर प्रॅक्टिस आणि संध्याकाळी त्या दिवसभरात केलेल्या प्रॅक्टिसची सैद्धांतिक थेरी प्रवचनातून असते. मी त्यांची प्रवचनं फार पूर्वी यू-ट्यूबवर ऐकली होती. पण कोर्समध्ये एकेक दिवस संपल्यानंतर संध्याकाळी त्या त्या दिवसाचं प्रवचन ऐकलं की मग लक्षात येतं ह्यांच्या बोलण्यात किती मज्जा आहे ते..! किती खाचाखोचा आहेत ते..! बाकी गोयंकांकडे उच्च दर्जाचा सेन्स ऑफ ह्युमर आहे, ह्यात काही वादच नाही. समोरचे ऐकणारे लोक कसा कसा विचार करत असतील ह्याबद्दल त्यांनी आधीच फार खोलात जाऊन विचार केलाय. ही रेकॉर्डेड प्रवचनं जुनी आहेत. त्या वेळच्या साधकांपुढे दिलेली. पण आपलं मनही डिट्टो तसंच जुनं आहे, त्यामुळे आपल्याला हे लागू पडतं.. कदाचित आणखी शंभर वर्षांनी कुणी हे ऐकलं तर त्यालाही हे लागू पडेल. एका प्रवचनात ते म्हणतात, "व्याकुळतेच्या लहरी येतच राहतील आयुष्यात. त्यांच्यासोबत जे काही जुनं इंधन असेल तोपर्यंत त्या जळत राहतील. नंतर आपोआप विझून जातील. फक्त तुम्ही त्यात स्वतःचं पेट्रोल ओतू नका. आता हे सगळं वरवर बुद्धीला पटेल.. पण सराव नसेल तर कायमस्वरूपी खोलवर आत घुसणार नाही.. मग व्याकुळता आली की तुम्ही पेट्रोलपंपाच्या सगळ्या टाक्या, पाईप्स खोलून ठेवणार..! आणि आतल्या आत धुमसत राहणार..!" २०. दहाव्या दिवशी सकाळी मंगलमैत्री. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे..!! जन-जन मंगल, जन-जन मंगल, जन-जन मंगल होय रे.. !! ह्यांच्या आवाजातून कशी कणव झरत असते..! आपल्याला ती कळतेय कारण आपल्यातूनही ती झरत आहे. नऊ दिवसांतील घावांवर मलमपट्टी कशी होत असते, हे शेवटच्या दिवशीच्या मंगलमैत्रीतून एकदा अनुभवूनच पहायला पाहिजे.. सांगून ते कळण्यास मर्यादा आहेत. मग मौन खुलं झालं. जेव्हा बोलायला लागलो तेव्हा सुरूवातीला पाच-दहा वाक्यं सलग बोलताना टाळूमध्ये आणि घशात स्वरयंत्रामध्ये मजेशीर गुदगुल्या होत होत्या, हे एक आठवतंय. शब्दांनाही स्वतःचा नाद असतो, ध्वनी असतो हे प्रकर्षानं जाणवलं. आपल्याला बोलून व्यक्त होता येतं, ही किती आश्चर्याची गोष्ट आहे, हे नऊ दिवसांच्या मौनानंतर समजलं..! २१. दहाव्या दिवशी मोबाईल आणि बाकी गोष्टी रिटर्न. मोबाईल सुरू केल्यानंतर स्क्रीनवर शे-पाचशे नोटीफिकेशन्स बदाबद कोसळणं.. बाकी आपण नाहीसे झालो तरी जग आपापल्या गतीने चालूच राहिलेलं असतं. बाकी ह्या दहा दिवसांत खर्च काही नाही. शेवटच्या दिवशी डोनेशनचं काउंटर असतं, दानपेटी असते. काही कंपल्शन असं नाही. अकराव्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सेंटरच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर आपण जणू कोमातून किंवा गाढ निद्रेतून ह्या वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत, असं एक जादूई फिलींग..! आणि सोबतच ह्या दहा दिवसांत कमावलेल्या काही इनसाईट्स दुनियादारीत फार काळ टिकवून ठेवता येणार नाहीत, ही धाकधूकही..! बघूया कसं जमतंय ते..! डिस्क्लेमर : व्यक्तीनुसार अनुभव/मतं वेगवेगळी असणार. शिवाय लिहिण्याची, अनुभवांची माझी मर्यादा असल्याने त्यात काही दोष हे असणारच आहेत. हे लिखाण म्हणजे काही विपश्यनेवरचं अंतिम सत्य नाहीये. तेवढा कुणाचा अधिकारही नसतो. फक्त काही शेअर करणं एवढाच उद्देश. त्यामुळे ह्या लेखाकडे मनोरंजन म्हणून पहावे, ही विनंती. ह्या लेखावरून समजा कुणी काही मत बनवलं किंवा जनरलायझेशन केलं तर ते फारसं योग्य होणार नाही. आपापल्या अनुभवाअंतीच काही निष्कर्ष काढला तर बरं होईल, असं वाटतं. बाकी चूकभूल द्यावी घ्यावी. मंगल हो _/\_

प्रतिक्रिया द्या
21672 वाचन

💬 प्रतिसाद (57)
र
रंगीला रतन Tue, 12/14/2021 - 18:14 नवीन
कारण स्वतःच्या गॅसेसवर नियंत्रण ठेवणं, त्या बिचाऱ्यांना जमत नाहीये. ॲलोपॅथी,आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा तत्सम बंगाली बाबा वगैरे सर्व शाखांनी ह्यांच्यापुढे हात टेकले असतील काय? की ह्या विकारापुढे ह्या साधकांनी स्वतःहूनच सपशेल हार मानलेली असेल?? कारण काळवेळेचे, स्थळाचे वगैरे बंधनही आता त्यांस क्षुद्र वाटते आहे..! खरं सांगा इथे जायची दुर्बद्धी तुम्हाला कशी झाली? की Rehab मधी जायचा टाळायला इकडे गेलात :=)
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 02:30 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 02:30 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 02:30 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 02:30 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 02:30 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 12/17/2021 - 04:44 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा