जनातलं, मनातलं

आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !

Primary tabs

आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.

* * * * *

मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी. किंवा, हा लेख म्हणजे काहीतरी गंमतजंमत असणार असाही काहींचा अंदाज असावा.

वाचकांनो, काही हरकत नाही !
आता इथे आलाच आहात तर पाहूया काय आहे हा आंबट व खारटपणा. या लेखातून तुम्हाला मानवी शरीरासंबंधीच्या एका आगळ्यावेगळ्या संवेदनस्थितीबद्दल काही सांगणार आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत अस्तित्वात असलेली अशी स्थिती ही खरोखरच गमतीशीर वाटणारी आहे. परंतु अशा विचित्र स्थितीचा अनुभव म्हणजे कोणताही आजार वगैरे बिलकूल नाही. समाजातील सुमारे 2%–4% लोकांना असा विशिष्ट अन विचित्र संवेदनांचा अनुभव येत असतो आणि त्याला शास्त्रीय भाषेत Synesthesia असे म्हणतात - syn = एकत्र व esthesia = संवेदनक्षमता. म्हणजेच, दोन भिन्न संवेदनांचे नकोसे असलेले एकत्रीकरण किंवा भेसळ. (शरीराच्या सर्व संवेदना बधीर करणारा anesthesia आपल्याला परिचित असतोच).

एक सोपे उदाहरण पाहू. समजा, ‘पुस्तक’ असा शब्द आपल्यासमोर लिहिलेला असेल तर आपल्याला त्या शब्दापासून फक्त दृष्टीने बोध होऊन मनात त्याचा अर्थ समजतो(आणि फार तर मनात पुस्तकाची प्रतिमा उमटू शकते).
परंतु एखाद्याच्या बाबतीत पुस्तक हा शब्द बघितल्यानंतर जर त्याला तोंडात आंबट चव लागली तर तो झाला synesthesia. वरवर पाहता हे अगदीच विचित्र वाटेल परंतु ते सत्य आहे.
सुमारे दोनशे वर्षांपासून वैज्ञानिक या विचित्र स्थितीचा अभ्यास करत असून तो त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. शरीरपेशींमधील विशिष्ट जनुकीय घटक या स्थितीला जबाबदार असावेत परंतु त्या संदर्भातील संशोधन अद्याप अपुरे आहे.

दैनंदिन जीवनात विविध अनुभूती घेण्यासाठी आपण ५ प्रमुख इंद्रियांचा वापर करतो. त्यांच्याद्वारे अनुभवलेल्या विविध संवेदना अशा आहेत :

डोळे : दृष्टी
नाक : वास
कान : श्रवण
जीभ : चव आणि
त्वचा : स्पर्श.

(या व्यतिरिक्त असलेल्या इतर काही संवेदना बाजूला ठेवू).

वरील प्रत्येक इंद्रियात निसर्गतः विशेष प्रकारच्या संवेदन यंत्रणा (receptors) असतात. त्या प्रत्येक यंत्रणेमार्फत भिन्न प्रकारची संवेदना चेतातंतूंच्याद्वारे मेंदूत पोचवली जाते. या प्रक्रियेदरम्यान विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत संदेशात केले जाते. आपल्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग नेमून दिलेले असतात. अशा शिस्तबद्ध ‘प्रोग्रॅम’मुळेच आपले एखादे इंद्रिय फक्त त्याला नेमून दिलेली संवेदनाच मेंदूत पोचवते आणि आपल्याला तिची जाणीव होते. उदाहरणार्थ, जेव्हा डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला फक्त ‘दिसणे’च अपेक्षित असते.

या उलट मेंदूत संवेदनांची भेसळ झालेल्या व्यक्तींना अनेक प्रकारचे चित्रविचित्र अनुभव येतात. एखाद्याने गिटारचा आवाज ऐकला की त्याच्या डोळ्यासमोर अचानक पिवळा रंग दिसू लागतो. तर अन्य एखाद्याच्या बाबतीत त्याने साध्या काळ्या शिसपेन्सिलने कागदावर काढलेले विविध अंक पाहिले तरी त्याच्या डोळ्यांसमोर काही रंग नाचू लागतात. Solomon Shereshevsky (१८८६-१९५८) या रशियन पत्रकाराचे प्रकरण तर अचंबित करणारे होते. त्याच्या मेंदूत पाचही प्रमुख संवेदनांची मिसळण झालेली होती. त्याने एखादा अंक नुसता मनात जरी आणला तरी त्याच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारची चित्रे तरळत. उदा.,
‘१’ पाहिला असता त्याला एक धष्टपुष्ट माणूस दिसायचा तर ‘२’ च्या विचाराने एक उत्साहाने ओसंडून वाहणारी स्त्री दिसायची. ८७ या अंकाच्या विचाराने एक जाडी बाई आणि मिशा पिळणारा पुरुष एकत्रित दिसायचे. आता बोला !
तर हे झाले संवेदनांच्या भेसळीचे एक अतिरेकी उदाहरण.

आता पाहू एक दृष्टीज्ञान आणि चवज्ञान यांची मिसळण झालेले एका डच स्त्रीचे उदाहरण.
या बाईंना निरनिराळे लिखित शब्द दाखवले असता त्यांना विविध प्रकारच्या चवी किंवा वासाची संवेदना होते. पदवीपर्यंत शिकलेल्या या बाईंचा वैज्ञानिकांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे आणि त्यासाठी मेंदूची एमआरआय तपासणीसारखी आधुनिक साधने देखील वापरली आहेत. या बाईंना वेगवेगळ्या प्रकारचे डच भाषेतील शब्द दाखवण्यात आले आणि प्रत्येक शब्द पाहिल्यानंतर त्यांना कोणत्या चवीची संवेदना झाली याची नोंद घेतली गेली. उदाहरणादाखल त्यातील काही शब्दांची इंग्लिश भाषांतरे आणि बाईंनी अनुभवलेली चव अशी होती :

mine - गोड चव
dive - कडू
lasting - आंबट
woman - खारट

या प्रयोगादरम्यान त्यांच्या उत्तरांमध्ये सातत्य होते. तसेच त्या बाईंनी सांगितलेली माहिती हा निव्वळ ‘भास’ नाही ना, याची देखील खात्री करून घेतली गेली. त्यासाठी बाईंच्या मेंदूच्या विविध भागांची प्रतिमा-तपासणी आणि त्याचे शास्त्रीय पृथःकरण करण्यात आले.

संवेदना मिसळणीच्या असंख्य प्रकारांमध्ये (सुमारे ६०) दोन प्रकारच्या ‘मिसळी’ अधिक प्रमाणात ( > 50%) दिसतात :
१. विविध प्रकारचे आवाज (tones) ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर विभिन्न रंग तरळणे, आणि

२. कुठलाही रंग नसलेले अंक पाहिले किंवा त्यांचा विचार जरी केला तरीसुद्धा डोळ्यांसमोर भिन्न रंग दिसणे.

ok

या व्यतिरिक्तच्या अन्य प्रकारांपैकी फक्त एकाचा ओझरता उल्लेख करतो आणि त्याला mirror-touch synesthesia असे म्हणतात. त्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केला असता त्या दोघांसमोर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला निव्वळ ते दृश्य पाहून आपल्यालाच कोणीतरी स्पर्श करते आहे अशी भावना होते.
ok

अशी मिसळण का होत असावी हा वैज्ञानिकांपुढे यक्षप्रश्न असून त्याच्या स्पष्टीकरणासाठी काही गृहीतके मांडली गेलीत. विविध संवेदना स्वीकारणारे मेंदूचे निरनिराळे भाग गर्भावस्थेतील आयुष्यात एकमेकांशी बऱ्यापैकी जोडलेले असतात. जशी गर्भाची वाढ होऊ लागते तसतसे हे विभाग एकमेकांपासून सुटे होणे अपेक्षित असते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत असे न झाल्यामुळे भिन्न संवेदनांचे प्रदेश एकमेकांशी गरजेपेक्षा जास्त चेतातंतूद्वारा जोडले जातात. आपल्या मेंदूत एकूण 86 अब्ज चेतातंतू असल्यामुळे कधी ना कधी या सगळ्या जटील गुंत्यात (फोनच्या क्रॉस कनेक्शनसारखा) ‘क्रॉस ओव्हर’ असा प्रकार होताना दिसतो. तसेच या लोकांच्या मेंदूच्या अंतर्गत रचनेतही काही बदल दिसून येतात. अशा लोकांपैकी सुमारे 40 टक्क्यांच्या बाबतीत या प्रकाराची आनुवंशिकता आढळली आहे. तर काही जणांच्या बाबतीत BDNF या प्रकारच्या विशिष्ट रसायनाची पातळी अधिक दिसून आली. त्यातून एक नवी थिअरी मांडली गेली. त्यानुसार संवेदना-मिसळण ही एक प्रकारे परम जागृत अवस्था (advanced state of consciousness) असावी आणि त्याला मेंदूचा वेगळ्या अंगाने झालेला विकास (differentiated development) कारणीभूत असावा.

संवेदनामिश्रणाच्या प्रकरणांमागे एक किंवा अधिक जनुकांचा वाटा असू शकेल परंतु ते अद्याप अस्पष्ट आहे. मानवी उत्क्रांतीदरम्यान अशा प्रकारची जनुके टिकून का राहिली असावीत याचे वैज्ञानिकांना बरेच कुतुहल आहे. त्यावरील विचारमंथनातून काही गृहितके मांडली गेली आहेत त्यांची आता नोंद घेऊ :

१. एखाद्या व्यक्तीतील संबंधित जनुकीय बदलामुळे मुळात तिला एक वेगळाच भन्नाट गुणधर्म प्राप्त झालेला असतो आणि त्याचा बायप्रॉडक्ट म्हणून हा संवेदनामिश्रणाचा अतिरिक्त गुण चिकटलेला असतो.

२. वरील मुद्द्यातला वेगळा गुणधर्म कुठला असावा यावरही बराच खल झालाय. काहींच्या मते अशी माणसे सामान्य लोकांपेक्षा अधिक सर्जनशील (creative) असतात. काही गाजलेल्या कलाकारांचे निरीक्षण केले असता त्यांच्यात अशा संवेदनामिश्रणाचे प्रमाण अधिक आढळले आहे.

३. अशा व्यक्तींना अचाट बुद्धिमत्ता (savantism), आकलनक्षमता किंवा अविश्वसनीय अशी अफाट स्मरणशक्ती प्राप्त होऊ शकते.

४. या व्यक्तींचे रंगज्ञान देखील सामान्य लोकांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि तीक्ष्ण असू शकते.

५. अशी मुले शालेय वयात परकीय भाषा आणि संख्याशास्त्र हे विषय इतर मुलांपेक्षा अधिक गतीने शिकतात आणि त्यात प्राविण्य मिळवतात असेही काही संशोधकांचे निरीक्षण आहे.

आतापर्यंत वर्णन केलेला संवेदना मिश्रणाचा गुणधर्म संबंधित व्यक्तीला जन्मतःच मिळालेला असतो. त्याची खातरजमा करण्यासाठी अन्य काही गोष्टींची शहानिशा करणे आवश्यक असते. काही मानसिक आजार किंवा त्यावरील औषधोपचारांच्या दरम्यान संबंधित रुग्णांना चित्रविचित्र प्रकारचे भास (hallucinations) होऊ शकतात. तसेच ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना देखील काही भास होत असतात. त्यांची synesthesia या निसर्गदत्त प्रकाराशी गल्लत होता कामा नये.
अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील मेंदूशास्त्रज्ञ डॉ. David Eagleman यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केलेला असून त्यांच्या संशोधनात त्यांना संवेदनामिश्रण असलेल्या 42,000 खात्रीशीर व्यक्ती सापडलेल्या आहेत. त्यांचे या विषयावरील Wednesday Is Indigo Blue हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

या कुतुहलजनक विषयातले संशोधन अद्याप पुरेसे नसले तरी भविष्यात त्याला गती मिळू शकेल. त्यातून आतापर्यंतच्या गृहीतकांमधून मांडलेल्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. हा शास्त्रीय विषय रोचक वाटल्याने वाचकांपुढे त्याची प्राथमिक माहिती सादर केली. आता सामान्यजन म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो. जर आपल्या पाहण्यात चुकूनमाकून असा एखादा माणूस आलाच, की जो ‘बुवा’ म्हटले असता आंबट आणि ‘बाई’ म्हटले असता खारट चव लागली, असे जर म्हणाला तर त्याला चक्रमबिक्रम न समजता संवेदनांची मिसळण झालेला एक इसम(synesthete) असे समजायला हरकत नाही ! :)

ok
***********************************************************************************************************
संदर्भ :

  1. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3222625/
  2. https://en.wikipedia.org/wiki/Solomon_Shereshevsky
  3. https://www.frontiersin.org/journals/psychology/articles/10.3389/fpsyg.2...
  4. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11366591/
  5. https://www.bbc.com/future/article/20250224-the-people-who-see-foreign-l...
Bhakti

रोचक माहिती !!
रच्यकाने हेमंतकुमार नामक गायक आठवले :)

सर्वप्रथम कुमार सरांचे नव्या नावानिशी मिपावर स्वागत!! नेहमीप्रमाणेच रोचक माहितीने भरलेला लेख. वाचताना मजा आली . स्वतःलाही असे काही वाटतेय का हे जाणुन घ्यायला लागेल.

