- 8201 views
काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले. 'ज्ञानार्जन, हवापालट, देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना दिल्या जाणाऱ्या भेटी किंवा विविध भौगोलिक प्रदेशांतील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेला प्रवास' अशी काही दशकांपूर्वीपर्यंत असलेली पर्यटनाची साधी सरळ व्याख्या आता कालबाह्य झाली असून रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून दूर होऊन चार विरंगुळ्याचे क्षण मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रवासात व्यक्तिगणिक बदलणाऱ्या आवडी-निवडी, छंद आणि मनोरंजनविषयक कल्पना विचारात घेऊन धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वारसा पर्यटन, क्रीडा पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन अशा अनेक प्रकारांत त्याचे वर्गीकरण झाले आहे.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशा भारतातल्या पाच राज्यांशी तब्बल १७७० किलोमीटर लांबीच्या खुल्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडलेला, एक लाख ४७ हजार १८१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला, म्हणजे तौलनिकदृष्ट्या आपल्या छत्तीसगड राज्यापेक्षा थोडा मोठा आणि ओडिशा राज्यापेक्षा आकाराने थोडा लहान असलेला आणि दक्षिणेकडे उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम पसरलेले, समुद्रसपाटीपासून अवघ्या ५०-६० मीटर उंचीवरचे 'तराई क्षेत्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेच्या सपाट मैदानी प्रदेशापासून पुढे 'शिवालिक टेकड्या', 'महाभारत पर्वतरांग', 'इनर हिमालया' ते उत्तरेकडे संपूर्ण तिबेटची सीमा व्यापणाऱ्या 'ग्रेट हिमालया'तील जगातले सर्वोच्च पर्वतशिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या रूपाने समुद्रसपाटीपासून ८,८४८.८६ मीटर इतकी उंची गाठणारा, प्राचीन ऐतिहासिक वारशाने, वैविध्यपूर्ण संस्कृतीने आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेला नेपाळ हा दक्षिण आशियाई देश जगभरातील अबालवृद्ध पर्यटकांच्या उपरोल्लिखित सर्व पर्यटनविषयक अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहे.
नेपाळला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये धार्मिक पर्यटनासाठी पौराणिक-धार्मिक संदर्भ असलेले, अतिशय सुरेख आणि भव्य असे 'जानकी मंदिर' आणि श्री राम-सीता ह्यांचा विवाह झालेला 'मणी मंडप' व अन्य काही धार्मिक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेले 'जनकपूर'; 'पशुपतीनाथ' आणि 'चांगू नारायण' अशी दोन भव्य प्राचीन मंदिरे, 'काठमांडू दरबार स्क्वेअर (बसंतपूर)', 'पाटण दरबार स्क्वेअर (ललितपूर)', 'भक्तपूर दरबार स्क्वेअर (भक्तपूर)' ह्या १३व्या ते १८व्या शतकातील तीन प्राचीन राज्यांच्या राजधान्या असणाऱ्या नगरांतील अप्रतिम काष्ठशिल्पे असलेली मंदिरे व महाल आणि 'बौद्धनाथ' व 'स्वयंभूनाथ' असे दोन प्राचीन स्तूप अशा युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळे' म्हणून जाहीर केलेल्या सात स्थळांचा समावेश असलेले 'काठमांडू खोरे'; वन पर्यटनासाठी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले 'चितवन राष्ट्रीय उद्यान' जी ठिकाणे लोकप्रिय आहेतच, त्याचबरोबर ग्रेट हिमालयाच्या कुशीतले 'ऑल इन वन' अनुभव देणारे 'पोखरा खोरे'देखील अत्यंत लोकप्रिय असून ते नेपाळची 'पर्यटन राजधानी' म्हणून ओळखले जाते.
जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांपैकी तब्बल आठ शिखरे नेपाळमध्ये आहेत. पोखरा ते सारंगकोट अशा हौशा-नवश्या गिर्यारोहकांसाठीच्या एक दिवसीय ट्रेकपासून दहा दिवसांचा 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' असा थोड्या अनुभवी गिर्यारोकांसाठी, तर दोनशे तीस किलोमीटर लांबीच्या, बावीस दिवसांच्या 'अन्नपूर्णा सर्किट' सारखे तरबेज गिर्यारोकांसाठी असे सुमारे वीस ते पंचवीस पर्याय पोखरा व्हॅलीत उपलब्ध असल्याने जगभरातल्या गिर्यारोहकांची ही पंढरीच आहे. माउंटन सायकलिंगची आणि माउंटन बायकिंगची आवड असणाऱ्यांना आकर्षित करणारे, आपल्या लडाख आणि लाहौल-स्पितीसारखे निसर्गरम्य पर्वतीय 'शीत वाळवंट'देखील पोखरा खोऱ्यातील 'मस्टांग' जिल्ह्यात आहे. 'व्हाईट वॉटर राफ्टिंग', 'कयाकिंग', 'बंजी जंपिंग', 'झिप लायनिंग', पॅराग्लायडिंग, 'माउंटन फ्लाइट', 'अल्ट्रा लाइट प्लेन फ्लाइट', 'हेलिकॉप्टर राइड' अशा अनेक रोमांचक अॅक्टिव्हिटीज हिमालयात करण्याची संधी पर्यटकांना पोखरात मिळते. त्याचप्रमाणे 'पुमदीकोट महादेव', 'विश्व शांती स्तूप', 'डेवी'ज फॉल', 'गुप्तेश्वर महादेव गुंफा', 'केदारेश्वर महादेव मंदिर', 'महेंद्र गुंफा', 'विंध्यवासिनी मंदिर', सारंगकोटचा 'सनराईज पॉइंट' आणि 'रोप-वे', खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला जुना पोखरा बाजार, 'इंटरनॅशनल माउंटन म्युझिअम' अशी अनेक अन्य प्रेक्षणीय स्थळे पोखरामध्ये असली, तरी त्या सगळ्यांचा आढावा एका लेखातुन घेणे अशक्य असल्याने सदर लेखाचा फोकस हा पोखराची शान असलेले 'फेवा लेक', ह्या तलावातल्या बेटावरचे 'ताल बाराही' मंदिर, आणि 'लेक साइड' परिसरातल्या थोड्या मजामस्ती एवढ्यापुरताच मर्यादित ठेवत आहे.
चला तर मग, आता सुरुवात करू या 'फेवा लेक' आणि त्यातल्या 'ताल बाराही' मंदिरापासून.
'फेवा लेक' आणि त्यातल्या 'ताल बाराही' मंदिराच्या उत्पत्तीविषयी अनेक आख्यायिका / दंतकथा सांगितल्या जात असल्या, तरी त्यातली सर्वाधिक मान्यताप्राप्त आख्यायिका अशी -
कोणे एके काळी 'फेवा' नावाचे एक नगर होते. उत्तम हवापाणी आणि सुपीक जमीन असे शेतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने शेतीवाडीतून होणाऱ्या मुबलक उत्पादनाच्या जोरावर नगरातले रहिवासी सधन-संपन्न होते. अशा समृद्ध नगरातील सधन नागरिकांच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी भगवती देवी भुकेल्या भिकारिणीच्या वेशात प्रकट होऊन घरोघरी जाऊन अन्नाची मागणी करू लागली. नगरातील एकाही कुटुंबाने तिला अन्न-पाणी न देता अपमानित करून हाकलून लावले होते, परंतु नगराच्या वेशीजवळ काठमांडूहून तेथे स्थलांतरित होऊन जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर शेती करून आपली उपजीविका चालवणाऱ्या एका गरीब दांपत्याने तिला पोटभर जेवू-खाऊ घातले होते.
नगरातल्या धनिकांच्या गोरगरिबांप्रती असलेलया बेपर्वाईतून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे क्रोधित झालेल्या भगवती देवीने फेवा नगराचा विनाश करून तिथल्या असहिष्णू नागरिकांना अद्दल घडवण्याचा आपला निर्णय जाहीर करून ह्या गरीब पण कनवाळू दांपत्याला त्या विनाशापासून वाचवण्यासाठी शेजारच्या एका टेकडीवर आपला संसार थाटायला सांगून आशीर्वाद दिला. भगवती देवीच्या सांगण्याप्रमाणे हे कुटुंब त्या टेकडीवर स्थलांतरित झाल्यावर देवीने नगराला सर्व बाजूंनी वेढणाऱ्या डोंगर-टेकड्यांपैकी दोन टेकड्या नाहीशा करून त्यांच्यामुळे अडलेल्या जलसाठ्याला मार्ग मोकळा करून देत फेवा नगराला जलसमाधी दिली.
संपूर्ण फेवा नगर पाण्याखाली जाऊन तिथे हा तलाव निर्माण झाला आणि ते गरीब दांपत्य वास्तव्यास असलेली टेकडी चहूबाजूंनी पाण्याने वेढली जाऊन तयार झालेल्या ह्या प्रचंड तलावात एका बेटाच्या रूपाने अस्तित्वात राहिली. ह्या जलप्रलयापासून आपल्याला वाचवणाऱ्या भगवती देवीप्रती आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी त्या दांपत्याने ह्या बेटावर देवीचे छोटेसे मंदिर बांधले होते.
पुढे सोळाव्या शतकात कास्कीचा राजा कुलमंडन शाह ह्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दगड, लाकूड आणि धातू यांचा वापर करून पॅगोडा शैलीत बांधलेल्या ह्या छोट्याशा दुमजली मंदिराचा कळस स्वर्णाच्छादित आहे. आपल्याकडे सहसा सप्तमातृका पूजल्या जातात, त्याप्रमाणे नेपाळमध्ये पूजल्या जाणाऱ्या अष्टमातृकांपैकी एक असलेल्या 'वाराही' देवीला (नेपाळी भाषेत 'बाराही') समर्पित केलेले हे तलावातील मंदिर 'ताल बाराही' तसेच दुर्गा हे भगवती देवीचेच नाव असल्याने दुर्गा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
विशाल फेवा तलावातील बेटावर असलेल्या ह्या मंदिरात जाण्यासाठी बोटीशिवाय अन्य पर्याय नाही. तलावात नौकानयन करण्यासाठी किनाऱ्यावरील धक्क्यावर स्वतः वल्हवण्याच्या आणि नावाड्यासहित असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेल्या छोट्या होड्या आणि पॅडल बोट्स भाड्याने मिळतात, तसेच केवळ मंदिरात जाण्या-येण्यासाठी शेअर बोटीचा पर्यायही उपलब्ध आहे.