Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पापा की परी

म
मालविका
Fri, 08/05/2022 - 10:33
💬 61 प्रतिसाद
पापा कि परी गोष्ट अगदी अलीकडली. अगदी ८१ सालातली असेल. कोकणातील गुहागर तालुक्यातील एक छोटंसं खेडं .गुहागर हुन ४/५ किमी आरे गावचा फाटा आणि त्याही पुढे दीड एक किलोमीटर खोतांच घर. अगदी आजही जिथे दिवसातून एखादीच एस टी जाते. एक घर या इथे तर दुसरं घर कमीत कमी अर्धा किमी मागे/पुढे. आसपास काय ती नारळी पोफळीची वाडी. आजही पाटाचं पाणी इथे वाहतं. वीज केव्हा असते केव्हा नाही. मोबाईल च्या रेंजची तीच कथा. रिंग गेली तरी कॉल पूर्ण होईल याची शाश्वती नाही. इथल्या खोतांच्या घरी जन्माला आल्या दोन पऱ्या. मोठी प्राजक्ता तर दुसरी मुग्धा. आई बाबांच्या लाडक्या. तेव्हा सुद्धा दोन्ही मुलीचं का ? म्हणून लोकांनी विचारलं. पण खोतांच दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम होत. आरे गावातल्याच मराठी शाळेत दोघी शिकत होत्या. पुढे हायस्कुलसाठी गुहागर तालुक्यात एस टी ने ये जा करीत. तेव्हासुद्धा घरातून मुख्य रस्त्यावर चालत येत तेव्हा कुठे एस टी मिळे. घरात सगळं भरभरून असलं तरी खोतीचा माज कधीच नव्हता. उलट गावात अडल्या नडल्याला मदत करायला खोत कायम तयार असत. त्यामुळे भरपूर माणसं जोडून ठेवली होती. मुलींना घरात न बसवता शहरात पाठवून चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. यथावकाश मुलींची लग्न झाली. त्यांना मुलं झाली. दोघे आईवडील आता एकटे पडले. पण तरीही रोजची शेतीची, बागेची काम होतीच. गडीमाणस अवतीभोवती होती. माहेरपणाला मुंबईहून येणाऱ्या मुली चांगल्या महिनाभर राहायच्या. आई बाबांना आणि नाळ जोडलेल्या गावाला मनसोक्त भेटायच्या. शहरात शहरी तर गावात गावकरी बनून राहायच्या.आई बाबांच्या आजारपणात तर यायच्याच धावून. अचानक खोतांच्या छातीत दुखायला लागल्याचं निमित्त झालं. शहरातल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. मुली - जावई तातडीने धावून आले. दोन दिवसांचं आजारपण आणि खोत जग सोडून गेले. जवळचे सगळे नातेवाईक आसपास होते. मुलींना आणि त्यांच्या आईला धीर देत होते. घरी कळवल्यावर घरच्या गड्याने आणि शेजाऱ्यांनी पुढची तयारी करायला घेतली. हॉस्पिटल मधून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून खोतांना घरी आणलं. पुढचे विधी करण्याची चर्चा सुरु झाल्यावर मोठी प्राजक्ता पुढे झाली. "बाबांचे अंत्यसंस्कार मी करणार " ठामपणे म्हणाली. कोकणातल्या एका छोट्याश्या खेड्यात एखादी मुलगी ठामपणे आपले म्हणणे मांडते हीच मोठी गोष्ट होती. गुरुजींनी होकार दिल्यावर पुढचे विधी सुरु झाले. तिथे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाली. पण मुली किंवा आई कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. इतर पुरुषांबरोबर ती एकटी कशी जाणार म्हणून मी आणि एक वहिनी बरोबर गेलो. स्मशानात जाण्याची नि ते विधी बघण्याची पहिलीच वेळ. आजकाल सगळ्याच सिनेमात आणि सिरीयल मध्ये सर्रास सगळं दाखवतात. पण हीच वेळ जेव्हा आपल्या प्रियजनावर येते तेव्हा खरंच कठीण असत. माझ्यापेक्षा थोडीशी मोठी माझी बहीण हे सगळं करताना पाहून अंगावर काटा येत होता. चितेवर त्या माणसाला ठेवणं, त्याभोवती प्रदक्षिणा घालणं आणि सगळंच खूपच शहारे आणणारं होत. डोळ्यातून अश्रू न गाळता ती हे सगळं करीत होती. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता. काकांना त्यांच्याच जागेत अग्नी दिला जावा हि इच्छा त्यांनी बऱ्याच आधी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे गड्याने आयत्यावेळी जागा साफसूफ केली होती. तरीही खाली काटेकुटे, काही झाडांची बारीक खोडं, मुंगळे असं काही ना होतंच. चितेला प्रदक्षिणा घालताना तिच्या पायाला ते सगळं टोचतंय याची जाणीव सारखी मनाला होत होती. चितेला अग्नी दिला मात्र एवढा वेळ आवरून धरलेला धीर सुटून ती मनसोक्त रडली. तिला जवळ घेऊन आम्ही देखील रडलो. सगळं दृश्य बघताना वारंवार मन भरून येत होत. डोळे पाझरत होते. स्मशातला हा पहिला अनुभव विदारक असाच होता. दहा मिनिटे थांबून तिला घेऊन आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर इतर बायकांनी तिला थोडं पाणी पाजलं, थोडं शांत केलं. थोड्याच वेळात ती सावरली. धाकटी सुद्धा सावरली. परत निघालेल्या लोकांना निरोप देत होत्या. आता आईला सावरायची मोठी जबाबदारी अंगावर होती. ज्या धीराने दोघी या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या त्याच धीराने त्या आईला सावरतील याची खात्री आहे. आम्हीही आहोतच जवळ. तरीही कौतुकाच्या, लाडाच्या मुली अगदी पापा कि परी असलेली मुलगी जेव्हा धीराने असं काही करते तेव्हा इतरांना हि बळ मिळतं. कदाचित काहींना वाटेल त्यात काय मोठं ? आजकाल बऱ्याच मुली करतात. पण शहरात हे मुलीने वडिलांना अग्नी देणं आणि एका छोट्याश्या खेड्यात हि घटना घडणं हि खूप मोठी गोष्ट आहे. गावातल्या कितीतरी लोकांना हे पसंत पडणं कठीण आहे. अगदी आमच्याच नातेवाईकांमध्ये "काय गरज आहे ?" म्हणणारे होते. यांच्याकडे चाललं, आमच्याकडे हे नाही चालायचं असंही कुणी म्हटलं. अश्या वेळी ठामपणे आपल्याला पाहिजे ते करणं आणि बाकीच्यांकडून करून घेणं सोपं नक्कीच नाही. कारण जर भटजींनी नकार दिला असता तर ? इतर लोकांनी मदत करायला नकार दिला असता तर ? पण त्याही लोकांना समजावणं आणि त्याप्रमाणे करून घेणं, एकीकडे स्वतःला आणि आईला सांभाळणं हे खरंच आव्हानात्मक आहे. आणि या बाबांच्या लाडक्या लेकीने ते करून दाखवलं. अभिमान आहे अश्या बहिणीचा. पापा की परी म्हणून बऱ्याच वेळा मुलींना हिणवलं जात पण त्याच मुली आपल्या बापासाठी काहीही करू शकतात हे प्राजक्ताने आज दाखवून दिलं.

प्रतिक्रिया द्या
18134 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ध
धर्मराजमुटके Sun, 08/14/2022 - 05:25 नवीन
रोचक आहे पण जल्ला या विषयात कसा बसवायचा ते कल्ला नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान Sat, 08/13/2022 - 23:21 नवीन
धर्मराजमुटके, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
नात्यातले पुरुष नसतील तर अगदी विकतचा पुत्र घेऊन अंत्येष्टी करायचे म्हणजे वैध मार्ग ?
का नसावा? पूर्वीचे लोक विधिनिषेध पाळायचे. त्यामुळे क्रीत्पुत्र हा वैध मार्ग असू शकतो. प्रस्तुत कथेत इतर नातेवाईक मिळू शकले असते. ते ही वैध धरायला हवेत. २.
माणूस गेल्यावर त्याचा विधी कोणत्या मार्गाने गेला यावर त्याची गती ठरत नाही तर त्याने आयुष्यभर काय केले याने ठरत असते हे समजून घ्या.
प्रस्तुत कथेच्या संदर्भात हे विषयांतर आहे. ३.
केवळ उत्तम प्रकारे विधी केल्यामुळे मृतास गती मिळाली असती तर आयुष्यभर पापकर्म करणार्‍यांनी उत्तम प्रकारे विधी करुन आपला मार्ग सुकर केला असता.
प्रस्तुत कथेच्या संदर्भात हे विषयांतर आहे. असो. हिमालयात कुठेशी तरी एक स्थान आहे. नाव आठवंत नाही. तिथे बायकांनी श्राद्ध केलेलं चालतं. माझी आई यात्रेसाठी गेली होती. तेव्हा वाटेत लागलं. तिने तिथे माझ्या वडिलांचं श्राद्ध केलं. मुलीने अंत्यसंस्कार केलेले चालतात असं कुठलं ठिकाण वा एखादा शास्त्राधार असेल तर मी तो मान्य करेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 08/14/2022 - 05:24 नवीन
पूर्वीचे लोक विधिनिषेध पाळायचे. त्यामुळे क्रीत्पुत्र हा वैध मार्ग असू शकतो. प्रस्तुत कथेत इतर नातेवाईक मिळू शकले असते. ते ही वैध धरायला हवेत.
मला वाटतं की तुम्हाला फक्त शुष्क वेदांती (किंवा इतरही चर्चा) करायला आवडतात. आजकाल नातेसंबंधात अनेक त्रांगडी असतात. भावाभावांचे वैर किंवा इतर अनेक कारणे असतात ज्यामुळे इतरांची मदत घ्यायला नको वाटते किंवा मदत मागीतली तरी मिळेल याची खात्री नसते. आयुष्यभर ज्यांचाशी भांडलो किंवा ज्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यांच्या पाया पडून अंतिम संस्कार करुन घ्यावेत काय ? ज्याने अंतिम संस्कार करायचे त्याचे त्या व्यक्तीशी काहीतरी प्रमाणात तरी मन जुळलेले असावेत की नाही ? धर्ममार्तंडांनी माणसांच्या व्यावहारिक अडचणी समजून घ्यायच्या की 'क्रीत्पुत्रासारखे पैसा फेको तमाशा देखो' असे मनाला पटत नाही ते सल्ले रेटायचे यामुळेच माणसे धर्मापासून दुरावत चालली आहेत का याचाही विचार व्हावा. आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा स्त्रीवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव बर्‍याचश्या गोष्टींपासून वंचित ठेवायचे मात्र प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला. काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करता येणार नाही यावर ठाम रहा असे तुमचे मत असेल तर ते कसे बदलणार ? शिवाय आंतरजालावर चर्चा करुन कोणी आपली मते बदलली आहेत असे मला तरी वाटत नाही. (तुम्हाला एकट्यालाच कशाला दोष देऊ ? बरेचदा माझीदेखील मते बदलत नाही) असो कितीही चर्चा झाली तरी तुमचे मत बदलेल असे वाटत नाही (नव्हे तर तशी खात्रीच झाली आहे). त्यामुळे इथेच थांबतो.
हिमालयात कुठेशी तरी एक स्थान आहे. नाव आठवंत नाही. तिथे बायकांनी श्राद्ध केलेलं चालतं. माझी आई यात्रेसाठी गेली होती. तेव्हा वाटेत लागलं. तिने तिथे माझ्या वडिलांचं श्राद्ध केलं. मुलीने अंत्यसंस्कार केलेले चालतात असं कुठलं ठिकाण वा एखादा शास्त्राधार असेल तर मी तो मान्य करेन.
तुम्हीच गरुड पुराणाचा संदर्भ दिला होता त्यावर वर चर्चेत मी व प्रचेतस यांनी उत्तर दिले आहे. मला वाटते ते पुरेसे असावे. याउपर अजून शास्त्राधार शोधायची माझी पात्रता नाही. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ज
जेम्स वांड Sun, 08/14/2022 - 05:52 नवीन
शिवाय आंतरजालावर चर्चा करुन कोणी आपली मते बदलली आहेत असे मला तरी वाटत नाही. (तुम्हाला एकट्यालाच कशाला दोष देऊ ? बरेचदा माझीदेखील मते बदलत नाही)
ज्ञानवृक्षाखली आपले स्वागत आहे ! LoL.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ग
गामा पैलवान Sun, 08/14/2022 - 10:48 नवीन
धर्मराजमुटके, तुमचा वरील प्रतिसाद वाचला. १.
मला वाटतं की तुम्हाला फक्त शुष्क वेदांती (किंवा इतरही चर्चा) करायला आवडतात
खरंय. भावना असाव्यात, मात्र बौद्धिक चर्चेत त्यांचा अडथला असू नये. असो. वेदांती चर्चा शुष्क असतात हे विधान वाचून गंमत वाटली. २.
आजकाल नातेसंबंधात अनेक त्रांगडी असतात. भावाभावांचे वैर किंवा इतर अनेक कारणे असतात ज्यामुळे इतरांची मदत घ्यायला नको वाटते किंवा मदत मागीतली तरी मिळेल याची खात्री नसते. आयुष्यभर ज्यांचाशी भांडलो किंवा ज्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यांच्या पाया पडून अंतिम संस्कार करुन घ्यावेत काय ? ज्याने अंतिम संस्कार करायचे त्याचे त्या व्यक्तीशी काहीतरी प्रमाणात तरी मन जुळलेले असावेत की नाही ?
तारतम्य वापरलं की ही समस्या सुटेल. नाहीतर क्रीतपुत्र आहेच. बाकी, मरणान्ति वैराणि असं कोणीतरी कुठेतरी म्हंटलंय. ३.
धर्ममार्तंडांनी माणसांच्या व्यावहारिक अडचणी समजून घ्यायच्या की 'क्रीत्पुत्रासारखे पैसा फेको तमाशा देखो' असे मनाला पटत नाही ते सल्ले रेटायचे यामुळेच माणसे धर्मापासून दुरावत चालली आहेत का याचाही विचार व्हावा.
क्रीतपुत्र हा पैसे फेकून तमाशा बघण्याचा प्रकार नाही. ४.
आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा स्त्रीवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव बर्‍याचश्या गोष्टींपासून वंचित ठेवायचे मात्र प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला.
आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा पुरुषवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव प्रसूतीपासून वंचित ठेवायचे मात्र प्रसूतीच्या प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला. ५.
काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करता येणार नाही यावर ठाम रहा असे तुमचे मत असेल तर ते कसे बदलणार ?
काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करायला बसवाच यावर ठाम रहायचं असेल तर ते मत बदलण्यात मला बिलकूल रस नाही. बाकी, शास्त्राधार वा जनरीत काढलीत तर मी माझं मत बदलेन. ६.
त्यामुळे इथेच थांबतो.
तुमच्या निर्णयाचा आदर आहे. मीही इथे थांबतो. ७.
याउपर अजून शास्त्राधार शोधायची माझी पात्रता नाही. धन्यवाद !
पण जाणकार लोकं शोधून काढू शकतात. अंत्यसंस्कार हे मृताच्या फायद्यासाठी केले जातात. त्यात इहलोकीच्या भावना आणणं चुकीचं आहे. असो. धाग्यावरच्या एकंदरीत चर्चेवरनं वाटतंय की बाईला पुरुषांसारखं बनवायचा चंग काहीजणांनी बांधलेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 08/14/2022 - 11:30 नवीन
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात अगदी तसेच यमही दिसत नाही. तुमी लोक उगा कायले भांडून राहिले. संत गाडगे महाराजांचे विचार लक्षात घ्याना मग सगळं कळेल.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 08/14/2022 - 12:32 नवीन
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात अगदी तसेच यमही दिसत नाही.
मेल्यावर यम दिसेलच असे नसावे कदाचित. इथे एक मागच्या जन्माच्या गोष्टी आठवतात असा दावा करणार्‍या मुलाची मुलाखत आहे. (या मुलाने सांगितलेल्या पूर्वजन्माच्या आठवणींनूसार त्याच्या पूर्वजन्माच्या गावी आणि घरी जाऊन पडताळल्या आहेत असे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे) या मुलाखतीत मुलाखत घेणारी मुलगी मुलाला ४.१५ मिनिटाला विचारते की तू वर गेल्यानंतर तुला मिशीवाले यमराज दिसले का? मुलगा अ‍ॅहॅ म्हणून नकारार्थी मान हलवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
च
चौकस२१२ Sun, 08/14/2022 - 12:08 नवीन
तुम्हाला ५ हजार वर्षं जुन्या परंपरांमध्ये बदल करायचे , अन वाटेल ते नवीन प्रकार करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटेल ते असे कुठे म्हणलय मी माझे वाक्य वाचा ".....रूढी परंपरांना उगाच कारण नसताना फेकून द्व्यावे असे मी म्हणत नाही ..."
  • Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi Sun, 08/21/2022 - 19:05 नवीन
कोविडच्या तिसर्या लाटेत दुर्दैवाने वडीलांचे निधन झाले. निधनाच्या वेळी हॉस्पिटलमधे मी, पती, भाऊ व आई उपस्थित होतो. वडीलांना आमच्या ताब्यात दिले व तिथून आम्ही अंत्यविधीसाठी रवाना झालो. विद्युतदाहिनीचा वापर केल्यामुळे इतर विधी झाले नाहीत. दशक्रियाविधी इ. भावाने पार पाडले. मी व आई उपस्थित होतो. गरज पडल्यास मी ही कार्ये नक्की पार पाडली असती. मला हा प्रिव्हीलेज वाटत नाही तर अत्यावश्यक गोष्ट वाटते. स्मशानातले वातावरण नॉर्मल असणे शक्यच नाही. पण वडीलांचे इस्पितळातील शेवटचे तास माझ्यासाठी जास्त त्रासदायक होते. पुरूषांनाही पहिल्यांदा स्मशानात गेल्यावर त्रास होत असेल. पण सामाजिक जबाबदारी म्हणून वारंवार जावे लागत असल्याने बोच कमी होत असेल. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबे असताना नॅचरल ॲटॅचमेंट, वेळेवर उपलब्धता वगैरे गोष्टींमुळे भावाने किंवा पुतण्याने अंत्यसंस्कार करण्याचा रिवाज असावा. कुठल्याही परीस्थितीत मृत व्यक्तीवर प्रेम असणार्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक अंत्यसंस्कार करणे जास्त योग्य ठरावे.
  • Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi Sun, 08/21/2022 - 19:05 नवीन
कोविडच्या तिसर्या लाटेत दुर्दैवाने वडीलांचे निधन झाले. निधनाच्या वेळी हॉस्पिटलमधे मी, पती, भाऊ व आई उपस्थित होतो. वडीलांना आमच्या ताब्यात दिले व तिथून आम्ही अंत्यविधीसाठी रवाना झालो. विद्युतदाहिनीचा वापर केल्यामुळे इतर विधी झाले नाहीत. दशक्रियाविधी इ. भावाने पार पाडले. मी व आई उपस्थित होतो. गरज पडल्यास मी ही कार्ये नक्की पार पाडली असती. मला हा प्रिव्हीलेज वाटत नाही तर अत्यावश्यक गोष्ट वाटते. स्मशानातले वातावरण नॉर्मल असणे शक्यच नाही. पण वडीलांचे इस्पितळातील शेवटचे तास माझ्यासाठी जास्त त्रासदायक होते. पुरूषांनाही पहिल्यांदा स्मशानात गेल्यावर त्रास होत असेल. पण सामाजिक जबाबदारी म्हणून वारंवार जावे लागत असल्याने बोच कमी होत असेल. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबे असताना नॅचरल ॲटॅचमेंट, वेळेवर उपलब्धता वगैरे गोष्टींमुळे भावाने किंवा पुतण्याने अंत्यसंस्कार करण्याचा रिवाज असावा. कुठल्याही परीस्थितीत मृत व्यक्तीवर प्रेम असणार्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक अंत्यसंस्कार करणे जास्त योग्य ठरावे.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 08/22/2022 - 15:28 नवीन
१९८१ साली गुहागर सारख्या खेडेगावात एका मुलीने आपल्या वडलांना अग्नी देणे ही तशी विशेष बाब म्हणावी लागेल. लेखिकेला केवळ एवढच सांगायचे असावं. कोणताही अभिनिवेश न आणता, अतिशय तटस्थतेने लेखिकेने सर्व वर्णन केले आहे, पार्श्वभूमी लक्षात यावी म्हणून पापा की परी हा उल्लेख आहे असं मला वाटतं. अनेक प्रतिसाद दात्यांनी आपापल्या मगदुरानुसार मते मांडली आहेत, फाटे फोडले आहेत. असो. लेख खूप छान झाला आहे. आवडला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा