Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आ
आजी
Wed, 03/11/2026 - 07:54
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन. अगदी ६० टक्के मिळाले तरी फर्स्ट क्लास मिळाला म्हणून कौतुक व्हायचं. बोर्डात पहिल्या येणाऱ्या मुलाला किंवा मुलीलाही ८५ ते ८८ टक्के मार्क्स असायचे. माझे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांतले मार्क्स दयनीय असत. ते मी आजतागायत कुणालाही सांगितलेले नाहीत, अगदी जवळच्या व्यक्तींनाही नाहीत. मी तर त्यांची स्वतःच्या मनातही आठवण काढत नाही. माझ्या काही थोड्या एक दोन मार्कशीट्स ऊर्फ प्रगतिपुस्तके काळाच्या प्रवाहात देखील अजून टिकून राहिली आहेत. माझ्या नातवापासून मी त्या माझ्या मार्कशीटस् लपवूनच ठेवल्या आहेत. नाहीतर चिमणरावांच्या कथेतल्यासारखी माझी अवस्था व्हायची! गणित, इंग्रजी च्या तासाला तर माझी पार लाजच निघायची. आमचे गणिताचे शिक्षक जीव तोडून गणित शिकवायचे. आणि मी जीव मुठीत धरून ते लेक्चर ऐकायची. आईशप्पथ मला एक अक्षरही कळायचं नाही. सगळं डोक्यावरच्या हवेवरुन जायचं. सर शेवटी जे शिकवलं त्यावर प्रश्न विचारायचे. मी मला काही विचारू नये म्हणून तोंड लपवून बसायची. सरांच्या प्रश्नांची वर्गातली हुशार मुलं, मुली फटाफट उत्तरं द्यायची. मला न्यूनगंड यायचा. सर्वात शेवटी सर मला विचारायचे,"काय ग, तुला समजलं का?" मी शरमून अर्ध्यामुर्ध्या झालेल्या स्वरात म्हणायची "हो. समजलं." मग सर म्हणायचे,"चला, हिला समजलं म्हणजे सगळ्या वर्गाला समजलं."आणि सगळा वर्ग हसायचा. आत्ताच्या काळात शिक्षक असं वागतील का? पालक भांडायला येतील! पण आमच्या काळात घरीही आमची अभ्यासावरुन खरडपट्टी काढली जायची. इंग्रजीच्या सरांनी एकदा वर्गात अचानक शब्दांची स्पेलिंग्ज घातली. त्यांनी दहा शब्द घातले. अन् हाय रे माझ्या कर्मा! माझी दाहीच्या दाही स्पेलिंग्ज चुकली. पण सर रागावले नाहीत. माझ्या बाकाजवळ येऊन ते म्हणाले,"उद्या मी पुढच्या धड्यातली स्पेलिंग्ज घालणार आहे. नीट पाठ करुन ये. एकही चूक होता कामा नये." मी साश्रू नयनांनी होकारार्थी मान डोलावली. शाळा सुटल्यावर घरी गेले. आईनं दिलेलं काहीही न खाता स्पेलिंग पाठ करायला बसले. सर्व प्रयत्न त्यात ओतले. दुसऱ्या दिवशी सरांनी वर्गात स्पेलिंग्ज घातली. आणि माझी चक्क सर्व स्पेलिंग्ज बरोब्बर आली. मला दहापैकी दहा मार्क मिळाले. म्हणजे शत प्रतिशतच नाही का? सरांनी माझ्या पाठीवर थोपटत मला शाबासकी दिली. मला म्हणाले,"डोकं आहे तुला. हुशार आहेस तू. अभ्यासाकडे लक्ष दे. आळशीपणा करु नकोस." मला आनंद झाला. असे हवेत शिक्षक,हो ना? विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश देणारे! धीर देणारे. त्यानंतर माझं इंग्रजी सुधारलं. अगदी शतप्रतिशत नाही पण शतपैकी अर्धशतक झळकावलं मी! हा प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. मला फिजिक्स ऊर्फ पदार्थविज्ञान आणि केमिस्ट्री ऊर्फ रसायनशास्त्र हे विषयही अंमळ कठीणच जायचे. हायजिन फिजिऑलाॅजी (हो. असा विषय तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री ऐवजी उपलब्ध होता), आणि इभूना म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे विषय मला आवडायचे. आणि मला त्यांत शतप्रतिशत नाही तरी पाऊण प्रतिशत मार्क्स मिळायचे. माझी एक मैत्रीण अतिशय अद्वितीय आणि महान होती. ती चक्क फिजिक्स केमिस्ट्री घेऊन M.sc झाली. नंतर तिचा भीमपराक्रम म्हणजे ती पदार्थ विज्ञानात Ph.D झाली नंतर ती अमेरिकेत (यू नो) गेली. त्या जुन्या काळात! तिथल्या विद्यापीठांत ती फिजिक्स आणि गणित शिकवायला लागली. आज सत्तरी ओलांडली तरी ती अजून शिकवते आहे! तिनं मात्र अनेकदा शतप्रतिशत गुण मिळवले. 'गुणी' आहे माझी मैत्रीण! मी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र माझे नावडते विषय मी सोडून दिले. फक्त आवडत्या विषयांचा मन लावून, आवडीने, कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला आणि प्रत्येक परीक्षेत शत प्रतिशत नाही तरी घवघवीत यश, प्रसिद्धी मिळवली आणि कृतार्थ आणि गौरवपूर्ण जीवन जगले. जगते आहे. मला वाटतं प्रत्येकाला असा आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली तर शतप्रतिशत हे स्वप्न राहणार नाही. ह्या शतप्रतिशत वरुन आठवण झाली. हा शब्द कसा आणि केव्हा रुढ झाला ते आठवलं. काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाने निवडणुकीत शतप्रतिशत यश मिळवण्याचा निर्धार केला आणि त्याप्रमाणे धोरण ठेवून प्रचाराची आखणी केली. त्या पक्षाच्या उमेदवारांना अगदी शतप्रतिशत नाही पण चांगलं यश मिळालं. पण शाळा कॉलेजातलं हे अमुक तमुक प्रतिशत यश पुढच्या व्यावहारिक जीवनात फारसं विचारात घेतलं जात नाही. आपला खटला चालविणाऱ्या वकीलाला,घर बांधणाऱ्या इंजिनिअरला किंवा आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कुणीही ,"काय हो, तुम्हांला तुमच्या पदवी परीक्षेत किती टक्के गुण मिळाले होते?", असं विचारत नाही. एकुणात काय तर आपण आपलं जीवन जगताना आपलं कर्तव्य शतप्रतिशत आणि.. शतप्रतिशत प्रामाणिकपणे पार पाडावं. भरभरून शतप्रतिशत जगावं. शतप्रतिशत रसिकतेनं कलांचा आस्वाद घ्यावा. शतप्रतिशत सामाजिक ऋण फेडावं. इथे हे असे मिळवावेत शतप्रतिशत गुण !!!

प्रतिक्रिया द्या
239 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा