Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुराकामी

प
पाटिल
Fri, 02/04/2022 - 17:25
💬 3 प्रतिसाद
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..! त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..! मग सुरूवातीला धूसर दिसणारी त्याची पात्रं हळूहळू 'विश्वरूप' प्रकट करायला लागतात..! हे करताना मुराकामी उरकाउरकी अजिबात करत नाही. गोष्टींकडे बघण्याची एक खास अशी फ्रेश नजर त्याला लाभलेली आहे. त्यामुळे घटनेचा, प्रसंगाचा, ॲम्बीयन्सचा, मनस्थितींचा एकेक पापुद्रा अत्यंत शैलीदारपणे काढण्याची त्याची पद्धत असते..! पण तरीही तो कुठंही कंटाळा आणत नाही, पकड किंचितही ढिली होऊ देत नाही, हे विशेष..! मुराकामीची कल्पनेची झेप फार उंच असल्यामुळे कधीकधी आपलेही वास्तवाचे भान सुटते. आणि होतं असं की आपण तर्क बाजूला ठेवून मुराकमीला शरण जातो..! बाधा झाल्यासारखे आत आत शिरत जातो त्याच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि काही पात्रं तर बऱ्याच काळानंतरही आपल्याला अधूनमधून झपाटण्याची क्षमता राखून असतात, असं म्हटलं तरी चालेल. (उदाहरणच द्यायचं झालं तर 'काफ्का ऑन द शोअर'मधलं मिस्टर नकाटा हे पात्र..! निव्वळ अफलातून..!) त्याची पात्रं मध्येच एखादं पुस्तकं वाचायला लागतात किंवा कधी बीथोवन मोझार्टसारख्या अशाच एखाद्या अनवट कलावंतांचं संगीत ऐकायला लागतात किंवा कधी cooking मध्ये खोलवर बुडून जातात किंवा कधी चक्क मांजरांशी बोलायला लागतात आणि मांजरंही अत्यंत निरागसपणे स्वतःचं अंतरंग उघड करायला लागतात किंवा मग कधी बारमध्ये बसून फिलॉसॉफीकली दारू चाखणं किंवा सेक्ससंबंधी उत्कृष्ट हालचालींची बहारदार वर्णनं येतात..! आणि मग त्यांच्या माध्यमातून मुराकामी त्या प्रत्येक कलाकृतीबद्दलची, प्रक्रियेबद्दलची स्वतःची चिंतनशील सघन निवेदनं व्यक्त करत राहतो. जे अत्यंत वाचनीय असतं..! मुराकामीचं स्वतःचं वाचन घनघोर म्हणावं असं आहे..! पौर्वात्य-पाश्चात्य जगातल्या अभिजात वाड्मयाची, इतिहासाची, संस्कृतींची मुराकामीला जाण आहे. बुद्ध, मार्केझ, सार्त्र, काम्यू, काफ्का, फ्रॉईड, ऑर्वेल, कोसलर, रसेल, हेमिंग्वे, शॉ, प्रुस्त, विटगेन्स्टाईन, इलियट, फिट्झेराल्ड, नीत्शे, सॉक्रेटिस, प्लेटो, चेकॉव्ह, दस्तोव्हस्की आणि असे रग्गड अभिजात लेखक-फिलॉसॉफर्स मुराकामीने वाचून पचवलेले आहेत, हे दिसतं..! कारण मुराकामी स्वतःच्या कादंबऱ्यांमध्ये काही सवांदांमध्ये, अशा लेखकांच्या साहित्यातले qotes अचूक जागी अत्यंत चपखलपणे पेरत असतो..! ते सगळं वाचत असताना आपल्यामध्येही भावनिक, मानसिक चक्रीवादळं येतात आणि नेणीवेच्या पातळीवर आपलीही वरच्या दिशेने हालचाल सुरू होते, असाही एक अनुभव येतो. बाकी मला आणखी एक आवडतं ते म्हणजे ह्या मुराकामीला 'शांतता' 'स्तब्धता' 'मौन' 'एकांत' ह्या गोष्टी शब्दांमध्ये फारच परिणामकारकरीत्या मांडता येतात..! त्यामुळे त्याच्या पॅराग्राफ्समधल्या शांततेची चव घेता घेता आपणही शांत होत जातो..! आणि ती विनायास झिरपणारी शांतता आपल्याला एवढं काही देत असते की त्याबद्दल काय सांगावं..! ज्याने त्याने वाचूनच अनुभवायला पाहिजे, अशी एक गोष्ट आहे ती. 'काफ्का ऑन द शोअर', '1Q84' 'नॉर्वेजियन वूड' ह्या काही माझ्या आवडत्या कादंबऱ्या आहेत. इतरही आहेत. आणि तशी तर मुराकामीच्या पुस्तकांची यादी काही लवकर संपेल असं दिसत नाही.! लिहिण्यासाठी एवढे वेगवेगळे विषय, आशय हा माणूस कुठून पैदा करतो कळत नाही !! असो. जाताजाता : बिथोवनच्या एका अप्रतिम कलाकृतीचं वर्णन मुराकामीने त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीत केले आहे. ते वर्णन एवढं जबरदस्त आहे की आपल्याला पुस्तक संपल्यावर आपोआपच ते शोधून ऐकावं लागतं.! दुसरा काही इलाजच राहत नाही..! आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला पटतं की मुराकामी म्हणतोय ते बरोबर आहे..! मग आपण त्याला धन्यवाद देतो. बाकी मुराकामीला धन्यवाद वगैरेची काही गरज असेल, असं वाटत नाही. तो फक्त गालातल्या गालात हसून सोडून देईल. तर ते एक असोच. पहा: बीथोवन Piano Trio No. 7 "Archduke" https://youtu.be/5eb1y1bjBmM

प्रतिक्रिया द्या
2523 वाचन

💬 प्रतिसाद (3)
क
कॉमी Fri, 02/04/2022 - 18:03 नवीन
मुराकामी आवडता लेखक म्हणता येण्याइतकी त्याची पुस्तकं वाचली नाहीयेत, पण एक कथासंग्रह वाचलाय तो खूप आवडलेला- आफ्टर द क्वेक. त्यातली हनी पाय ही गोष्ट तर अत्यंत आवडलेली. मुराकामीचं एखादं सणसणीत पुस्तक नुकतंच वाचलंय आणि मुरकामीबद्दल काय लिहू आणि काय नको असं झालंय असं हा लहानसा लेख वाचून वाटलं. मस्त असतं हे असं वाटणं.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Fri, 02/04/2022 - 18:21 नवीन
सुंदर लिहिलंय! एक छोटा कथासंग्रह वाचलाय आणि मुराकामी च्या साहित्याच्या रसास्वादाचे बरेच लेख. त्यामुळे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बाकी एक विचार नेहमीच येत राहिलाय; बहुधा मुराकामी मूळ लेखन जपानी भाषेत करत असेल आणि आपण वाचतो ते इंग्रजी मध्ये असून इतकं भारी वाटत. मूळ भाषेत किती जबरदस्त असेल! तो फील आपल्याला येणे अशक्य आहे ना :-) भैरप्पा वाचताना पण असच वाटत नेहमी. अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.
  • Log in or register to post comments
प
पाटिल Sat, 02/05/2022 - 05:18 नवीन
@कॉमी, मस्त असतं हे असं वाटणं >> :-)) खरंय. आफ्टर द क्वेक कथासंग्रह वाचलाय मी. चांगलाच आहे. त्याचा मराठी अनुवादही झालेला आहे. काफ्का ऑन द शोअर जरूर वाचून पहा. जबरदस्त प्रकार आहे. बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत. द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग तीन चार बैठकींत संपण्यासारख्या नाहीत. प्रत्येकी जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे. @ लई भारी, अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.>> हो. मुराकामीच्या पुस्तकांना इंग्रजी अनुवादक फार चांगले लाभले आहेत. :-) भैरप्पांच्या पुस्तकांचे उमा वि. कुलकर्णींनी केलेले अनुवाद एकेकाळी भरभरून वाचले आहेत. त्यापैकी 'पर्व' 'मंद्र' आवडली होती. मात्र त्यांची 'काठ' ही कादंबरी विशेष आठवणीत आहे. त्यातल्या त्या प्राध्यापिका अमृता आणि सोमशेखर यांच्या प्रेमसंबंधांनी, फारच भारावून टाकले होते. नंतर एकदा २००८ साली वगैरे म्हैसूरला गेलो असताना, खास चामुंडा टेकडीवरही जाऊन आलो होतो. परंतु त्या कादंबरीतल्या भैरप्पांनी लिहिलेल्या जुन्या शांत चामुंडा टेकडीच्या परिसराची प्रतिमा उगाचच विस्कटून गेल्यासारखे वाटत राहिले होते नंतर.. पण चालायचंच. हे असं होतच असतं ना म्हणजे :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा