Welcome to misalpav.com
लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
तंत्रज्ञानाने जग इतकं छोटं झालंय की अंतर्देशीय व तार यंत्राच्या जमान्यातला मी स्काइप आणि कायप्पावर मुलीला प्रत्यक्ष बघताना अचंबित झालो होतो. अर्थात याचीही हळूहळू सवय होत गेली. आता सकाळ-संध्याकाळ मोबाइलवर बोलणं दररोजचा दिनक्रम झाला. आता तिचं नसणं आंगवळणी पडलं. पुढे शिक्षण झालं, मनासारखा साथीदार मिळाला. आता एफडीवरचं व्याज मिळण्याची वेळ आली आणि आमची परदेशी जाण्याची बारी आली. पहिलटकरणीसारखी मन:स्थिती, काय होईल कसं होईल.. पण मुलांनी सूत्रं हाती घेतली आणी दे मेड इट पॉसिबल.... (अम्रीकेत जायचं म्हणजे थोडी प्रॅक्टिस नको!) बाकी... जाईन विचारीत रानफुला... हे होतंच ना. सर्व काही व्यवस्थित पार पडलं. पॅरिसला पोहोचल्यावर मात्र मन पुन्हा एकदा जोरात भूतकाळात गेलं. शम्मी कपूरच्या 'अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटाची आठवण आली. बालगंधर्वच्या कट्ट्यावर चकाट्या पिटताना शम्मी, शर्मिला, प्राण, सिनेमातली गाणी, रोमान्स हे विषय जरूर चघळले जायचे. शर्मिलाचा झुबी झुबी झलेम्बू... हेलनच्या टक्करचा कॅब्रे..... https://youtu.be/ruZXd7zrD1U?si=syzJa942aiyi8Nrp हायला.. म्हातारपणी मन आसं भिरकटतयं बघा. मूळ विषय बाजूलाच राहतो. असो, नवीन अनुभव, मुलांचं कौतुक आणि 'सोन्या'चं आगमन. पंख लावल्यासारखे दिवस उडून गेले. परत येताना मिश्र फिलिंग होतं. सहा महिने झाले होते. ____________________________>>>>>> आमच्या परदेशवारीचा पहिला वाढदिवस आणि 'सोन्या'चासुद्धा. जायलाच हवं. पण या वेळेस मात्र वेगळंच वाटत होतं. पहिलटकरणीची हुरहुर, उत्सुकता नव्हती, तर किती पैसे लागतील, काय काय घेऊन जायचं याबद्दलची कुरकुर, धुसफुस होती. आणि यातूनच एका कवितेचा ञन्म झाला. अहो, काय सांगू, एकटं जाता येत नाही.... एकटं जाता येत नाही, दोघांना जावं लागतं सोपं नाही परदेशी जाणं, बॅक खातं खाली करावं लागतं अंबावडी, बुंदीच्या लाडू (साठी!!!) सोबत 'लक्ष्मीनारायणा'ला जावं लागतं शुगर फ्री बरोबर, गुडघ्याच्या मालिशकरता तेलसुद्धा न्यावं लागतं एव्हढं मोठं ओझं घेऊन, सिक्युरिटीचं जंगल पार करावं लागतं चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.. म्हणत तासंतास पाय आखडून बसावं लागतं इमिग्रेशनच्या दबावाखाली धडधड वाढते कोरड्या पावाचे तुकडे चघळून पोट दुखाया लागते काय बाईं!... तुमचं तर लईच्च भारी!!!,. सारखी सारखी परदेशवारी.. कुजकं पाद्रं ऐकावं लागतं पदरमोड करून शेजारणीसाठी काहीबाही आणावं लागतं जाताना तरी जरा बरं, 'देखणे ते चेहरे प्राजळांचे' बघायचं सुख असतं येताना मात्र गळ्यातले आवंढे अन् डोळ्यातलं पाणी बघा, काही केल्या खळतं नसतं भरलेल्या ब्यागा अन् बरोबर रिकामं पाकीट असतं अहो, काय सांगू, परदेशी जाणं वाटतं तितकं सोप नसतं.. वर्षातून एकदाच मुलांकडे जायचं म्हणजे मोठ्या गॅसवर दूध कसं उतू जातं, तसंच प्रेमहीण उतू जायला लागतं. मगं चितळे, लक्ष्मीनारायण, कल्याण भेळ.. सर्व काही जे पुण्यात प्रसिद्ध आहे आणि तिथेसुद्धा मिळतं, गोळा करण्यात दिवस जातात. जावईबापूंचा पोशाख, मग एवढ्या लांब जायचं एकच कसा, हासुद्धा त्यांना चांगला दिसेल.. मुलीने मागच्याच वेळेस दिलेली यादी पुन्हा अपडेट होते मग डी मार्ट, पीएनजी, चितळे इ.