Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असे देश, अशी नावे !

ह
हेमंतकुमार
Mon, 06/06/2022 - 03:49
💬 88 प्रतिसाद
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख. ok देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते : 1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे 2. भूभागाचा भौगोलिक प्रकार 3. भूगोलातील दिशा 4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून 5. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांत विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत. १. प्राचीन जमाती / वंशाची नावे जवळपास एक तृतीयांश देशांची नावे या प्रकारे दिली गेलीत. क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत. या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत. Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते. १९८४मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत : Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर. थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल. Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे ८५१ भाषा प्रचलित आहेत. ok २. भौगोलिक प्रकार जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत. ok Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालिय पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली ! 😀 Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले. या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. 3. भूगोलातील दिशा सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी : • नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी • जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व) • ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू. हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा : Timor(मलय भाषेत) = पूर्व Leste(पोर्तुगीज) = पूर्व हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले. येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे. ४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत. बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे. मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले. ओमानमध्ये खूप तांब्याच्या खाणी असल्यामुळे त्याचे जुने नाव मजान असे होते. पुढे ते संस्थापक पुरुषाच्या नावावरून ओमान करण्यात आले. परंतु या संस्थापक नावासाठी खलील, सीबा आणि इब्राहिम असे तीन ‘ओमान’ दावेदार आहेत ! या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत. त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. ok हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे. ५. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू. माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत: a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो. b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे. सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत : a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे. b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले. c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश. d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार: ने= गाई-गुरे आणि पा = राखणदार असे हे व्युत्पत्ती प्रकरण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात. “नावात काय आहे?” हा शेक्सपिअर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न. त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे ! प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली. ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे. ……………………………………………………………………………………………………………………………………………. चित्रे जालावरून साभार !

