सहज सुचले ते...
Primary tabs
सहजच जसे सुचले तसे...
सुकतातची जगिया..
मृत्यू आणि जीवन यावर आजवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. काही जण मृत्यूला काडीचीही किंमत देत नाहीत त्यामुळे त्यांच्या मते जन्मालाही फारसे महत्त्व उरत नाही. उदा. काफ्का काय म्हणतो ते पहा -"ते कधितरी थांबते" एवढाच आयुष्याचा अर्थ आहे...
काफ्का मृत्यूबद्दल फारच अलिप्तपणे विचार करतो आहे असे दिसते. काफ्काच्या सगळ्या कथांमधून आणि कादंबऱ्यांमधून आपल्याला हाच दृष्टीकोन पाहण्यास मिळतो. एके ठिकाणी तो म्हणतो, ‘‘मृत्यूला घाबरण्याचे तसे काही कारण नाही, पण माणसे मृत्यूला घाबरतात कारण त्यांच्या अनेक इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या आता पूर्ण करता येणार नाहीत या कल्पनेनेच त्यांची बंभेरी उडते.’’
तुमच्या मृत्यूचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही, पण तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांवर मात्र खूपच परिणाम होत असतो. चांगला, वाईट, कारण त्या मंडळींना आता तुमच्यापासून स्वातंत्र्य मिळते. त्याने काही जण खूश होतात तर काही जण दुःखी होतात. अर्थात हे दुःखी जन काही दिवसांनी परत आनंदाने जगू लागतात. मृत्यूचा अर्थ हा एवढाच आहे. उदा. माझ्या पिसूक या कादंबरीत (मेटॅमॉरफॉसिस) जेव्हा रुपांतर झालेली अळी मरते तेव्हा त्याच्या आई वडिलांना, बहिणीला परत एकदा स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो आणि ते लगेचच एका सफरीवर बाहेर पडतात. तुमच्या मृत्यूचा हा एकच अर्थ आहे- लोकांना आपल्यापासून स्वातंत्र्य देणे.
जन्म मृत्यूचा खेळ हा अनादिकालीन आहे. यावर थोरोने चांगले भाष्य केले आहे-
“माणसाचा मृत्यू ही खरेतर किती सरळ साधी गोष्ट आहे! पण माणसाला ते मान्य नाही. निसर्गाने जे काही गमावले आहे, ते सगळे निसर्गाला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात परत मिळते. पण मृत्यू सुंदर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे एक अपघात म्हणून न पाहता, एक सृष्टीनियम म्हणून पाहतो, तेव्हा. तो जन्माइतकाच सर्वसाधारण असतो. मृत्यूत विशेष असे काही नाही. माणसे इथे मरतात, माणसे तिथे मरतात आणि इतरत्रही मरतात आणि शेवटी या जीवसृष्टीत अमरत्वाचा मक्ता घेऊन कोण मागे उरले आहे? या वर्षी दिसते ते गवत आणि दिसणाऱ्या वनस्पती या काय मागच्या वर्षातील आहेत का? निसर्गातील गवताचे प्रत्येक पाते, फांदीवरील प्रत्येक पान, हे ऋतुबदलात आनंदाने धारातिर्थी पडते आणि तेवढ्याच आनंदाने परत फुटते. ऋतुचक्रातील चार महिन्याची ती करामत असते. मृत वाळलेली झाडे, सुकलेले गवत व वनस्पती या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग नाहीत का? आहेत ! शिशिरातील रंग बदललेली, मनाला भुरळ पाडणारी झाडे शेवटी मृतवत होणाऱ्या पानांच्या रंगामुळेच प्रेक्षणीय आहेत ना?
खरेतर ते दृष्य म्हणजे हिवाळी वाऱ्याने निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारलेल्या वेदनाच असतात की ! तरी पण आपण त्याचा आनंद लुटतो.”
थोरोही मृत्यूला फारशी किंमत देत नाही, पण त्याला तो सुंदर म्हणतो. येथेही तो सुंदर असतो पण मरणाऱ्यासाठी. बाकीच्यांचे सांगता येत नाही. यात मला जरा गफलत दिसते. माणसाची आठवण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो जिवंतच असतो. आजही जेव्हा सावरकरांची आठवण काढली जाते तेव्हा ते जिवंतच आहेत असे म्हटले पाहिजे. असो.
सावरकरांनी सन्यस्त खङग या नाटकात एका स्त्रीपात्राच्या तोंडी हे वाक्य घातले आहे. त्यात थोरो जे काही म्हणतो ते काही ओळीत सांगितले आहे. ही कवितेची ताकद आहे आणि अर्थात कवीचीही. खाली तिचा संवाद दिला आहे.-
‘‘बाई बाई किती तरी सुकली ही फुले! या मर्त्य जगात फुले सुकणारच, पाकळ्या गळणारच, सुवास जाणारच, पण म्हणून काही जगाला दोष देत सुटण्याचे काही कारण नाही, कारण फुले फुलतातही जगातच. पाकळ्या उमलतातही जगातच आणि सुवास दरवळतातही याच जगात.
सुकतातची जगि या ।
जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी ।
उमलति ना त्याहि कलिका । ज्या ॥
परंतु सुंदर कळ्या पाकळ्या ।
फुलती ही जगिंया ।
विसर ना हे वैतागीं । तुझीया ॥
अर्थ : पाकळी पाकळी गळत फुले गळत असतात, त्याबरोबर काही न उमललेल्या कळ्याही गळतात. हे सत्य जरी विदारक असले तरी दुसरीकडे कुठेतरी सुंदर कळ्या आणि पाकळ्या उमलत असतात. दुर्भाग्याला वैतागलेल्या मानवा हे विसरू नकोस.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्यस्त खङग या नाटकातील हे पद सगळ्या जीवनाचे सार चार ओळीत सांगतात. तात्यारावांनी हे पद एका स्त्रिच्या मुखी घालून समस्त स्त्री जातीला सलाम केला आहे असे मला वाटते, कारण स्त्रियांइतका या ओळींचा अर्थ कोणाला कळला असेल असे मला वाटत नाही. स्त्रिया निराश होत नाहीत, उद्या पहाट होणार आहे..आणि चांगले दिवस येणार आहेत हे स्त्रियांपेक्षा चांगले कोण जाणते? उदा..
मॅविस गॅलन्ट म्हणते ‘‘..विदीर्ण झालेल्या आयुष्यवस्त्राबद्दल व्यवहारिक विचार एखादी स्त्रीच चांगल्याप्रकारे करु शकते. ती ते शिवायचा प्रयत्न करते, त्याला ठिगळं लावते व त्याचे काठ सरळ राहतील याची काळजी घेते. त्या वस्त्राचा शेवटचा धागा उरला तर तो ती जमिनीवर पसरते व त्याची लांबी मोजते व विचार करते, " याचा मी काय उपयोग करु शकते ? व त्यासाठी या धाग्याचे आयुष्य किती असावे लागेल ?
हे समजण्यासाठी तुमच्या आईने, पत्नीने, बहिणीने, प्रेयसीने जो संघर्ष केला आहे तो आठवा...
मला या इंग्लिश ओळी आठवतात, ज्या मी परत रचल्या आहेत..
ऐक मी काय सांगतेय ते !
आयुष्य माझ्यासाठी फार काही सोपे नव्हते.
खाचखळग्यांनी व्यापलेले,
काटाकुट्यांनी भरलेले
रस्ते होते फाटलेले
नव्हते गालिचे हिरवळीचे
पण मी पायऱ्या चढत होते
व मुक्कामासाठी चालतच होते,
अंधाऱ्या कोपऱ्यांवर वळत होते
प्रकाश नसेल पोहोचला कधीच
अशा जागेत
मी कधी कधी पोहोचत होते.
म्हणून म्हणते, मागे वळू नकोस
पायऱ्यांवर विश्रांती घेऊ नकोस
मला माहीत आहे हे खूप अवघड आहे
पण आता कोलमडून जाऊ नकोस
कारण ,
मी अजून चालतेच आहे..
हेही आयुष्य माझ्यासाठी सोपे नाहीये...
- जयंत कुलकर्णी.
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे ..
संन्यस्त खड्ग वाचले नाहि अजुन .. युट्युब वर सापडले तर बघणार !
पुलेशु !!
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे ..+१०८ अजून येऊ द्या.
सुंदर
विचार प्रवर्तक