Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारगिल विजय दिवसाचे निमिताने

म
मित्रहो
Tue, 08/02/2022 - 10:46
💬 65 प्रतिसाद
नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती. माझ्या पिढितल्या मंडळींसाठी हे युद्ध चांगलेच लक्षात राहिले कारण त्याआधी टिव्हिमिडियामधे कोणत्याही युद्धाचे या प्रमाणात प्रसारण झाले नव्हते. हे प्रसारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा निराळा आहे पण त्या प्रसारणामुळे माझ्यासारख्यांच्या मनात युद्धाच्या चित्रस्मृती (Visual Memory)जाग्या आहेत. जनरल मलिक, कमांडर पुरी, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन हनीफ, कॅप्टन बत्रा, सुभेदार योगेंद्र यादव अशी नावे सामान्य जनतेपर्यतं पोहचली. मे महिन्यापासून घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. साधारण २५ मेच्या आसपास भारताने ऑपरेशन विजयची सुरवात केली आणि २६ जुलै रोजी भारताने या युद्धात पूर्ण विजय मिळविला. ९ ते १० जुलैच्या आसपास टोलोलिंग आणि टायगर हिल्सचा पूर्ण पट्टा भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यानंतर युद्ध भारताच्या बाजूने झुकले होते. ऑपरेशन विजयमधील विजय सोपा नव्हता, ५०० च्यावर सैनिकांना प्राण गमवावा लागला. या युद्धाच्या निमित्ताने दोन प्रश्न नेहमीच उपस्थित होतात १. येवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली तर याची भारताच्या गुप्तहेर खात्याला कल्पना नव्हती का? २. भारतीय सैन्याला या युद्धासाठी मोठी किंमत का मोजावी लागली. ? पहिल्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. जनरल व्ही. पी मलिक असे म्हणतात की अशी कोणतीही माहिती सैन्यापर्यंत आली नव्हती. (Discovery: Tale of Valor)गुप्तहेर खात्याचे म्हणणे वेगळे असेल. या विषयावर नक्की भाष्य करणे कठीण आहे पण मी जे वाचले त्यावरुन एक लक्षात आले की घुसखोरी झाली अशी काही माहिती असली तरी त्यातून धोक्याची कल्पना येत नव्हती. किती सैनिक आहेत, त्यांच्या नक्की जागा कोणत्या, त्यांच्याकडे असणारी शस्रास्त्रे या सर्वांची पूर्ण कल्पना नव्हती. या घुसखोरीच्या स्वरुपाचा पूर्ण अंदाज हाती असलेल्या माहितीवरुन येत नव्हता असा निष्कर्ष कदाचित काढता येईल. तसेच जी माहिती होती त्याची खातरी करुन घेता आली नव्हती. यामागे सर्वात महत्वाचे कारण होते संसाधनांचा अभाव. सर्वेक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध नव्हती. आतासारखे सॅटेलाइट तंत्रज्ञान तेंव्हा विकसित व्हायचे होते. सर्वेक्षणाचा सारा भर हा मानवी सर्वेक्षणावर होता. तसेच भारतीय सैनिक त्याकाळी काश्मिर खोऱ्यात अतिरेक्यांविरुद्धाच्या विविध कारवायांमधे गुंतले असल्याने सीमेवरील काही सैन्य तिकडे हलवण्यात आले होते. या साऱ्याचा फायदा घुसखोरांनी घेतला. दुसरा मु्द्याच्या बाबतीत साधारणतः तीन कारणे सांगितली जातात. १. टायगिर हिल, टोलोलिंग, ५१४० , ४८७५, ५१९० टॉपही सारी उंच शिखरांची ठिकाण होती आणि भारतीय सैनिक त्याच्या तळाशी होते. शत्रू उंच डोंगरावर बसला असेल आणि तुम्ही खाली असाल तर त्यात तुमच्या सैन्याची हानी अधिक होते. शत्रू किती आहेत, त्यांच्याकडे शस्त्रांस्त्रांचा साठा किती आणि कशा प्रकारचा आहे याची कल्पना नसल्याने सुरवातीला इंनफँट्री युनीटचा वापर करुन भारतीय सैन्याने काही जोखीम असलेले हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आले. २. कारगिलच्या युद्धात भारतीय वायुसेनेने देखील हल्ले केले. भारतीय वायुसेनेला सुरवातीच्या काळात तितकेसे यश मिळाले नाही. घुसखोरांचा आकडा, त्यांच्या नक्की जागा आणि त्यांच्या जवळ असणारी आयुधे याची पूर्ण कल्पना नसल्याने असे घडले. सुरवातीला बाँम्ब हल्ला करण्यासाठी विमानं बरीच खाली उडायाची त्यामुळे ती स्टिंगरच्या माऱ्याच्या अंतरात यायची. याचा फटका काही विमानांना बसला. एका विमानाचे इंजिन बिघडल्यामुळे पायलट नचिकेत राव यांनी POK च्या भागात उडी मारली आणि ते पाकच्या ताब्यात सापडले. अशाच एका उड्डाणाच्या वेळी पायलट आहुजा शत्रूंच्या हातात सापडले त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हळूहळू गोष्टी स्पष्ट होत गेल्या आणि भारतीय वायुसेनेने नंतर टारगेट हेरुन हल्ले केले. बटालिकच्या भागात वायुसेनेने केलेल्या हल्ल्यामुळे घुसखोरांचे मोठे नुकसान झाले. ३. जेंव्हा शत्रू शिखरावर आणि तुम्ही खाली अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळेला शत्रुची रसद तोडणे, वर असलेल्या शत्रूपर्यंत कोणतीही कुमक पोहचू न देणे त्यातून शत्रूला नामोहरम करणे अशी युद्धनीती असते. समस्या अशी होती शत्रूला मिळणाऱ्या मदतीचे मार्ग POK च्या भागातून जात होते. भारतीय सैन्याला LOC पार करु नये असे आदेश होते. तसेच काही मार्ग हे भौगोलिक दृष्टया भारतीय भागातून पोहचणे अशक्य होते. या साऱ्याचा परिणाम असा झाला की पाक सैन्य आणि भारतीय सैन्य आमने सामने असले तरी पाक सैन्य वर भारतीय सैन्य खाली असा प्रकार होता. बराचसा भाग थंड वाळवंटाचा असल्याने त्यात लपायला जागा नव्हत्या. त्यामुळे खालून वर चढणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला करणे पाक सैन्याला तुलनेत खूप सोपे होते. या साऱ्याचा विचार केला तर भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आणि शौर्याची पूर्ण कल्पना येईल. तरुण ऑफिसर आणि JCO यांनी या युद्धात फार महत्वाची भूमिका बजावली. जसजसे घसुखोरांची संख्या, त्यांच्याकडे असलेला शस्त्रास्त्र साठा याचा अंदाज यायला लागला तसे मग भारतीय सैन्य आणि वायुसेना यांनी मिळून योजनाबद्ध रितीने हल्ले करायला सुरवात केली. आर्टिलरी बोलाविण्यात आली. कारगीलच्या युद्धाला कलाटणी देण्यात बोफोर्स तोफांनी मोठी भूमिका बजावली . असे म्हणतात भारतीय सैन्य कुठली आयुधे वापरु शकतो याचा अभ्यास करुन पाकिस्तानने जी तयारी केली होती त्यात बोफोर्स तोफा नव्हत्या. १० ते ३५ किमीवर मारा करु शकणाऱ्या या तोफांमुळे उंचावर असलेल्या शत्रूवर मारा करता आला. तोफांचा मारा, वरुन होणारे हवाई हल्ले याने घुसखोरांना नामोहरम करता आले. मग सैन्य खालच्या बाजूने वर जात घुसखोरांना हुसकावून लावण्यात भारतीय सैनिकांना यश आले. एकेक करीत सर्व शिखरे ताब्यात घेतली. कारगिलच्या युद्धाचे आंतरराष्ट्रिय राजकारणावर देखील दूरगामी परिणाम झाले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने एक मुद्दा मांडावसा वाटतो. आपण जेंव्हा सैन्याविषयी वाचतो, कविता वाचतो किंवा युद्धकथा वाचतो त्यात सैनिकांची हिंमत, शौर्य, पराक्रम आणि बलिदान या मुद्दयांवर अधिक भर असतो. सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाशिवाय कोणतीच लढाई जिंकता येत नाही हे निर्विवाद सत्य आहे. युद्ध जिंकायला त्यापलीकडे जाऊन योजना, निती आणि Operational Logistics (मराठी शब्द यंत्रणा?) ची गरज असते. याविषयी हवे तेवढे बोलले जात नाही. ते समजून घेतले जात नाही. यात सैन्य, शस्त्रात्र, त्यांच्या खान्यापिण्याची सोय या व्यतिरीक्त मेडिकलची सोय, युद्धाच्या ठिकाणी वापरायचे कपडे , सैन्याचे Acclimatization, भौगोलिक परिस्थिती, हवामान या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करुन विचार करुन योजना करावी लागते. १९७१ मधे जनरल माणेकशा यांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितले होते मी युद्धाला तयार नाही मला तयारीला वेळ द्या. सामान्यांना या साऱ्याची, त्यात येणाऱ्या असंख्य अडचणींची कल्पना नसते. सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. ही माहिती गुप्ततेच्या अटी सांभाळून सामान्यापर्यंत पोहचायला हवी जेणेकरुन सामान्य नागरींकांची याविषयीची समज वाढेल . आपणा सर्वांसाठीच इतिहास १९४७ साली भारत स्वतंत्र झाला इथेच संपतो. त्यापलीकडे भारताचा राजकीय आणि सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सैनिकी शिक्षणासाठी, किंवा तज्ञ मंडळी तसा अभ्यास करीत असतात पण सामान्य माणसाला त्याची तितकी कल्पना नसते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ साली पाच महत्वाची युद्धे झाली. भारताच्या भूमीवर घडले नसले तरी भारतीय सैन्याने १९८९ मधे श्रीलंकेत जाऊन लढाई केली. या मोठ्या लढायांव्यतिरीक्त १९६७ साली सिक्किम मधे नथूला आणि चोला ला ची लढाई, १९८४ सालचे सियाचीन वर ताबा मिळविण्यासाठी केलेले ऑपरेशन मेघदूत, १९८७ सालातील अरुणाचल प्रदेशातील ऑपरेशन फाल्कन, ऑपरेशन पराक्रम, डोकलाम, उरी, बालाकोट आणि गलवान अशा छोट्या लढाया किंवा युद्धसदृष परिस्थिती निर्माण झाली होती. नागालँड, काश्मिर या भागात सुद्धा ज्या देशविरोधी कारवाया घडल्या त्या मोडून काढण्यासाठी सुद्धा सैन्याचा वापर झाला. थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे. या सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते. संबंधित काही पुस्तके India's War: A military History (1947 to 1971), आणि Full Spectrum (1972 to 2020) by Arjun Subrmaniam 1962 the war that wasn't आणि 1965 A WESTERN SUNRISE by Shiv Kunal Verma Ours is not reason to why by Brig R R Palsokar (श्रीलंकेतील शांतीसेनेचा अनुभव. मी वाचले नाही अजून) Kargil from Surprise to Victory by General VP Malik Himalayan Blunder by Brig Jon Dalvi (नामकाचू मधे ब्रिगेडियर दळवी आणि त्यांचे सैन्य लढले. हे पुस्तक मी वाचले नाही. या पुस्तकावर पूर्वी बंदी होती तेंव्हा हे उपलब्ध आहे की नाही ते माहिती नाही. ) डिस्कव्हरी चॅनेलवरील काही प्रोग्राम Tale of Valor Special force Operation तसेच StratnewsGlobal या युट्युब चॅनेलवर देखील याविषयावर उत्तम चर्चा होत असते. [लेखातील बरीच माहिती ही Full Spectrum या पुस्तकातून घेतली आहे. ]

प्रतिक्रिया द्या
14184 वाचन

💬 प्रतिसाद (65)
स
सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 16:38 नवीन
मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते पाकिस्तानला सुरुवातीला असे दाखवायचे होते कि हे आमचे सैनिक नसून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिदीन आहेत. आमचा त्यांना फक्त पाठिंबा आहे. परंतु जसे जसे भारतीय हुतात्म्यांना मिळणार मानसन्मान भारताच्या टीव्ही वर दिसू लागला तसा सन्मान त्यांच्या हुतात्मा होणाऱ्या सैनिकांना मिळत नव्हता एवढेच नव्हे तर हे आमचे सैनिक नव्हेतच असा पवित्रा सैन्याने घेतल्याने त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार आणि हुतात्म्यांना मिळणारे मानधनाचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंट मध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. या युद्धाचे वेळेस आंतरराष्ट्रीय समुदायापैकी युरोप आणि अमेरिकेने आपली कोणतीही मदत केलेली नव्हती. अमेरिकेने तर आपले जी पी एस देण्यास नकार दिला होता त्यामुळे आपल्याला क्षेपणास्त्रे डागण्यास फार त्रास झाला होता शेवटी रशियाने आपले ग्लोनास हे तंत्रज्ञान दिले होते. यावेळेस जवळ जवळ निवृत्त होत आलेल्या मिग २५ या विमानांनी परत एकदा ताबारेषेवर उड्डाणे करून पाकिस्तानच्या बंकर्स आणि ठाण्यांची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणी मग त्याचा वापर करून फ्रेंच मिराज विमाने आणि इस्त्रायली स्मार्ट बॉम्ब यांनी पाकिस्तानच्या तोफा आणि बंकर्स ला भाजून काढले आणि युद्ध लवकर समाप्त झाले. https://www.rediff.com/news/special/kargil-how-mig-25-played-a-special-role/20220606.htm#:~:text=While%20researching%20features%20on%20the,strategic%20icy%20heights%20of%20Kargil. आज २० -२२ वर्षांनी भारत आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे त्यामुळे बालाकोट किंवा उडी येथे भारताने नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले केले त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणताही गडबड केली नाही. किंवा रशियाने केलेली मदत लक्षात ठेवून युक्रेनच्या युद्धाबद्दल रशियाविरुद्ध भारताने पवित्र घ्यावा अम्हणून प्रचंड दबाव आणला गेला तरी भारत झुकला नाही याबद्दल ते काहीही करू शकत नाहीत. वनानी दहते वन्हे, सखा भवती मारूत: स एवं दीप नाशाय कृशे कस्यास्ती सौहृदं अर्थात वनाला आग लागली असता ती पसरवण्यासाठी वायू सहाय्य्यभुत होतो परंतु हीच आग दिव्यात छोटी असते तेंव्हा हाच दीप विझवण्याचे काम वायू करतो. जगात अशक्त माणसाचा कोणीही मित्र नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
स
सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 16:40 नवीन
https://www.bharat-rakshak.com/IAF/history/kargil/1382-jimmy-bhatia.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Fri, 08/05/2022 - 09:38 नवीन
तरी भारत झुकला नाही
यामधे मला वाटते आणखी दोन महत्वाची कारणे असावीत. १. आघाडी सरकारे जाऊन भारतात स्थिर सरकार आले. त्यामुळे आतल्या गोटातल्या बातम्या मिळवणे पूर्वीपेक्षा आता सोपे झालेले नाही. २. चीनला आटोक्यात ठेवायचे असेल तर ते भारताच्या सहभागाशिवाय शक्यच नाही याची खात्रीच युरोप व अमेरिकेला झालेली आहे. त्यामुळे भारत पूर्वीपेक्षा खूपच कणखर भूमिका घेऊ शकत आहे. मुख्य म्हणजे ह्याचे भान मोदींना आहे व ते त्याचा योग्यरितीने लाभ उठवत आहेत. मग काहीजणं त्याला एन आय आर पंतप्रधान म्हणोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Fri, 08/05/2022 - 09:55 नवीन
एन आर आय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
व
विवेकपटाईत Fri, 08/05/2022 - 05:44 नवीन
घुसखोरीची माहित निश्चित असेल. पण युद्धासाठी लागणारे साहित्याची कमतरता होती. बोफोर्स होती पण दारू गोळे नव्हते. रस्त्यां अभावी सैनिक साजोसामान पोहचायला ही वेळ लागणार होता. बाकी याकाळात हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/05/2022 - 06:44 नवीन
हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.
भारतीय लष्कराच्या मेहनतीला आपण कमी करून मांडता आहात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
सुबोध खरे Fri, 08/05/2022 - 08:42 नवीन
नाही हि वस्तुस्थिती आहे. आकडा वर खाली होऊ शकतो. परंतु NLI (नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री) च्या सैनिकांना पाकिस्तान सरकारने वाऱ्यावर सोडून दिले होते याचे कारण तेथे आमचे सैनिक नाहीतच असा पवित्रा पाकिस्तानी लष्कराने घेतला होता. पाकिस्तानी लष्कराने आमचे ४५३ सैनिक शहिद झाले असा दावा केला होता परंतु नवाझ शरीफ यांच्या पक्षाने श्वेतपत्रिका काढली होती त्याप्रमाणे किमान ३ हजार आणि इतर विश्लेषकांच्या मते ४००० पर्यंत सैनिक यात मारले गेले. The former Pakistan Prime Minister, Nawaz Sharif, claimed that more than 4,000 Pakistani troops and officials were killed in the Kargil conflict. The Pakistan Government had consistently denied charges of its involvement in the Kargil War and claimed it to be an operation conducted entirely by the Mujahideen (holy warriors). Several months later it indirectly acknowledged its participation by decorating some of its soldiers who died in the conflict. http://www.hindu.com/thehindu/2003/08/17/stories/2003081702900800.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विवेकपटाईत Sun, 08/07/2022 - 05:48 नवीन
ही प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी झालेली हानी आहे, त्या बाबत लिहले आहे . तसेही कारगिल मध्ये जीवंत राहणे ही एक प्रकारचे युद्धच आहे. आपल्या सैनिकांना ते रोज लढावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
मदनबाण Sat, 08/06/2022 - 17:05 नवीन
कारगिल युद्ध या विषयावर एक्स रॉ एजंट एन के सुद यांनी बरेच माहितीपर भाष्य केलेले आहे. ज्यांना या विषयात अधिकचा रस असेल त्यांनी ISRG - Indian Security Research Groupइथे जाऊन ते व्हिडियो शोधुन पहावेत. कारगिल म्हंटलेच की मला प्रचंड दु:ख आणि त्याहुन अधिकचा राग येतो, कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना ज्या यातनामय पद्धतीने ठार केले त्याचा आपण बदला घेतला नाही ! मी त्या दिवशाची वाट पाहत राहणार जेव्हा हा बदला पूर्णत्वास आणला जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 08/07/2022 - 10:40 नवीन
थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे.... १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या रघुवंशातील राजे- सेनापती यांपासून ते आधुनिक काळातील नेते - लष्कर प्रमुख या इतिहासाचा सैनिकी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, शालेय शिक्षणाद्वारे तो नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. --- आधुनिक भारतीय सैन्यास बहुदा दीड-दोनशे वर्षांचा युद्धानुभव आहे. त्यावर योग्य ती ग्रंथसंपदा निर्माण व्हायला हवी. --- अवांतर: ब्रिटिश इंडियाच्या फाळणीनंतर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सैन्याचे विभाजन कसे झाले असावे यावर कोणी लेख लिहिल्यास वाचायला आवडेल. (५५ कोटी बद्दल भरपूर वाचण्यात आला आहे पण बाकी मुलकी प्रशासन, लष्करी मनुष्यबळ, इतर संसाधने यांचे विभाजन कसे कसे झाले असावे याची काही रिसोर्सेस आहेत का?)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/08/2022 - 05:32 नवीन
तुमच्या प्रश्नाला अनुसरून सर्च करता करता खालील फोटो सापडला Image removed. हा फोटो कैक दिवस इंटरनेटवर, फाळणी दरम्यान नॅशनल लायब्ररी कोलकाता मधील पुस्तकांची फाळणी ह्या नावाने फिरत होता पण ते खरे नाही हा मूळ फोटो डग्लस डंकन नावाच्या फोटो जर्नलिस्टने १९४७ साली काढलेला असून तो नॅशनल लायब्ररी कोलकाता इथला नसून तत्कालीन इम्पेरियल सेक्रेटरीयाट लायब्ररी (आता सेंट्रल सेक्रेटरीयाट लायब्ररी) नवी दिल्ली इथला आहे, पुस्तकांचे विभाजन करून गेलेली व्यक्ती म्हणजे तत्कालीन ग्रंथपाल कर्मचारी श्री बी एस केशवन हे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
म
मित्रहो Sun, 08/07/2022 - 12:39 नवीन
विवेकपटाईत, मदनबाण, वामन देशमुख प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प७९ गुरुवार, 08/11/2022 - 17:46 नवीन
नजम सेटि मुलाखत कारगिल बद्दल https://www.youtube.com/watch?v=3QPeUX3_qfM
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 08/12/2022 - 10:34 नवीन
धन्यवाद प७९ कारगिल युद्धाविषयी जनरल मलिक यांची मुलाखत https://www.youtube.com/watch?v=dAGdFYVvfqc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प७९
म
मित्रहो Mon, 08/15/2022 - 11:56 नवीन
इंटेलिजन्स फेलीव्हर बाबतीत नुकतीच विक्रम सूद (रॉ चे पूर्वीचे प्रमुख) यांची जुनी मुलाखत बघितली https://www.youtube.com/watch?v=hPSSbfsLgio त्यांच्या मते अशा काही घटना झाल्या की गुप्तहेर खात्यावर दोष येतोच. ते चालायचेच. त्यांना आवडले नाही की प्रोफेशनल व्यक्तीने दुसऱ्याबद्दल लिहिणे. त्यांनी नांव घेतले नाही पण रोष जनरल मलिक यांच्या पुस्तकाविषयी असावा. सूद यांच्या मते हिवाळ्यात भारताचे सैनिक उंचावरील जागा सोडून खाली येतात हे पाक सैन्याला माहिती होतेच तर त्याचा फायदा ते घेणार नाही कशावरुन. सैन्याच्या चौक्या दूर दूर होत्या असेही एक कारण घुसखोरीमागे दिले जाते. एक मला पडलेला प्रश्न सर्वेक्षण किंवा पेट्रोलिंगचे काम कोणाचे असते BSF/ITBPचे कि सैन्याचे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा