हर घर तिरंगा, घर घर तिरंगा
नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत.
आता हा उपक्रम समाप्त झाल्यावर ह्या झेंड्यांचे काय करायचे हा प्रश्न मला तसेच माझ्या अनेक मित्र मैत्रिणींच्या मनात उद्भवणे स्वाभाविकच आहे. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीनंतर रस्त्यावर पडलेले अनेक प्लास्टिक व कागदाचे झेंडे पाहिले की मन उद्विग्न होते व भारतीय तिरंग्याला उचित मान न मिळाल्याचे दु:ख होते. मग ह्यावर मार्ग म्हणून अनेक सेवाभावी संस्था, संवेदनशील नागरिक, विद्यार्थी असे रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करताना दिसतात, पण त्यांचे श्रम, प्रयासही तोकडे पडत असल्याचे जाणवतात.
आपल्यातले अनेकजण ह्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून ह्या तिरंग्याचे अनमोल ठेवीसारखे जतन करतील, पण जे असे जतन करू शकणार नाहीत त्यांनी काय करावे ? ‘Flag Code of India 2002’ प्रमाणे फाटलेले, चुरगळलेले, अस्वच्छ झेंडे जाळून नष्ट करू शकतो परंतु प्रश्न तीन दिवसांनी घरावरून काढलेल्या कापडी झेंड्यांचा आहे. त्याचे काय करायचे ? अनेकजणांनी अशा झेंड्याना जाळून टाकणे, जमिनीत पुरणे किंवा कापून बारीक तुकडे करणे असे उपाय सुचवताना ऐकले, परंतु मनाला ते पटले नाहीत.
जरा जास्त विचार करताना हा उपाय मनात आला, बघा, जमण्यासारखा आहे का ?
तीन दिवस घरांवर लावलेले झेंडे उतरविल्यानंतर एखाद्या सेवाभावी संस्थेने, NGOने, अथवा शासकीय संस्थेने ते गोळा करावेत. असे सर्व झेंडे ब्लिच लावून एकतर रंगहीन, पांढरे करावेत किंवा एखादा गडद रंग वापरून (निळा, हिरवा वगैरे) त्या रंगाचे करावेत. थोडक्यात ध्वजाचे सर्व रंग तसेच अशोकचक्र मिटवून टाकावेत. नंतर असे झेंडे एकत्र शिवून त्या कापडाचे वेगवेगळे उपयोग करावेत. असे उपयोग म्हणजे, शासकीय शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवणे, शासकीय रुग्णालयात पलंगपोस, नर्सेसचे युनिफॉर्म शिवणे, तुरुंगातील कैद्यांसाठी कपडे शिवणे, हात-पाय पुसायला उपयोग करणे वगैरे. ह्याशिवाय अजून अनेक उपयोग करता येतील. 3’ X 2’ मापाचे एक लाख झेंडे जरी एकत्र झाले तर त्याचे अमाप कापड तयार होईल व ते कापून, जाळून किंवा पुरून नष्ट करण्यापेक्षा अश्या प्रकारे वापरात आणले तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग झाला असे म्हणता येईल.
वरील उपाय सुचवताना आपल्या भारतीय तिरंग्याचा कोणत्याही प्रकारचा अपमान, उपमर्द किंवा अवहेलना करण्याचा मानस नाही हे ही मी नमूद करू इच्छितो.
आपल्याला काय वाटतं ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare