Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोष्ट 95 वर्षांच्या संसद भवनाची

प
पराग१२२६३
Fri, 01/21/2022 - 18:36
💬 2 प्रतिसाद
भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आता 95 वर्षे पूर्ण झालेली आहेत. रायसीना टेकडीच्या परिसरात वसलेले संसद भवन शंभरीकडे वाटचाल करत असतानाच त्याच्या शेजारीच नव्या संसद भवनाची उभारणी केली जात आहे. त्या नव्या इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा कारभार नव्या संसद भवनातून सुरू होईल. तरीही आधीच्या संसद भवनाने भारताच्या संसदीय वाटचालीला, स्वातंत्र्यलढ्याला अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे महत्व कायम राहणार आहे. पहिल्या महायुद्धानंतर भारतात लागू झालेल्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांवर आधारलेला भारत सरकार अधिनियम, 1919 (Government of India Act-1919) संमत करण्यात आला होता. त्यानुसार भारतीयांच्या प्रतिनिधींचे विधिमंडळ अस्तित्वात येणार होते. त्यामुळे त्याची इमारत नव्या राजधानीत, नवी दिल्लीत रायसीना परिसरातच उभारण्याचे ठरले. त्यानंतर उभ्या राहिलेल्या विधिमंडळ इमारतीचे उद्घाटन 18 जानेवारी 1927 ला करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने 23 ते 29 जानेवारीदरम्यान संसद भवनावर करण्यात येणाऱ्या रोषणाईमुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. ही वर्तुळाकार वास्तू वातानुकुलित असून तिचा व्यास 560 फूट आणि परिघ सहा एकर आहे. पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याभोवती 26 फूट उंचीचे 144 स्तंभ उभारलेले आहेत. संसद भवनाच्या मध्यभागी पूर्ण गोलाकार मध्यवर्ती सभागृह (Central Hall) असून त्याच्या घुमटाची त्रिज्या 98 फूट आहे. पूर्वी येथे विधिमंडळाचे ग्रंथालय होते. पुढे नुतनीकरणानंतर येथे 9 डिसेंबर 1946 पासून 24 जानेवारी 1950 पर्यंत घटना परिषदेच्या बैठका झाल्या होत्या. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि महत्वाच्या राष्ट्रांच्या प्रमुखांचे संबोधन त्याचबरोबर लोक सभा आणि राज्य सभा यांच्या संयुक्त बैठका यासाठी मध्यवर्ती सभागृहाचा वापर केला जातो. हे सभागृह अधिवेशनाच्या काळात खासदारांमध्ये होणाऱ्या अनौपचारिक चर्चांचेही ठिकाण असते. या सभागृहात 6 प्रेक्षक गॅलेऱ्या आहेत. मध्यवर्ती सभागृहाच्या भिंती मौल्यवान लाकडाने मढवलेल्या असून त्यावर अनेक राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे लावलेली आहेत. मध्यवर्ती सभागृहाच्या भोवतीने तीन अर्धवर्तुळाकार सभागृहे आहेत. त्यांपैकी एकामध्ये लोक सभा, दुसऱ्यामध्ये राज्य सभा भरते आणि तिसरे सभागृह ग्रंथालय म्हणून वापरले जाते. लोक सभेत हिरव्या रंगाचे, तर राज्य सभेत लाल रंगाचे गालिचे आणि आसने आहेत. लोक सभेतील 550 आणि राज्य सभेतील 250 आसने सहा भागांमध्ये आणि 11 ओळींमध्ये विभागलेली असून त्या ओळींची मांडणी घोड्याच्या नालेच्या आकाराप्रमाणे आहे. त्यासमोर मध्यभागी सभापतींचे आसन आणि त्यापुढे सभागृहाच्या महासचिवांचे आसन आणि सभापटल आहे. सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर विशिष्ट व्यक्ती, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक इत्यादींसाठी गॅलेऱ्या आहेत. लोक सभेच्या लाकडाने मढवलेल्या भिंतींवर पहिल्या भारतीय विधिमंडळाचे अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांचे चित्र आणि अखंड भारतातील विविध प्रांतांच्या सोनेरी रंगातील मुद्रा बसवण्यात आलेल्या आहेत. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 ला ब्रिटिश सरकारच्या Public Safety Bill आणि Trade Dispute Bill यांना विरोध दर्शवण्यासाठी सेंट्रल असेंब्लीत (आताची लोक सभा) प्रेक्षक गॅलरीतून बाँब टाकला होता. त्यांनी हा बाँब जेथून टाकला होता त्या जागेचे आता स्मारक करण्यात आले आहे. तिसरे अर्धवर्तुळाकार सभागृह स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानिकांच्या बैठकांसाठी वापरले जात असे. त्यामुळे त्याला त्यावेळी Prince’s Chamber म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर तेथे 15 ऑगस्ट 1987 पर्यंत संसदेचे ग्रंथालय सुरू होते. संसद भवनातील तिन्ही सभागृहांच्या भोवतीच्या चार मजल्यांवर सभापती, मंत्री, पक्ष कार्यालये, लोक सभा आणि राज्य सभा सचिवालयांची कार्यालये, संसदीय कामकाज मंत्रालय, भारतीय स्टेट बँकेचा कक्ष, टपाल, रेल्वे आणि विमान आरक्षण कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर संसदीय समित्यांसाठी आणि पत्रकारांसाठी प्रत्येकी तीन कक्ष आहेत. संसद भवनाच्या परिसरात विविध नेत्यांचे पूर्णाकृती आणि अर्धपुतळे उभारलेले असून ठिकठिकाणी कारंजी आणि बगीचे केलेले आहेत. संसद भवनाच्या स्वागत कक्षाच्या वातानुकुलित इमारतीच्या बांधकामात नव्या-जुन्या वास्तुशैलींचा सुंदर मिलाफ झालेला आढळतो. तेथे प्रेक्षक खासदारांच्या भेटी घेऊ शकतात. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/01/95.html

प्रतिक्रिया द्या
3097 वाचन

💬 प्रतिसाद (2)
त
तर्कवादी Sun, 01/23/2022 - 09:45 नवीन
नवीन संसद भवन उपयोगात येवू लागल्यावर जुने कोणत्या कारणासाठी वापरले जाईल ?
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Sun, 01/23/2022 - 14:41 नवीन
जुनी इमारत पुढे संग्रहालय म्हणून वापरली जाण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा