काथ्याकूट

सध्या मी काय पाहतोय ? भाग १२

Primary tabs

P1
कराटे गर्ल्स ही एक प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा वेब सिरीज आहे, जी हल्लीच माझ्या पाहण्यात आली. ही २०२४ मध्ये प्रदर्शित झाली वेब सिरीज असुन हा पहिला सिझन आहे.
ही कथा कोमल आणि आभा या दोन १८ वर्षांच्या मुलींभोवती फिरते, ज्यांची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. कोमल ही रागीट आणि बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे, तर आभा ही तिच्या वडिलांच्या कराटे अकॅडमीचा वारसा पुढे नेणारी शिस्तबद्ध मुलगी आहे. [ सिरीज पाहताना आभाचे डोक्यावरील विविध हेअर बँड्स तिची स्टाईल सेन्स दाखवतात. ]
कथा मुख्यत्वे नाशिक मधील नवोदय कराटे अकॅडमी मध्ये घडते जिथे कोमल तिच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रवेश घेते.सुरुवातीला एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या या मुली नंतर कराटे स्पर्धेसाठी एकत्र येतात.
या मालिकेत अश्लेषा ठाकूर [ कोमल ] आणि सेलेस्टी बैरागी [ आभा ] यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
मानव गोहिल यांनी आभाच्या वडिलांची (सेन्सेई: अजय कदम) महत्त्वाची भूमिका निभावली आहे.ही सिरीज मैत्री, जिद्द आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासावर आधारित आहे.खेळाच्या माध्यमातून सामाजिक अडथळे तोडणाऱ्या मुलींची ही गोष्ट अत्यंत प्रभावी आहे.ही वेब सिरीज Amazon MX Player वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ११

मदनबाण

युट्युबवर एका पापाजींनी या २ स्त्री प्रधान चित्रपटांचे परिक्षण केल्याचे पाहण्यात आले होते.चित्रपट वादग्रस्त असल्याचे देखील समजले. बर्‍याच काळाने असे चित्रपट पहावेच असे परिक्षण पाहुन वाटले.

P1

'बॅड गर्ल' ( Bad Girl ) :-
२०२५ च्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेला 'बॅड गर्ल' (Bad Girl) हा एक तमिळ ड्रामा चित्रपट आहे.याचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शिका वर्षा भरत यांनी केले असून, वेत्रिमारन आणि अनुराग कश्यप यांनी याची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट रम्या (अभिनेत्री: अंजली शिवरामन) नावाच्या मुलीचा हायस्कूलपासून ते वयाच्या तिशीपर्यंतचा प्रवास मांडतो, ज्यात तिचे प्रेम, सामाजिक अपेक्षा आणि तिने घेतलेले चुकीचे निर्णय दाखवले आहेत.या अभिनेत्रीचा अभिनय सुरेख आहे, किशोर वयापासुन प्रैढ अवस्थे पर्यंत पोहचण्याचा एकाच पात्राचा हा प्रवास तीने अप्रतिम साकारला आहे,प्रत्येक वयातील मुलीचे हावभाव तीने सशक्तपणे आणि सहजतेने दाखवले आहेत.अंजली शिवरामनच्या धाडसी आणि संवेदनशील अभिनयाचे मोठे कौतुक झाले. रम्याच्या आईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शांतीप्रिया यांनी पालकांची हतबलता आणि प्रेम अतिशय प्रभावीपणे साकारले आहे. महिलांची मैत्री आणि त्यांच्या आयुष्यातील बारकावे (जे सहसा पुरुषप्रधान सिनेमात दिसत नाहीत) हे अतिशय प्रामाणिकपणे या चित्रपटात मांडलेले आहेत.चित्रपटाने पुराणमतवादी सामाजिक नियमांना, विशेषतः एका विशिष्ट चौकटीतील रुढींना आव्हान दिले आहे,ज्यामुळे प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर काही प्रमाणात वाद झाला होता. ज्यांना व्यक्तिरेखा-प्रधान कथा आवडतात, त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.जे प्रेक्षक निव्वळ मनोरंजन किंवा नैतिकता महत्वाची धरतात त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही.या चित्रपटाला काही पुरस्कार मिळालेले आहेत व कुठल्या फिल्म फेस्टीवल मध्ये समाविष्ट केले होते याची माहिती चित्रपटाच्या सुरुवातीला क्षणभर दिसते.मला तर अनेकदा पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांची भिती वाटते कारण एक तर असे चित्रपट मल समजत नाहीत किंवा झेपत नाहीत! :)))
हा चित्रपट पाहुन मला तणाव मात्र जाणवला.

द गर्लफ्रेंड ( The Girlfriend ) :-
P2
द गर्लफ्रेंड हा तेलुगू भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल रवींद्रन यांनी केले असून, यात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.
हा चित्रपट 'भूमा देवी' (अभिनेत्री: रश्मिका मंदाना) नावाच्या एका साहित्य शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थिनीच्या जीवनावर आधारित आहे.
तिची भेट कॉलेजमधील एक देखणा आणि आत्मविश्वासू मुलगा 'विक्रम' ( अभिनेता: दीक्षित शेट्टी) याच्याशी होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात.मात्र, हळूहळू या नात्याचे स्वरूप बदलू लागते आणि विक्रमचे वागणे भूमा साठी अत्यंत ताबा मिळवणारे / नियंत्रीत करणारे आणि श्वास कोंडणारे होते.चित्रपटात भूमाच्या या गुदमरणाऱ्या नात्यातून तीची स्वतःची ओळख शोधण्याच्या आणि स्वावलंबी होण्याच्या प्रवासा दाखवतो.रश्मिका मंदानाच्या तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय असल्याचे अनेक समीक्षकांनी म्हटले आहे. मला देखील तीचा अभिनय आवडला.समीक्षकांनी कौतुक केले असले तरी हा चित्रपत फ्लॉप ठरलेला आहे.

हे दोन चित्रपट पाहिल्यावर मला काय वाटले?: दोन्ही अभिनेत्रींनी उत्तम अभिनय केला आहे. मला व्यक्तीश: अंजली शिवरामन अधिक भावली आणि तीचा अभिनय देखील रश्मिका मंदाना पेक्षा अधिक सरस वाटला. दोन्ही चित्रपट पाहुन कुठेतरी असे जाणवले की मुलींनी हॉस्टेलवर शिकण्यासाठी गेल्यावर तिथे जो मुलगा आवडेल त्याच्याशी सहज शरीर संबंध ठेवणे ही अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे. बॅड गर्ल मध्ये तीने किती पुरुषांशी संबध ठेवले त्याचा काउंट देखील मला लक्षात ठेवता आलेला नाही, यात एक मुसलमान पुरुष देखील आहे. शरीर संबंध ठेवा, गर्भ निरोधक गोळ्या वापरु नका, कॉंडम शिवाय चांगली मजा असा सर्वसाधारण छुपा अजेंडा अगदी लिलया मिसळलेला वाटतो. हेच द गर्लफ्रेंड मध्ये रश्मिका मंदाना अगदी काकूबाई टाईप किंवा अबोल, कोणाशी पटकन न बोलणारी सुसंस्कृत घरातील मुलगी तीच्या बॉयफ्रेंड बरोबर अगदी सहजतेने झोपते ते देखील मुलींच्या हॉस्टेल मध्ये तीच्याच खोलीत. मुले-मुली इतक्या सहजतेने एकमेकांच्या हॉस्टेल मध्ये कोणत्याही वेळी जाऊ शकतात?
तेव्हा रुढी विरोधी- पुरुष प्रधान विरोधी हे दाखवण्या बरोबर हे असण्यासाठी किंवा होण्यासाठी मुलींनी मुलांशी शारीरिक संबंध ठेवणे हा किमान निकष असल्याचे वाटते.
हे चित्रपट पाहुन झाल्या नंतर मला एक गोष्ट समजली ती म्हणजे रश्मिका मंदाना ने इस्त्रायली-पॅलेस्टिनी संघर्षाच्या वेळी All Eyes On Rafah असा संदेश पोस्ट केला होता,पण तीने आज पर्यंत बांग्लादेशातील हिंदूं बद्धल ब्र देखील काढलेला नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanya

कपिलमुनी

अंदाज
१.तुमचे वय ४५ च्या आसपास असावे असा आहे.
२. तुम्ही हॉस्टेल मध्ये राहिला नाहिये.

त्यामुळे तुम्हाला हे सगळे आश्चर्यजनक वाटत आहे .

मदनबाण

मुनी मी स्पष्ट लिहले आहे की : हे दोन चित्रपट पाहिल्यावर मला काय वाटले?
माझे मत हे त्या "चित्रपटात" काय दाखवले आहे त्या बाबतीत आहे. हॉस्टेल मध्ये उठ-सुठ प्रवेश करता येत नाही, तिथे एन्ट्री करावी लागते. हॉस्टेलच्या ठरलेल्या वेळा देखील असतात. तसेच प्रत्येक मुलींच्या हॉस्टेल मध्ये मुलांना प्रवेश करण्यास परवानगी असते असा तुम्ही समज करुन घेतलेला दिसतोय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

कॉमी

व्लादिमिर नोबोकोव्ह ह्या लेखकाचे "लोलिता" नामक अतिशय विवादित पुस्तक आहे. कारण ह्या सदर पुस्तकातले मुख्य पत्र आणि प्रथम पुरुषी निवेदक एक pdfफाइल पुरुष 'हंबर्ट' आहे. दुसरे प्रमुख पात्र आहे डोलोरस नावाची बारा वर्षांची मुलगी.

ह्या पुस्तकाची कथा, नोबोकोव्ह ह्या लेखकाचे मनोगत, पुढे स्तुती आणि टीकाकार अशा सगळ्याच टीकाकारांनी नोबोकोव्हच्या ह्या पुस्तकासोबत केलेले गोंधळ, स्टॅन्ली कुब्रिकचा ह्या पुस्तकावर आलेला सिनेमा जो पाहून नोबोकोव्ह हताश झाला, तसेच आजही ह्या पुस्तकाचा नोबोकोव्हच्या उद्दिष्टाविरूद्ध असलेला विकृत क्लचरल इम्पॅक्ट, ह्यावर एक उत्तम व्हिडिओ पाहिला.

वॉर्निंग - संवेदनशील विषय.
Lolita: the worst masterpiece

ह्या व्हिडिओतील विषयावरून "लिओन: द प्रोफेशनल" हा सिनेमा पाहताना वाटलेली घृणा आठवली.

मदनबाण

माझ्याच धाग्यात "लोलिता" या केवळ एका नावाने मला अवांतर करायला लागत आहे!
ट्रम्प तात्या आणि जेफ्री एपस्टीन प्रकरण गाजत असताना त्यात एका विमानाचे नाव माझ्या वाचनात आले होते, ते म्हणजे : लोलिता एक्स्प्रेस
हे नाव याच "लोलिता" कादंबरी वरुन ते दिले गेले होते. एपस्टीनच्या विमानातून अनेकदा कमी वयाच्या मुलींना त्याच्या खाजगी बेटावर नेले जात असे, म्हणून स्थानिक लोक आणि प्रसारमाध्यमांनी या विमानाला उपरोधिकपणे 'लोलिता एक्स्प्रेस' असे नाव दिले होते.या विमानातुन बिल क्लिंटन ने किमान २६ वेळा, डोनाल्ड ट्रम्प ने किमान ७ वेळा व इतर प्रवाशां मध्ये प्रिन्स अँड्र्यू देखील होते. आत्ता एलॉन मस्क जरी ट्रम्प तात्यांचे व्हेनेझुएलावर केलेल्या अफलातुन आणि अभ्यासावी अश्या कारवाई चे कौतुक करत असला तरी त्याने ६ जून २०२५ ला ट्रम्प तात्यां बद्धल एक्सवर एक पोस्ट केली होती आणि तात्यांचे नाव एपस्टीन फाईल्स मध्ये असल्याचे लिहले होते,नंतर त्याने ती पोस्ट डिलीट केली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

>>स्टॅन्ली कुब्रिकचा ह्या पुस्तकावर आलेला सिनेमा जो पाहून नोबोकोव्ह हताश झाला

का म्हणून ?

-दिलीप बिरुटे

कॉमी

ह्या पुस्तकात असे काही प्रसंग आहेत जे पडद्यावर दाखवणे प्रेक्षकांना सहन झाले नसते आणि कायद्याने सुद्धा परवानगी नसली असती.

पण त्या प्रसंगांच्या नसण्याने ह्या कथेचा चेहरामोहरा पार बदलून गेला. मोहून टाकणाऱ्या मधाळ भाषेत लिहिलेली एका राक्षसाची आत्मकथा, असे नोबोकोव्हच्या पुस्तकाचे स्वरूप आहे. ते विशिष्ठ प्रसंग काढल्यामुळे हम्बर्टचे राक्षस असणे खूप कमी झाले आणि सिनेमा जणू हलकाफुलका जरी विचित्र पण शेवटी रोमान्स सिनेमा झाला. त्यामुळे नोबोकोव्हला धक्का बसला.

हं बरोबर. मी पुस्तक वाचलेले नाही. पण सिनेमा पाहिला. (आपण इकडे डकवलं म्हणूनच पाहिला )
आत्ताशी नोबोकोव्हच्या धक्क्याचं कारण समजलं.

आभार. :)

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर

तीन-चार दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरची दोनच सिझन असलेली 'माईंडहंटर' ही सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर वेब सिरीज बिंज वॉचिंग करत बघून झाली. मस्त सिरीज आहे! पहिला एपिसोड बघताना आपण काहीतरी जाम बोरिंग बघायला घेतले कि काय अशी शंका आली होती, पण पुढे मात्र मालिका खिळवून ठेवते. सत्तरच्या दशकात एफ.बी.आय. च्या 'बिहेविअर सायन्स युनिट' अंतर्गत सिक्वेन्स किलर्स, सिरीयल किलर्सच्या विकृत मानसिकतेचा अभ्यास छान प्रकारे दर्शवला आहे. अतिशय बुद्धिमान व्यक्ती त्यांच्या मनावर आघात करणाऱ्या पूर्वायुष्यातल्या काही घटनांमुळे अनेकांच्या हत्या करण्यास कशा उद्युक्त होतात हे बघणे रोचक आहे.
काही एपिसोड्समध्ये कथानकाच्या गरजेनुसार अर्वाच्य भाषा असली तरी मालिकेतले बरेच संवाद मला खूप आवडले!

मदनबाण

P1
कधी कधी असं होतं की नक्की काय पहावं? तेच धड सुचतं नाही, समजा काही पाहण्याचा पर्याय उपलब्ध जरी असला तरी त्यावेळी त्याची इच्छा नसते. मग अश्यावेळी काहीतरी हलकंफुलकं आणि डोक्याला देखील शॉट लागणार नाही असं काही पाहावे असा विचार असतो, अश्याच विचारात असताना मला भूल चूक माफ हा चित्रपट योग्य वाटला! हा चित्रपट पाहण्याचे मुख्य कारण म्हणजे मला वामिका गब्बी आवडली आहे,अगदी चिकण सुपारी आहे! ;) त्याच बरोबर राजकुमार राव याचा अभिनय मला आवडतो.

भूल चूक माफ :
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला'भूल चूक माफ' हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
चित्रपटाची कथा वाराणसीमध्ये घडते.मुख्य पात्र अंजन तिवारी (राजकुमार राव) आपली प्रेमिका तितली (वामिका गब्बी) हिच्याशी लग्न करण्यासाठी एका सरकारी नोकरीच्या शोधात असतो.या प्रयत्नात तो काही चुकीचे मार्ग निवडतो आणि अनपेक्षितपणे एका 'टाइम लूप'मध्ये अडकतो.तो दररोज झोपल्यावर आपल्या हळदीच्या दिवसाच्या सकाळीच पुन्हा जागा होतो.राजकुमार रावने त्याच्या नेहमीच्या बनारसी शैलीत आणि कॉमिक टायमिंगमध्ये उत्तम काम केले आहे.वामिका गब्बीसोबतची त्याची केमिस्ट्री मला आवडली. सीमा पाहवा, संजय मिश्रा आणि रघुवीर यादव यांसारख्या अनुभवी कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपट पहावतो.हा एक स्वच्छ आणि कौटुंबिक चित्रपट आहे,जो नात्यांमधील साधेपणा आणि मूल्यांवर भाष्य करतो.चित्रपटाचा उत्तरार्ध काहीसा रेंगाळलेला वाटतो.टाइम लूपमुळे एकच गोष्टी वारंवार घडताना पाहून तुम्हाला थोडा कंटाळा येऊ शकतो.मेंदूला कुठलेही कष्ट न देता पुढे काय घडेल किंवा काय घडणार आहे ते समजते.हा एक हलका-फुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याने टाईमपास म्हणुन पाहु शकता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys