Welcome to misalpav.com
लेखक: पियुशा | प्रसिद्ध:
बाकरवडी / भाकरवडी सारणासाठी साहित्य - १) १ चमचा जिरे. २) १ चमचा धणे. ३)२ चमचे पांढरे तीळ. ४) ३ चमचे बारीक किसेलेल सुके खोबरे. ५) घट्ट चिंच-गूळ चटणी (रेडिमेड चालेल) ६) बारीक शेव. ७) लाल तिखट १ छोटा चमचा. ८) चवीनुसार मीठ. ९) साखर १ छोटा चमचा. सारणाची कृती - सर्वप्रथम एक तवा किंवा पॅन मंद आचेवर तापवून घ्यावा. तवा तापला की त्यात आधी जिरे आणि धणे भाजून घ्यावेत. ते भाजल्याचा सुगंध यायला की त्यात तीळ घालावे. तीळ तडतडले की शेवटी सुके खोबरे घालावे आणि मस्त खरपूस भाजून घ्यावे. मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठीच गॅसची आच मंद ठेवावी. आता हे मिश्रण गार होऊ द्यावे. मिश्रण गार झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी. आता ह्या सारणामध्ये अनुक्रमे मीठ, साखर, लाल तिखट आणि मूठभर बारीक शेव घालून दळून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे. हे आपले बाकरवडीचे सारण तयार आहे. आता बाकरवडीचे पीठ मळून घेऊ या. त्यासाठी साहित्य - १) १ कप मैदा. २) २ चमचे बेसन. ३) चवीनुसार मीठ. ४) ३ चमचे कडक तेलाचे मोहन. कृती - एका परातीत मैदा घेऊन त्यात बेसन आणि चवीनुसार मीठ कोरडेच एकत्र करून घ्यावे. आता त्यात कडक तेलाचे मोहन घालून पिठाला चांगले चोळून घ्यावे. मोहन सर्व पिठाला व्यवसथित लागले पाहिजे आणि कोरड्या पिठाची मूठ तयार व्हायला लागली की मोहन परफेक्ट आहे असे समजावे. मूठ होत नसेल आणखी थोडे तेल तापवून घालावे. आता ह्या पिठात थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. पीठ घट्ट असेल तरच बाकरवडी खुसखुशीत होईल. पीठ मळून झाले की १५ मिनिटे झाकून ठेवावे.
1
आता या पिठाचा साधारण एका मोठ्या चपातीला लागेल इतका गोळा घेऊन पातळ व एकसमान लाटून घ्यावा. त्यावर चिंच-गूळ चटणी सर्व पोळीला सारखी पसरवून घ्यावी. आता त्यावर आपले सारण व्यवस्थित पसरवून घ्यावे. आता त्यावर पुन्हा बारीक शेव पसरवून लाटण्याने हलकेच फिरवून ग्यावे, म्हणजे सारण सगळ्या पोळीला एकसारखे लागेल.
2
आता या पोळीची गुंडाळी / रोल करून घ्यावी. या रोलच्या एक इंच आकाराच्या वड्या कापून घ्याव्या. कापलेल्या वड्या उभ्या ठेवून बोटाने हलकेच दाबून थोड्या चपट्या करून घ्याव्या. आपल्या बाकरवड्या तळण्यासाठी तयार आहेत.
3
आता एका कढईत तेल आधी तापवून घेऊन आच मध्यम ठेवून सर्व बाकरवड्या खरपूस तळून घ्याव्या. (आच मोठी असेल तर बाकरवडी बाहेरून तळली जाते, पण आतून कच्ची राहते).
4
आपली खमंग खुसखुशीत बाकरवडी तयार आहे.
bakarwadi