पावभाजी व्रताची गोष्ट
Primary tabs

ऐका माझ्या या पावभाजीच्या व्रताची एक गोष्ट! हे व्रत मी अगदी बालपणातच अंगिकारलं होतं – नववीत शाळेत असताना! एका काकूंकडे ती लालभडक भाजी तव्यावर रटरटताना पाहिली, आणि बस्! माझ्या डोक्यात व्रताचा घंटानाद झाला. पुढच्याच रविवारी घरी घाट घातला – "आज पावभाजी होणार!" आता इतकं आठवत नाही, पण ती पहिली पावभाजी एवढी छान जमली होती की, मैत्रिणींमध्ये फुशारकी मारली: "मी अशी मस्त पावभाजी बनवते, काय सांगू? स्ट्रीट स्टाइल भैय्यासारखी!"
एक मैत्रीण म्हणाली, "असं का ग ? मी येते तुझ्याकडे, शिकव ना!" मी म्हणाले, "ये की, माझ्या वाढदिवसाला मी पावभाजीच करणार आहे, तुला स्पेशल शिकवेन!" वाढदिवसाला ती आली, मी भाजी बनवली – मऊसूत, चविष्ट! ती पाहून म्हणाली, "अरे, मिक्सरमधून काढतेस का ग?" मी हसून म्हणाले, "ए बाई, असं काही नसतं करायचं! हाताने स्मॅश करूनच असला स्वाद येतो!" आणि दोघी खो खो हसत सुटलो. (आता विचार करते, तेव्हा मिक्सर वापरलंअसत तर किती सोपं गेलं असतं! )
तेव्हा पावभाजीसाठी कांदा चिरणे हे ऑलिम्पिक गेम्ससारखं महत्वाचं काम होतं! चॉपर-वॉपर काही नव्हतं, फक्त चाकू आणि डोळ्यात पाणी. परतायला, वरून घालायला – कांदाच कांदा! मग शिताफीने हे काम बाबांना देई: "बाबा, प्लीज ना..." आणि बाबा खरंच निगुतीने बारीक बारीक चिरायचे, जणू कांदा त्यांचा बेस्ट फ्रेंड! मटारच्या सीझनमध्ये तर पावभाजी फेस्टिव्हलच! फ्रोजन मटारचं नावही ऐकलेलं नव्हतं, वाळलेले मटार तर आई कधी आणतच नसत – फक्त वाळलेला हरभरा दिसायचा, जणू तोच मटारचा दूरचा नातलाग!
वाढदिवस असो की पाहुणे येणार, आईचं फर्मान: "पावभाजी कर!" मी म्हणे, "आई, अभ्यास आहे गं!" आणि पावभाजीच्या कढईतून अंग काढून पळ काढायचे. पण कॉलेजात मैत्रिणींनी रूमवर जमलो की, पावभाजीचा दरवळ उठे – तोच मैत्रीचा खरा आधार! आता लग्न झालं, दोनाचे चार हात झाले, पावभाजी कधीही होऊ लागली. फ्रोजन मटार, वाळलेले दाणे – सगळं मिळालं, आणि मास्टरी हळूहळू वाढली.
रंग लाल हवा? भाज्या उकडताना थोडं बीट टाका – लाल रंग लवकर येतो! आता तर एक चिमूट पनीर मसाला टाकला की, लालभडक होऊन जाते, जणू भाजीने लिपस्टिक लावली! जास्त पाहुणे येणार तर? बटाटे वाढवा, इतर भाज्या कमी – असा काळाबाजार मनात करून घ्यायचे. बाहेर भैय्या मोठ्या तव्यावर किती वेळ स्मॅश करतो ते पाहायचे, मग घरी बारीक गॅसवर रटरटू द्यायची. पण एकदा गरम शिंतोडे अंगावर उडाले – चार हात लांब उडी मारली! आता शिकले, सावध राहते.
सुहाना, एव्हरेस्ट, बादशाह, MDH ते आता सवाई – या जादूच्या दहा वीएस तीस रुपयांच्या पुडक्यांशिवाय पावभाजी शक्यच नाही! तरीही नवे मसाले शोधते, जणू चोखंदळपणे साडी शोधावी तसे!
आता "अहो, पावभाजी करायची आहे, भाज्या आणा!" म्हटलं की, नवरा फक्त बटाटे, शिमला, फ्रोजन मटार आणतो आणि निर्विकार चेहऱ्याने विचारतो, "काय, अजूनही भाज्या यात असतात?" मग आमची "तीन भाज्यांची स्पेशल पावभाजी" प्रसिद्ध! जैन, मुंबई स्ट्रीट, हिरवी – सगळ्या ट्राय केल्या, पण त्यांची "मिनिमलिस्ट" व्हर्जन बेस्ट!