खेपा सुरू होतात. मुलं लांब राहतात, सणवार होत नाहीत, मग एखादं सोन्याचं काहीतरी आणि आता सोन्यासुद्धा आलाय, जसा एफडीवरच्या व्याजावर इनकम टॅक्स, तसा. पहिला वाढदिवस, नाही म्हटलं तरी ग्रॅम-दोन ग्रॅमची चार-पाच वळी, एखादी पाच ग्रामची साखळी, काही पारंपरिक ड्रेस, तिकडे मुलांचे कपडे फार महाग हो, इथून पाच-सात घेऊन जाऊ. एवढंच, तरी गेला बाजार लाख-दीड लाखभर कुठं गेले नाहीत. बाकी, दोघांचं विमानाचं भाडं व इतर खर्च मिळून दोन लाख. म्हातारा-म्हातारीचे कपडे प्रत्येकी सहा किलो, बाकी ऐंशी किलो आवांतर. काॅमेंट कानी पडते.. मग, तिकिटावर प्रत्येकी सेहेचाळीस किलो ऑथराइज्ड आहे, एवढे पैसे दिलेत, वसूल नको करायला! (जास्त सामान नेल्यास पैसे कसे वसूल होतात? - एक न उलगडणारं कोडं.) "अम्रिकेत पोहोचलो की जावईबापूच सर्व खर्च करत आहेत, तुम्हाला थोडा करायला काय हरकत आहे? जेवतोचं ना आपण पण.." इती..सौ.भुंगा कानात भुणभूणायला लागतो. दिवस हळूहळू जातात. जायची वेळ येते. इतके दिवस केलेली अवांतर खरेदी समेटायला सुरवात होते. घरातून निघताना, कायप्पावर आलेल्या 'काय कशी चाललीय अम्रिकेची वारी', आपुलकीने (खोटी खोटी?) विचारपूस करताना हळूच कानावर टाकलेल्या सामानाची यादी, अशी सर्व (डिमांड लिस्ट) बाहेर पडायला सुरुवात होते. शेवटचे काही दिवस बहुतेक काॅस्को, क्रोगर, आयक्या व तत्सम महा-दुकानात जातात. प्रथम नाॅन पेरिशेबल आणि नंतर पेरिशेबल सामान जमा व्हायला सुरुवात होते. अम्रिकेतून यायचम म्हणजे चॉकलेट्स अनिवार्य, आणि भरपूर क्वांटिटीमध्ये खरेदी केला जाणारा पदार्थ. कशाला? विचारलं की "सगळ्यांना द्यायला नको? आणि आल्यागेल्याच्या हातवर पण तर टेकवावा लागेल!" चॉकलेट्सचे हे सर्व ब्रँड भारतात उपलब्ध आहेत, अगदी फरेरो रोशेससुद्धा. पण अम्रिकेची चाॅकलेटं भारतात आल्यावर अधिकच चविष्ट लागत असावीत! "हा ड्रेस छान आहे, सुमीला आवडेल, सुशीला छान दिसेल" (आता भारतापेक्षा अम्रिकेत कपडे स्वस्त मिळतात असा शोध लागलेला असतो.) असं करून भरपूर कपड्यांची खरेदी होते. शेजारच्या 'व्हिस्की'लासुद्धा (शेजारणीच्या कुत्र्याचं नाव) चघळण्याची हाडं घेतली जातात. असं बघा, सबका साथ सबका विकास, सगळ्यांच्या आवडीनिवडी आठवतात. पुन्हा एकदा ऐंशी किलो कधी होतं, कळत नाही. (परत जायच्या आगोदरची खरेदी.) सूटकेसेस काठोकाठ भरून जातात. आता काठोकाठवरून आठवलं.. काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या! प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या! यांच्या सर्व खरेदीत, म्हातार्‍याला एक ड्युटी फ्री ठेवायलासुद्धा जागा राहत नाही. म्हटलं, तर उत्तर मिळतं, "आपल्या देशात काय दुष्काळ पडलाय का?" (चॉकलेट्सचा दुष्काळ आहे वाटतं), ( मनातल्या मनात) आता बोला, मित्रांना काय तोंड दाखवायचं! जायच्या दोन दिवस आगोदर गोड बातमी येते - आऊचा काऊ कुणाचातरी चुलत मामे भाऊ एकशे वीस मार्क्स घेऊन शीईटी, निट्ट पास झालाय. आता कालेजात जाणार, लॅपटॉप अती आवश्यक आहे, तव्हां एक एप्पलचा लॅपटॉप आणा. हायला, जसं काही हडपसर मंडईतून शेपूची आणि करडईची जुडी आणा.. म्हातार - पैशे संपले, जमणार नाही. म्हातारी - नेला नाही तर काय म्हणतील? म्हातारा - अगं, पैसे संपलेत, कुठून घेऊ? म्हातारी - तरी म्हटलं होतं, 'बाहेर पडलो तर चार पैसे लागतात, थोडे जास्त बरोबर असावेत. (आता सांगा, चार पैशात कुठं लॅपटॉप येतो का?) (पुन्हा मनातल्या मनात.) "दोन एफड्यापण मोडल्यान, आता आणखीन कुठून आणू?" काकुळतीला आलेला अनुभवी म्हातारा सरतेशेवटी ब्रह्मास्त्र काढतो. "आपण जावईबापूंकडून घ्यायचे का?" संजीवनी बुटी लागू पडते. "नाही हो, तिर्‍हाईतासाठी आपल्याच जावयाला कशाला तसदी?" वगैरे..गाडी अचानक गियर बदलते. तुम्हीच काही तरी युक्ती काढा. सांगा इमिग्रेशन, एक्साइज.. आसंच काहीतरी. तर मित्रांनो, (यात मैत्रिणीसुद्धा सामील आहेत) मला सांगा, परदेशवारी काय सोप्पी हाय व्हयं? एक सेवानिवृत्त म्हातारा.