प्रतिक्रिया द्या
23807 वाचन

💬 प्रतिसाद (88)
स
सुरसंगम Mon, 06/06/2022 - 04:34 नवीन
तुमचे चौफेर दांडगे वाचन मिपा जगत समृद्ध करते. येऊ दया अजून असं बरेच काही. लहानपणी अमृत, ridrers digest, चांदोबाचे अंक लोकप्रभा, साप्तहिक सकाळ असे बहुवाचनीय माहिती असलेली पुस्तके / मासिके वाचली जातं होती. आताच्या पिढीला ही माहिती एका क्लिकच्या अंतरावर असून त्यात आवड पाहिजे. काहीवेळा वाटतं की हे माहिती असून काय फायदा चारचौघात हा अतीवाचन करतो पुस्तकी किडा असंही म्हटलं जायचं.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/06/2022 - 07:02 नवीन
चारचौघात हा अतीवाचन करतो पुस्तकी किडा असंही म्हटलं जायचं.
>>> मुद्दा बरोबर आहे. याचा सुवर्णमध्य असा साधता येईल. आपल्या आवडीनुसार झेपेल इतके वाचन आपण करतो. प्रत्यक्ष एखाद्या समूहात वावरताना समोरील लोकांचा अंदाज घेऊन आपल्या व्यासंगाच्या विषयावर मोजूनमापून बोलायचे. लेखन हे माध्यम आपण निर्वेधपणे वापरू शकतो. हवे ते लिहून ठेवायचे. ज्याची इच्छा आणि आवड असेल तोच ते वाचायला येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/06/2022 - 06:00 नवीन
भारत हे नाव कसे पडले हे माहित असून देखिल इतर देशांची नावे अशी का पडली असतील याचा विचारच केला नव्हता. पाकिस्तान आणि बांगलादेश ही नावे कशी पडली हे साधारण माहित आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/06/2022 - 07:09 नवीन
भारत हे नाव कसे पडले हे माहित असून
>> याच्या दोन व्युत्पती सर्वपरिचित आहेत (भारतवर्ष आणि भा + रत). याव्यतिरिक्त काही लिहितो. मागे एकदा मी स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या दिवशी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम ऐकला होता. त्यात सांगितलेली माहिती अशी होती : “ब्रिटिशांनी इंडियाची फाळणी केली आणि दोन देश निर्माण झाले. त्यांची अधिकृत नावे अशी ठेवण्यात आली : १. इंडिया that is भारत व २. इंडिया that is पाकिस्तान. यातून असे सुचवायचे आहे की, फाळणी झाली ती इंडियाची. नंतर भारत हा पूर्णपणे स्वतंत्र देश निर्माण झाला."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ह
हेमंतकुमार Tue, 09/27/2022 - 01:08 नवीन
कायदेपंडित जे. साई दीपक यांनी हे पुस्तक चतुष्ट्य लिहिलेले आहे : India that is Bharat Quadrology
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
न
नचिकेत जवखेडकर Mon, 06/06/2022 - 08:52 नवीन
अरे वा! ही माहिती गोळा करता येऊ शकते ही कल्पना सुचणं हेच भन्नाट आहे :) जपानबद्दल सांगायचं झालं तर निहोन किंवा निप्पोन हा शब्द जपानी भाषेमध्ये(कांजी मध्ये) 日本 असा लिहिला जातो. 日 म्हणजे सूर्य आणि 本 या कांजीचा एक अर्थ ओरिजिन(उगम?) असा आहे. त्यामुळे सूर्याचा उगम असा अर्थ होतो. अर्थात तांत्रिकदृष्ट्या जपानमध्ये सूर्य सर्वप्रथम उगवत नाही हा भाग वेगळा :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/06/2022 - 09:27 नवीन
तांत्रिकदृष्ट्या जपानमध्ये सूर्य सर्वप्रथम उगवत नाही हा भाग वेगळा :)
अगदी बरोबर ! यासंदर्भात जालावर वाचले असता बरीच उलट-सुलट आणि घोळदार माहिती मिळते. जपानची तशी नोंद खूप प्राचीन काळी झालेली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा वगैरे गोष्टी अस्तित्वात आल्या आणि संदर्भ बदलले. काहींच्या मते वर्षाच्या पहिल्या सहामाहीत न्युझीलँड हा प्रथम सूर्याचा मानकरी आहे तर दुसऱ्या सहामाहीत Samoa. अन्य काहींच्या मते किरिबाटीचा पहिला नंबर आहे वगैरे. भूगोल अभ्यासकांनी अधिक सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर
क
कर्नलतपस्वी Mon, 06/06/2022 - 09:12 नवीन
फावल्या वेळात नकाशा आणी विकी खंगाळायला मला पण आवडते.मस्त वेळ जातो. नुकताच नायगारा फॉल्सला जाण्याचा योग आला. सर्व प्रथम नकाशावर माहीती शोधत असताना कॅनडा मधे लखनौ नावाचे एक शहर दिसले. लखनौ माझे आवडते शहर , कुतूहल म्हणून गुगलबुवांना छेडले. कॅनडाच्या दक्षिण ओन्टारीयो प्रांतात सन १८०० आसपास वसलेल्या निनावी वसाहतीचे नाव उत्तर प्रदेश, भारताच्या लखनौ शहराच्या नावावरून १८५७ मधे ठेवण्यात आले. इथे सुद्धा कॅम्पबेल स्ट्रीट नावाचा रस्ता आहे. उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत आहेत - एक म्हणजे मुख्य रस्त्याचे नाव मदत दलांचे नेते सर कॉलिन कॅम्पबेल यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. दुसरे म्हणजे या रस्त्याला समाजाचा पहिला व्यापारी माल्कम कॅम्पबेल यांचे नाव देण्यात आले आहे. लखनौच्या(कॅनडा) अनेक रस्त्यांवर लखनौच्या( उ प्र भारत) मदतकार्यात सहभागी असलेल्या काही ब्रिटिश सेनापतींची नावे आहेत: कॅम्पबेल, रॉस, ऑट्ररम, हॅवलॉक, विलोबी, रोज आणि कॅनिंग. संपुर्ण जगात सात लखनौ शहरे आहेत.अती उत्तरेला मिनीसोटा,यु एस ए तर अती दक्षिणेला व्हिक्टोरीया,ऑस्ट्रेलियात. ३ लखनौ अमेरीकेत. २ लखनौ ऑस्ट्रेलियात. १ लखनौ भारतात. १ लखनौ कॅनडा मधे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/06/2022 - 09:43 नवीन
७ लखनौ >>> भलतीच रंजक माहिती. छान ! ........ अजून काही गमतीजमती : • ज्या देशांच्या नावांच्या अखेरीस land हा प्रत्यय येतो असे युनोचे सभासद असलेले एकूण १० देश आहेत. त्यापैकी the Netherlands , New Zealand, Solomon Islands व Marshall Islands ही नावे दोन स्वतंत्र शब्दांनी युक्त आहेत. • नावात Republic असणारे देश : १२ • नाव United ने सुरवात होणारे देश : ४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
न
नचिकेत जवखेडकर Mon, 06/06/2022 - 09:57 नवीन
मस्त, रोचक महिती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
स
सुक्या Mon, 06/06/2022 - 22:29 नवीन
मद्रास .. ओरेगॉन राज्यात मद्रास नावाचे गाव आहे. सालेम मासाच्युसेट व ओरेगॉन मम्धे बरोडा मिशिगन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
च
चौथा कोनाडा Mon, 06/13/2022 - 14:04 नवीन
सात लखनौ शहरे ....... मस्त, रोचक महिती ! कर्नलतपस्वी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
श
शलभ Mon, 06/06/2022 - 12:05 नवीन
नेहमीप्रमाणे मस्त लेख. हा खेळ खेळायला मजा येते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/06/2022 - 16:04 नवीन
वाखूसा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/06/2022 - 16:18 नवीन
हा खेळ खेळायला मजा येते.
>>> अगदीच + ११ ...... टर्कीने मागच्या आठवड्यात Türkiye असे नामांतर केले. याची कारणे : Turkey असा गुगलशोध घेतला असता २ अप्रिय अर्थही दिसतात : १. अमेरिकेतली टर्की पक्षाच्या मांसाची मेजवानी २. केम्ब्रिज शब्दकोशानुसार ‘मूर्ख माणूस’ व ‘मोठे अपयश’. ‘https://www.gktoday.in/topic/turkiye-turkeys-new-official-name/ नव्या नावातील ü वेगळाच आहे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 06/07/2022 - 10:51 नवीन
त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात. आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं. उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो. असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो! आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ख
खेडूत Tue, 06/07/2022 - 10:52 नवीन
त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात. आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं. उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो. असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो! आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ख
खेडूत Tue, 06/07/2022 - 10:53 नवीन
त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात. A, o आणि u ला ते वापरता येतात. आपल्या कीबोर्ड वरून आपण ae/ue/oe लिहिलं तरी चालतं. उच्चार काहीसा ओठांचा चंबू करून करावा लागतो. उदा. Shoen म्हणजे सुंदर, यात o वर टिंबे असतात, e नसतो, आणि उच्चार शोन न करता शएन असा काहीसा होतो. असेच जर्मन एसझेट म्हणजे डबल एस च्या ऐवजी वापरतात, तो कॅपिटल B सारखा, पण खालचे अर्धवर्तुळ न जोडता तुटक असतो. त्यामुळे suss म्हणजे स्वीट हा शब्द उमलॉट नसतील तर Suess असा लिहिला तरी चालतो. आणि उच्चार सुईस होतो! आत्ता टर्की असे का करतेय तर त्यांना गेली अनेक दशके युरोपीय समुदायात सामील व्हायचं असल्यानं असा प्रकार केला असावा. जर्मन लोकं मनातून फारच तिरस्कार करतात त्यांचा, पण हा उगाच जवळीक वाढत नेण्याचा प्रयत्न वाटतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 11:08 नवीन
त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा इंग्रजीत ट्रेमा म्हणतात
छान माहिती. इथे दिल्यानुसार मी खालील कोड वापरून पाहिला (वर्डमध्ये). पण नाही टंकले जात. ü : Alt + 0252. बहुतेक इंग्लिश देशांमध्ये तशी टंकन समस्या असल्यामुळे ते नवे नाव तिथल्या माध्यमात फारसे वापरले जाणार नाही अशी चर्चा वाचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ख
खेडूत Tue, 06/07/2022 - 11:49 नवीन
कळफलक सेट करून आपल्यालाही ते लिहिता येते. युरोपियन भाषांमध्ये चिन्हं वगैरे वैविध्य आहे. टिंब, चंद्रकोर, कॉम्मा, डोक्यावर वर्तुळे, ए ला ई चिकटून लिहिणे, वगैरे. Orbis keys for diacritics शोधून येल विद्यापीठ संस्थळ पहावे. तिथे शॉर्ट कट कळा दिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 12:21 नवीन
युरोपियन भाषांमध्ये चिन्हं वगैरे वैविध्य आहे
>>> +१ येल विद्यापीठ संस्थळ पाहिले. छान आहे. ... २०१६ पासून Czech Republic चे Czechia झाले आहे. हे नकाशाच्या खेळातून समजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
स्मिताके Mon, 06/06/2022 - 17:53 नवीन
मस्त रंजक माहितीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 06/07/2022 - 01:51 नवीन
नेहमीप्रमाणे विषयाची सुन्दर हाताळणी आणि एका चान्गल्या चर्चेला सुरुवात..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 02:49 नवीन
प्रतिसादांमधून खूप उपयुक्त माहिती येत आहे. वर लखनऊ आणि मद्रास परदेशात असल्याबद्दल आले आहे. दोन उलटी उदाहरणे पण मला आठवली: १. वेलिंग्टन आपल्या तामिळनाडूत सुद्धा आहे. या नावाने एक प्रकारे विक्रम केलेला आहे. सुमारे आठ देशात मिळून 39 ठिकाणांना वेलिंग्टन नाव आहे ! ती न्युझीलँडची राजधानी आहे. २. एक सिंगापूर दक्षिण आफ्रिकेत देखील आहे आणि तेलंगणा राज्यातील सिंगापूरला ‘सेंसस टाऊन’ असा दर्जा आहे. म्हणजे, अजून अधिकृत गाव नाही परंतु पुरेशी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रात देखील मी एका आडगावात ‘सिंगापूर’ची पाटी पाहिली होती पण तिची नोंद सापडत नाही.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 06/07/2022 - 03:44 नवीन
स्वारगेट वरून सिंगापूरला येष्टी जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 04:54 नवीन
म्हणजे थोड्या पैशात गरिबाचे जिवाचे सिंगापूर करून येता येईल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 06/07/2022 - 06:00 नवीन
वेलिंग्टन आपल्या तामिळनाडूत सुद्धा आहे. या नावाने एक प्रकारे विक्रम केलेला आहे. सुमारे आठ देशात मिळून 39 ठिकाणांना वेलिंग्टन नाव आहे ! ती न्युझीलँडची राजधानी आहे.
एकापेक्षा जास्त देशात एकाच नावाची इतकी ठिकाणे असतील तर तो नक्कीच विक्रम म्हणायला हवा. पण एकाच देशात एकाच नावाची अनेक ठिकाणे याचा विक्रम वॉशिंग्टन आणि लिंकन या नावांवर असेल हे नक्की. https://www.gl-li.com/2018/01/27/the-most-popular-president-lincoln-or-washington/ वर दिले आहे की एकट्या आयोवा राज्यात वॉशिंग्टन नावाची ५० पेक्षा जास्त ठिकाणे आहेत. अर्थातच ही सगळी ठिकाणे खूप लहान असतील- आपल्या परिभाषेत एखादं खेडं शोभावी अशी. तरीही अमेरिकेत एकाच नावाची कित्येक ठिकाणे असतात आणि त्यात अशी खेडीच नाही तर मोठ्या शहरांचाही समावेश असतो. पोर्टलंड नावाचे मध्यम आकाराचे शहर मेन राज्यात आहे तर त्याच नावाचे मोठे शहर ऑरेगन राज्यातही आहे. तीच गोष्ट कोलंबस या नावाच्या शहराविषयी. या नावाची शहरे ओहायो आणि जॉर्जिया या दोन्ही राज्यांमध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 06:11 नवीन
विक्रम वॉशिंग्टन आणि लिंकन या नावांवर
>>> मस्तच ! .... एकाच नावाची गावे/ठिकाणे जगात शोधण्यासाठी हे संस्थळ : https://geotargit.com/called.php?qcity
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 06/07/2022 - 06:23 नवीन
अरे वा. त्या लिंकवरून कळले की स्प्रिंगफिल्ड नावाची ९ देशांमध्ये मिळून ५८ ठिकाणे आहेत. या ५८ ठिकाणांमध्ये वर म्हटल्याप्रमाणे आयोवा राज्यातील ५० पेक्षा जास्त लिंकन नावाच्या गावांसारख्या लहान ठिकाणांचा समावेश नसावा असे दिसते. नाहीतर कदाचित हा आकडा ५८ पेक्षा जास्त असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सुबोध खरे Tue, 06/07/2022 - 08:35 नवीन
महाराष्ट्रात अनेक "वडगाव आणि पिंपळगाव" या नावाची गावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात निदान एक दोन तरी असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/07/2022 - 05:08 नवीन
रोचक विषय अन उत्तम मांडणी. लहानपणी मला अझरबैजान हे देशाचे नाव म्हणजे 'अझहर भाई जान' चा अपभ्रंश वाटायचा :-) . अमेरिकेत बरेचदा लहानशा खेड्याला जगातल्या प्रसिद्ध शहराचे नाव दिलेले असते. दिल्ली (Delhi) किमान चार अमेरिकन राज्यांमधे आहे. त्याचप्रमाणे बर्लिन व बॉम्बे देखील किमान चार राज्यांमधे आहेत. फ्लोरिडामधे सेंट पीटर्सबर्ग, मेलबोर्न ही गावे आहेत. महाराष्ट्रातले सिंगापूर माझी मुख्यमंत्री स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या पुढाकाराने वसवले किंवा नाव बदललेले गाव आहे असे लहानपणी ऐकले होते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/07/2022 - 05:21 नवीन
महाराष्ट्रातले सिंगापूर
>> सापडले ! रायगडजवळ आहे : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/07/2022 - 12:26 नवीन
महाराष्ट्रात कर्जत नावाचे तीन तालूके आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/07/2022 - 19:50 नवीन
किमान तीन खंडाळे आहेत. पहिलं भोरघाटाचं खंडाळे आणि दुसरं रायगड जिल्ह्यातलं खंडाळे. ते बेणे इझ्रायली लोकांचं तीर्थक्षेत्र आहे. तिसरं साताऱ्यापाशी आहे (म्हणे). चौथं नगर जिल्ह्यात आहे म्हणे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
ज
जेम्स वांड Mon, 06/13/2022 - 05:30 नवीन
म्हणजे पारगाव खंडाळा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हेमंतकुमार Wed, 06/08/2022 - 02:42 नवीन
वडगाव, पिंपळगाव, कर्जत व खंडाळा
>>> पूरक माहितीबद्दल सर्वांचे आभार ! खंडाळा >>> ५ वे उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले. वर दिलेल्या जागतिक संस्थळासारखे महाराष्ट्र / भारतासाठी वेगळे सापडत नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 06/20/2022 - 00:12 नवीन
५ वे उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले. याचे नाव धाराशीव असे वापरले पाहिजे. आपणच नाही वापरले तर कोण करणार आहे हा बदल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ग
गवि Wed, 06/08/2022 - 04:44 नवीन
नेहमीप्रमाणे उत्तम लेख. सर्व मोठ्या भौगोलिक खंडांची नावे A ने सुरु होऊन A नेच संपतात. हा योगयोग की अन्य काही ते माहीत नाही. एक नाव अनेक गावे यात रत्नागिरी (कोंकण आणि ज्योतिबानजीक), औरंगाबाद(महाराष्ट्र आणि बिहार), फोंडा (कोंकण आणि गोवा), देवबाग (कारवार आणि मालवण) (बादवे, फोंडा / पोंडा उच्चारी भेद असू शकतील) वगैरे आठवली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/08/2022 - 05:34 नवीन
मोठ्या भौगोलिक खंडांची नावे A ने सुरु होऊन A नेच संपतात
रोचक मुद्दा आहे ! ऑस्ट्रेलिया खंडाबाबत जर आपण काही जाल-प्रश्नोत्तरे वाचली तर करमणूक होते. त्या खंडाला ऑस्ट्रेलिया म्हणायचे की Oceania, यावर घमासान चर्चा झालेल्या दिसतात. भूगोलानुसार ऑस्ट्रेलिया हा खंड तर Oceania हा ‘भाग (रीजन)’ असे दिसते. काहींच्या मते, “तुम्हाला ब्रिटिशधार्जिणे शिक्षण मिळाले असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलिया खंड असेच म्हणणार” वगैरे वगैरे ..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ज
जेम्स वांड Mon, 06/13/2022 - 05:28 नवीन
कोल्हापूरजवळचा ज्योतिबाचा डोंगर आहे त्याचे नाव "श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी" असे आहे, त्यामुळे कन्फ्युजन तितके होत नाही. अर्थात ज्यांना माहिती आहे त्यांना तसेही कन्फ्युज होणार नाही इतरेजन कन्फ्युज होऊ शकतात. औरंगाबाद कन्फ्युजिंग आहे, तसेच बारा ज्योतिर्लिंगात वैजनाथ हे कन्फ्युजिंग आहे परळीचा वैजनाथ का देवघर झारखंड येथील बाबा बैजनाथ असे हे कन्फ्युजन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निनाद Mon, 06/20/2022 - 00:13 नवीन
औरंगाबाद कन्फ्युजिंग आहे, म्हणून संभाजी नगर असे यथोचित नाव वापरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/21/2022 - 14:21 नवीन
पृथ्वीचा ८वा खंड Zealandia मानला जातो. अर्थात तो 94% पाण्याखाली बुडालेला आहे. उरलेला सहा टक्के जमिनीवर असून त्याचा न्यूझीलंड हा एक भाग समजतात. अशा देशांच्या सागरी हद्दीवरून बराच खल झालेला आहे. त्या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय नियमही आहेत. न्यूझीलंडबाबत एक रंजक माहिती वाचली. जर का त्यांनी सिद्ध केलं, की ते या आठव्या खंडाचेच एक भाग आहेत, तर मग त्यांना त्यांची सागरी हद्द सध्याच्या सहा पट मंजूर होईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
शेखरमोघे Wed, 06/08/2022 - 05:58 नवीन
नेहेमीप्रमाणे रोचक आणि माहितीपूर्ण लेख. Argentina या देशाचे नाव तिथल्या चान्दीच्या (Latin: Argentum) उत्पादनावरून पडले.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 06/09/2022 - 09:15 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 06/09/2022 - 11:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/09/2022 - 12:40 नवीन
देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ, कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले ! Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/09/2022 - 12:40 नवीन
देशांचे नावबदल हा एक रोचक विषय आहे. काही देशांनी अनेक वेळा नामांतर केलेले दिसते. उदाहरणार्थ, कंबोडियाने चार वेळेस नामांतर करत पहिल्या नावापाशीच वर्तुळ पूर्ण केले ! Kingdom of Cambodia >> Khmer Republic >> Democratic Kampuchea >> State of Cambodia>>> Kingdom of Cambodia.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 06/12/2022 - 16:29 नवीन
बबीना, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश च्या सीमेवरील गाव,खुप जुने व मोठ्ठी छावणी. या गावात द्वितीय विश्व युद्धात ब्रिटीशांची मोठ्ठी छावणी होती.British Air Base in Native Asia याचे Abbreviation आहे.BABINA तसेच नागपूर जवळ कन्हान नदी काठी इंग्रजानी तात्पुरती छावणी(Camp (Temp)) उभारली होती त्याचा अपभ्रंश कामटी व स्पेलिंग Kamptee आसे झाले. आशी अनेक रोचक माहितीवर आधारीत स्वतंत्र धागा बनू शकतो.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 06/12/2022 - 16:32 नवीन
Read Army in place of Air
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/12/2022 - 17:22 नवीन
बबीना आवडली !
रोचक माहितीवर आधारीत स्वतंत्र धागा बनू शकतो.
>>>> जरूर लिहा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा