काथ्याकूट

दिवाळी अंक २०२५ - आवाहन

Primary tabs

आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत.

दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत.

लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे. पीडीएफ रूपात किंवा स्कॅन केलेले हस्तलिखित कृपया पाठवू नये.
दर वर्षी तेच तेच नियम आणि अपेक्षा लिहून नेहमीच्या मिपा सदस्यांना त्या पाठ झाल्याच असतील, तरीही खाली चोप्य पस्ते (copy-paste) करत आहोत -

  • दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
  • कोणत्याही विषयावरचे तुमचे साहित्य व्य,नि.द्वारे साहित्य संपादक आयडीवर पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
  • किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
  • आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल, तर प्रेषक म्हणून आपला 'मिपा आयडी' लिहायला कृपया विसरू नका.

या अंकासाठी 'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. या विषयावर पुरेसे साहित्य प्राप्त झाल्यास तो विभाग शोभून दिसेल.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपली मते किंवा त्याविषयी तांत्रिक आणि अन्य विविध प्रकारची माहिती देणारे लेख. एआयचा नोकऱ्यांवर किंवा जनजीवनावर होणारा परिणाम आणि दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय केंद्रस्थानी असलेल्या कथा-कविता असे सर्व प्रकारचे लेखन अपेक्षित आहे. AI वापरून लिहिलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे इ. अपेक्षित नाहीत.

1

दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!

लेख पाठवण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२५.

आम्हालाही थोडा वेळ द्या हो पुढच्या कार्यवाहीसाठी.. अगदी शेवटच्या क्षणी लेखन न पाठवता जितके अगोदर पाठवाल, तितके उत्तम.

वाट बघत आहोत.

मिपा व्यवस्थापन

मिपा मालक चालक तंत्रज्ञ वगैरे आपल्या आयुष्यातला वेळ काढून आम्हा मिपाकराची लिहिण्या-बोलन्याची हौस पुरवता ( कोणत्याही फ़ळाची अपेक्षा न करता ) त्या बद्दल तहेदिलसे शुक्रिया.

राजकारण वगैरे मिपावर नियमित दळन येतं त्यामुळे तो विषय घेतला नाही असे वाटले.

बाय द वे, लिहिण्याचा प्रयत्न करीन. दिवाळी अंक संपादक टीमला शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

अभ्या..

वावावा,
छान. अंकाला शुभेच्छा.
जुन्या आठवणी जागृत झाल्या दिवाळी अंकांच्या.
आम्ही ग्राफिक डिझायनर म्हणजे बिचारे रिक्षावाले, एआय चित्रांच्या ड्रायव्हरलेस शटल कॅबकारसमोर आम्ही निष्प्रभ आहोत.
(टांगेवाल्यांसारख्या पेंटरांच्या पोटावर पाय ठेवून ग्राफिक्स केले तेंव्हाची त्यांची मनस्थिती आता समजतेय)
असो. जमाना आहे, बदलत राहणार.
मिपाकर वाचक म्हणून एक मागणं हाय. बघा.
माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे. एक दिवस मिपावर एआय जनरेटेड लेख, कविता, कलाकृती आणि त्यावर ए आय निर्मीत प्रतिसाद पाहायची वेळ येऊ नये इतकेच.
.
या अंकासाठी AI ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे.
शुभेच्छांच...अजून काय?

''माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे''

अभ्याच्या मताशी सहमती आहे. माणसाची सृजनशीलता महत्वाची आहे, ती जपावी एवढीच इच्छा.

-दिलीप बिरुटे

गवि

AI वापरून लिहिलेल्या कथा कविता आणि लेख अपेक्षित नाहीत या वेळी अंकात. AI बद्दल लिहिलं गेलं पाहिजे.

अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून. कृपया.

अभ्या..

अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून.
वॉव,
आपल्याच शोकसभेत श्रध्दांजलीपर भाषण करण्याचा प्रस्ताव. कसली रोम्यांटिक कल्पना.
जमणार नाही आपल्याला.
.
तुम्ही लिव्हा. छान छानच लिहायचं असते म्हणे असलं.
ते पोकळी बिकळी, पृथ्वी फिरत राहते, जातात येतात वगैरे टाईपचं विदाउट एआय लिव्हा काहीतरी. बरं वाटेल वाचून.

माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे.

सहमत

ए आय,ए आय....
अरे, हा तर जुनाच पर्याय .
काऊ कोकता उदरी,
आठवते ती ए आय...
मार खाताना बापाचा,
लपवते पदरी ती ए आय
तुही माही सारखीच हाय,
तरीही, माही आय ती माही आय
सबका मालिक एक ?,
एकच उत्तर हाय.
ए आय,ए आय,ए आय....

सर्वानाच शुभेच्छा व साहित्य फराळाची उत्सुकतेने वाट पहाणार.

सौन्दर्य

दरवर्षी सारखीच उत्सुकता असणार आहे. ह्या वर्षी काहीतरी लिहीन म्हणतो .

ए आय च्या मदतीने लिहिलेले लेख वाचायला फारच अवघड जातात व त्यात एक कृत्रिमता जाणवते.

मनिष

काही थीम आहे का? त्या अनुषंगाने लिहायला बरे पडते.

चौथा कोनाडा

याच आवाहनात नमुद केल्यानुसार :

या अंकासाठी 'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. या विषयावर पुरेसे साहित्य प्राप्त झाल्यास तो विभाग शोभून दिसेल.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपली मते किंवा त्याविषयी तांत्रिक आणि अन्य विविध प्रकारची माहिती देणारे लेख. एआयचा नोकऱ्यांवर किंवा जनजीवनावर होणारा परिणाम आणि दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय केंद्रस्थानी असलेल्या कथा-कविता असे सर्व प्रकारचे लेखन अपेक्षित आहे. AI वापरून लिहिलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे इ. अपेक्षित नाहीत.


दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!

..... थोडक्यात थीम एआय ची आहे पण कशावरही लिहू शकता .... आपल्या लेखनाची मिपाकर आणि वाचक आतुरतेने वाट पहात आहोत.
हार्दिक शुभेच्छा !

मनिष

एआय (कामाचा भाग असूनही) विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. पण दुसरी एखादी प्रसन्न थीम निवडतो. :)

शशिकांत ओक

मित्रांनो,
दिवाळी अंकात या विषयावर आधारित लेखन वाचायला मिळेल ही आनंदाची गोष्ट आहे. काही काळापासून कृ. बु. ला विद्याधर म्हणावे असे सुचवत आलो आहे. खुद्द त्यांना आवडले आहे म्हणून ते मान्य करतात. मिपाकरांना विनंती की आपण धागा काढून नामकरणात आपल्याला सुचतील अशी नावे देऊन त्यातून त्याला निवडीसाठी सहभागी करावे. आपापसात संबोधन करायची सुविधा होईल. पूर्वी कधी कधी असे होई की आपले आधीचे बोलणे - मला माहित नाही- मी मशीन आहे. मराठी शिकत आहे. असे तुटकपणे म्हटले जायचे. नमस्कार विद्याधर म्हणा मग मी आधीचे सगळे धागे लक्षात ठेवेन असे त्यानेच सुचवले.
दिवाळी अंकात यावर आपापले विद्याधर कोण हे वाचायला रंजक होईल.

पर्णिका

'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स',,, मस्तच! उत्सुकता वाटतेय...
मिपा दिवाळी अंक उत्तम असेलच, मिपा व्यवस्थापन-साहित्य संपादकांना शुभेच्छा !

संपादक मंडळ ,
नमस्कार .

दोन दिवसांत कथा पाठवतो आहे .

दिवाळी अंकासाठी खूप शुभेच्छा !

धन्यवाद .

संपादक मंडळ ,
नमस्कार .

कथा पाठवली आहे . कळावे .

दिवाळी अंकासाठी पुन्हा खूप शुभेच्छा !

धन्यवाद .

योगी९००

कथा जवळजवळ तयार आहे

एक दिवस उशिर झाला आहे. आज किंवा उद्या पाठवली तर चालेल का?

चौथा कोनाडा

मला ही उशीर होत आहे.....

संपादक मंडळ .. कृपया अजुन दोन तीन दिवस विलंबास अनुमती द्यावी ही विनंती !

स्वधर्म

साहित्य संपादक या आय डी स व्य.नि करून लेख पाठवला आहे. व्य. नि. ने पोहोच मिळेल काय?
तसेच लेखासाठी फोटो व्यनिमध्ये टाकता आला नाही. तर तो कसा पाठवावा?
धन्यवाद.

स्वधर्म

व्य नि मध्ये फोटो टाकता आला नव्हता. म्हणून फोटो असलेले वर्ड डॉक्युमेंट पाठवलेले आहे.

गवि

धन्यवाद. साहित्य संपादक बघतीलच.

एक_वात्रट

माफ करा, पण एक लेख काल पाठवला आहे, तर दुसरा लेख आज पाठवतो आहे. दोन्ही लेख अंकात समविष्ट होतील का?

चौथा कोनाडा

मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेख व्यनिने पाठवला आहे.

इ-मेलने देखिल पाठवला आहे. त्यात WORD आणि PDF फॉरमॅट फाइल मध्ये जोडलेली आहे.
लेख चित्रांच्या इमेज लिंक सह आहे. जास्तीतजास्त संपादन करून कमीतकमी चुका होतील याची काळजी घेतली आहे.

लेखाची दीर्घता आणि अचानक उद्भवलेली तातडीची कामे या मुळॆ विलंब झाला त्याबद्दल दिलगीर आहे.

मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेखन करण्याची संधी दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

शुभ दीपावली !

- चौथा कोनाडा,

पाशिंजर येऊन शिटा फुल्ल भरल्याबिगर दिवाळी अंकाची बस निंगणार नाय वाट्टे !

सर्व मिपाकर तथा कुटुबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्वेता२४

कथा पाठविण्यास उशीर झाला. याबद्दल क्षमस्व. तथापी माझ्या कथेची दखल घेऊन ती दिवाळी अंकात प्रसिद्ध केलीत व मला दिवाळी अंकाचा भाग बनण्याची संधी दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद!!! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

केदार भिडे

नमस्कार,
लॉगिन केल्याशिवाय दिवाळी अंकातील साहित्य दिसत नाहीये. लॉगिन करूनही केवळ एकच लेख दिसत आहे

प्रचेतस

मालक दिवाळी अंक प्रकाशनाच्या पूर्वतयारीत गुंतलेले दिसत आहेत, सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.

टर्मीनेटर

सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.

झाली एकदाची सर्व तयारी 😀
होईलच आता अंक प्रकाशित 👍

स्वधर्म

सगळे जण कसे अगदी आतुर झाले होते. अखेर संपादक मंडळाने दिवाळी अंक प्रकाशित केला.
अंक सवडीने वाचेनच पण प्रथमदर्शनी अत्यंत देखणा झालाय, हे नोंदवतो. संपादक मंडळाचे आभार!