देव जाणे !!
माझी आई खूप धार्मिक होती. त्याउलट वडील तर्क कठोर. आई देवाची पूजा रोज मनोभावे करायची. तिला वेळ नसेल तर मोठा भाऊ करायचा. आई सर्व व्रतवैकल्ये,श्रावणातले उपास, गौरी गणपती, नागपंचमी, गोकुळाष्टमी, दसरा, पाडवा सगळं, सगळं करायची. शिवाय विनायकी आणि अंगारकी करायची. जिवतीची पूजा करायची.
वडील म्हणायचे,"या हल्लीच्या काळात जिवतीएवढी मुलं परवडणार आहेत का? शिवाय जिवतीचा कागद चिकटवून काय होणार आहे? मुलांवर विज्ञाननिष्ठ संस्कार करणं हे आईवडिलांचं कर्तव्य."
दोघांचेही विचार ऐकून माझी द्विधावस्था व्हायची. आईवर माझं फार प्रेम होतं. म्हणून ती सांगते म्हणून मी शुभंकरोती म्हणायची. पण माझ्या बुद्धीला त्या वेळी वडिलांचं म्हणणं पटायचं.
आईला, भावाला काम असलं, त्यांना वेळ नसला की आई मला पूजा करायला सांगायची. अगदी लहान वय ते. पूजा करायचा मला विलक्षण कंटाळा यायचा. मी कशी पूजा करायची माहिताय? देवांवरची आधीची फुलं काढायची. सहाण आणि खोड नुसतंच ओलं करायचं. गंध नीट उगाळायचंच नाही. कारण गंध उगाळायचा मला खूप कंटाळा येई. मग ताम्हनात पाणी ओतून सगळे देव मी एकत्रच खळबळायची. देवाच्या प्रत्येक मूर्तीला वेगळी आंघोळ घालायचीच नाही. नंतर वस्त्रानं देव पुसायचीच नाही. नंतर हळदीकुंकवाच्या कुयरीत देवांना उलटं करुन देवांची डोकी खाली करायची. त्यांच्या डोक्यांना हळदीकुंकू चिकटायचं. त्या मूर्तींना सुलट करुन तबकात ठेवायची. बचकभर फुलं त्यांच्या अंगावर टाकायची. उदबत्ती, निरांजन लावायचं. झाली पूजा!
देवाच्या आंघोळीचं पाणी तुळशीवृंदावनात न ओतता बाहेरच्या पायरीजवळ जाऊन डाव्या बाजूला फेकून द्यायची. निर्माल्य निर्माल्याच्या पिशवीत टाकायची. नेवैद्य दाखवायची. म्हणजे नुस्ता समोर ठेवून द्यायची. आई विचारायची "झाली एवढ्यात पूजा?नीट केलीस का?" मी म्हणायची,"हो.नीट केली. तू येऊन बघ हवं तर!" आईचा विश्वास बसायचा नाही. मग मला एखादा रट्टा मिळायचा.
अशाप्रकारे अगदी लहान असताना न कळत्या वयात अशी उपटसुंभ पूजा मी केली. लहानपणी त्यात आपलं काही चुकतंय असं माझ्या निर्लज्ज आणि कोडग्या मनाला वाटायचंच नाही. मी अश्रद्ध होते की आळशी होते? मला अक्कल नव्हती हेच खरं! मग मोठी झाले. लग्न झालं. ह्यांची बदली झाली आणि आम्ही एका नव्या घरात भाडेकरु म्हणून गेलो. त्या घरात एका कोपऱ्यात उंचावर एक देवघर होतं. आधीपासूनच.
आसपास बागही होती. बागेत एक तुळशीवृंदावन होतं. त्या वृंदावनाला दिवा लावायला एक छोटीशी देवळी होती. शेजारीच घरमालक सहकुटुंब सहपरिवार राहातं होते. ते तुळशीवृंदावन आणि ती देवळी पाहून काय झालं मला कुणास ठाऊक! मला वाटलं, ह्या देवळीत रोज दिवा लावावा. घरात देव ठेवावेत.
मग माझ्याकडे असलेली,शो पीस म्हणून घेतलेली गणपतीची मूर्ती मी एक लोकरीचे बस्कर टाकून कोपऱ्यातल्या देव्हाऱ्यात ठेवली. आईनं आणि सासूबाईंनी दिलेली अन्नपूर्णा, लंगडा बाळकृष्ण, शाळीग्राम शोधून काढले.आणि छोट्या ताटलीत ठेवले. फुलं घातली. तुळशीची पाने वाहिली. निरांजन लावलं. संध्याकाळी देवापाशी पुन्हा एकदा निरांजन लावलं. वृंदावनाच्या देवळीत पणती लावून तेलवात केली. संध्याकाळच्या धूसर अंधारात ते वृंदावन आणि प्रकाश देणारी ती पणती इतकी गोड दिसत होती! देवापुढचं निरांजन पाहूनही प्रसन्न आणि शांत वाटत होतं. मग मी रोज तसं करायला लागले.
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी आणखी मोठी झाले. तिशीत प्रवेश केला. आणि माझा दृष्टिकोन बदलला. माझं वाचन वाढलं. आगरकर, सावरकर, जे कृष्णमूर्ती, विवेकानंद, चिन्मयानंद, शिवानंद, ओशो असं खूपच वाचलं. आणि मला कर्मकांड नको वाटायला लागलं. वडिलांच्या मतांचा प्रभाव माझ्यावर होताच! मी व्रतवैकल्ये उपवास वगैरे करत नव्हतेच. पण मग रोजची पूजाही करेनाशी झाले. सामाजिक कार्य करायला लागले. गोरगरीब, गरजूंना मदत करायला लागले. काही वस्त्यांमधे जाऊन तिथं संस्कारवर्ग घालवायला लागले. हळूहळू समविचारी मैत्रिणी भेटल्या. सगळ्या मिळून सामाजिक कामं करायला लागलो. मोलकरणींना शिकवायचो. प्रौढांसाठी साक्षरता वर्ग चालवायला घेतला. शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांना शिकवायला लागलो. अनाथाश्रमात जाऊन मुलांना गोष्टी सांगितल्या. वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी गप्पा मारायला लागलो. गावच्या महिला दक्षता समितीच्या सदस्य झालो. महिलांवरचे अन्याय दूर करण्यासाठी खटपट करायला लागलो. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यायला लागलो. मारकुट्या नवऱ्यांना काहीअंशी आळा बसू शकला. रिमांड होम मधली, अनाथाश्रमातली मुलं सणावाराला, दिवाळीत वगैरे आमच्याकडे दोन दिवस राहायला येऊ लागली. त्याकाळात पंजाबमध्ये अतिरेक्यांनी हैदोस घातला होता. अतिरेक्यांच्या हल्ल्यात ज्यांचे आई-वडील मारले गेलेत अशा अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसाठी मी काही काम केले. तीन मुलांना मी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. ही यादी खूप मोठी आहे. आपल्यापैकी बरेच जण अशी मदत करत असतात. मी त्यांतलीच एक. मला वाटलं देवाची सेवा म्हणजे अशा संकटग्रस्तांना मदत करणं. माझ्या मनाला त्यामुळे शांती समाधान मिळाले. तुम्हालाही असा अनुभव आला असेल. अशी मदत केल्याचे सर्वत्र सांगू नये, पण विषयाला धरुन आलं तर सांगायला हरकत नसावी.
आता वयपरत्वे अंगमेहनतीची कामं होत नाहीत. बाहेर जाऊन सामाजिक कामं करणं शक्य होत नाही. मग मी झेपेल तितपत अल्प देणगी, मदत देते. तीही आता फारशी शक्य होत नाही.
पण तरी आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर कोणाला देण्यात आनंद असतो. दान सत्पात्री व्हावं याची पुरेपूर काळजी घेते. यात माझा देव मला सापडलाय का? कळत नाही. मी आता पूजा अर्चा, उपास, व्रतवैकल्ये करत नाही. फक्त गीतेचा एक अध्याय रोज वाचते. त्यातली स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचून स्फूर्ती मिळते. आपण ती अंगी बाणवावी असं वाटतं. ॐ अक्षरावर थोडी ध्यान धारणा करण्याचा प्रयत्न करते. मन एकाग्र होतंच असं नाही.
उगीच काहीतरी कल्पना करुन देवाला चार हात, सोंड, चक्र, वाहन देण्यापेक्षा तो कसा आहे, कसा दिसतो ते मला "माहीत नाही" असं म्हणणं जास्त प्रामाणिकपणाचं आणि तर्कशुद्ध आहे असं आताशा वाटतं.
देव आहे का नाही, तो कशा स्वरूपात आहे आपल्याला सामान्य माणसाला कळत नाही. मी पूजाअर्चा करत नाही हे बरोबर आहे का नाही काय माहीत!
"तो" खरा कसा आहे? "देवच जाणे!", असंच शेवटी म्हणावं लागेल.
त्यातली स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचून स्फूर्ती मिळते. आपण ती अंगी बाणवावी असं वाटतंशेवटी स्फूर्तीसाठीच स्थितप्रज्ञानाच्या शोधात पुढे पुढे जातो.