भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव !
अनुभव १:
साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला. मी घरी आलो.
मी जरा अधीर आहे. दुसऱ्याच दिवशी HR ला फोन केला आणि फीडबॅक विचारला. HR पाहिल्याने फोनच उचलत नव्हती. सामान्यतः ज्यांची उमेदवारी अजून ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो उमेदवार अजूनही जर रेस मध्ये असेल तर HR त्याचे फोन उचलते. रिजेक्ट झालेल्या उमेदवारांचे फोन HR उचलत नाही असे मला अनुभवाने समजले आहे. शेवटी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला तर तिने उचलला. आणि कोरड्या स्वरात सांगितले की मी रिजेक्ट झालेलो आहे. इंटरव्ह्यू तर चांगला गेला होता. मी खट्टू झालो. त्याच कंपनीत ज्या मित्राने रेफर केले होते त्याला काय झाले म्हणून विचारले.
त्याने मला विचारले ... तू अटायर काय घातले होतेस. मी म्हणालो ... फॉर्मल शर्ट, ट्राउझर आणि ऑफिस शूज. त्याच्या पुढचा प्रश्न : आणि सूट ? मी म्हणालो नाही मी कधीच सूट घालत नाही. तो थोडा चिडला .... म्हणाला ....यापुढे प्रत्येक इंटरव्ह्यू ला सूट घालत जा.... आता तू मिड मॅनेजमेंटचा उमेदवार आहेस.... स्वतःला छान प्रेसेंट केलेस तर चांगल्या किमतीत विकला जाशील .....
अनुभव २:
अगदी काही महिन्यांपूर्वी मी एक इंटरव्ह्यू दिला होता. मिड मॅनेजमेंटचाच रोल होता. टीम्सवर मीटिंग वर interview होता. मी सूट बिट घालून बसलो होतो.
पहिलाच प्रश्न [इंग्रजीतूनच होता ]:
कौस्तुभ , तुला जर कंपनीच्या CEO ला प्रेसेंट करण्यासाठी २ PPT स्लाईड्स बनवायला सांगितल्या, आणि तुला त्या दोन मिनिटात प्रेसेंट करायच्या आहेत, तर तू त्या PPT स्लाईड्स मध्ये काय दाखवशील?
मी असा प्रश्न कधीच फेस केला नव्हता. आणि असा काही प्रश्न येईल असे कधी वाटले ही नव्हते. पण मग काहीतरी जुळवा जुळव करून उत्तर दिले. पण मुलाखत घेणाऱ्याला ते काही पसंत पडले नाही. त्याने पुढील मुलाखत घ्यायची म्हणून घेतली.
पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही.
अनुभव ३:
एका ** ४ मध्ये डायरेक्टर पोसिशन ला अर्ज केला होता. पहिले २ राउंड मस्त गेले, HR एकदम गोड गोड बोलत होती. [हलाल ची आठवण येत होती]. आता फक्त सॅलरी डिस्कशनचा राउंड होता. पण तिथे HR न येता कोणीतरी VP आला. म्हणाला, तुझे दोन्ही राउंड चा फीडबॅक एक्सलंट आहे. वि आर गुड टू प्रोसिड. मी खुश झालो.
त्याचे पुढील वाक्य गुगली होती. तो म्हणाला , as अ डायरेक्टर तुला ****** चा बिसनेस दर चार महिन्यांनी आणावाच लागेल. आणि हे काम तुझ्या इतर ग्राहकांचे काम सांभाळून करावे लागेल. मी असे सेल्सचे काम कधीच केले नव्हते. आणि मला ते जमत ही नाही.
एखादा असता तर नवीन चॅलेंज म्हणून सरळ हो म्हणून जॉब घेतला असता. मी मात्र स्वतःची मर्यादा ओळखून स्पष्ट पण नम्र नकार दिला. कदाचित मी फारच कंझर्वेटिव्ह वागलो असेल., उत्तम संधी गमावली असेल ....
पण मला रात्रीचा दिवस करून आणि माझी हेल्थ विकून पगार विकत घ्यायचा नव्हता आणि नाही. ज्यांना चॅलेंज घ्यायची आहेत त्यांनी खुशाल घ्यावी ....
अनुभव ४:
एकदा कुवेतला एक ओपनिंग होती त्यासाठी मुंबईला एका कंसल्टंसीत गेलेलो. ती कन्सल्टन्सी शोधेपर्यंत त्यात जाईपर्यंत १० मिनिटे लेट झाला. कुवेतच्या मुलाखत घेणाऱ्याने एक टोन्ट मारला. म्हणाला "तुम्ही फार लांबून आलेले दिसता" ... मी म्हणालो ... हो ... पुण्यातून ... २०० किमी आहे.
तो म्हणाला ओह्ह आय गॉट नाऊ .... इतक्या लांबून आलात म्हणून तुम्हाला उशीर झाला .... मी कुवेत वरून वेळेत आलो .... कदाचित कुवेत पुण्यापेक्षा जवळ असेल मुंबईच्या ....
मी खाली मान घातली ... पुढे तो माझ्या cv कडे पाहून म्हणाला .... तुम्ही या जॉब साठी खुपच लहान आहात हो ... आम्हाला निदान १८ वर्षे तरी पूर्ण असलेला उमेदवार हवाय....
माझे वय तेव्हा ३३ होते.... मला काही कळेना .... तितक्यात त्याने माझ्या पुढे माझा cv टाकला आणि बर्थ डेट दाखवली ..... ती बर्थडेट ची तारीख त्याच दिवसाची होती ....
अनुभव ५:
मी काही महिन्यापूर्वी मॅन्युफॅक्चरिंग सोडून IT मध्ये डेस्कटॉप अभियंता म्हणून जॉईन केले होते [हा अनुभव तर खूप विचित्र होता .... कधी लिहीन असे वाटत नाही]. आमचे कॉन्ट्रॅक्ट संपणार होते म्हणून परत जॉब शोधात होतो. एका ओळखीतून एका कंपनीत मुलाखतीला गेलो. मला आधीच समजले होते की माझा आहे तो पगारच त्या कंपनीच्या [मी जिथे मुलाखत देणार होतो त्या ] बजेटपेक्षा थोडा जास्त आहे. पण ओळखीतून गेलो होतो म्हणून बहुदा माझा इंटरव्ह्यू ठेवला असावा. इंटरव्ह्यू सुरु झाल्यावर मुलाखत घेणाऱ्याने मला खूप अवघड प्रश्न विचारले. मी अजूनही या क्षेत्रात नवीन होतो. मला काही सांगता येईना. प्रत्येक प्रश्नानंतर मुलाखत घेणारा मला डिस्करेज करत होता. एकदाची मुलाखत संपली.
तो म्हणाला, कौस्तुभ तुला तर काहीच येत नाही रे. .. आमच्या काल जॉईन झालेल्या फ्रेशरला जास्त माहिती आहे तुझ्या पेक्षा ... पण ज्यांच्या ओळखीतून तू आला आहेस त्यांच्यासाठी मी तुला कन्सिडर करेन. पण पगार तुला आता आहे त्याच्या अर्धाच मिळेल. तुला इथे सगळे शिकता येईल ... ३ वर्षांनी तू एक्सपर्ट होऊन बाहेर पडशील ...
माझे नुकतेच लग्न झाले होते. मुळात जो पगार होता तो ५ आकडी पण नव्हता ... त्याच्या अर्ध्यात मी कसे घर चालवणार होतो ?
मी नाही म्हणून घरी आलो .... गाडी चालवताना रडत होतो......
काही वर्षांनी हिंजवडीतील तत्कालीन एका नामांकित कंपनीत तो मुलाखतकार मला पुन्हा भेटला .... त्यावेळी मी त्या नामांकित कंपनीच्या पेरोलवर होतो .... आणि तो मुलाखत घेणारा माझा व्हेंडर ...त्याने मला पाहून ऍप्रिशिएट केले. ...
चक्र पूर्ण फिरते असे म्हणतात .... आता रडायची पाळी त्याची होती ....
पण मी खुनशी नाही .... अगदीच कोणी माझे वाईट केले असेल तरच मी आयुष्यभर त्याच्याशी सूड भावनेने वागतो ....
अशी माणसे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत .... आणि तो मुलाखतकार आज माझा फेसबुक फ्रेंड आहे .... बघूया, हा लेख वाचून मला फोन करतो का ?
तात्पर्य :
१. पहिल्या दोन अनुभवातून शिकलेली दुनियादारी : मुलाखत सुरु होताना पहिल्या २ ते ३ मिनिटात तुमचे जे इम्रेशन मुलाखत घेणाऱ्यांवर पडते तिथेच तुमच्या इंटरव्ह्यूचा निकाल बहुतांश वेळा ठरलेला असतो.
२. मॅनेजमेंट रोल्स साठी जाताना ..... बिग ४ साठी कोणत्याही रोल साठी जाताना नेहमी सूट घालावा.
३. मुलाखतीस नेहमी वेळेच्या आधी पोहोचावे ....
४. हल्ली तुमचे म्हणणे अगदी थोडक्यात पण प्रभावी पणे मांडणे हे अत्यंत महत्वाचे स्किल आहे.
५. तुमच्या CV मध्ये जी माहिती तुम्ही दिलीय ती नीट तपासून पहा. तुमच्या मित्राला किंवा जोडीदाराकडून एकदा पाहून घ्या ....
६. तुमच्या CV ची कधीही गुंडाळी करू नका .... तुम्हालाच तुमचा रिस्पेक्ट नसेल तर तुम्ही ज्या कंपनीत जॉईन करता तिचा रिस्पेक्ट तुम्ही कसे ठेवणार ?
७. समजा तुम्ही रिजेक्ट झालात तर त्याची करणारे शोधा .... रिजेक्ट झाल्याचे दुःख समजू शकतो ... पण त्यासाठी १३ दिवसाचे सुतक पाळायची काही गरज नाही ..... मनात म्हणा
"एक गाव उणं तर दस घर पुणं "
अजून खूप काही लिहिता येईल .... पण सध्या लेखनसीमा !!!
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२
💬 प्रतिसाद
(13)
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/07/2026 - 07:25
नवीन
छान माहिती, भविष्यात कामी येईल!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Sat, 03/07/2026 - 08:00
नवीन
ईंटरव्ह्युला चांगली तयारी करुन , चांगले फॉर्मल कपडे घालुन, वेळे आधीच पोचावे हे खरे , पण नाहीच सिलेक्शन झाले तर "है फिदा तो, आ xx नही तो तेरी xxx" म्हणुन पुढे जावे.
माझ्या बाबतीत एका नामांकीत आय टी कंपनीत आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पोझिशन साठी मुलाखती झाल्या पण प्रत्येक वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि ते मला तिथेच कळले होते. शेवटी मी कानाला खडा लावला की वडापावची गाडी टाकेन पण या कंपनीत नोकरी करणार किवा मागणार नाही.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 03/08/2026 - 13:12
नवीन
मला एका इन्टर्व्ह्यू मधे फारच विचित्र अनुभव आला होता.
मुलाखत घेणारा हा पक्का पुणेरी इसम होता. थेट मुलाखात होती.
माझे आडनाव वाचून मी नोकरी कशाला करतो त्यापेक्षा बिझनेस का नाही करत असे थेट विचारले.
या आडनावाच्या माणसाला नोकरी कशाला हवी असे बोलून अत्यंत कुजकट हसला.
आणि मी तुम्हाला रीजेक्ट करतो आहे.असे सांगितले.
त्या वेळेस कामाची खूपच गरज होती. म्हणून माज दाखवू शकलो नाही.
पण इतके वर्षानंतर आजही मी त्या इसमाची तक्रार त्या एच आर कडे करायला हवी होती असे वाटते.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 03/09/2026 - 08:05
नवीन
कोणतीही नोकरीविषयक मुलाखत ही बायस्ड असते. आयटीत तर उमेदवाराला रिजेक्टच कसे करता येईल असे मुलाखत घेणारा वागत असतो. त्यातही तो दिसतो कसा, बाह्यरूप कसे आहे, कपडे कसे आहेत या कमी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. (ते महत्वाचे असते पण अगदी गरजेचे नसते.) त्यातही भारतात आडनाव, नाव, जात, लिंग, धर्म, वर्ण इत्यादींना अवास्तव महत्व दिले जाते.
जे काम आहे ते जर येत असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर ठिक असते. पण अगदी बेसीक प्रश्न अनुभवी उमेदवाराला विचारले जातात. अभ्यासबाह्य, कामाच्या व्यतिरीक्त प्रश्न विचारतात.
ट्रांन्सपरंट मुलाखत हवी असेल तर मुलाखत घेणारा, देणारा दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवा. उमेदवाराला टोकन नंबर द्या अन त्यानेच ओळखा. चेहेरा न दिसता, पाहता काही राऊंड घ्या अन मगच पुढे जा असे हवे.
आयटीतल्या मुलाखतीत भयंकर अडवणूक होते.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 03/09/2026 - 15:57
नवीन
बरोबर बोललात.
मी गेली कित्येक वर्षे आय.टी क्षेत्रात काम करत आहे व इंटरव्यु टेबलच्या दोन्ही बाजुचा बराच अनुभव आहे.
करिअरच्या सुरवातीला एका अगदीच साधारण कंपनीत निवड झाली होती व त्यावेळी तशी परिस्थिती असल्याने ती कंपनी जॉईन केली होती तिथे मिळालेला अनुभव अजुनही कामास येतो त्याविरूद्ध त्यानंतर त्याच कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर एका नामांकित कंपनीत इंटरव्यु देऊन निवड झाली होती तिथे काम तसे बरे होते पण राजकारण भरपूर असा प्रकार होता.तिथे जेमतेम १ वर्ष टिकलो. बरेच जण अश्या कंपनीत केवळ एच-१ विसासाठी काम करत होते. पुढे जेव्हा इंटरव्यु पॅनेल मध्ये उमेदवार निवडीसाठी बसु लागलो तिथे तर मुलाखतीत उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत अगदीच साधारण होते.नंतर नंतर केवळ कमीत कमी निकष पूर्ण करणार्या एक दोघांना टेक्निकल मध्ये जास्त खोलात न जाता निवडले तर ते तुलनेने चांगले काम करत होते असे आढळले.उत्कृष्ठ रिज्युमे असणारे उमेदवार कंपनीत जास्त दिवस टिकत नाहीत. बरेच जण त्यांच्या कंपनीत नोटीस पिरियड वर असतात व केवळ पॅकेज वाढवुन मिळावे म्हणुन त्याअवधीत वेगवेगळ्या कंपन्यात मुलाखती देतात. असे उमेदवार लगेल कळून येतात त्यांना बर्याच वेळेला वाटेला लावावे लागते. मुलाखत हा बर्याच वेळेला फार्सच असतो. मी ही एखादा उमेदवार जर कमीत कमी निकष पूर्ण करणारा असेल तर बाकीचे फॅक्टर्स पाहतो. (सौदेंडियन जसे स्वतःच्या लोकांना प्राथमिकता देतात तसाच प्रकार.)
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
Wed, 03/11/2026 - 08:47
नवीन
अभ्यासबाह्य किंवा कामाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणे आणि त्यावरून निकाल देणे हे चूकच आहे परंतु अनुभवी उमेदवाराला बेसिक प्रश्न विचारायला हरकत नसावी. भले तो माणूस त्या विशिष्ट डोमेन मध्ये १० वर्ष कार्यरत असेल पण ग्राउंड लेवल ला काय होतं हे माहिती असलंच पाहिजे. हां, अनुभवी व्यक्तीला फक्त बेसिक प्रश्न विचारून लगेच ऑफर दिली तर मात्र बरोबर नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 03/11/2026 - 16:54
नवीन
मला मात्र उलटा अनुभव आला होता.
फार वर्षापुर्वी मुलाखत दीली होती. एक तर मी मुलाखतीला तयार नव्हतो कारण त्यांना ज्या कामासाठी माणूस हवा होता ते काम मी गेले वर्षभर केले नव्हते. पण त्यावेळी दुर्मीळ असलेले सर्टिफिकेशन मी केले होते. त्यामुळेच मी त्यांनी दोन दोन वेळा कॉल करुन मी तीसर्या वेळी तयार झालो.
मुलाखतीच्या सुरवातीलाच सांगुन टाकले की मी सर्टिफिकेशन केले आहे पण गेले एक वर्ष त्यावर अजिबात काम करायची संधी मिळालेली नाही. आणि तुम्ही एकदम डीप डाइव्ह करुन टेक्नीकल प्रश्न विचाराल ती मी उत्तरे देउ शकणार नाही.
त्यांना कसेही करुन माणूस हवाच होता आणि त्यांना सर्टिफिकेशन वालाच हवा होता त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे आपण बघुया, येत नसेल तर तुम्हाला आठवत नाही असे समजू कारण तुम्हाला थेयरी येतेय हे सर्टिफिकेशन वरुन दिसतय. त्यांना बहुतेक माझे सर्टिफिकेट क्लायंट ला दाखवायचे होते.
मुलाखतीच्या सुरवातीला त्यानी बेसीक प्रश्न विचारुन माझा पाया पक्का आहे याची खात्री करुन घेतली. नंतर हळू हळू डीप डाइव्ह करायला लागले. डीप डाइव्ह मधे मी उत्तर द्यायला वेळ लावतोय असे पाहिल्यावर ते चक्क मला हिंट देउन लागले. मुलाखत टेलीफोन वर चालु होती. त्यांनी हींट देउन देउन माझ्याकडून उत्तरे काढून घेतली.
मला कळत नव्हते काय चालु आहे, प्रश्न विचारला जायचा आणि मी गप्प बसल्यावर दोन तीन हींट दिल्या जायच्या. मग मी अपेक्षित उत्तर देत होतो.
शेवटी त्या तिन मुलाखत घेणार्यानी मला दोन दिवसात सिलेक्ट केलानी. माझे सर्टिफिकेट मागवुन घेतलानी. क्लायंट ला पाठवलानी.
मी रुजु झालो आणि एक वर्ष काम केले. खुप काही शिकलो. नंतर विचारले की अशी कशी मुलाखत घेतली तुम्ही. मला तर काही येत नसताना तुम्ही मला सिलेक्ट पन केलात.
ते म्हणाले की आम्ही तुझा बाकीचा रेजुमे पाहीला त्यात बरेच काही होते, तुझ्या पहील्या कंपनितल्या एच आर सोबत बोललो. चांग्ला फिडबैक मिळाला. आणि तू येत नसताना सरळ येत नाही म्हणून सांगत होतास ते खूप प्रामाणिक वाटले.
खरे तर मला त्या कंपनीत जायची इच्छा नव्हती. पण भक्कम पगार वाढ मिळाली म्हणून गेलो.
थोड्क्यात - उगाच द्यायची म्हणून मुलाखत द्यायची अशा ज्या ज्या मुलाखती मी बेफिकीरीने दिल्या त्यात उत्तीर्ण झालो. आणि जिथे खुप इच्छा होती आणि तयारी करुन बसलो तिथे अनुतीर्ण झालो.
काही कंपन्या टेक्नीकल बघतात, काही जण अटिट्युड बघतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/09/2026 - 15:14
नवीन
प्रामाणिकपणे लिहिलेले अनुभव आवडले.
होतकरू उमेदवारांना नक्की बरच फायदा होईल.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 03/10/2026 - 08:06
नवीन
. हे असे सरसकट नसते. मी मुलाखत घेण्याचेही काम केले आहे मुलाखत घेताना जॉब डिस्क्रिप्शन जे डी मधे जे लिहीलेले आहे त्या नुसार प्रश्नांचा रोख असावा लागतो. दुसरे म्हणजे कंपनीला कामासाठी उमेदवार हवा असतो. त्यामुले सरसकट रीजेक्ट केले जात नाही. कमीअधीक स्किल्स असतील तरी त्याचा विचार केला जातो.
कंपन्याना शक्यतो लवकर जॉईन करेल असा उमेदवार हवा असतो.
दुसरे म्हणजे बरेचदा हैदराबाद येथील उमेदवारांचा आनुभव अग्दी विचित्र आला आहे. यात सी व्ही मधे अनुभव वाढवून लिहीणे, खोटा ( न केलेला ) अनुभव लिहीणे. फोनकॉलवर मुलाखत असेल तर दुसर्याच कोणीतरी उत्तरे देणे. ( हे अगदी व्होडीओ कॉल मधेही केले जाते) . बरेचदा समाधान मुलाखती नंतरह उमेदवाराने जॉईन केल्या नंतर उमेदवाराला आवश्यक स्कील्स चे अत्यल्प ज्ञान आहे किंवा नाहीच असे आढळून आलेले आहे.
बर्याच भारतीय कंपन्या बॅग्राऊंड चेक / व्हेरीफिकेशन चा आग्रह धरतात ते या साठीच.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 03/10/2026 - 11:57
नवीन
हैद्राबाद मधुन बरेच फेक उमेदवार येत असल्याने आमच्याकडे तेथील उमेदवारांना फक्त ऑफिसमध्ये मुलाखतीला बोलावतात, व्हिडिओवर नाही. बाकी मी आतापर्यंत आय टी मध्ये शेकडो मुलाखती घेतल्या आहेत (प्रत्यक्ष आणि व्हिडिओ). पण उमेदवार रिजेक्ट करणे हा क्रायटेरिआ कधीच नसतो. रेझ्युम मधे जी टेक्नॉलॉजी लिहिलेय आणि जित्क्या वर्षाचा अनुभव दाखवलाय तेव्हढे येत आहे की नाही, संभाषण कौशल्य आहे की नाही हेच मी तरी बघतो. जात पात धर्म लिंग यांचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा पहिल्या काही मिनिटातच मुलाखतीचा रोख समजतो आणि उमेदवाराचा अंदाज येतो. पण कधी कधी मध्यातच मुलाखतीचा रोख पालटतो आणि ती ईंटरेस्टिंग किवा बोरिंग ही बनु शकते.
कधी कंपनीला जास्त गरज असते, कधी उमेदवार लवकर रुजु होउ शकतो अशा कारणामुळे तडजोडही करावी लागते. मागे एकदा माझ्या प्रोजेक्ट मध्ये गरज होती म्हणुन मी लिंक्ड ईन वर पोस्ट केले तर ५०-६० रेझ्युम आले. ते रेक्रुटमेंट टीमला दिले. त्यातले बरेच त्यांच्या नियमात न बसल्याने रिजेक्ट झाले, उरलेल्यांमधील बरेच जण मुलाखतीत रिजेक्ट झाले. ४-५ ऑफर गेल्या आणि शेवटी त्यातील एकच जण जॉइन झाला.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 03/10/2026 - 13:18
नवीन
सध्या बर्याच आय टी कंपन्यात ९० दिवस नोटीस पिरीयड असतो. त्यामुळे उमेदवार बरेचदा एक इन्टरव्ह्यू घेऊन राजिनामा देतात. आणि आणखी एखादी नवी ऑफर येतेय का याची चाचपणी करतात.
जास्त पगार मिळेल तेथे जॉईन करतात.
वाईट म्हणजे ज्या कम्पनीने पहिली ऑफर दिली त्या कंपनीला तसे कळवायचे कष्टही घेत नाहीत.
अर्थात एच आर जसे तुम्हाला रिजेक्ट केल्याचे कळवत नाहीत तसेच काहीसे हे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 03/10/2026 - 13:32
नवीन
एच.आर गमतीशीर प्रकरण आहे. बेंगलोरमधल्या एका नामांकित कंपनी १ वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा तिथल्या एका महिला एच.आर ने कोपच्यात घेऊन माझे बौध्दिक घेतले व असे एका वर्षानंतर कंपनी सोडणे मॉरली इथिकली राँग आहे वगैरे डोस पाजले.माझाही निर्णय डळमळीत होऊ लागला होता पण तिथे असलेले राजकारण इतके तीव्र होते कि तिथे जॉब कंटीन्यु करणे अशक्य होते. पुढे मी नोटीस पिरियड मध्ये असतानाच कळले कि ज्या एच.आर ने माझी भलामण केली होती तिने कंपनी सोडली होती म्हणजे ती बया जेव्हा मला मोरॅलिटीचे डोस पाजत होती तेव्हा ती स्वतःच नोटीस पिरियड मध्ये होती.
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 03/12/2026 - 02:41
नवीन
मी चेन्नई ला काम करत असतानाची गोष्टं . 2 वर्षे काढल्यावर पुण्यात यायची खटपट चालू केली आणि एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखत झाली, त्यांनी सिलेक्ट पण केलं पण नोटीस पिरियड च्या मुद्द्यांमध्ये माशी शिंकली. ती कंपनी 3 महिने थांबायला तयार नव्हती आणि चेन्नईची कंपनी लवकर सोडायला तयार नव्हती(बाय आऊट फक्त नावाला आहे असं सांगितलं). नाईलाजाने मी पुण्यातील कंपनीला परिस्थिती सांगितली तर तिकडचा एचआर मला म्हणे की तू ऍब्सकॉन्ड करून ये. त्याला म्हटलं ए बाबा, मला असलं काही जमणार नाही आणि मुळात मी 2 वर्ष झाली इकडे काम करतोय तर उगाच गालबोट नाही लावायचं माझ्या अनुभवाला. तर मला शिकवत बसला की, आमची कंपनी इतकी छान आहे की तू थेट निवृत्त होऊनच बाहेर जाशील, बाकी कुठे नोकरी करायचीच गरज नाही. तरी पण मी अडून बसलो म्हटल्यावर मला म्हणे उद्यापर्यंत विचार कर आणि मला सांग. दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की मला जमणार नाही तर ओके वगैरे काहीही ना म्हणता थेट फोन बंद करून टाकला. मजा म्हणजे मला त्या कंपनीकडून इतक्या वेळेला मुलाखतीसाठी बोलावलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होऊन निवड नाही झालेली :)
- Log in or register to post comments