Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

B
Bhakti
Tue, 03/10/2026 - 14:26
💬 2 प्रतिसाद
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे यांचे "सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार "हे ते पुस्तक होते .पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्लेरा ब्रूस हायस्कुल फॉर गर्ल्स चे चित्र होते.आता शाळेच्या समोरच्या रस्त्याहून तर मी रोजच येते.शहरात मुख्य ठिकाणी खूप भव्य मैदान या शाळेचे आहे .पुढे गेले की अहमदनगर कॉलेज ,पलीकडे बूथ हॉस्पिटल ,तिकडून पुन्हा बाजारात जाण्याच्या रस्त्यावर ह्यूम चर्च आहे.पुढे माळीवाड्याचा राहण्याचा उल्लेख लक्ष्मीबाई टिळक (रेव्ह. नारायण वामन टिळक यांच्या पत्नी)यांनी आपल्या स्मृतिचित्रे पुस्तकात केला आहे. तर सिंथिया फरार यांचे सावित्रीबाईच्या शिक्षिका म्हणून तर कार्य खूप महान आहे.पण तत्कालीन नगरच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट केले हे पुस्तक वाचतांना लक्षात आले.तरीही सिंथिया फरार हे फारच अपरिचित नाव राहिले आहे . भारतातील मुलींच्या शिक्षणाचा इतिहास हा १९व्या शतकात खूप महत्वाचा टप्पा आहे. त्यात मिशनरी शाळा, सिंथिया फरार यांचे काम, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका होण्याची प्रक्रिया आणि नंतर स्वदेशी म्हणजेच भारतीयांनी सुरू केलेल्या शाळा सुरू होणे हे सर्व क्रमाने घडले. फुलेंपूर्वी मुलींसाठी शाळा कशा होत्या? आधी मुख्यतः मिशनरी शाळा असायच्या. १८४८ पूर्वी भारतात मुलींसाठी शिक्षण खूपच कमी होते. बहुतेक मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. बालविवाह, जातीव्यवस्था, समाजाचा विरोध आणि स्त्रियांना घराबाहेर जाण्याची बंदी यामुळे मुली अशिक्षित राहत होत्या. पण ब्रिटिश काळात ख्रिश्चन मिशनरी (धर्मप्रचारक) लोकांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. हे मिशनरी मुख्यतः अमेरिकन, ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांतून आले होते. १८२०-१८३० च्या काळात मुंबई , कलकत्ता, मद्रास इत्यादी शहरांत मिशनरी शाळा सुरू झाल्या. उदाहरणार्थ मुलींसाठीची पहिली शाळा ज्याचा आपल्याला उल्लेख आढळतो ती मार्च १८२४ मध्ये मुंबईतील अमेरिकन मिशनने सुरू केली होती. ती गंगाबाई नावाच्या एका स्थानिक महिलेने शिकवली होती. असे मानले जाते की, भारतात अशा प्रकारची ही पहिली शाळा होती. १८४० पर्यंत मुंबई, अहमदनगर, पुणे परिसरात १०-२० मिशनरी शाळा होत्या. काही शाळांमध्ये १००-४०० मुली शिकत होत्या. मुख्य उद्देश मुलींना शिक्षित करून ख्रिश्चन धर्माकडे वळवणे होता, पण त्यामुळे शिक्षणाची सुरुवात झाली. या शाळा परदेशी प्रभावाखालील होत्या. भारतीय समाजातील लोक स्वतंत्रपणे अशा शाळा सुरू करत नव्हते, कारण समाजाचा प्रचंड विरोध होता. सिंथिया फरार (Cynthia Farrar, १७९५-१८६२) ह्या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी होती. त्या १८२७ मध्ये भारतात आल्या आणि अविवाहित अमेरिकन महिलांपैकी पहिल्या मिशनरींपैकी एक होत्या. १८२७-१८३७ पर्यंत त्यांनी मुंबईत मुलींच्या शाळा वाढवल्या. १८२९ पर्यंत ४००+ मुली शिकत होत्या. तिने शाळा चांगल्या पद्धतीने चालवल्या .परीक्षा घेतल्या, हस्तकला शिकवली.१८३९ मध्ये त्या अहमदनगरला गेली आणि तिथे ४-५ शाळा चालवल्या. १८४५-४६ मध्ये १००+ मुली शिकत होत्या. त्यांच्या शाळा चांगल्या संघटित होत्या. तिने भारतीय मुलींना शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला. तेव्हा जोतीराव फुले यांनी १८४५-४६ मध्ये शाळांचे निरीक्षण करण्यासाठी अहमदनगरला त्यांनी चालविलेल्या शाळा पाहिल्या आणि प्रभावित झाले. १८५३ मध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणतात, "एका मैत्रिणीसोबत मी अहमदनगरमधील मुलींच्या शाळांना भेट दिली, ज्या अमेरिकन मिशनरी विभागाच्या फरार मॅडम यांनी व्यवस्थापित केल्या होत्या. त्या शाळा पाहून मला खूप आनंद झाला कारण त्या खूप चांगल्या प्रकारे चालवल्या जात होत्या. पुण्यात परतल्यानंतर, मी लगेच मुलींसाठी एक शाळा सुरू केली जिथे वाचन, लेखन, गणित आणि व्याकरण हे विषय शिकवले जात होते." जना त्चुरेनेव्ह आणि सुमीत म्हसकर यांनी एमजी माली यांचा हवाला देत त्यांच्या "वेक अप फॉर एज्युकेशन" या पेपरमध्ये म्हटले आहे की वसाहतवाद, सामाजिक परिवर्तन आणि भारतातील जातिविरोधी चळवळीची सुरुवात, सावित्रीबाई फुले यांनी स्वतःची अध्यापन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी काही महिने फरार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. सिंथिया फरार सावित्रीबाईंच्या शिक्षिका कशा झाल्या? सावित्रीबाई फुले जन्मतः निरक्षर होत्या. लग्नानंतर जोतिराव फुले यांनी घरीच तिला वाचायला-लिहायला शिकवले. पण व्यावसायिक शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक होते.सावित्रीबाईंनी दोन शिक्षक प्रशिक्षण कोर्स केले. पहिला अहमदनगर मध्ये सिंथिया फरार यांच्या संस्थेत काही महिने केला. फरार यांनी त्यांना शिक्षण आणि शिक्षक कसे होतात हे शिकवले.आणि दुसरा पुण्यातील नॉर्मल स्कूल मध्ये. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात. नंतर स्वदेशी मुलींच्या शाळा कशा सुरू करण्यासाठी भारतात चळवळ उभी राहू लागली.मिशनरी शाळांनी पाया घातला, पण भारतीयांनी स्वतःच्या समाजासाठी शाळा सुरू केल्या तेव्हा क्रांती झाली.यात फुले दांम्पत्य यांचा मोलाचा वाटा आहे. जोतिराव आणि सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील पहिली स्वदेशी मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला ६-९ मुली होत्या यात सर्व जातीतील दलित, मागासवर्गीय यांचा सहभाग विशेष होता .शाळा भारतीयांनी चालवलेली होती. जातीव्यवस्था आणि स्त्रीदास्याविरुद्ध होती. या शाळेला विरोध खूप होता लोक शेण-दगड फेकत, बहिष्कार टाकत, पण सावित्रीबाई रोज शिक्षणाचा वसा राबवत राहिल्या. १८४८-१८५२ पर्यंत फुले दांपत्याने एकूण १८ शाळा पुणे आणि आसपास सुरू केल्या. १८५२ मध्ये २७३ मुली शिकत होत्या.मिशनरी शाळा धर्मप्रचारासाठी होत्या, पण फुलेंच्या शाळा सामाजिक क्रांतीसाठी दलित-महिला शिक्षण, सर्व जाती एकत्र शिकणे.१८४७ मध्ये बंगालमध्ये प्यारी चरण सरकार यांनी, मुंबईत नाना शंकर शेठ यांनी शाळा सुरू केल्या, पण फुलेंच्या शाळेला सर्वसमावेशक आणि क्रांतिकारी म्हणून ओळख मिळाली. १८६२ मध्ये सिंथिया फरार यां मृत्यूपर्यंत फरार अहमदनगरमध्ये राहत आणि काम करत. सिंथिया फरार यांच्या अमेरिकन मिशनरी संस्थेत मुख्य प्रेरणा आणि व्यावहारिक प्रशिक्षण.प्रशिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी मुलींच्या शिक्षणाची क्रांती सुरू केली. सिंथिया फरार यांचे काम फुलेंच्या शाळांसाठी पाया ठरले. आजही सावित्रीबाईंना "भारतातील पहिल्या महिला शिक्षिका" म्हणून ओळखले जाते! -भक्ती संदर्भ: विकिपीडिया, पुस्तके- MG Mali संशोधन पेपर-Jana Tschurenev आणि Sumeet Mhaskar यांचे आणि मिशनरी रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. काही नवीन संशोधनात २०१० पूर्वीचा पुरावा कमी यावर वाद आहे, पण बहुतेक इतिहासकार हे मान्य करतात की फरार यांचा प्रभाव होता https://thesatyashodhak.com/cynthia-farrar-missionary-woman-who-inspired-jotirao-phule/ https://seedbed.com/5-women-who-changed-the-face-of-missions/ https://www.punekarnews.in/cynthia-farrar-social-reformer-and-teacher-of-savitribai-phule/ https://www.esakal.com/education-jobs/american-marathi-mission-misses-cynthia-farrar-girls-education-at-early-age-ddn96

प्रतिक्रिया द्या
194 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
श्रीरंग_जोशी Wed, 03/11/2026 - 20:30 नवीन
सिंथिया फरार यांच्याबाबत या लेखामुळे प्रथमच कळले. तपशीलवार लेख आवडला. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 03/12/2026 - 04:06 नवीन
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा