संडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)
Primary tabs
सुरवात करत आहे मिसळीने अर्थात कोल्हपुरी.
मी खाली दिल्याप्रमाणे मिसळ करते. काही सजेशन असल्यास स्वागत आहे.
कोल्हपुरी मिसळ
साहित्य:
३ वाट्या मोड आलेली मटकी
४ उकडलेले बटाटे
४ मोठे कांदे
३ इंच आले
१०/१२ लसूण पाकळ्या
१ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
१ वाटी सुखे खोबरे
२वाट्या ओले खोबरे
२ टे.स्पून तीळ
१ टे.स्पून गरम मसाला (किंवा ५ लवंगा, ८/१० काळे मिरे, २ इंच दालचिनी तुकडा,१ च.धने, १ च जिरे)
२ टे.स्पून कांदालसूण मसाला
१/२ च. हळ्द
१/४ च. हिंग
१ वाटी तेल
चवीनुसार मीठ
इतर साहित्यः शेव चिवडा (मिक्स) / फरसाण, पाव (ब्रेड स्लाइस), कोथिंबीर, लिंबू
तयारी:
१.प्रथम मोड आलेली मटकी भाजून, शिजवून (कुकरमध्ये), त्यातील पाणी बाजूला काढून २ च.तेलात फोडणी करून
मीठ,तिखट घालून उसळ करून घ्यावी.
२.२च.तेलात हळ्द, मीठ घालून उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत.
३. २ च.तेलात, २ चिरलेले कांदे,तीळ, खोबरे, लवंगा, काळे मिरे, दालचिनी ,धने, जिरे सर्व भाजून घ्यावे आणि थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटावे. आले, लसूण बारीक वाटावे.
४.मिसळीचा कट करताना एका मोठ्या पातेल्यात उरलेले ३/४ वाटी तेल घेऊन त्यामध्ये हळ्द, हिंग, १ बारीक चिरलेला कांदा घालावा.
५.कांदा गुलावी रंगाचा झाल्यावर त्यामध्ये २ च. कांदालसूण मसाला आणि वरील दोन्ही वाटण घालावे. कडेने तेल सुटेपर्यन्त परतावे.
चवीनुसार मीठ घालावे. ५/६ कप (जमल्यास कोमट) पाणी घालावे. वरील मटकीचे बाजूला काढलेले पाणी,चिंचेचा कोळ घालावा. उकळी आणावी.
सर्व्ह करताना:
एका खोलगट डिश मध्ये प्रथम मटकीची उसळ.
उकडलेले बटाटे
फरसाण
त्यानंतर कट
बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर
सोबत पाव आणि लिंबाची फोड.
टीप: १. काही वेळा वेळ कमी असेल तर एकाच फोडणीत मटकीउसळ, बटाटेभाजी करु शकतो.
२.चिंचेचा कोळ ऐवजी सर्व्ह करताना टोमॅटोच्या बारीक फोडी घालाव्यात.
३.काही वेळा कटावरील तवंग जास्त हवा असल्यास २ च.तेल गरम करून त्यात १ च.तिखट घालून कटामध्ये घालावे.
वा वा.... एकदम सह्हि... कोल्हापूरी मिसळ...
कांदा लसूण मसाला मात्र यात कोल्हापूरीच घालावा... दुसरा नको
- प्राजु.
मिसळपाववर खुद्द मिसळीचीच पाककृती यावी, यासारखा दुसरा सुंदर योग तो काय! :)
स्वातीजी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाककृती इथे द्या अशी तुम्हाला विनंती...
आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.
धन्यवाद.
स्वाती ने लिहलेली मिसळ वाचून मला स्फूर्ती आली.. आमच्या
संडे स्पेशल मिसळीचे फोटो.. सर्व मिसळप्रेमींसाठी..
http://chakali.blogspot.com/2008/01/kolhapuri-misal.html
आणि
http://chakali.blogspot.com/2008/01/misal-snaps.html
चकली
http://chakali.blogspot.com
फारच सुरेख पाककृती आणि फोटो आहेत! त्यातील एक फोटो इथे द्यायचा मला मोह झाला आहे. आपली परवानगी मी गृहीत धरली आहे! :)
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण!!
आपला,
(मिसळीकरता जगणामरणारा!) तात्या.
अहो मिसळ चाटून पुसून फस्त केलेली रिकामी बशी समोर नका हो ठेऊ (चित्र दिसत नाहीये ;))!
चतुरंग
मिसळची कृती अगदी छान आहे. :) :)
जर फोटू असता एकदम बेस्ट झाले असते... :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
असं जळवताय. कमीत कमी फोटू तरी द्यायचा व्हता.
बा़कि कोल्हापुरच काय बि असल तरी बेसच......
आन ती लंवगी मिरची दिसत नाय कोल्हापुरची ते.........आ.......
सू हा स...
सू हा स...