जे न देखे रवी...

तू.....

Primary tabs

तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा

तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा

तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा

मी धीटपणे कधी पाहू शकलोचं नाही तुला
आताशा तुझा चेहराही नीटसा आठवत नाही
नाकातील चमकी मात्र चमकत राहते अधे-मध्ये
आणि नुसताच गंध येत राहतो कडवट रानफुलांचा

#चक्कर_बंडा

आमच्याच जमान्यातलं दिसतायं!

घराच्या समोर ,दगडी कट्ट्यावर बसायची
कितीही येरझारा घातल्या
तरी नाही कधी बोलायची

आता नाना नानी पार्क मधे भेटतेस
तोंडभरून हसतेस
जुन्या आठवणी बद्दल
अजुनही बोलत नाही
मनाची किवाडं खोलत नाहीस

तेवढचं मनाला बर वाटतं
माझ्या मनात जे आहे
तेच तुझ्या मनात आहे
अजुनही हेच मला खर वाटतं

Bhakti

वाह, खुप सुंदर

तू मनमुराद बोलायचा तेव्हा काळच थांबायचा
मी मुकी अबोली सारखी फक्त हसायचे
निघून गेले किती क्षण आठवणींच्या नावेत
शब्दांच्या लाटेत आजही चेहरा तुझा तराळतो
-भक्ती

कविता करणाऱ्या, त्यातही अशी उत्तम कविता, मला नेहमीच आश्चर्य वाटतं.
त्याहून जास्त हेवा वाटतो, असं काही आपल्याला जमत नाही त्याचा!

बाजीगर

एकतर्फी प्रेमाच्या तरल हळूवार भावना .....
सुंदर व्यक्त केल्यात आपण.

खूप छान खूप छान.

मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी वडिलधार्‍यांना नमस्कार करायला उठली की "सगळ्यांमधे एकच नमस्कार कर, प्रत्येकाला वेगळा नमस्कार करायची गरज नाही" असे कोणीतरी मोठा सांगत असे आणि मग बाकीचे सगळेही त्याला माना डोलवत असत...

सांगण्याचा मुद्दा एवढाच की तोच नियम इथे मिपावरही पाळला तरी चालेल.

पैजारबुवा,

चक्कर_बंडा

:-) समजलं पैजार बुवा..... नियम तर पाळायलाचं हवेत !

मिपा काही तसं मला नवीन नाहीये, फक्त खात जरा उशिरान घेतलं.....

संजय पाटिल

सुंदर!
खुप दिवसनी एक छान कविता वाचायला मिळाली...
बाकिच्या विटा पण सुंदर!

श्रीगणेशा

खूप छान कविता! आवडली!!

----
"#चक्कर_बंडा" नाव मात्र गूढ वाटतंय, अर्थ समजून घ्यायची उत्सुकता आहे :-)

चक्कर_बंडा

गूढ वगैरे काही नाही, स्वभाव वैशिष्ट्यांच्या मूल्यमापनाची नावाशी सांगड घालून मित्रमंडळींनी केलेलं बारसं म्हणा हवं तर....