जे न देखे रवी...

आजीच्या घरातली गंमत

Primary tabs

एक चिमणी, दोन चिमणी,
तीन चिमण्या आल्या दारी,
पटापटा चोचीमध्ये,
धान्य घेऊन गेल्या घरी ।।

आजी म्हणाली चिमणी बाई,
आज का ग तुझी घाई ?,
चिमणी म्हणाली टाकून दाणा,
आज जायचयं एका लग्नाला ।।

घरी जाते, नाश्ता करते,
घालते पोरांना ही जेवायला,
पोरांची नाटकं रोज नवी,
कशी पुरवावी सांगा मजला? ।।

आजी म्हणाली खरंए बाई,
खाण्याची नाटकं नवी नाही,
तुला उद्या देईन पोळी
पोरांना दे करून गोळी ।।

तिकडून आली आजीची नात,
रोजचं नवं गाणं गात,
आश्चर्याने आजीला म्हणते कशी,
चिमणीची भाषा कळते कशी? ।।

आजी म्हणाली भाषा एकसारखी,
प्रेमाने बोलणाऱ्या सगळ्यांना सारखी,
तेवढ्यात चिमणी म्हणाली आजीला,
येते उद्या, जाते भाजीला ।।

आजीने आपली डोलावली मान,
नातीच्या डोक्यात आश्चर्य छान,
चिवचिव असो, कावकाव असो,
अथवा असो पानांची सळसळ,
जर प्रेम दाखवलं सगळ्यांना,
शंभर टक्के कळत त्यांना ।।

न कळता, हसली नात,
मान डोलावून गेली आत,
तितक्यात ऐकू आली कावकाव,
आजी म्हणाली या कावळेराव ।।