पण आता तीन जण झालो – लेकीच्या पोटात सगळ्या भाज्या जायला हव्यात! म्हणून स्वतः बाजारात जाऊन आणते: बटाटा, फ्लॉवर, वाटाणे, गाजर, टोमॅटो, शिमला, कोबी, बीट, घेवडा – फुल्ल टू मिक्स व्हेज! नाहीतर लेकी मोठी होऊन म्हणेल, "आई, तू फक्त बटाट्याची भाजी बनवायचीस का?"
पावाचं काय सांगू? आधी पोळ्या लाटायची कटकट नको म्हणून लादी पाव! मग आरोग्यासाठी गव्हाचे पाव, आणि कधी थेट "पोळीभाजी" होऊन जायची! आता मक्खन? अमुलच्या वड्या झपाट्याने संपायच्या, पण आता हेल्थसाठी घरचं साजूक तूप – तरी स्वाद तसाच!
अशी ही पावभाजी व्रताची गमतीदार गोष्ट! चार-पाच वर्षांनी लेकीकडे ही व्रताची ड्यूटी दिल्यावर मी मुक्त होईन असं वाटतं. पण खरंच सुटेन का? की तेव्हाही फोन करून सांगेन, "लेकी, बीट टाकायचं विसरू नकोस!"
कशी वाटली सख्यांनो ही पुराणकथा? तुमची पावभाजी स्टोरी सांगा ना...
--भक्ती
व्रताची गोष्ट आवडली. आमच्या घरी पावभाजीचा वार शुक्रवार!! का? अहो फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपवुन तो येत्या रविवार साठी रिकामा करायला.
हा हा!चांगली आयडियाची कल्पना आहे पण फ्रीज स्वच्छ करायच्या धांदलीत चुकून कारलं पडायचं पावभाजीत :)
कृहघ्याहेवेसांन..
व्रताची गोष्ट आवडली.. मी पण आठवी-नववी पासुन हे व्रत घेतलंय...
लेकीला फार आवडते त्यामुळे ८-१५ दिवसातुन एकदा होतेच होते...
तुम्ही प्रयोग करताय तर एक शॉर्ट्कट सांगते..अजिबात कांदा न घालता भाजी करुन बघा.. कांदा फक्त वरुन घ्यायचा...
आमच्या गावच्या पावभाजी वाल्याने दिलेली टीप...ते लोक कांदा घालतच नाहीत...मस्त होते.. सोपी सुटसुटीत..
मोठ्या प्रमाणात करायची असेल तर बिन कांद्याची भाजी म्हणजे वरदान..
चला आता या आठवड्यात करणे आले.
+१
झक्कासं लागते एकदम! बाकी Bhakti पावभाजीचे व्रत आवडले!
आज माझ्या घरी हे व्रत संपन्न होणार आहे.बायडी एकदम भारी पावभाजी बनवते!ती देखील थोडासा बीट घालते,भाजी स्मॅश करण्याचे काम अनेकदा माझ्याकडे दिले जाते.
एवरेस्टचा मसाला बर्याच वेळा वापरला जातो.लेख पाहुन पनीर मसाला टाकण्याची सुचना बायडीस केली आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project
बटाटा, फ्लॉवर, हिरवे वाटाणे आणि गाजर. वरून कच्चा कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घेतल्याशिवाय त्या भाजीला पूर्णत्व येत नाही. लोण्यावर गरम भाजलेले वरून कुरकुरीत पण आतून मऊ लादी पाव!! स्वर्गच! "काय करूया?" या प्रश्नाचं सर्वात सोपं आणि हक्काचं उत्तर म्हणजे पावभाजी!
मी पण 👍
माझी एक मावशी खूप छान पाव-भाजी बनवायची, आता तीची इहलोकीची यात्रा संपली असली तरी पाव-भाजीशी तिच्या आठवणी कायमस्वरूपी जोडल्या गेल्या असल्याने आम्ही कुटुंबीय आणि काही सख्या शेजाऱ्यांच्या मनात ती सदैव जिवंत राहणार आहे.
'कांदा, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची, फरसबी, भिजवलेले पण मोड न आलेले हिरवे वाटाणे, ताजी ताजी आलं-लसूण पेस्ट, अमूल बटर, एव्हरेस्ट पावभाजी मसाला' हे अत्यावश्यक जिन्नस आणि पुरेसा वेळ हाताशी नसेल तर पावभाजी करूच नये असा तिचा कडक खाक्या होता.
'खडा' स्वरूपात वापरायच्या भाज्यांची कटिंग वेगळी, एकत्र उकडून मिक्सर मधून काढण्याच्या भाज्या वेगळ्या, तीन टप्प्यातील पावभाजी मसाल्याचा वापर, तिखट-मीठ टाकण्याची वेळ असे सगळे तिचे एकदम निगुतीने चालायचे आणि प्रत्येकवेळी मी लक्ष देऊन ते सगळं बघत राहायचो.
तिच्या पद्धतीने मोठ्या कढई/फ्राईंग पॅन मध्ये अमूल बटरच्या पाकिटातील अर्धी वडी वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतल्यावर पावभाजी मसाला भुरभुरण्याचा पहिला टप्पा पार पडण्यापासून ते पूर्ण तयार झालेल्या भाजी सोबत बटरने थबथबलेले भाजलेले पाव, वरून घालायला बटरचा तुकडा/किसलेले चीज, कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, लिंबाची फोड आणि तव्यावर भाजलेला कुरकुरीत उडदाचा पापड समोर आल्यावर चवीने त्यांचा आस्वाद घेतल्यावरच माझे 'पावभाजी व्रत' सुफळ संपूर्ण होते 😋
मावशीची हि रेसिपी आजही जशीच्या तशी फॉलो करतो, फक्त काही वर्षांपूर्वी एका हॉटेल व्यावसायिक मित्राकडून मिळालेल्या 'टीप' नुसार उकडून मिक्सरमधून काढायच्या भाज्यांमध्ये भरल्या वांग्यांसाठी आपण वापरतो त्या आकाराच्या एका लहानशा वांग्याची भर पडल्यापासून तर घरी बनणाऱ्या पावभाजीच्या टेक्स्चर आणि चवीला अक्षरशः चार चांद लागले आहेत.
स्वाद, सुगंध आणि चवीला पहिले प्राधान्य देत असल्याने बिट आणि गाजरातल्या अंगभूत गोडव्यामुळे पावभाजीचा मजा किरकिरा करणाऱ्या ह्या दोन भाज्यांसाठी माझा 'बिग नो', उकडलेला कोबी एकवेळ चालून जाईल पण त्याचा अंगभूत उग्र वास भाजीचा फ्लेवर बिघडवू शकतो म्हणून त्याचेही प्रमाण फरसबी प्रमाणेच कमी असावे असे माझे मत!
पावभाजीची ही सचित्र रेसिपी लिहिण्याचा विचार एकदा डोक्यात आला होता पण मागे 'चिजी बटरी पिझ्झा'च्या धाग्यावर काही मिपामित्रांनी 'माझ्या रेसिपीज त्यांच्या वजनवाढीसाठी कारणीभूत ठरू शकणार' असल्याची प्रेमळ तक्रार केल्याने तो विचार सोडून दिला 😉
अर्थात प्रत्येकाचे 'विधी' थोडेफार वेगळे असल्याने 'फलप्राप्तीत' किरकोळ फरक असू शकेल पण आपल्यासारख्या ह्या व्रताचे पालन करणाऱ्यांचा 'संप्रदाय' बऱ्यापैकी मोठा असावा हे प्रतिसादांतून जाणवले आहे!
खुपच खुसखुशीत प्रतिसाद आहे.
अर्थात प्रत्येकाचे 'विधी' थोडेफार वेगळे असल्याने 'फलप्राप्तीत' किरकोळ फरक असू शकेल पण आपल्यासारख्या ह्या व्रताचे पालन करणाऱ्यांचा 'संप्रदाय' बऱ्यापैकी मोठा असावा हे प्रतिसादांतून जाणवले आहे!
अगदी अगदी!
मीही वांग भाजीत वापरायचे पण आता नाही वापरत ,काही विषेश कारण नाही.
...अर्थात प्रत्येकाचे 'विधी' थोडेफार वेगळे असल्याने 'फलप्राप्तीत' किरकोळ फरक असू शकेल पण आपल्यासारख्या ह्या व्रताचे पालन करणाऱ्यांचा 'संप्रदाय' बऱ्यापैकी मोठा असावा हे प्रतिसादांतून जाणवले आहे!या संप्रदायाचे वारकरी आमच्या घरी सर्वच जण आहेत! पावभाजी अधूनमधून करण्यात येतेच. सुरुवातीपासून मात्र विकतचे बटर न वापरता साजूक तूप वापरतो.
---
आजची स्वाक्षरी:
कांदा-लिंबाशिवाय मिसळपावला चव नाही.
कांदा-लिंबाशिवाय पावभाजीला चव नाही.
अरे वाह! आणि हो... फोटु रापचीक आहे 👍
सत्यवचन 🙏
मस्तच फोटो,पाव खरपुस भाजले आहेत तर!