मिश्र पीठांची डाळबाटी
Primary tabs

नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले.
हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे. हे एक प्रकारचे वाफवलेले आणि तळलेले स्नॅक आहे, जसे की ढोकळ्याचे किंवा मुठिया सारखे पदार्थ.
सामग्री :
गव्हाचे पीठ: २ कप
रवा : १ कप
ज्वारीचे पीठ: १/२ कप
बेसन: १/४ कप
हिरव्या मिरच्या:पेस्ट ३ चमचे
आलं-लसूण पेस्ट: १ चमचा
हळद: १/२ चमचा
मीठ: चवीप्रमाणे
साजूक तूप: २ चमचे (मळण्यासाठी)
जीरे: १ चमचा
तीळ : ४ चमचे
कोथिंबीर (बारीक चिरून): ४चमचे
तिखट:२ चमचे
पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)
एका मोठ्या भांड्यात पाणी(१/२ ग्लास) घेऊन त्यात तिखट ,हळद,मीठ,आलं लसूण,हिरवी मिरची पेस्ट,जिरे , कोथिंबीर,तूप एकत्र केले.त्यात गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन एकत्र करा.
मळणे: पाण्याचा वापर करून हे सर्व मिश्रण चांगले मळून घ्या. मिश्रण मऊ आणि गुळगुळीत असावे, परंतु खूप पातळ नसावे. १५ मिनिटे झाकून ठेवा.
आता ह्यांचे उंडे करत पोळी प्रमाणे लाटून तेल लावले.व नीट पाच ते सहा घड्या करून परत गोल उंडा केला.
वाफवणे: मिश्रणापासून तयार उंडे वाफवण्याच्या भांड्यात(इडली पात्रात) पाणी गरम करून ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या, ज्याने त्या शिजतील.
तळणे: वाफवलेले उंडे थंड होऊ द्या. नंतर त्या लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. कढईत तेल गरम करून या तुकड्यांना हलक्या तळलेल्या तळून घ्या.
-भक्ती
फोटो एकदम कातील आला आहे... चटकन उचलून तोंडात टाकावा असा...हातात वाफाळता कप...समोर रिमझिम पाऊस....आणि गरम गरम बाटी अशी काहीशी कल्पना केली....!!!
वाह, अप्रतिम! फोटो बघूनच बाटी छान खुसखुशीत असणार असं वाटतंय.
तुम्ही सुगरण आहात अगदी भक्ती.
असा डबा असेल तर मी पुन्हा शाळेत जाणार आणि लपवून खाणार.
छान दिसतयं करून खाऊन बघायला हवे
सर्वांना _/\_
चेपूवर पाककृती दिली असता,खानदेशात अशीच डाळ बाटी करतात असे समजले.याला बाफले असेही म्हणतात.
बट्ट्यांना चांगले लेयर आलेले आहेत. आवडले. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
मस्तच.
क्या बात है!!
नक्कीच करुन बघते! फोटोतील गुलाबाचा रंग फारच सुंदर आहे.
स्वगत :
करून बघायला बायकोला सांगून बघितले पाहिजे. मग बघू करते का.
कदाचित बघता बघता लगेचच करेल,
किंवा बघू कधीतरी असे म्हणेल.
किंवा तुम्ही ते मिपावर काहीबाही बघून मला करायला सांगणे बंद करा, असे म्हणेल.
किंवा जरा सुनांना करायला सांगून बघा, मग बघूया काय होते, असे म्हणेल .....
--- जाऊ दे. बघू पुढे कधीतरी स्वतःच करून.
यात भिजवतांना दही घातले तर अजून फ्लफी होतील का?