जनातलं, मनातलं

व्हेनेझुएला

Primary tabs

एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला.
मी - काय रे इतक्या सकाळी ?
बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना !

बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो.

मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ?
बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ?
मी - नाही !
बंडू - देश आहे एक.
मी - पण बंडू मागल्या वेळेस तू माझ्यासोबत हाटेलात फुकट जेवायाला आला होतास, तेव्हा जेवणानंतर तू व्हेनेझुएला नावाचे आईस्क्रीम मागवले होतेस. तुला खरे तर व्हॅनिला आईस्क्रीम मागवायचे होते.
बंडू - स्लीप ऑफ टंग होत नाही का कधी ?
मी - हो, होते ना. पण व्हॅनिला चे व्हेनेझुएला ? एवढं ?
बंडू - वाहिनी ! पोहे केले असतील तर आणा, याचे तोंड तरी बंद होईल.

म्हणजे बंडू माझ्याच घरी येऊन, माझ्याच बायकोने बनवलेले पोहे, माझ्या तोंडात कोंबून माझे तोंड बंद करणार होता. त्याला पोहे नकोच होते, असे तो दाखवत होता. रविवारी सकाळी आमच्याकडे काहीतरी असणारच हे गृहीत धरूनच तो आमच्याकडे येतो.

मी - (पोह्याचा बकाणा भरून झाल्यावर) बरं, देश आहे का व्हेनेझुएला ?
बंडू - ह्म्म्म (तोंडात पोहे असल्याने तेव्हडेच बोलू शकला तो )
मी - कुठे आहे रे हा देश ?
बंडू - वाटलंच ! तुला माहीत नसणारच.
मी - तुला माहीत आहे ना ? मग सांग की
बंडू - "तुमच्या सारख्या लोकांना" काय फरक पडतोय कुठे असला तरी !

म्हणजे याला हा देश कुठे आहे हे माहीत नाही. पण बील "आमच्यासारख्या लोकांवर"

मी - बरं ! काय झालं त्या देशाचं ?
बंडू - काय झालं ? काय झालं ? अरे ट्रम्प ने त्या देशाच्या पंतप्रधानाला खुल्ला उचलला ! खुल्ला !
मी - खुल्ला ? खुल्ला कसं काय उचलतात रे ?
बंडू - तुमच्यासारख्या उंदीरमार खात्यात सिनियर क्लार्क असलेल्या लोकांना कशाला हवी आहे माहिती ? उचलला एवढं बास झालं !

बंडू माझा उपमर्द करायची एकही संधी सोडत नाही. महापालिकेत उंदीरमार खात्यात नोकरी आहे हे तो अगदी तुच्छतेने सांगत असे. पण त्याच्याकडे तीही नव्हती. मी एकदोनदा त्याला सफाई खात्यात सुपरवायझर म्हणून चिटकवायचा प्रयत्न केला पण त्याने मानभावीपणे नकार दिला होता. तो म्हणे, लायकीची नव्हती नोकरी. मुळात बंडू अनेक प्रयत्न करून दहावी पास झाला होता आणि काही दिवस माझ्या कॉलेजात पायधूळ झाडली होती. तिथली त्याची आणि माझी ओळख .

बंडू - वाहिनी ! चहा झाला असेल तर आणा हो. याला सर्व समजावून सांगावे लागेल.

मला समजावून सांगण्यासाठी जे श्रम लागतील त्यासाठी याला चहा हवा होता.

मी - ए बंडू, सांग ना रे. कसं उचललं खुल्ला ? (मी पिच्छा सोडला नाही)
बंडू - रात्रीच्या अंधारात गेले भेकड साले. आणि उचलला त्याला. सोबत बायकोला पण उचलली. घेऊन गेले अमेरिकेत.
मी - असं ! पण का रे ?
बंडू - वाटलंच ! जागतिक घडामोडींचा अभ्यास नसणारच. तुमच्यासारखा आयक्यू असणारे माझे मित्र आहेत हे सांगायची लाज वाटते मला.
मी - आय क्यू म्हणजे काय रे ?
बंडू - हातात फोन आहे ना ? मग करा की गुगल ! की ते पण आम्हीच करून द्यायचे?
मी - अरे पण तुला माहीत असेलच ना ? मग कशाला गुगल करू ?
बंडू - वाहिनी ! चहात दूध जरा जास्त टाका.

बंडूची कोंडी झाली तो वहिनीला हाक मारत असे

मी - पण का उचललं ते तर सांग
बंडू - तेलासाठी
मी - अमेरिकेत गोडेतेल नाही ? आणि ट्रम्पला असे कितीसे तेल लागत असेल जेवणासाठी?
बंडू - असेच, असेच फालतू जोक करा आणि मरा. आहार, निद्रा, भय, मैथुन याशिवाय आहेच काय तुमच्या सारख्याच्या आयुष्यात?
मी - आहार, निद्रा, भय, मैथुन - हे काय असतं ?
बंडू - वाहिनी ! पोहे चांगले झालेत !

म्हणजे या प्रश्नाचे उत्तर ही मिळणार नसते

मी - बरं उचललं त्याला. आता पुढे काय ?
बंडू - पुढे काय ? पुढे काय ? अरे हातावर हात धरून बसणार का तुम्ही लोक ?
मी - मग काय करायचं ?
बंडू - निषेध करा
मी - कुठे ?
बंडू - कुठेही करा. सोशल मीडिया वर करा
मी - बरं ! त्यानंतर ?
बंडू - पेटून उठा
मी - म्हणजे नक्की काय करायचं ? स्वतःला पेटवून घेऊ ?
बंडू - असेच फालतू जोक करा. असेही तुमच्यासारखी माणसं कमी झाली तर भार तरी कमी होईल.
मी - टॅक्स भरतो आम्ही. आम्ही मरून कसे चालेल ?
बंडू - मग मेहेरबानी करता काय ?
मी - तू भारतोस ?
बंडू - नोकरी लागली कि भरेन

मी - तू पेटून उठलास ?
बंडू - (रागाने ) पेटून उठलो म्हणून आलो ना इतक्या सकाळी ?
मी - अस्सं !
बंडू - तेल साठे आहेत व्हेनेझुएला मध्ये. त्यावर त्या ट्रम्पूल्याचा डोळा होता बरेच दिवसापासून. म्हणून त्याने हे केले.
मी - बरं ! आता तू काय कारणार ?
बंडू - आपल्याला सावध राहायला हव?
मी - आपल्याला ? का ? आपला काय संबंध ?
बंडू - जागतिक घडामोडींचा अभ्यास नसला कि असले प्रश्न पडतात उंदीर खातातल्या लोकांना.

परत उपमर्द

मी - अरे तुझा अभ्यास आहे ना ! मग तू सांग.
बंडू - उद्या मोंदीना उचललं तर ?

अरे माझ्या कर्मा ! या काळजीपोटी आला होता एवढ्या सकाळी ?

मी - पण मोदींना का उचलतील ?
बंडू - कारण मोदी ट्रम्पूल्याचे ऐकत नाहीत.
मी - काय ऐकत नाहीत ?
बंडू - ट्रम्प कधीपासून सांगतोय कि रशियाकडून तेल घेऊ नका. पण मोदी ऐकत नाहीत.
मी - ते तर मागेच सांगतिले होते ट्रम्प ने. मग तेव्हाच का नाही उचललं मोदींना ? आधी मादुरो ला उचलून बघूया. तो हलका आहे. तो उचलला गेला कि मग वजनदार मोदींना उचलूया. असा तर विचार केला नसेल ?
बंडू - काही असू शकतं ! पृथ्वी बाबा म्हणाले ना म्हणजे काहीही होऊ शकतं. खूप शिकलेत ते ! रात्र वैऱ्याची आहे.
मी - बरं मग आता आपण, म्हणजे तू काय करणार ?
बंडू - मोदींना उचलू शकणार नाही याची खबरदारी घेणार.
मी - म्हणजे नक्की काय करणार ?
बंडू - त्यांचे सुरक्षा कवच वाढवणार.
मी - तू ?
बंडू - देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला माणूस काहीही करू शकतो.
मी - सुरक्षा कवच तू कसे वाढवणार ?
बंडू - त्यासाठी आधी मला तयारी करावी लागणार. एक काम कर पटकन ५ हजार जी पे कर मला.
मी - पाच हजारात सुरक्षा कवच वाढेल ?
बंडू - खरं तर जास्त लागणार आहेत पण मी लायकीप्रमाणे मागतो. काही धनाड्य लोकांकडे जाणार आहे मी.

म्हणजे माझ्या घरचे पोहे आणि चहा ढोसून वर माझी लायकी काढून हा आता अन्य काही लोकांकडे उकिरडे फुंकायला जाणार होता.

मी - पण मागचेच काही हजार तू परत दिले नाहीस.
बंडू - अरे देशसेवेसाठीच वापरले ना ? खरे तर माझे आभार मानायला हवेस कि तुझे पैसे देशासाठी खर्च होत आहेत. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला मदत करायची नाही.
मी - बरं ! आणखी काय ?
बंडू - आज रविवार आहे ! मटण आणणार असशीलच. वाहिनी संध्याकाळी येतो जेवायला. चल मला जमल्यास पुतीन ला पत्र लिहावं लागणार आहे.
मी - अरे पण पुतीन ला तर मराठी येत नाही, इंग्रजी येत नाही, ते तुलाही येत नाही. मग पत्र रशियन भाषेत लिहावं लागणार, त्यासाठी तुला रशियन शिकावं लागणार , रशियन शिकण्यासाठी कोणी तरी रशियन शिक्षिकाच तुला लागणार, त्यासाठी गोव्याला जावे लागणार. गोव्याला जायला तुझ्याकडे पैसे नाहीतच. मग सर्व मिळून किती लागणार ते सांग ना. एकदाच ट्रान्स्फर करतो. कालच पगार झालाय माझा.

बंडू - वाहिनी ! संध्याकाळी जेवायला येतो. मटण जास्त तिखट करू नका मला सकाळी त्रास होतो.

कंजूस

एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.)
तरी मी सांगत होतो यालोकांना की मिपा सोडू नका.
______________________________
[ काही वर्षांपूर्वी कळवा येथे हॉटेल अमितमध्ये झालेल्या मिपाकट्ट्याला आपण भेटलो होतो हे आठवत आहे. ट.का. ( उर्फ टवाळ कार्टाही होता.]

खटपट्या

काका, पुलं चं नाव घेऊन तुम्ही मला लाजवताय,
मला आता आठवलं, आपण भेटलो होतो अमित गार्डन मध्ये.
पूर्वीचे लोक का सोडून गेले मलाही माहीत नाही.
प्रत्येकाची काही कारणे असतील.
पण अचानक शुकशुकाट झाला होता / आहे हे खरे आहे.
असो.

टर्मीनेटर

( पुलंची उगाचच आठवण झाली.)

+१
मला पण ह्या 'बंडु' वरुन असा मी असामी मधले 'दत्तोबा कदम' आणि 'नानु सरंजामे' आठवले 😀

खटपट्यापंत... मजेदार लेख आवडला आहे 👍

सोत्रि

मस्त खुसखुशीत!!

- (बंडूसारखा मित्र असलेला) सोकाजी

विवेकपटाईत

मस्त लेख. बंडूची पृथ्वी काका सोबत तुलना. साऊथ ब्लॉक मध्ये असताना, एकदा त्यांच्या चेंबर मध्ये सोबत कॉफी घेतली होती. अत्यंत शांत स्वभाव , मधुर वाणी आणि मुद्देसूद बोलणारे. बहुतेक वाढते वय आणि बेरोजगारीचा परिणाम.

खटपट्या

नाय वो नाय.
बंडू ची तुलना प्रुथ्वी बाबा बरोबर नाही केली. तसे वाटले असेल तर माफ करा.

विवेकपटाईत

मोदीला स्टंप उचलून नेईल ही संकल्पना पृथ्वी काकांनीच मांडली होती.

सकाळ मध्ये ब्रिटिश नंदी यांचे एक सदर यायचे तसा खुसखुशीत लेख!! आता म्हणे तात्यांचा कोलंबियावरही डोळा आहे. मग ग्रीनलँड वगैरे आहेतच.
येउंद्या अजुन.

Bhakti

हा हा, असा बंडू मलाही माहितेय :)

गणेशा

अप्रतिम सुंदर विनोदी लेखन..

लिहीत रहा.. वाचत आहे...