Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्यायामशाळेचं रहस्य

ब
बिपीन सुरेश सांगळे
Fri, 08/12/2022 - 18:45
💬 14 प्रतिसाद
व्यायामशाळेचं रहस्य ------------------------- ( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . ) बालकथा - मोठा गट ------------------------------------------------------------------------------------------- ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली . एका बालचित्रकाराची . आणि एका मोठ्या प्रसंगाची ... ----- “ ए मामा , दाखव की तुमची व्यायामशाळा , “ शिरीष म्हणाला . शिरीष आठवीतला मुलगा . उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. गोपाळमामाशी त्याचं चांगलं जमायचं . पण व्यायामशाळेनं काहीतरी घोडं मारलं होतं बहुतेक . ती दाखवायला तो काही तयारच होत नव्हता . तिला काय सोनं लागलं होतं , कोणास ठाऊक ? शेवटी आजीचा वशिला लावला तेव्हा मामा नाईलाजाने तयार झाला . अर्थात रागानेच ! मामाचं गाव छोटं होतं . पण रेल्वेमार्गावर वसलेलं . निळ्याशार पाण्याचं एक तळं आणि हिरवीगार शेती असलेलं . मामाच्या मित्रांनी एक व्यायामशाळा बांधली होती . स्वतः श्रमदान करून . पण गावाबाहेर . तीच शिरीषला बघायची होती . जी दाखवण्यासाठी मामा टाळाटाळ करत होता . काय कारण असावं ? मामा जाणे . ते चालत निघाले . एका टेकाडावर ती व्यायामशाळा होती . बऱ्यापैकी मोठी . लाल विटांची .जशी ती जवळ येऊ लागली , मामा म्हणाला , “ बघ एकदाची आमची व्यायामशाळा . पण गप्प बसायचं हं. कोणाशी काही बोलायचं नाही , कळलं ? “ त्याला वाटलं , हा मामा वेगळाच आहे आणि ही व्यायामशाळाही . रहस्यमयच दिसतीये . ते आत गेले. एक मोठी खोली होती . त्याला लागून आणखी एक मोठी खोली होती . चुना मारलेल्या पांढऱ्या भिंती. पहिल्या खोलीत जमिनीवर ठेवलेली वजनं , शीगा . डंबेल्स , मुदगल . काही बाकडी . तिथे आता एकच माणूस होता . तोदेखील नुसताच उभा . तो मामाकडे पाहून हसला . ती एक जुन्या काळातली साधीशी जिम होती . शिरीष ते पहात होता . दोनच मिनिटांत मामा म्हणाला , “ निघू या ? “ कसली घाई लागलीये ह्याला ? शिरीषला कळेना . आतली खोली तर बघूच दिली नाही . तेवढ्यात आतून एक तरुण बाहेर आला . रुबाबदार . मोठ्या दाढीमिशा वाढलेला . धट्टाकट्टा . डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला . त्यातून त्याचे बाहेर डोकावणारे लांब , दबलेले केस . “ काय रे ? कोणाला आणलंय इथे ? “ त्याने विचारलं . “ क्ष - क्षमा असावी , माझा भाचा . “ मामा म्हणाला . “ असू दे ,असू दे . काय रे , नाव काय तुझं ? “ त्याने विचारलं . मामाने सांगितलं होतं , बोलायचं नाही ; पण आता ? ... “ शिरीष , “ त्याने नाव सांगितलं . मग तो धाडस करून पुढे म्हणाला ,” मी इथे आलं तर चालेल का - व्यायामाला ? “ मामाने आवंढा गिळला . “तो कशासाठी ? आम्ही व्यायाम करतो तो देशसेवेसाठी . तू करणार का ती ? “ “ हो. करीन की . “ त्यावर तो तरुण गडगडाटी हसला . त्याने शिरीषच्या पाठीत एक थाप मारली . बाप रे ! काय ताकद होती त्या हातात ! मग तो म्हणाला , “ चालेल बरं . पण आता नाही . आधी शिक मोठा हो . मग मला भेट . “ त्यावेळी शिरिषला तिथे आणखी काही तरुण दिसले . त्यांच्या हालचाली चोरट्या होत्या . त्यांचं बोलणं कुजबुजत्या स्वरूपाचं होतं . संशयास्पद ! असं का ? ही कसली देशसेवा ? तो विचारात पडला . कोण असावीत ती मंडळी ? ----- ती व्यायामशाळा नावालाच होती . खरं तर तो एक गुप्त अड्डा होता - क्रांतिकारकांचा . आणि तो अड्डा म्हणजे त्यांच्या लपण्याची जागा , त्यांचा शस्त्रसाठा , त्यांचा खलबतखाना , सारंच होतं. आणि सध्या तिथे शांततेत ‘ गडबड ‘ चालू होती . एक मोठा कट तिथे आकारास येत होता . काय असावा तो ? सध्यातरी ते एक गुपितच होतं . ----- शिरीष अंगणात बसून चित्र काढत होता . आजीचं . दोघे कडुनिंबाच्या झाडाखाली बसले होते . छान सावली होती . तो लहान असला तरी चित्र छान काढायचा . विशेषतः चेहरे तर अगदी हुबेहूब ! तेवढ्यात मामा आला , म्हणाला , “ ए , चल माझ्याबरोबर . स्टेशनवर जायचंय . “ शिरीष निघाला . चित्र अर्धंच राहिलं . पण त्याने ती छोटी वही आणि पेन्सिल खिशात टाकली . मामाच्या शेतासाठी खत लागत होतं . ते घेऊन एक माणूस रेल्वेने येणार होता . ते ताब्यात घ्यायचं होतं . ते दोघे सायकलवर डबलसीट गेले . रस्त्याच्या कडेला पिवळ्या गवताची सोबत होती . गरम होत होतं . स्टेशनवर खूप नाही , पण गर्दी होती . मामा कोणाकोणाशी बोलत होता . शिरीषने त्याचं चित्र पूर्ण केलं . तरी ट्रेन काही येईना अन वेळ काही जाईना . तो इकडेतिकडे पाहू लागला . त्याला एक माणूस दिसला . एक धनगर . धडधाकट, काळसर . पांढरं धोतर , पांढरा सदरा . लाल मुंडासं . जाडजूड मिशा अन भेदक डोळे . व्यक्तिचित्र काढण्यासाठी भारी व्यक्तिमत्व होतं . तो त्यांच्या पलीकडे बसला होता . शिरीषने त्याचं नीट निरीक्षण केलं . तो माणूस उठून दुसरीकडे गेला . तेव्हा त्याने त्या माणसाचं चित्र काढायची सुरुवात केली . चित्र पूर्ण झालं . अन गाडी आली . शिट्टी वाजवत . धुरांच्या रेषा काढत . ----- ते घरी आले जेव्हा तेव्हा मामाचा एक मित्र आला होता . त्याने शिरीषने काढलेलं आजीचं चित्र पाहिलं . “अरे वा ! भारी आलीये की आमची काकू , “ तो म्हणाला . त्यावर शिरीषला भाव चढला . त्याने वहीचं पान उलटलं आणि आणखी एक चित्र दाखवलं . त्या धनगराचं . त्याबरोबर तो मित्र एकदमच चमकला . म्हणाला , “ हे चित्र तू नीट काढलं आहेस का ? चेहरा हुबेहूब आहे का ? “ “अगदी ! “ शिरीष आत्मविश्वासाने म्हणाला . त्यावर त्या मित्राने मामाला डोळ्याने खुणावलं आणि ते दोघे तिथून निघालेच . काहीतरी गडबड होती खरी . पण काय ? ... ----- तो धनगर - धनगर नव्हता . तो एक वेष बदललेला पोलीस होता . तो तिथे फिरत होता ही काही चांगली गोष्ट नव्हती . लगेच क्रांतीकारकांना निरोप गेला. सगळे क्रांतिकारक तिथून पसार झाले . सगळं घेऊन , गाव सोडून पळाले . एक ती व्यायामाची साधनं सोडता . आणि त्यांच्याबरोबर गोपाळमामाही . ते सगळे क्रांतिकारक पुढे भूमिगत झाले . तो लांब केसवाला त्या गटाचा मुख्य होता - बळवंत . त्या गावावरून जाणाऱ्या ट्रेनमध्ये इंग्रजांचा मोठाच खजिना पाठवला जाणार होता . तो लुटण्याची त्याची योजना होती . अर्थात क्रांतिकार्यासाठी . त्यासाठी त्यांची सगळी लगबग चालू होती ; पण हे असं विघ्न आडवं आलं होतं . पोलिसांनी व्यायामशाळेवर धाड घातली . तेव्हा त्यांना तिथे काहीच हाताला लागलं नाही . तिथे गावातले बालगोपाळ मस्ती करत होते . आणि त्यांच्यामध्ये शिरीषही होता . ती पोरंटोरं जड वजनं उचलण्याचा फुका प्रयत्न करत होती . नुसती गंमत. खजिना लुटण्याचा कट फसला होता ; पण - क्रांतीकारकांना पकडण्याची इंग्रज सरकारची मोहीमही फसली होती . आणि हे सारं घडलं होतं , शिरीषच्या त्या एका चित्राने . अप्रत्यक्ष का होईना पण क्रांतीकारकांना वाचवण्याचं श्रेय त्याचं होतं . पुढे शिरीष त्याच्या घरी गेला . एके दिवशी मामा त्याला भेटायला आला . चोरीछिपे . त्याने एक भारी रंगपेटी व चित्रकलेची वही आणली होती . तो म्हणाला , “ ही तुला भेट . खास बळवंतजींकडून ! ते तुझं खूप कौतुक करत होते . “ शिरीषची छाती फुगली . त्याने बळवंतजींचं चित्र काढायचं ठरवलं . पण तो एकदम सावध झाला . त्यात त्यांना धोका होता . ती गोष्ट त्याने राखून ठेवली . त्याने ते चित्र काढलं - पण भारत स्वतंत्र झाल्यावर ! ------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
4129 वाचन

💬 प्रतिसाद (14)
च
चौथा कोनाडा Tue, 08/16/2022 - 18:45 नवीन
व्वा, क्या बात हैं ! सुंदर कथा. शेवट तर खासच ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारकाची आणि देशभक्तीची समज असलेल्या चित्रकार विद्यार्थ्याची ही वेगळी कथा खुप भावली. वाह, बिपिन जी !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 08/16/2022 - 19:58 नवीन
खूप दिवसांनी लिहीलंत पण एकदम सुंदर कथा
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 08/17/2022 - 08:53 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 08/17/2022 - 10:04 नवीन
आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शलभ Wed, 08/17/2022 - 12:15 नवीन
मस्त कथा. आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 08/21/2022 - 18:46 नवीन
चौको सौंदाळा पटाईत पैजार बुवा शलभ खूप आभारी आहे आणि सर्व वाचकांचाही खूप खूप आभारी आहे लॉगिन चा काही प्रश्न होता . त्यामुळे उशीर झाला . क्षमस्व
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 08/21/2022 - 18:48 नवीन
चौको अहो ग्रेट आहात आपण . चित्रकार आहात . हे नवीनच . प्रदर्शनाबद्दल खूप अभिनंदन ! अन कथाही एका बालचित्रकाराचीच . हा योगायोग . छान वाटलं
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 08/22/2022 - 11:52 नवीन
सुरेख!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/22/2022 - 15:14 नवीन
मस्त कथा! आवडली 👍
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 08/22/2022 - 16:35 नवीन
चांगली कथा. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sun, 08/28/2022 - 21:52 नवीन
सुंदर कथा, नेहमीप्रमाणे युद्धस्य कथा रम्रयाः!! भूमीगत युद्धाची कथा व योद्ध्यांची. सुंदर कथा.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sun, 08/28/2022 - 21:52 नवीन
सुंदर कथा, नेहमीप्रमाणे युद्धस्य कथा रम्रयाः!! भूमीगत युद्धाची कथा व योद्ध्यांची. सुंदर कथा.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Mon, 08/29/2022 - 05:36 नवीन
कथा आवडली आहे!!! Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 09/07/2022 - 19:12 नवीन
असंका टर्मिनेटर नितीन नूतन आकाश धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा