युट्युबर्सना किती पैसे मिळतात?
नमस्कार मिपाकरांनो,
नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात काही माहिती देण्याचा प्रयत्न ह्याठिकाणी करतोय.
सर्वसामान्यपणे अनेकांना असे वाटत असते की कोणीतरी एखादा व्हिडीओ बनवून युट्युबवर अपलोड केला आणि त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकवर्ग लाभल्याने त्या व्हिडीओच्या Views ची संख्या काही हजार ते काही लाख झाली म्हणुन त्या क्रिएटरला किंवा त्याच्या चॅनलला भरपूर पैसे मिळतात.
पण असं प्रत्यक्षात होतं का?
ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
कारण कुठल्याही क्रिएटरला/चॅनलला युट्युबवरच्या आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून जर कमाई (Monetization) करायची असेल तर आधी त्याला YouTube Partner Program (YPP) मध्ये सहभागी होणे आवश्यक असते.
ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे.
YPP मध्ये सहभागी होण्यासाठी सहा किमान पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असून त्यापैकी चार विशेष अवघड नाहीत पण खाली दिलेला चौथा आणि पाचवा निकष पूर्ण करणे थोडे आव्हानत्मक असते,
4. Have more than 4,000 valid public watch hours in the last 12 months.
12 महिन्यांच्या कालावधीत चॅनल वरचा व्हिडीओ/व्हिडीओज चार हजार तासांपेक्षा जास्ती वेळ प्रेक्षकांद्वारे बघितला/बघितले गेले असले पाहिजेत.
5. Have more than 1,000 subscribers.
चॅनलचे एक हजारापेक्षा जास्त सदस्य (सबस्क्रायबर्स) असले पाहिजेत.
सातत्यपूर्ण दर्जेदार कंटेन्ट निर्माण करणाऱ्यांना विशेष अडचण येत नाही त्यामुळे असे क्रिएटर्स हे निकष साधारणपणे वर्षभरात पूर्ण करू शकतात, पण यथातथा व्हिडीओ बनवणाऱ्यांची मात्र तारांबळ उडते आणि ते ह्या पहिल्या पायरीवरच बाद होतात.
अशा बाद होण्याची शक्यता असलेल्या काही जणांनी मध्यंतरी नवोदित युट्युबर्सचे Whatsapp ग्रुप्स काढून 'तू माझे चॅनल सबस्क्राईब कर, मी तुझे चॅनल सबस्क्राईब करतो' तसेच 'तू माझ्या चॅनल वरचे व्हिडीओ बघ, मी तुझ्या चॅनल वरचे व्हिडीओ बघतो' अशी शक्कलही लढवली होती 😀
सर्व सहा निकष पूर्ण केल्यावर मग युट्युब कडून अर्जाची छाननी, चॅनल रिव्हयू वगैरे प्रक्रिया पार पडल्यावर एकदाचा तो क्रिएटर/चॅनल YPP मध्ये सहभागी होतो!
(इच्छुकांना सर्व निकष व त्यापुढची प्रक्रिया ह्याची माहिती YouTube Partner Program overview & eligibility इथे वाचता येईल.)
एवढे सगळे खटाटोप पार पाडल्यावर क्रिएटरला YPP मध्ये दाखला तर मिळाला, आता त्याला पैसे किती मिळतात त्याकडे वळूयात.
सर्वसामान्यपणे असे सांगितले जाते की 1000 Views साठी $0.5 इतकी रक्कम मिळते, पण हे अंतिम सत्य नाही!
ह्याविषयावर अनेक लोकांचे (युट्युबर्स/ब्लॉगर्स) अनेक दावे बघायला/वाचायला मिळतील आणि त्यातही तफावतही दिसून येईल त्याचे कारण म्हणजे युट्युब मॉनेटायझेशनसाठी पात्र अशा 1000 Views साठी पैसे देते, पण ती रक्कम किती असेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही!
"There are no guarantees under the YouTube partner agreement about how much or whether you'll be paid. Earnings are generated based on a share of advertising revenue from viewers watching your video."
YouTube partner earnings overview
व्हिडीओच्या प्रतिहजार Views पासून चॅनलला किती कमाई होईल हे समजण्यासाठी YouTube Analytics मधल्या दोन संज्ञा आणि त्यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे.
1. RPM
Revenue Per Mille (RPM) is a metric that represents how much money you’ve earned per 1,000 video views. RPM is based on several revenue sources including: Ads, Channel memberships, YouTube Premium revenue, Super Chat, and Super Stickers.
RPM is your total revenue (after YouTube's revenue share) per 1000 views.
2. CPM
Cost per 1,000 impressions (CPM) is a metric that represents how much money advertisers are spending to show ads on YouTube.
CPM is the cost per 1000 ad impressions before YouTube revenue share.
(इच्छुकांना RPM आणि CPM बद्दलची तपशीलवार माहिती Understand ad revenue analytics इथे वाचता येईल.)
RPM मध्ये जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न + कमाईच्या अन्य मार्गांतुन मिळालेल्या उत्पन्नाच्या तपशीलांचाही समावेश असतो तर CPM मध्ये मुख्य भर हा जाहिरातींतुन मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तपशीलावर असतो,
आणि ह्या जाहिरातींचे व्यवस्थापन AdSense मार्फत होते.
त्यामुळे प्रत्येक युट्युबर/चॅनलच्या YouTube Analytics मध्ये त्याला 1000 Views साठी मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे हे वेगवेगळे असतात. आणि हे आकडे कमी-अधिक होण्यास काही अन्य घटकही कारणीभूत ठरतात, कसे ते आपण खालच्या उदाहरणातून बघुयात.
समजा पैजारबुवा, चांदणे संदीप, तुषार काळभोर, भक्ती, चौथा कोनाडा, जेम्स वांड आणि मी अशा सात मिपाकरांचे अध्यात्मिक, वाद्यवादन, शरीरसौष्ठव, संगीत, नृत्यकला, पाककृती असे सहा विषयाधीष्ठित आणि एक कुठल्याही विषयाला समर्पित नसलेले असे खालील प्रमाणे सात मॉनेटायझेशन साठी पात्र युट्युब चॅनल आहेत.
1. पैजारबुवांच्या अध्यात्मिक चॅनलवर ते त्यांच्या कीर्तन, प्रवचनाचे व्हिडीओज प्रकाशित करतात.
2. चांदणे संदीप ह्यांच्या चॅनलवर ते तबला आणि मृदूंग वादनाचे धडे देणारे व्हिडीओज प्रकाशित करतात.
3. तुषार काळभोर आपल्या चॅनलवर Gym, बॉडी बिल्डिंग, झुंबा डान्स असे व्यायाम/फिटनेस विषयक मार्गदर्शनपर व्हिडीओज प्रकाशित करतात.
4. भक्ती आपल्या चॅनल वरच्या व्हिडीओज मधून शास्त्रीय संगीताचे/गायनाचे धडे देतात.
5. चौथा कोनाडा ह्यांचे नृत्यकलेला वाहिलेले चॅनल आहे आणि त्यावर ते आपल्या व्हिडीओज मधून भरतनाट्यम, कथकली अशा शास्त्रीय नृत्यकलेचे धडे देतात.
6. जेम्स वांड आपल्या चॅनलवर भारतीय, मंगोलीयन, तुर्की, अफगाणि अशा विविध देशी-विदेशी खाद्यपदार्थांच्या पाककृती व्हिडीओतून सादर करतात.
7. माझे चॅनल विषयाधीष्ठित नाही, 'गळका नळ कसा दुरुस्त करावा' पासून 'घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे लावावेत' पर्यंत कुठल्याही विषयावर सल्ले देणारे व्हिडीओज त्यावर प्रकाशित होतात.
जुन 2022 मध्ये आमच्या प्रत्येकाच्या चॅनलवरच्या व्हिडीओजना 1000 Views मिळाले, सर्व व्हिडीओजची लांबीही समान आहे, आणि प्रत्येक व्हिडीओला मिळालेल्या जाहिराती आणि त्यांची संख्याही समान आहे असे आपण उदाहरणासाठी गृहीत धरू.
पण Views ची संख्या समान असली तरी युट्युब कडून आम्हाला झालेली कमाई मात्र खाली दिल्याप्रमाणे प्रत्येकाची वेगवेगळी आहे.
पैजारबुवा - ₹ 500
चांदणे संदीप - ₹ 450
तुषार काळभोर - ₹ 400
भक्ती - ₹ 350
चौथा कोनाडा - ₹ 300
जेम्स वांड - ₹ 200
टर्मीनेटर - ₹ 50
आता प्रश्न असा पडेल की सगळ्या गोष्टी समान असूनही उत्पन्नात फरक कशामुळे पडला?
ह्याचे उत्तर आपल्याला प्रत्येकाचे YouTube Analytics बघितले की मिळेल.
'पैजारबुवा' म्हणजे काय ऋषीतुल्य माणूस, आणि त्यांच्या व्हिडीओजना लाभलेला प्रेक्षकवर्ग सुद्दा एकदम सात्विक प्रवृत्तीचा!
त्यामुळे त्यांच्या सर्व प्रेक्षकांनी नुसता व्हिडीओच नाही तर त्यात दाखवण्यात आलेल्या जाहिरातीही स्किप वगैरे न करता तेवढ्याच भक्तीभावाने बघितल्या.
अशा आदर्श परिस्थितीमध्ये त्यांच्या YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views पण 1000 होते आणि CPM मध्ये दर्शवलेले Views from the videos that monetized पण 1000 होते.
थोडक्यात त्यांचे सर्वच्या सर्व views मॉनेटायझेशन साठी पात्र ठरले आणि बुवांना युट्युबचा कट वजा होऊन 500 रुपये मिळाले.
'कविराज' चांदणे संदीप ह्यांच्या बाबतीत परिस्थिती थोडी बदलली. त्यांच्या YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views 1000 होते आणि CPM मध्ये दर्शवलेले Views from the videos that monetized मात्र 900 होते.
त्यामुळे त्यांचे 100 views मॉनेटायझेशन साठी अपात्र ठरल्याने पात्र ठरलेल्या 900 views साठी त्यांना 450 रुपये मिळाले.
आता इथे प्रश्न हा येतो की 'कविराजांच्या व्हिडीओचे 100 views कशामुळे अपात्र ठरले?
तर त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही शक्यता अशा की त्या 100 पैकी काही प्रेक्षकांनी जाहिराती स्किप केल्या असतील, काहींनी AdBlocker किंवा तत्सम plugins / addons इन्स्टॉल असलेल्या ब्राऊझर वरून त्यांचा व्हिडीओ पाहिला असेल, काही प्रेक्षकांनी YouTube Vanced वगैरे वर त्यांचा व्हिडीओ पहिला असेल तर काहींजणांनी त्यांचा व्हिडीओ डाउनलोड करून पहिला असेल.
वरील चार शक्यतांपैकी काहीही झाले असेल किंवा अन्य काही क्लुप्त्या वापरून काही प्रेक्षकांनी व्हिडीओमध्ये दाखवलेल्या 'जाहिराती पाहिल्या नाहीत' हे कारण ते 100 views मॉनेटायझेशन साठी अपात्र ठरण्यास पुरेसे आहे.
पुढे 'पैलवान' तुषार काळभोर ह्यांच्यापासून भक्ती, चौथा कोनाडा, जेम्स वांड ते माझ्यापर्यंत सगळ्यांचे YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views 1000 दिसत असले तरी CPM मध्ये प्रत्येकाच्या कमी कमी होत गेलेल्या मॉनेटायझेशन साठी पात्र views च्या संख्येमुळे आमची कमाई सुद्धा कमी कमी होत गेली.
एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही! हा एक प्रचंड गुंतागुंतीचा आणि काहीसा अपारदर्शक व्यवहार आहे.
वरील उदाहरणात सोयीसाठी सर्व गोष्टी समान गृहीत धरल्या होत्या पण प्रत्यक्षात त्या आणखीन क्लिष्ट आहेत.
YouTube Analytics वरचा RPM हा क्रिएटर/चॅनलचा पक्ष असतो तर CPM हा जाहिरातदारांचा पक्ष असतो. दोन्ही पक्षांचे काही अधिकार आणि निवड स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ: आपल्या व्हिडीओमध्ये जाहिरात दाखवायची की नाही, दाखवायची असल्यास ती फक्त सुरुवातीला दाखवायची की उत्पन्न वाढवण्यासाठी मध्ये मध्ये पण जाहिराती दाखवायच्या, कोणत्या प्रकारच्या जाहिराती दाखवायची परवानगी द्यायची आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती नाकारायच्या कि सर्वच प्रकारच्या जाहिराती दाखवायच्या वगैरे ठरवण्याचे स्वातंत्र्य क्रिएटर/चॅनलला असते आणि त्या प्रमाणे ते सेटिंग करू शकतात. अर्थात जाहिरात प्रकारांची निवड फारच मर्यादित ठेवल्यास काहीवेळा त्या प्रकारांत मोडणारी जाहिरातच उपलब्ध नसेल तर विना जाहिरातीचे व्हिडीओ बघितले जाऊन नुसते views वाढणार पण त्यापासून काही उत्पन्न न मिळण्याचा धोका असल्याने ही निवड फार काळजीपूर्वक करावी लागते.
दुसऱ्या बाजूला जाहिरातदार देखील आपली जाहिरात कुठल्या देशात/प्रदेशात, कुठल्या वयोगटाला, कुठल्या उत्पन्नगटाला, स्त्रियांना की पुरुषांना, विद्यार्थी की विवाहितांना अशा असंख्य पर्यायांतून आपल्या टार्गेट ऑडियन्सची निवड करू शकतात तसेच कुठल्या विषयावरचे कंटेन्ट दाखवणारे व्हिडीओज, चॅनलची/क्रिएटर ची लोकप्रियता, व्हिडीओंचा दर्जा वगैरे गोष्टींचा विचार करून त्यावर आपली जाहिरात दाखवायची की नाही हे ठरवू शकतात.
Google Ads ह्या पर्सनलाईज्ड असल्याने जाहिरातदारांना आपला टार्गेट ऑडियन्स निवडणे खूप सोपे जाते.
इच्छुकांना ह्याबद्दल अधिक माहिती About targeting for Video campaignsइथे वाचता येईल.
दर्जेदार कंटेन्ट निर्माण करणाऱ्या क्रिएटर्स/चॅनल्सना चांगल्या म्हणजे प्रती 1000 views साठी जास्त दाम मोजणाऱ्या जाहिराती मिळतात तसेच नॉन-स्किपेबल Ads मिळाल्यासही त्यांची कमाई वाढते. आणि परदेशातून (विशेषतःअमेरिकेतून) त्या व्हिडीओजना प्रेक्षक लाभत असतील तर त्या views साठी जादा कमाई होते कारण भारतापेक्षा अमेरिकेतला प्रती हजार views साठीचा जाहिरातींचा दर जास्त आहे.
असो, सारांश काय तर युट्युबर्सना पैसे मिळतात पण ते सहजासहजी मिळत नसून त्यासाठी त्यांना बरेच कष्ट उपसावे लागतात, जिद्द आणि संयम बाळगावा लागतो!
फार जास्त तांत्रिक तपशीलात न जाता विषय समजावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे फक्त महत्वाच्या मुद्द्यांवरच प्रकाश टाकलाय. प्रतिसाद लिहायला घेतला होता त्याचा लेख झाला. सगळ्याच मुद्द्यांना हात घातला तर लेख मालिका होइल, आणखीन एका अपूर्ण मालिकेचे पाप डोक्यावर घ्यायची आता इच्छा नाही (लै टोमणे ऐकावे लागतात) त्यामुळे आता इथेच थांबतो 😀
काही राहिलं असल्यास प्रतिसादातून चर्चा करूच!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neeli Neeli || Full Song || Folk Song || Ft. Dhethadi Harika || Nivriti Vibes || Tamada Media