हेमंतकुमार

असू शकतेच.
लेखात याचे प्रकार दिलेले आहेत. अशा बहुतेक लोकांत साधारणपणे कुठल्यातरी एका संवेदनेच्या बाबतीत घोटाळा झालेला असतो.

Synesthesia is inherently "selective" because it does not affect all senses equally

कंजूस

तुम्ही कुमारच आहात.
____________
पण हा लेख काही कळला नाही.

हेमंतकुमार

काय कळले नाही यासंबंधी काही विशिष्ट प्रश्न असल्यास शंकासमाधान करता येईल.

सुबोध खरे

अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते.

रंग पाहिला तर आपल्याला रंग दिसतो

परंतु एल एस डी" घेतल्यावर जर हि डोळ्याची संवेदना जर श्रावण केंद्रात गेली तर काय होईल? त्या माणसाला "रंग" ऐकू येतो.

किंवा

आवाजाची संवेदना दृष्टी केंद्र कडे गेली तर काय होईल? या माणसाला आवाज "दिसू "लागतो.

किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो.

LSD-induced synesthesia involves cross-sensory experiences, like seeing sounds as colors or tasting music, where senses blend, often triggered by music, thoughts, or emotions, leading to intense visual patterns (fractals, geometric shapes) and altered perceptions of reality, creating a rich, immersive, and sometimes overwhelming sensory flood. This heightened interconnectedness of senses allows for novel ways of experiencing the world, often described as profound or mystical.

Visualizing Sound: Hearing a song and seeing its melody as flowing colors or shapes.
Tasting Words/Sounds: Experiencing flavors associated with specific sounds or spoken words.
Feeling Colors: Perceiving textures or physical sensations from different colors.
Geometric Patterns: Intense, complex geometric forms overlaying vision.

एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात.

आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.

हेमंतकुमार

एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील.

या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते. त्याचे कारण वर लेखात सविस्तर दिलेलेच आहे.

टर्मीनेटर

तुम्हा दोघा डॉक्टर द्वयींच्या प्रतिसादांतला 'एल.एस.डी' चा उल्लेख वाचून माझ्या एका जुन्या प्रतिसादातले "ह्या चित्रपटाचा नुसता परिचय वाचूनच अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यासारखी अवस्था झाली" हे वाक्य आठवले एकदम 😀

ह्या प्रतिसादाचा आणि वरील वाक्याचा त्यातला 'ॲसिड टॅब' हा एक शब्दप्रयोग वगळता अर्थाअर्थी काहीही परस्पर संबंध नाही, उलट हा शब्दप्रयोग त्या वाक्यात कोणत्या संदर्भाने वापरला होता हेच स्पष्ट होईल फारतर! तसेही "आजपर्यंतच्या आयुष्यात 'करायलाच पाहिजेत' अशा अनेक गोष्टी करण्याच्या नादात 'चुकूनही करू नयेत' अशाही अनेक गोष्टी, एकदाच का असेना पण करून झाल्या आहेत" असे इथे अनेकदा लिहून झालेले असल्याने त्यातली 'शहाण्या माणसाने चुकूनही करू नये' ह्या कॅटेगरीमध्ये पहिल्या पाचात नाही तरी गेला बाजार पहिल्या दहात तरी येईल अशी एक गोष्ट सांगायला हरकत नाही...

खरे साहेबांनी म्हंटल्याप्रमाणे सायकॅडेलिक संगीताच्या साथीने 'रंग ऐकणे आणि आवाज बघणे' हे 'त्या' प्रसंगी शब्दश: अनुभवले आहे. अक्खे जग म्हणजे एक प्रचंड मोठा कॅलिडोस्कोप वाटायला लागून आपल्या आजूबाजूच्या अगणित रंगीबेरंगी महाकाय प्रकाशमान नक्षी कॅलिडोस्कोप फिरवल्याप्रमाणे आपले आकार सतत बदलत रहातात. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर आठ-दहा तासांच्या त्या 'अंमल काळात' अनेक अचाट, अशक्य अशा हॅल्युसिनेशन्स अनुभवल्यात की विचारू नका, त्या सांगितल्या तर हसून हसून पोट दुखेल 😀

गंमत म्हणजे 'ट्रिप' मधल्या त्या भ्रामक विश्वात आपण काय काय केले, प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले काय काय बघितले किंवा अनुभवले ह्या सगळ्याची मेंदूकडून व्यवस्थित दखल घेतली जात असावी कारण अंमल उतरल्यानंतरही आपल्याला सर्व गोष्टी जशाच्या तशा आठवतात, स्वप्नाप्रमाणे पूर्ण किंवा अंधुकसे आठवणे किंवा अजिबात काही न आठवणे असला काही प्रकार झाला नाही त्यामुळे स्मृतींच्या खात्यात त्यांची नोंद होत असावी असे वाटते.

दीडेक दशकापूर्वी 'तज्ञ' व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, एकदम छान आनंदी मूडमध्ये असताना स्वेच्छेने हा उद्योग केल्यावर जो "जन्नत का नजारा" अनुभवायला मिळाला तो पुन्हा अनुभवायची आजतागायत कधीही ईच्छा झाली नाही एवढा खतरनाक होता की त्यावरून एखाद्या दुःखी किंवा नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीने अत्यंत चुकीच्या मूड मध्ये जिभेखाली 'ॲसिड टॅब' धरल्यास कशाप्रकारचा "जहन्नुम का नजारा" अनुभवायला मिळेल ह्याची मी त्यावेळी अनुभवलेल्या सर्व 'सकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांना 'नकारात्मक' भावना, दृष्ये. घटना, प्रसंगांनी रिप्लेस करून केवळ कल्पना तेवढी करू शकतो, प्रत्यक्षात त्यांचा अनुभव त्यापेक्षा कितीतरी भयंकर असू शकेल.

मल्टिपल नशेचे प्रकार नियमित करणारे भले भले नशेडी असोत कि आमच्यासारखे 'Been there... Done that! 'ह्या धोरणांतर्गत एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत, पण पुन्हा म्हणून ते ॲसिड टॅबच्या वाटेला जात नाहीत. 'काल्पनिक विश्वात' थोडीशी मुशाफिरी करायची ईच्छा झाल्यास महाशिवरात्रीला किंवा होळीला 'येडी नशा' म्हाणून बदनाम असलेली 'भांग' एकवेळ प्यायलेली परवडली पण 'भ्रामक विश्वात' नेऊन अचाट आणि अफाट असे चमत्कारिक नजारे दाखवणारी ही 'महायेडी नशा' कायम 'युफोरिया'तच बागडू इच्छिणाऱ्या 'जुन्या आणि नव हिप्पी लोकांनाच' लखलाभ असो, वास्तविक जगात जगणाऱ्या, आपली उपजीविका चालवण्यासाठी 'डोके' ठिकाणावर असणे अत्यावश्यक असलेल्या कुठल्याही शहाण्या माणसाचे ते कामच नाही!

हे एवढं सगळं लिहायचं कारण म्हणजे, तुमच्या दोघांच्या प्रतिसादांत पुढे आलेले 'synesthesia', 'Pseudo-synesthesia', 'LSD-induced synesthesia', ' Drug-induced cross-modal perception' असे शब्दप्रयोग आणि व्याख्या. तुम्हा दोघांसमोर माझे वैद्यकीय ज्ञान हे शून्यच नाही तर -१, -१० असे उणे म्हणता येण्यासारखे आहे त्यामुळे कुठला शब्द किंवा व्याख्या बरोबर आणि कुठले चूक हे ठरवण्याचा हेतू नसून फक्त स्वानुभवावरून मला काय वाटते हे सांगण्यापुरताच मर्यादित आहे!

अशी स्थिती "एल एस डी" हे मादक द्रव्य घेतल्याने होते. यात मेंदूमध्ये क्रॉस कनेक्शन होते. / त्या माणसाला "रंग" ऐकू येतो. / या माणसाला आवाज "दिसू "लागतो. / किंवा दिसणारे फुल त्याला हाताला स्पर्श जाणवतो.

+१००
ये सब सच्चीमें होता हैं बॉस! ते अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि वाचुन त्याची स्पष्ट कल्पना येणेही शक्य नाही पण त्या भ्रमिष्टावस्थेत ती अनुभुती जाणवते आणि लक्षातही रहाते. पण हे प्रकार अंमल काळापुरतेच मर्यादीत असतात नंतर सर्व काही पहिलेसारखेच सामान्य होते हे मी माझ्या एकमेव अनुभवावरुन खात्रीने सांगु शकतो.

एल एस डी हे मादक द्रव्य असे मेंदूत पार बिघाड निर्माण करू शकतात. / आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून राहतो.

वैद्यकिय तज्ञाचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने कुठ्लीही औषधे घेणे जेवढे धोकादायक नसेल त्यापेक्षा जास्त धोका ह्या क्षेत्रातिल तज्ञाच्या सल्ला/देखरेखी शिवाय मनमानी करुन अशा मादक द्रव्यांचे अवाजवी सेवन करण्यात असतो. ओव्हरडोसमुळे किंवा ह्या महायेड्या नशेच्या अहारी गेल्यामुळे एखाद्याच्या मेंदुत पार बिघाड होणे आणि हा परिणाम कधी कधी वर्षानुवर्षे टिकून रहाण्याची शक्यता मला नाकारता येणार नाही कारण उन्नीस-बीस झाल्यास मेंदुत 'क्रॉस कनेक्शन'च काय 'शॉर्ट सर्किट' पण घडवुन आणण्याची क्षमता ह्या पदर्थात नक्किच आहे!

एल एस डी या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम हा शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार synesthesia नाही; त्याला फार तर Pseudo-synesthesia असे म्हणता येईल किंवा याहून अधिक चांगला शब्दप्रयोग Drug-induced cross-modal perception हा राहील.

बरोबर. शास्त्रशुद्ध व्याख्येनुसार हा परिणाम synesthesia नसला तरी वैद्यकिय पर्श्वभुमी नसलेल्या एखाद्याला अनौपचारीक संभाषणात या मादक द्रव्यामुळे होणारे परिणाम विषद करताना त्यातले गांभीर्य लक्षात यावे म्हणुन त्या व्यख्येत 'synesthesia' हा शब्द वापरला असावा असे वाटते. अर्थात 'Pseudo-synesthesia' आणि 'Drug-induced cross-modal perception' हे आधी माहिती नसलेले औपचारीक शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतात!

या द्रव्याच्या प्रभावाखाली असताना जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून त्यात सातत्य नसते. याउलट नैसर्गिक (developmental) खराखुरा synesthesia कायमस्वरूपी असून त्या अनुभवात सातत्य असते.

+१००
सहसा ८ ते १० तासांच्या (हा कालावधी व्यक्तीपरत्वे कमी जास्त असु शकेल) अंमल कालावधीत जे काही अनुभवास येते ते तात्पुरते असून नंतर त्याच्या फक्त स्मृती तेवढ्या रहातात. त्या अनुभवात खर्‍याखुर्‍या synesthesia प्रमाणे कुठलेही सातत्य नसते!

हेमंतकुमार

प्रामाणिक अनुभवकथन आवडले. तो 'दिव्य' अनुभव आहे एकदाच घेऊन त्यापासून लांब झालात हे फारच उत्तम !

एकदातरी अनुभव घेण्याची 'खाज' असलेले हौशे, नवशे, गवशे असोत,

एकेकाळी मी सुद्धा या प्रकारात किंचित मोडत होतो पण तुमच्या वरच्या 'पीएचडी' अनुभवाच्या तुलनेत मी घेतलेला अनुभव म्हणजे बालवाडीतलाच म्हणावा लागेल ! :)

हेमंतकुमार

"जन्नत का नजारा" आणि
जहन्नुम का नजारा"

हे दोन्ही शब्दप्रयोग भलतेच आवडलेले आहेत.

सविस्तर प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

गांजा किवा तत्सम मादक पदार्थांच्या सेवनाने पुरुषांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर परीणाम होतो असे ऐकले आहे ते खरे आहे का? हीच गोष्ट बाकिच्या अंमली पदार्थांना लागु आहे का? किवा गेलाबाजार तंबाखू, धूम्रपान, मद्यपानाला लागु पडते का?

हेमंतकुमार

वरील सर्व व्यसनांचा पुरुषाच्या जननक्षम इंद्रियांवर दुष्परिणाम होतो. हा खूप मोठा विषय असून एका प्रतिसादात घेणे अशक्य आहे.
थोडक्यात,
या सर्व दीर्घकालीन व्यसनांमुळे पुरुषी हार्मोनचे प्रमाण कमी होते. परिणामी शुक्रजंतूंची निर्मिती आणि त्यांचा दर्जाही खालावतो. त्याचबरोबर लैंगिक उर्मी देखील कमी होते.

हेमंतकुमार

जागतिक स्तरावर पुरुषवंध्यत्वाच्या एकूण रुग्णांपैकी अंदाजे खालील प्रमाणात पुरुष व्यसनाधीन आढळतात :

  • तंबाखू व्यसन : 25 ते 37%
  • मद्यपान : 18 ते 25 %
  • Psychoactive drugs : 2 ते 5 टक्के

अर्थात निरनिराळ्या देश आणि वंशांनुसार वरील टक्केवारीत फरक पडू शकतो.

गवि

हा लेख वाचून माझ्या एका वैयक्तिक अनुभवाचं गूढ काहीसं उलगडलं. खरंच त्याचं कारण Synesthesia आहे की अन्य काही हे मला नक्की सांगता येणार नाही. पण तरीही..

लहानपणापासून मला एक विशिष्ट शब्द ऐकला आणि त्याचवेळी एक विशिष्ट दृश्य मनाच्या चक्षूंसमोर आणलं, तर त्याच वेळी माझे पुढचे दोन दात अचानक सौम्य दुखतात. किंचित शिवाशिवणे कम दुखणे.

शब्द ऐकला की दृश्य आठवणे हे काही विशेष नाही. पण मी तो शब्द मनात आणला आणि ते दृश्य त्याचवेळी मनात आणलं तर अजूनही माझे दोन दात किंचित दुखतात.

यातली गंमत अशी की, तो शब्द आणि ते दृश्य यांचा काहीही सबंध नाही. त्या सर्वाचा दात दुखण्याशीही संबंध नाही. बालपणी कधीतरी पेढ्यांच्या दुकानात (हॉटेलवजा) बसलेला मी. समोर दिसणारा एक अत्यंत जुन्या बनावटीचा ट्रक, ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे (कोणाला आठवते का? ७० ८० च्या दशकातले) आणि पुढे ग्रिल असायचे, उभ्या डिझाईनचे. तर तसा ट्रक समोर आहे.

त्यावेळी माझ्या मनात जो शब्द आला असावा किंवा आधीच होता तो इंग्रजी भाषेत फळाचे एक नाव आहे.

त्यावेळी माझे दात दुखले असं मला आठवतं. त्यानंतर आजतागायत तो शब्द आणि ते दृश्य मी जर आठवलं तर खरोखर फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे. नुसतं त्या फळांचं नाव ऐकून तो इफेक्ट येत नाही. तसला ट्रक आता रस्त्यात कधी दिसत देखील नाही. पण दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर मात्र हा परिणाम नक्की होतो.

मन आणि शरीर यांचा काय काय नकाशा आणि जाळं आहे ते सांगणं कठीण आहे.

हे सर्व अगदीच निरर्थक वाटेल असं असल्याने कधी व्यक्त करावं असं वाटलंच नव्हतं. हा लेख वाचून गंमत म्हणून लिहीलं.

धन्यवाद.

हेमंतकुमार

ज्याच्या समोर वक्राकार हूड असायचे

हाच तो ट्रक :
ok

आमच्या घराजवळच एक गॅरेज असल्याने असे ट्रक नेहमी पहायचो.
तेव्हा महाराष्ट्रातील वाहन क्रमांकांची मालिका तीन अक्षरीच असायची - त्यातली पहिली दोन अक्षरे एमएच

गवि

अगदी अगदी. असाच ट्रक. ग्रिलचे डिझाईन थोडे उभ्या पट्ट्यांचे इतकाच बारीकसा फरक. पण मॉडेल हेच. धन्यवाद.

हेमंतकुमार

रच्याकने...
ट्रकचा संदर्भ आला की श्रीलाल शुक्ल यांच्या राग दरबारी कादंबरीतील हे जबरी वाक्य आठवणे अटळअसते :

"उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है"

हेमंतकुमार

फक्त तेच दोन दात दुखतात. भास नव्हे.

याला Synesthesia असे म्हणायचे का हे तज्ञच सांगू शकतील.

लेखात म्हटल्याप्रमाणे Synesthesiaचे एकूण ६० प्रकार आतापर्यंत सापडले आहेत. त्यात Mirror-pain synesthesia असा एक प्रकार असतो व त्याच्या एका उपप्रकारात एखाद्या निर्जीव वस्तूला 'इजा' किंवा तिची मोडतोड होत असेल तरीसुद्धा बघणाऱ्यावर त्याचा परिणाम होऊन काही दुखण्याची भावना होऊ शकते.

हा Indirect Triggers चा परिणाम असतो.

विजुभाऊ

ल्यूसी नामक एक इंग्रजी चित्रपट आहे.
त्यात ल्यूसी च्या रक्तात एक ड्रग भिनत जाते. आणि तीचा मेंदू पुर्णक्षमतेने काम करायला लागतो.
ह एकितपत शक्य आहे माहीत नाही. पण मेंदूची सूप्त क्षमता वाढत असेल असे वाटू शकते.
शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी कोकेन घेत असल्याचा उल्लेख येतो

हेमंतकुमार

शेरलॉक होम्स च्या कथेत तो मेंदू तल्लख करण्यासाठी

शेरलॉकसाठी ते ठीक आहे ! :) परंतु,
विज्ञान असे आहे :
कोकेनमुळे तात्पुरत्या काळासाठी मेंदूतील dopamine, norepinephrine, and serotonin या सर्वांची पातळी वाढते. त्यामुळे आनंद, तरतरी आणि वाढीव आत्मविश्वास या भावना निर्माण होतात. परंतु काही काळाने वरील रसायनांच्या पातळ्या खाली गेल्या की मग गडबड चालू होते.
त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम तर वाईटच आहेत.

खटपट्या

हेमंतकुमार सर,
आजकाल माइंड रीडींग चे स्टेज शो होतात त्यात एक प्रकार बघायला मिळ्तो. तो म्हणजे एका माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्याला काही दिसत नाही याची खात्री केली जाते. नंतर दुसर्‍या माणसाला बोलावले जाते. दुसर्‍या माणसाच्या गालाला हात लावला की पट्टी बांधलेल्या माणसाला वाटते की त्याच्या गालाला कोणीतरी हात लावतो आहे, प्रत्यक्षात त्याला कोणीही स्पर्शही केलेला नसतो. पण पट्टी बांधलेल्या माणसाला भास होतो.

याचा काही या शास्राशी संबध आहे का?

गवि

ही एक ट्रिक आहे. ज्या क्षणी अ व्यक्तीचा ब व्यक्तीच्या गालाला किंवा खांद्याला स्पर्श होतो त्याच वेळी क व्यक्तीला तो स्पर्श जाणवला असे प्रत्यक्षात नसते. मी ही ट्रिक स्टेजवर करताना पाहून नंतर जाणून देखील घेतली होती.

आधी क व्यक्तीचे डोळे बांधले जातात. डोळे बांधले आहेत त्या क व्यक्तीला बाकी आसपासचे कळेनासे होते. तेव्हाच तिच्या गालाला किंवा खांद्याला जादूगार (ट्रिक करणारा) स्पर्श करतो सर्वांच्या नकळत कारण लोकही त्यावेळी त्या दृष्टीने बघत नसतात. त्यांना ही काही स्पर्शाची जादू असणार आहे हेही तोवर माहीत नसल्याने.

मात्र क ला तो स्पर्श जाणवल्याने त्याचा मेंदू ती नोंद घेतो. कोणाचा स्पर्श होता ते क ला अर्थातच कळत नाही.

मग थोड्याशाच वेळात जादूगार अ या व्यक्तीला सर्वांसमोर गालाला किंवा खांद्याला स्पर्श करतो. शांतपणे. मग तो क ला त्याचे डोळे उघडून किंवा न उघडता विचारतो की तुम्हाला काही स्पर्श जाणवला होता का आणि कुठे. क "हो गालाला जाणवला" असं सांगतो आणि लोक अचंबित, टाळ्या.

स्पर्श नेमका केव्हा झाला त्याबद्दल प्रश्न विचारताना टाळलेले असते.

हेमंतकुमार

मी हे प्रकार प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. परंतु वर गविनी म्हटल्याप्रमाणे तो एक भ्रम असावा असे दिसते.
Synesthesia च्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या मेंदूमध्ये चेतातंतूंचे क्रॉस कनेक्शन झालेले असते हा महत्त्वाचा भाग आहे. मुळात अशा व्यक्ती लोकसंख्येच्या मनाने खूपच कमी असतात.

वरील खेळांमध्ये ते कोणताही सामान्य माणूस ठरवून आणत असतील आणि आधी त्याला पढवले म्हणजे झाले.