जे न देखे रवी...

मातीचे पाय

Primary tabs

पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते

मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ

मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या

आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?

प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही

ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले

- संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

मी देव समजलो ज्याला
तो निरा दानव निघाला
हे सर्व कळावयास
खुप वेळ मला झाला

हे जग असचं असतं. वेळ निघून गेल्यावर खरे खोटे समजते.

चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर रचना !
💖

ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले

क्या बात हैं !

चलत मुसाफिर

अनेकदा केवळ पायच नव्हे तर अख्खा पुतळा मातीचा निघतो.

कविता आवडली

राघव

चांगल्या कल्पना. थोडं मीटरमधे बसवलं तर बहारदार होईल! पुलेशु! :-)

वामन देशमुख

प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही

एकूण कविता आणि विशेषत: हा भाग आवडला.

चित्रगुप्त

कविता आवडली. आता एकच करण्याजोगे आहे:

आता एकचि करावे -
आपल्या पायीची धूळ
ललाटी लावू वाटावी -
ऐसे काही करावे...

प्रेमळ स्वप्नांची ओल -
आपणचि झिरपवावी
व्हावे नतमस्तक ऐसे-
पाय आपुलेचि असावे...

गेले ते गेले
जे उरले त्यांसि
आपणचि वंदनीय व्हावे...