Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

म
मार्गी
Tue, 03/10/2026 - 16:54
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर! पण कडक थंडीमुळे खिडक्या बंद केल्या आहेत. थोड्या वेळात सोबतच्या प्रवाशांशी ओळख झाली. इथे गावात सगळे एकमेकांना ओळखतात. पिथौरागढ़ येईपर्यंत उजाडायला सुरूवात झाली. आणखी एका जणाच्या घरी जाऊन जीप पुढे निघाली. सकाळची वेळ असल्यामुळे मुख्य शहरात वाहतुक कमी आहे. (हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )  .  .  .  पिथौरागढ़- टनकपूर रस्त्यावरचा पहिला थांबा म्हणजे गुरना माता मंदिर! इथे नमस्कार करूनच गाड्या पुढे जातात. पुढे मोठा घाट उतार लागला. दरीमध्ये धुक्याचा समुद्र! विलक्षण नजारे! सगळीकडे पर्वत रांगा आणि मधून वाहणारी पहाड़ी नदी‌ रामगंगा! घाट उतरून नदी ओलांडून जीप उजवीकडे वळाली. थोडा वेळ चंपावत जिल्हा लागला आणि मग अलमोडा जिल्हा सुरू झाला. दरीमध्ये असलेल्या धुक्याच्या समुद्रावरचा सूर्योदय बघता आला! कडक थंडी आहे! नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा चहा घेतला. अर्थात् आधी हात गरम केले, मग वाफ चेहर्‍यावर घेतली आणि मग चहा! १६०० मीटर उंचीच्या पिथौरागढ़वरून हळु हळु रस्ता हिमालयाच्या पायथ्याकडे जातोय. अर्थात् तो एकदम खाली येत नाही. कित्येक डोंगररांगा ओलांडाव्या लागतात. अनेकदा रस्ता परत वर चढतो. त्यानुसार मध्ये मध्ये सूचीपर्णी वृक्ष दिसत नाही आहेत. कुत्र्यांवरच्या केसाळ कातडीतही फरक जाणवतो! काही‌ वर्षांपूर्वी अगदी दोन- तीन घरं- दुकान असलेलं दन्या गाव आता बरंच मोठं झालेलं दिसतंय! अलमोडा जवळ येतंय. अलमोडा तसं पिथौरागढ़- काठगोदाम रस्त्यावर येत नाही. तिथे सहप्रवाशांना काम आहे, त्यामुळे तेही बघणं होतं आहे. अलमोडा! अगदी डोंगरावर वसलेलं दाटीवाटीचं शहर. खूप दिवसांनंतर शहराची गर्दी अनुभवली! इथे जास्त वेळ थांबलो असतो तर विवेकानंदांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला रामकृष्ण कुटिर हा आश्रम बघता आला असता. पण योग नव्हता. थोडा वेळ अलमोडा शहर बघितलं. एक छोटा वॉकही केला. थोड्या वेळात पुढे निघालो. हळु हळु हिमालयाचा पायथा जवळ येतोय! एका ठिकाणी एका नदीवरच्या पुलापाशी वाहनं‌ थांबली होती. डोंगरावरून वाळू आणि लहान- मोठे दगड पडत आहेत! पहाड़ात अनेक ठिकाणी हे दृश्य दिसतं. थोडा वेळ थांबावं लागलं. ती नदी ओलांडली आणि नैनिताल जिल्हा सुरू झाला. नीम करोली बाबांचं कैंची धाम! त्यांच्याबद्दल फार वाचलं नाहीय. अलीकडे विराट कोहली तिथे गेल्यापासून एकदमच लोक मोठ्या संख्येने येत आहेत. बाहेरून आश्रमाचा परिसर बघितला. योगायोग म्हणजे हा ब्लॉग लिहीण्याच्या थोडे दिवस आधीच कृष्ण दास ह्या त्यांच्या पाश्चात्य शिष्याची रणवीर अलाहाबादियाने घेतलेली मुलाखत ऐकली. खूप सुंदर अनुभव कृष्ण दास जींने सांगितले आहेत. त्यावरून नीम करोली बाबा कोण आणि कसे होते, हा अंदाज येतो!  .  .  पुढचा प्रवास लवकर झाला. हा रस्ता नैनितालच्या थोडा अलीकडून आणि भीमतालच्या जवळून जातो! पायथा जवळ येईल तसं एक सुंदर दृश्यं दिसायला मिळेल. इतका वेळ सगळीकडे पर्वतच पर्वत होते. पण आता हळुच एका बाजूने पर्वताच्या ऐवजी मोठी दरी येईल! पर्वत तीन बाजूंनी असतील आणि एका बाजूने दूरवर जमीन दिसेल! पहाड़ात कुठूनही पायथ्याला येताना हे सुंदर दृश्य दिसतंच! दूरवरून दिसणारी भूमाता! आणि अर्थातच उंचीवरून पायथ्याकडे येताना दिसणारे जैव विविधतले सगळे बदल! झाडं बदलतात, फुलं‌ बदलतात, डोंगराचं स्वरूप बदलतं! काठगोदामला पोहचलो! स्टेशनच्या बाहेर जीपने सोडलं. तिथे जेवण केलं आणि स्टेशनात जायला निघालो. बाजूच्या शाळेत एकदम विद्यार्थ्यांचा गलका ऐकू आला. शाळेच्या आवारात माकडं आल्यामुळे विद्यार्थी एकदम दचकले! नंतर स्टेशनवरही माकडं मस्त फिरत आहेत! काठगोदाम! ब्रिटीशांनी हिमालयात तोडलेली लाकडं वाहून नेण्यासाठी बांधलेलं स्टेशन! कदाचित काष्ठ गोदाम असं नाव असावं. इथून ट्रेन थेट मुंबई सेंट्रलला सोडेल! कुठून कुठे! उत्तर प्रदेश- राजस्थान- मध्य प्रदेश- गुजरात असं करत ३१ तासांचा प्रवास आणि रात्री मुंबईतून पहाटे पुण्यात! पण ह्यावेळची भटकंती अप्रतिम झाली! सुंदर ट्रेक, आकाश दर्शन आणि भेटी! आता उत्सुकता आहे ती जानेवारीत होणार्‍या दक्षिण भारत सायकल प्रवासाची! दक्षिणेत जाण्याआधी उत्तरेत अगदी मुन्सियारीपर्यंत फिरायला मिळालं! वा! वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 10 मार्च 2026.

प्रतिक्रिया द्या
92 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा