आजोळ
Primary tabs
आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ
मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ
पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या मागे
धरे सावली पोफळ
कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे
कधी नदीत डुंबणे
कधी नांगर धरणे
करवंदे तोडताना
काटे बोथटून जाणे
तान्ह्या पाडसांची शिंगे
चाचपडून बघणे
आठवडी बाजारात
निरुद्देश भटकणे
पारंब्यांचे उंच झोके
खो-खो लगोरीचा खेळ
चटपटीत अवीट
खास पंचरंगी भेळ
वाढे वैशाखी उन्हाळा
नदीपात्र नाला होई
आणि बघता बघता
सुट्टी संपूनच जाई
पडवीतला झोपाळा
झुलायचा गाण्यांवर
गाणी तीच म्हणताना
आज स्वर का कातर?
अजून त्या सुट्टीतला
भेटे मीच कधी मला
गळा दाटे-खंत वाटे
काळ का नाही गोठला?
गोटा नदीपात्रातला
जपलाय मी जादूचा
घासून तो उघडतो
खजिना मी आजोळचा
आरपार कोरडा मी
शहराच्या निबिडात
आजोळाच्या आठवाने
ढग दाटे पापण्यांत
पापण्यातल्या ढगाची
कड चंदेरी सोनेरी
बरसती आठवांच्या
आज सरीवर सरी
खूप छान!
बराच वेळ विचार करत होतो काय प्रतिसाद लिहावा? शब्दच सापडले नाही.
आजोळ एक अनुभव आहे तो स्वतःच घ्यायचा असतो. तो अनुभव आपण खुप सुंदर मांडलाय.
आजही डोळे ओले होतात जेंव्हा त्या सर्वांची आठवण येते. इतके निस्वार्थ आणी निरपेक्ष प्रेम कुठेच मिळत नाही. आगदी आई वडिलांकडून सुद्धा.
अगदी अगदी !
(दोन्हीकडील) आजी-आजोबांच्या सहवासांत अतिशय समृद्ध बालपण अनुभवलं... So grateful for it !
मस्त कविता!!
का कोणास ठावे, ही कविता आठवली
https://www.aathavanitli-gani.com/Song/Majhiya_Mahera_Ja
खूप छान!
बालपण हरवलं, आणि आजोळही. खंत बालपण हरवल्याची नाही वाटत, आजोळ हरवल्याची वाटते!
खूप सुंदर आहे कविता.
नजरेसमोर उभे राहिले सगळे
व्वा. खूप आवडली कविता.
अतिशय सुंदर.
आज पुन्हा एकदा वाचताना ही जुनी गाणी आठवली:
https://youtu.be/mu1wm6wiXFo
https://youtu.be/BiCkqhmxtbQ
https://youtu.be/jgn6Dffjlsg
सर्वांना धन्यवाद.