- 8863 views
मिपाच्या प्रवास विशेषांकानिमित्त मी 'घर ते हापिस बसचा स्टॉप या माझ्या प्रवासादरम्यान मला भेटलेल्या वल्लींची तुम्हाला ओळख करून देणार आहे.
रोज साधारण सकाळी पावणेसात ते सातच्या दरम्यान मी हापिसात जाण्याकरता घर सोडतो. या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे रोज दिसणारे चेहरे आता ओळखीचे झाले आहेत. त्यातल्या बऱ्याच लोकांची नावे माहीत नाहीत, ते कुठे राहतात, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती याबद्दल काहीच माहीत नाही. पण हे सगळे लोक माझे मित्र झाले आहेत आणि मी आज तुम्हाला याच मित्र-मैत्रिणींची ओळख करून देणार आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की मला जर या लोकांची नावेसुद्धा माहीत नाहीत, तर अशांची मी ओळख तरी कशी करून देणार? तर हे लोक मला जसे दिसले, जसे वाटले, तशी त्यांची ओळख करून देणार आहे. रोज सकाळी बाहेर पडलो की माझी नजर शोधत असते ती चोरकाकांना. यांना मी चोरकाका म्हणतो, कारण सकाळी सकाळी हे फुले गोळा करत फिरत असतात. यांच्या हातात एक काठी असते, तिचा उपयोग ते आधारापेक्षा झाडाच्या फांद्या खाली ओढण्याकरता जास्त करतात. मी दिसलो की मला "सुप्रभात" असे म्हणून परत आपले चौर्यकर्म सुरू करतात. सोसायट्यांच्या किंवा बंगल्यांच्या कुंपण-भिंतींबाहेर डोकावणारी झाडे वाकवत फुले गोळा करत असतात. फुलांनी पिशवी भरली असली, तरी नवीन झाड दिसले की हे त्याच्या फांद्या वाकवून फुले ओरबाडत असतात. यांच्या घरी किती देव आहेत.. देव जाणे! नंतर थोडा पुढे आलो की भैय्या दिसतो. खरे तर हा भैय्या मराठी माणूसच आहे. सोसायट्यांच्या वॉचमनशी तो मराठीत बोलत असतो. पण तो दूध घालतो, म्हणून त्याचे नाव भैय्या. यांच्याकडे अजूनही एक जुनी एमएटी आहे, जिला सर्व बाजूंनी मोठमोठ्या ताडपत्रीच्या पिशव्या लटकवलेल्या असतात आणि त्या दुधाच्या पिशव्यांनी गच्च भरलेल्या असतात. मी पाहतो, तेव्हा रोजचे साधारण शंभर लीटर दूध तरी त्याच्या गाडीवर लादलेले असते. मला दिसायच्या आधी तो किती ठिकाणी दूध घालून येतो त्याचा काही अंदाज नाही. बऱ्याच वेळा भैय्या मला प्रत्यक्ष दिसत नाही, पण त्याच्या गाडीवरून तो आजूबाजूला आहे हे मला समजते. सोसायट्यांच्या दरवाजासमोर गाडी उभी करून तो आत दूध घालायला गेलेला असतो. दिसला तरी तो धावतानाच दिसतो. आजूबाजूला पाहायला त्याला अजिबात वेळ नसतो. वेळ वाचवण्याकरता तो गाडी बंदसुद्धा करत नाही, तशीच सुरू ठेवून तो सोसायटीत दूध घालत फिरत असतो.
मग दिसतात ते जोशी पेपरवाले, फुटपाथवर किंवा पाऊस असेल तेव्हा एका दुकानाच्या शेडमध्ये रोज सकाळी जोशीकाका पेपरच्या ढिगाऱ्यामध्ये बसलेले असतात आणि मुख्य पेपर आणि पुरवण्या एकत्र करायचे काम करत असतात. कधीकधी पुरवण्यांबरोबर हँडबिलांचे गठ्ठे सोडवून ते पेपरात खुपसण्याचे काम ते मोठ्या वेगाने करत असतात. हे काम करत असतानाच एकीकडे ते पेपरचे गठ्ठेही करत असतात, म्हणजे एखादा पेपर टाकणारा मुलगा समोर आला की त्याला ते सांगतात, "हा आलास का? तो तुझा गठ्ठा, चल, उचल आणि पळ लवकर, त्या कुंजीर आजोबांना पेपरची तहान लागली आहे. सकाळपासून तीन फोन झाले आहेत, अजून पेपर आला नाही म्हणून." जोशीकाकांचा असा तोंडाचा पट्टाही एकीकडे सुरू असतो.
चोरकाका, भैय्या, जोशी पेपरवाले ही वरची किंवा यापुढे येणारी नावे ही काही या लोकांची खरी नावे नाहीत. ही मी मनातल्या मनात त्यांना दिलेली नावे आहेत.
पुढे गेलो की दिसतो कोंबडा. माझ्यासारखाच हासुद्धा ऑफिसला निघालेला असतो, पण याची बस त्याच्या घरासमोरच येते. बसची वाट बघत हा तिथल्या तिथे घुटमळत चालत असतो - म्हणजे पाच पावले चालतो, परत मागे वळतो, पुन्हा स्टॉपवर येऊन उभा राहतो, पुन्हा पाच-दहा पावले विरुद्ध दिशेला चालतो, पुन्हा स्टॉपवर येतो. बहुधा हा जर त्या विशिष्ठ ठिकाणी उभा नसेल, तर आपली बस थांबणार नाही याची त्याला भीती असावी, कारण त्या पाच-दहा फुटांपलीकडे हा कधी जाताना दिसत नाही. असे हे पाच-दहा फुटात लगबगीने चालताना त्याची हालचाल कोंबड्यासारखी होत असते, म्हणून त्याचे नाव 'कोंबडा'. बऱ्याच वेळा कोंबडीचे पिल्लूही याच्याबरोबर उभे असते, आपल्या शाळेच्या बसची वाट बघत. जर कोंबड्याची बस आधी आली, तर मग कोंबडी घाईघाईने घरातून बाहेर येते आणि पिल्लाजवळ उभी राहते आणि मग दोघी मिळून कोंबड्याला टाटा करतात.
थोडा पुढे अंतू उभा असतो. आपल्या मित्रांची वाट बघत. अंतू चौकात उभे राहून मित्रांना मोबाइलवरून फोन करत असतो. "अरे, ऊठ लवकर, सहा वाजून गेले, तो झम्प्या आलासुद्धा, चल लवकर." फोनवर असे डायलॉग मारत तो आपल्या प्रभातफेरीचे भिडू गोळा करत असतो. यातले झम्प्या हे नाव मात्र खरे असावे. कारण हा झम्प्या चालताना पुढे-मागे झाला की बाकीचे म्हातारे त्याच्यावर ओरडतात, "अरे झम्प्या, जरा माणसात चाल." हा झम्प्या, म्हणून त्यांच्यातल्या सर्वात म्हाताऱ्याचे नाव अंतू झाले. या ग्रूपमध्ये एक अण्णू गोगटा आहे, बापू हेगिष्टे आहे, गोविंद भट आहे आणि परांजप्यासुद्धा आहे. ही सगळी सत्तरी-पंचाहत्तरीदरम्यान आलेली दोस्त मंडळी जवळच एका बागेत मॉर्निंग वॉकला जातात. मी कितीही लवकर किंवा कितीही उशिरा हापिसाला निघालो, तरी या ग्रूपमधला किमान एखादा गडी तरी मला रोज भेटतोच.
देवसेनाही मला जवळजवळ रोज भेटते. बाहुबली सिनेमात देवसेना कशी पाठीला बाणाचा भाता बांधून युद्ध करत असते, तशी ह्या देवसेनेच्या पाठीवर योगामॅट असते. देवसेनेला ओव्हरटेक केलेला आवडत नाही. कारण ती लगेचच आपला चालण्याचा वेगा वाढवून तुमच्या पुढे जायचा प्रयत्न करते. एका योगशाळेजवळ या रेसचा शेवट होतो आणि देवसेना विजयी मुद्रेने योगशाळेत प्रवेशकर्ती होते.
कधीकधी अवंतिका, शिवगामी यादेखील लगबगीने योगशाळेत जाताना दिसतात. पण त्यांच्यात देवसेनेसारखी युद्धाची खुमखुमी नाही. आपली योगामॅट हातात धरून त्या रस्त्याने निवांत चालत असतात. यातली शिवगामी मात्र कुत्र्यांना भयंकर घाबरते. कुत्र्यापासून साधारण पाच फूट अंतर राखत योगमार्गावर चालत असते व जवळ येणाऱ्या कुत्र्यांना ती योगामॅटने दूर हाकलत असते.
कुत्र्यावरून आठवले - बरेच दिवसात बोझो दिसला नाही. एका अर्धचड्डित इसमाला बरोबर घेऊन बोझो मोठ्या थाटात रस्त्यावर फिरत असतो. त्याला पाहिजे तिकडे तो शी करतो आणि मग त्याचा तो अर्धचड्डित नोकर फावड्यासारख्या एका हत्याराने बोझोची शी मोठ्या आदराने एका पिशवीत भरून घेतो.

या बोझोला लहान मुले खूप आवडतात. कोंबडीचे पिल्लू दिसले की तो धावत धावत तिच्याकडे जातो आणि मग तीसुद्धा मोठ्या प्रेमाने त्याला मिठ्या मारते. कोंबडीला हा प्रसंग मुळीच आवडत नाही. मग ती बोझोच्या अर्धचड्डित नोकराला म्हणते, "बघा ना, आता ही अशीच दिवसभर शाळेत बसणार, त्याचा हाताने डबा खाणार." मग तो नोकर काही सांत्वनपर शब्द बोलतो. रस्त्यात कोणी दुसरा कुत्रा दिसला की या बोझोला आणि त्याच्या नोकराला खूप राग येतो. बोझोआधी त्याचा नोकरच या कुत्र्यावर छू होतो आणि त्यांना बोझोच्या वाटेतून हाकलून द्यायचा प्रयत्न करतो.
मी थोडा पुढे आलो की मला धावणारे गांधी दिसतात. या इसमाच्या डोक्याचा तुळतुळीत चकोट आहे आणि हा मला नेहमी धावताना दिसतो, म्हणून हा धावणारा गांधी. या गांधीबाबांना मॅरेथॉन धावायची खूप आवड असावी, कारण रोज त्यांच्या अंगात वेगवेगळ्या मॅरेथॉनची जाहिरात करणारे टीशर्ट असतात. ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता गांधीजी फक्त धावत असतात. धावणाऱ्या गांधींसारखे बॅरिस्टर गांधी आणि दांडीवाले गांधीसुद्धा आहेत. बॅरिस्टर गांधी नेहमी सूट-बुटात हातात बॅग घेऊन कोणत्या तरी गाडीची वाट पाहात उभे असतात. ते दर अर्ध्या मिनिटाने आपल्या रिस्ट वॉचात टाइम बघत असतात आणि इतर वेळी रस्त्यावरच्या लोकांकडे तुच्छतेने कटाक्ष टाकत असतात. दांडीवाले गांधी हातात एक काठी घेऊन रस्त्याने मंदपणे चालत असतात. त्यांच्यासोबत गरिबांचा शहारुकही असतो. दोघे जण निवांत गप्पा मारत अर्धा फुटपाथ अडवत एकमेकांशी गुजराथी भाषेत मोठमोठ्याने बोलत चालत असतात. रस्त्यावरच्या लोकांची यांना मुळीच पर्वा नसते. कर्कश मोठ्या आवाजात ते एकमेकांशी बोलत मंदपणे चालत असतात. मला रोज सकाळी एक श्रीमंत कचरेवालीसुद्धा दिसते. ह्या बाईच्या खांद्याला एका भलेमोठे पिशवी-कम-पोते लटकवलेले असते आणि ती रस्त्याने प्लॅस्टिक गोळा करत फिरत असते. मला जेव्हा ती दिसते, तेव्हा तिची पिशवी नेहमी गच्चपेक्षा जास्त भरलेली असते. त्यात कमीत कमी २० ते २५ किलो तरी कचरा जमवलेला असतो. पाण्याच्या बाटल्या, रिकामे डबे, पिशव्या असे जे काही दिसेल ते गोळा करत ती मोठ्या थाटात रस्त्याने फिरत असते. बाटल्यांमधले पाणी रस्त्यावर ओतून देत रिकाम्या बाटल्या गोळा करत रस्त्यावर शोधक नजर फिरवत ती चालत असते. कधी एखादा लोखंडाचा तुकडा किंवा तत्सम वस्तू दिसली की तिच्या चेहऱ्यावर विशेष भाव असतात. काचेची अखंड बाटली असेल तरच ती रस्त्यावरून उचलते. लोखंड, काचेच्या बाटल्या, दूध पिशव्या ठेवण्याकरता तिच्याकडे वेगवेगळ्या पिशव्या असतात. पण सर्वात जास्त भरलेले असते ते तिचे प्लॅस्टिकचे पोते. या तीन-चार गोष्टी सोडून रस्त्यावरच्या इतर कोणत्याही कचऱ्याला ती हात लावत नाही.

बापू चहावाल्यांचे पातेले कायमच उकळत असते. म्हणजे मी संध्याकाळी हापिसातून घरी परत येतानासुद्धा बापू चहा उकळतच असतात. सकाळी जाताना त्यांच्या बाजूला स्टीलचे एक मोठे पिंप भरून दुधाच्या पिशव्या ठेवलेल्या असतात. संध्याकाळपर्यंत हे पिंप रिकामे झालेले असते, तर चहाच्या रिकाम्या ग्लासांनी कचऱ्याची बादली भरलेली असते. कधीकधी शहारुक आणि दांडीवाले गांधी बापूंकडे चहा पिताना दिसतात. श्रीमंत कचरेवालीचाही हा अड्डा असावा, बऱ्याच वेळा ती 'चा आणि किरीम रोल'ची ऑर्डर देत बापूंच्या टपरीशेजारी टेकलेली दिसते.
माझ्या बस स्टॉपजवळच फ्रँकीचासुद्धा बस स्टॉप आहे. माझ्यानंतर दोन-अडीच मिनिटांत फ्रँकीही तिकडे पोहोचते. ती जवळच कुठेतरी राहत असावी, कारण स्टॉपवर पोहोचली, तरी तिचा मेकअप किंचतही हललेला नसतो. फ्रँकी गावठी अँजेलिना जोलीसारखी दिसते. फ्रॅंकीचा फोन सतत सुरू असतो आणि सगळ्यांशी ती फ्रँकली बोलत असते - म्हणजे प्रत्येक दोन-तीन वाक्यांनंतर तिच्या तोंडात "मी तुला फ्रँकली सांगते" असे शब्द असतात. बसमध्ये बसेपर्यंत आणि बहुतेक त्यानंतरही बराच वेळ फ्रॅंकीचा फोन सुरूच असतो.

फ्रँकीबरोबरच स्टॉपवर उभी असते ती ठळकबाई. ठळकबाईला तिचा नवरा रोज सोडायला येतो आणि बस सुटेपर्यंत स्टॉपवर उभा असतो. बस गेली की तो तिथेच एक सिगारेट पेटवतो, संपवतो आणि मगच गाडीवर बसून निघून जातो. ठळकबाई नवऱ्यापेक्षा बरीच उंच आहे आणि तिच्या नवऱ्याच्या पल्सरवर ती मागे बसून ती सहज पुढचे पाहत असते. गाडीवरून लांबून येतानासुद्धा ती मागे बसलेली ठळकपणे दिसते, म्हणून ती ठळकबाई. कधीकधी लाडात आली की ती नवऱ्याच्या गळ्यात मागून हात घालून बसते, तेव्हा मला ती विक्रम-वेताळची जोडीच वाटते.
ठळकबाई आणि फ्रँकीची बस गेली की लतीफची बस येते. या लतीफला मी कधी स्टॉपवर उभा राहिलेला पाहिला नाही. कायम बस आली की हा कुठून तरी धावत येतो. बऱ्याच वेळा लतीफ मला लांबून हात करून बस थांबवायला सांगतो. त्याच्या बस ड्रायव्हरलाही आता ते माहीत झाले आहे. लतीफ नसला की तो मला खुणेने विचारतो लतीफ कुठे दिसतो आहे का ते. आठवड्यातून एकदा तरी लतीफची बस चुकतेच. मग लतीफ परत मागे जातो आणि बाइक घेऊन कामाला जातो. एकदा तर गडबडीत लतीफ चुकून माझ्या बसमध्ये चढला होता.
या यादीत आणखीही अनेक जण आहेत. पण आजसाठी इतकेच पुरे.
माझ्या या मित्रांची ओळख तुम्हाला आवडली असेल, अशी अपेक्षा करतो. तुम्हालाही जर असे कोणी अनामिक मित्र-मैत्रिणी असतील, तर प्रतिसादात त्यांच्याबद्दल नक्की सांगा.