Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

म
मार्गी
Sat, 03/07/2026 - 07:00
✪ ध्वज मंदिराची रमणीय पायवाट ✪ धुक्याचा समुद्र आणि पर्वतांची रांग ✪ उतरताना नवीन वाटेचा अनुभव ✪ गावातल्या लोकांसोबत संवाद ✪ सत्गड़मधून आकाश दर्शनाची शेवटची रात्र ✪ पहाड़ाचा निरोप घेण्याचा कठिण प्रसंग १० डिसेंबर! सत्गड़! अगदी स्वप्नातलं टुमदार गाव! रात्रीप्रमाणेच पहाटेही आकाश सुंदर आहे! पहाटे सप्तर्षी पूर्ण उगवून किंचित पश्चिमेला झुकलेलेही दिसत आहेत! आज सत्गड़मधला शेवटचा दिवस. आज दुपारी भाचा- आदित्य शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत ध्वज मंदिराचा ट्रेक करणार आहे. पण सकाळीसुद्धा फिरावसं वाटलं. सत्गड़मध्ये कुठेही फिरताना ट्रेकिंग होतंच! रुळलेल्या पायवाटेने गावाचा परिसर बघत खाली उतरायला सुरूवात केली. शांत गाव, हिरवागार परिसर, उतरणारी पायवाट आणि समोर खालच्या बाजूला दूर रस्ता आणि पर्वत! वा! गावातल्या पायवाटेने उतरून पिथौरागढ़च्या बाजूला वळलो. पलेटा गावाच्या दिशेने निघालो. अनेक विद्यार्थी पलेटाच्या शाळेत पायी पायी जाताना दिसले. इथून ते गांव चार किलोमीटर अंतरावर आहे. महामार्ग असला तरी कुठे कुठे डोंगराची माती कोसळल्यामुळे रस्ता अरुंद आहे. एका ठिकाणी रस्त्याला लागून सुंदर शिव मंदिर आहे. सुंदर दृश्यांचा आनंद घेत साधारण अडीच किलोमीटर चालल्यावर परत फिरलो. येताना उत्तरेच्या दिशेला असलेली हिमशिखरं स्पष्ट दिसत आहेत. त्याशिवाय बाजूच्या दरीमध्ये धुक्याचा समुद्र दिसतोय! अहा! मनसोक्त फिरून परत आलो. (हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )  .  .  .  .  .  दुपारी भाचा शाळेतून आल्यावर लगेचच ध्वज मंदिराचा ट्रेक करायला निघालो. जाऊन येऊन तसे अडीच तास लागतात. इथे साडेपाच वाजता अंधार होतो. निघेपर्यंत पावणेतीन वाजले. ध्वज मंदिराच्या ट्रेकचा माझा हा तिसरा ट्रेक! तीनही वेळी सुंदर दृश्य आणि खूप विश्रांत करणारी अनुभूती! जाताना किंचित धाडस केल्याची भावना आहे. कारण हा परिसर वाघाच्या वास्तव्याचा आहे. काही ठिकाणी दाट जंगल आहे. पायवाट सोडली तर बाजूच्या वनात गावातले लोक जास्त जात नाहीत. पायवाट अगदी स्पष्ट आणि सोपी आहे. बर्‍याच ठिकाणी दगडी पायर्‍या आहेत आणि चढ तसा तीव्र आहे. कारण १९०० मीटर उंचीपासून हा ट्रेक २४४० मीटर उंचीवर अवघ्या तीन किलोमीटर अंतरात घेऊन जातो. आदित्यला ही पायवाट अगदी ओळखीची आहे. कुठेही चुकण्याची शक्यता नाही. वाटेत बसायला थोड्या जागाही आहेत. इथल्या गावांमध्ये हे मंदिर खूप पवित्र मानलं जातं. त्यामुळे शक्यतो आठ दिवस कांदा- लसूण सेवन न करणं इथे जाण्यासाठी आवश्यक मानलं जातं. मंदिराचा परिसर तितका पवित्र नक्कीच वाटतो. फोटोसाठी थांबत आणि दृश्यांचा आनंद घेत वेळेत वरच्या मंदिरात पोहचलो. ह्या परिसरातला हा सर्वोच्च शिखर बिंदू. त्यामुळे इथून अगदी दूरवरची पर्वतरांग आणि पंचाचुलीपासून ॐ पर्वतांपर्यंतची सर्व शिखरं दिसतात! त्यांचं रस्त्याचं अंतर साधारण २००- २५० किमी असेल! इतका विराट आसमंत इथून स्पष्ट दिसतो! अंधार पडायच्या आत परत जायचं असल्यामुळे लगेच निघालो. आदित्यला खूप छान वाटत होतं. तोच म्हणाला की, आपण पलेटाच्या बाजूने उतरूया. तो आधी त्या बाजूने एकदाच उतरला होता. अंधार पडण्याच्या आत पोहचणं कठिण आहे. पण त्याचा आत्मविश्वास बघून निघालो! नवीन पायवाट बघण्याचीही उत्सुकता आहे. सुरूवातीला काही ठिकाणी तीव्र उतार आहे. थोडा वेळ पाय घसरतील की काय असं वाटलं. पण लवकरच पायवाट थोडी रुंद झाली. पण दृश्य किती सुंदर! नितळ निळं आकाश आणि पलीकडच्या बाजूने दिसणारा पर्वताचा कडा! पुढे वाट सोपी होत गेली. पण अंधाराची शर्यत सुरू राहिली! पुढे एका टप्यानंतर कच्चा रस्ताही लागला. पण अंधार पडण्याच्या आत पोहचण्यासाठी आदित्यने पायवाट शोधली. त्यामुळे आम्ही रस्त्याने नाही तर रस्त्याला ओलांडणार्‍या शॉर्ट कटने जात राहिलो. आदित्य म्हणतोय की, त्याला हा ट्रेक एवढा कधीच आवडला नव्हता! तो खूप एंजॉय करतोय. हळु हळु पलेटा गाव जवळ येत गेलं. मध्ये मध्ये काही घरं लागायची. पण मुख्य गाव बरंच खाली होतं. अंधार पडायला आला आणि कुठे कुठे कुत्रे भुंकायला लागले! वेगाने जाण्याच्या प्रयत्नात एका ठिकाणी पाण्यावर पाय घसरला. पण लगेच थांबलो. आणि नंतर गाव आलंच! गावातून लगेचच सत्गड़ची बस मिळाली. अन्यथा अंधारात पाच किलोमीटर चालणं कठिण गेलं असतं. अर्थात् बसमधून उतरल्यावरही पाऊण किलोमीटरचा ट्रेक आहेच. पण तोही खूप सुखद वाटतोय! व्वा! वेगळ्या वाटेने ध्वज मंदिराचा ट्रेक झाला. आणि आम्ही अगदी फास्ट म्हणजे सव्वा दोन तासांच्या आत सहा किलोमीटर चाललो होतो. पुढे गावातले लोक भेटले त्यांना तर खरंच वाटलं नाही की, आम्ही‌ दुपारी सत्गड़मधून निघून पलेटाला पोहचलो होतो!  .  .  .  .  .  .  संध्याकाळी शेजार्‍यांसोबत गप्पा झाल्या. इथल्या अमांसोबत छान मैत्री झाली आहे. माझं फिरणं त्यांना खूप आवडतं. खूप लवकर आपलेसं करणारी माणसं! त्यांच्या गप्पांसोबत पहाड़ी गाणीही ऐकली. एक गाणं लक्षात राहिलं. तरुण वयात १८ व्या वर्षी कुमाऊँ रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या व वयाच्या चाळिशीपर्यंत कुटुंबापासून लांब राहिलेल्या सैनिकाचं मनोगत त्यात होतं! सत्गड़मधली शेवटची रात्र! तारे डोळे भरून बघून घेतले. उद्या पहाटे परतीचा प्रवास सुरू होईल! काठगोदामपर्यंत शेअर जीपने जाईन. जीपचा चालक गावातलाच आहे आणि दोन जण गावातूनच बसणार आहेत. त्यामुळे जीप अगदी घरापर्यंत येईल. माझी ट्रेन संध्याकाळची असली तरी सहप्रवाशांना वाटेत अलमोड्यामध्ये काही वेळ काम आहे. त्यामुळे सकाळी लवकर निघू आणि दुपारपर्यंत काठगोदामला पोहचू. पण हिमालयाचा निरोप घेणं कठिण जातंय! काय काय फिरायला मिळालं ह्या वेळी! खूप नशीबवान असल्यासारखं वाटतंय. पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात... वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 6 मार्च 2026.

प्रतिक्रिया द्या
194 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा